माचादो इ रूईथ, आनतोन्यो : (१८७५–१९३९). स्पॅनिश कवी. जन्म सेव्हिल येथे. शिक्षण माद्रिद शहरी. सोरेल येथे एका शाळेत काही वर्षे त्याने फ्रेंच भाषेचे अध्यापन केले. Soledades (१९०३) हा त्याच्या कवितांचा पहिला संग्रह. निसर्गदृश्यांतून स्वतःची भावावस्था व्यक्तविण्याची त्याची प्रवृत्ती ह्या काव्यसंग्रहातून प्रत्यायास येते. Campos de Castilla (१९१२) ह्या त्याच्या दुसऱ्या काव्यसंग्रहातील कविता चिंतनशीलतेकडे विशेष झुकलेली दिसते. ईश्वराचा शोध घेण्याची धडपड तसेच कॅस्टील ह्या स्पेनमधील प्रदेशाबद्दल त्याला वाटणारे उत्कट प्रेम काव्यसंग्रहात दिसते. स्पेनच्या राजकीय-सामाजिक प्रश्नांबद्दलची त्याची तीव्र जाणीवही ह्या संग्रहातील काही कवितांतून व्यक्त झालेली आहे. आनतोन्योची काव्यशैली साधी–काही वेळा गद्यप्रायही–आहे. तथापि वरवर साध्या वाटणाऱ्या ह्या शैलीतून खोल अर्थाचे अनुनाद उमटत असल्याचे अनुभवास येते. आनतोन्योची संपूर्ण कविता Poesias Completas१९१७ साली प्रसिद्ध झाली. १९२७ साली स्पॅनिश रॉयल अकादमीवर त्याची निवड झाली होती.
स्पेनमधील यादवी युद्धात आनतोन्योने प्रजासत्ताकाच्या बाजूची भूमिका घेतली. १९३८ साली तो देशाबाहेर गेला पायी फ्रान्समध्ये आला. तेथे असताना कॉल्यूर येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.