माओ त्से-तुंग (माव झ-दुंग) : (२६ डिसेंबर १८९३–९ सप्टेंबर १९७६). आधुनिक लाल चीनचा शिल्पकार, मुत्सद्दी आणि लेनिन-मार्क्सवादी विचारसरणीचा महान पुरस्कर्ता. हा माव श्वुन-षंग व वन च्यी-मे या दांपत्याचा ज्येष्ठपुत्र. त्याचा हूनान प्रांतातील शाव-शान या गावी शेतकरी कुटुंबात जन्म झाला. शाव-शानच्या प्राथमिक शाळेतील शिक्षणानंतर सुमारे तीन वर्षे तो घरच्या शेतीवर राबला. त्यानंतर पित्याच्या विरोधास न जुमानता तो आपल्या आजोळी माध्यामिक शिक्षणासाठी गेला. लहानपणी सान-ग्वो-जृ, र्श्व-हू- ज्वान इत्यादी कथा कादंबरी साहित्य व मीन ली-वाव ह्या लोकशाहीवादी वृत्तपत्राच्या लिखाणाने तो अतिशय प्रभावित झाला. १९११ च्या क्रांतियुद्धात स्वयंसेवक म्हणून लढल्यावर पाच वर्षे त्याने हूनानच्या प्रांतिक अध्यापन विद्यालयात शिक्षण घेतले. या काळात हक्सली, मिल, डार्विन, ॲडम स्मिथ वगैरे विचारवंतांच्या साहित्याच्या वाचनाने त्याला आधुनिक पाश्चात्त्य विचारप्रवाहांची चांगली माहिती झाली. यानंतर काही काळ त्याने पीकिंग विद्यापीठाच्या ग्रंथालयात कारकुनी केली. अध्यापन विद्यालयातील विद्यार्थी संघटनांच्या द्वारे त्याने सार्वजनिक कार्याचे प्राथमिक धडेही गिरविले.
माओने स्यांग-ज्यांग-फींग-ल्वुन हे मासिक १९१९ मध्ये काढले पण यातील छांगशाचा लष्करी गव्हर्नर जांग ज्यींग-यावच्या अन्याय्य कारभारावरील कडक टीकेमुळे त्याला मासिक बंद करून पीकिंगला पळ काढावा लागला. या काळात विद्यापीठ ग्रंथपाल ली दा-जावच्या प्रभावाने त्याचा मार्क्स-लेनिन वगैरेंच्या लिखाणाशी व कम्युनिस्ट चळवळीशी संबंध आला.
शांघाय येथील चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला माओ हूनान प्रांताचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित होता (१९२१). १९२३ पर्यंत हूनान शाखेचा चिटणीस म्हणून पक्ष प्रचाराचे व मंजूर संघटनेचे कार्य त्याने केले परंतु एका खाणीत संप घडवून आणल्यामुळे त्याच्यावर पकड वॉरंट सुटल्याने तो शांधायला निसटला.
या काळात देशोदेशींची कम्युनिस्ट चळवळ रशियातील पक्षप्रमुखांच्या आदेशानुरूप चाले. अविकसित देशांतील कम्युनिस्टांनी तेथील राष्ट्रवादी पक्षांशी सहकार्याचे धोरण ठेवावे, ह्या लेनीनप्रणीत तत्त्वानुसार माओने काही काळ क्वोमिंतांग (ग्वोमिनदांग) पक्षाचेही काम केले. हे कार्य करीत असताना तो शेतमजुरांच्या संघटना उभारण्यात बराच व्यग्र राही. येथे आलेल्या अनुभवांवरून मांचू राजवट व पाश्चात्त्यांच्या साम्राज्याशाही विरुद्धच्या लढ्याचे प्रमुख उद्दिष्ट चीनचा जमीन वाटपाचा प्रश्न सोडविणे हाच असावा. जमीन वाटपाचा प्रश्न सुटल्याशिवाय उद्योग व व्यापार यांचा विकास होणार नाही, असे त्याचे ठाम मत बनले. याच संबंधी त्याने ‘हूनानमधील शेतकरी चळवळीचा अहवाल’ हा लेख प्रसिद्ध केला.
शहरी कारखान्यातील संघटित श्रमिक कोणत्याही देशात कम्युनिस्ट क्रांती घडवून आणू शकतील, या रशियामान्य सिद्धांताविरुद्ध ‘संघटित शेतमजूरच चीनमध्ये क्रांती घडवून आणण्याची जास्त शक्यता आहे’ या माओच्या हूनान प्रांतातील शेतमजूरांच्या चळवळीवरील अहवालावरून चिनी कम्युनिस्ट पक्षात १९२७ मध्ये खूपच वादंग माजले. माओच्या सूचना फेटाळून लावण्यात आल्या. यानंतर लवकरच क्वोमिंतांग शासनाने कम्युनिस्टांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली व त्यामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षाची दाणादाण उडाली. तरीही ली ली-सान व छन शाव-यूसारखे कम्युनिस्ट पुढारी मॉस्कोच्या सूचनानुसार शहरी मजूर संघटनांमार्फत क्रांतीची उठावणी करण्याचीच भाषा बोलत होते. माओने मात्र हूनान किआंगसी प्रांताच्या सरहद्दीवरील दऱ्या-खोऱ्यात आपले कम्युनिस्ट सैन्य गोळा केले व तेथून चळवळीची सूत्रे हलविण्यास सुरुवात केली. लवकरच त्यास जू द याचे सैन्यही येऊन मिळाले व माओच्या संघटना कौशल्यामुळे चीनच्या ह्या भागात लहान लहान स्वायत्त कम्युनिस्ट राज्येच स्थापन झाली आणि वै ज्यीन येथे माओच्या अध्यक्षतेखाली त्यांचे मध्यवर्ती सरकार काम करू लागले परंतु जपानशी लढण्याच्या अगोदर कम्युनिस्टांना नेस्तनाबूद करण्याच्या चँग कै-शेकच्या निर्धारामुळे माओ चांगलाच कैचीत सापडला. चँगच्या सुमारे तीन लक्ष सैन्याने कम्युनिस्टांना घेरले असता ३६८ दिवसांत सुमारे साडेनऊ हजार किमी. अंतर कापून व अनेक हाल अपेष्टांना तोंड देऊन कम्युनिस्टांनी शन्सी प्रांतातील दऱ्याखोऱ्यांत व गुहांत आपली ठाणी प्रस्थापित केली व तेथून चँगविरुद्ध व जपानविरुद्धही आपला लढा चालू ठेवला. क्वोमिंतांग सैन्यापुढे माधार घेत असता, ‘शत्रूने आक्रमण केले की आम्ही माघार घेतो त्याने छावणीत मुक्काम केला की आम्ही त्याच्यावर हल्ले करून त्याला त्रस्त करतो शत्रू लढाईला तयार नाही असे दिसले की आम्ही आक्रमक पवित्रा घेतो व शत्रूने माघार घेतली की आम्ही त्याचा पाठलाग करतो’ या माओच्या गनिमी डावपेचांनी शत्रूला नाकीनऊ आणले. यानंतर १९३६ मध्ये जांग स्यूए-लियांगने चँग कै-शेकला कैद केले तेव्हा कम्युनिस्टांनी जपानशी एकजुटीने लढण्याच्या शर्तीवर त्याची सुटका करविली व पुढील काही वर्षे क्वोमिंतांग नाममात्र नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सैन्ये जपानशी लढत राहिली परंतु दुसऱ्या महायुद्धात जपानने शरणागती पतकरताच क्वोमिंतांग व कम्युनिस्ट यांच्यात पुन्हा युद्ध सुरू झाले. दोहोंत तडजोड घडवून आणण्याचा अमेरिकेने केलेला प्रयत्न फसला. या युद्धात क्वोमिंतांगचे लाखो सैनिक त्याच्या अधिकाऱ्यांसह कम्युनिस्टांना शरण गेले. शेवटी चँग कै-शेकचा निर्णायक पराभव होऊन चीनवर कम्युनिस्ट अंमल चालू झाला.
विसाव्या शतकातील १९५० ते १९७२ दरम्यान वीसबावीस वर्षांचा चीनचा इतिहास म्हणजे माओच्या ध्येयधोरणांची कथाच होय.यांपैकी सु. दहा वर्षे माओ कम्युनिस्टपक्षाचा अध्यक्ष व राष्ट्रप्रमुखही होता. साहजिकच चिनी प्रजासत्ताकाची भक्कम पायावर उभारणी करण्याचे बरेच श्रेय त्यालाच द्यावे लागते. १९५८ च्या झपाट्याने प्रगती करण्याच्या कार्यक्रमात किंचित अपयश आल्याने कम्युनिस्ट पक्षातील माओविरोधी गटाचे महत्त्व वाढले व १९५९ च्या एप्रिलमध्ये माओने राष्ट्रध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले परंतु कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष या नात्याने ‘सच्चा मार्क्स-लेनिनवाद्याला वर्गविग्रहाचा कधीच विसर पडता कामा नये’, या तत्त्वाचा पुरस्कार करून माओने अमेरिकेशी जुळते घेण्याच्या ख्रुश्चॉव्ह नीतीस कसून विरोध केला तथापि चीनमध्येच खुश्चॉव्हवादी ल्यव शाव-च्यी यांनी त्याला कसून विरोध केल्यामुळे माओने ‘लाल सैनिक’ आणि चिनी ‘जन मुक्तिसेना’ यांच्या मदतीने ‘सांस्कृतिक क्रांती’ घडवून आणून चिनी कम्युनिस्ट पक्षातील विरोधी गटांचा बीमोड केला. चीनमध्ये माओवादाचा विजय झाला. त्यामुळे यापुढे काही वर्षे चीनचे राजकारण माओच्या मतानुसार चालणार हे उघडच होते.
माओने जवळजवळ अर्धशतक चिनी साम्यवादी पक्षाची आणि राष्ट्राच्या उभारणीची धुरा वाहिली. या काळात त्याने जनतेला अनेक अभिनव प्रयोग करण्यास उद्युक्त केले. त्यांतील काही यशस्वी झाले तर काही फसले परंतु चीनसारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या व स्थितिशील देशातील जनतेला परिवर्तनाच्या प्रयोगात सहभागी करण्याचे धाडस त्याने केले. मार्क्स-लेनिन आदी साम्यवादी विचारवंताच्या ग्रंथांचा व साम्यवादी चळवळीच्या इतिहासाचा माओचा गाढ व्यासंग त्याच्या विविध लिखाणात स्पष्टपणे दिसून येतो. माओ कवी होता आणि इतिहासाचा चिकित्सक व्यासंगी होता. त्याच्या अनेक भाषणांतून इतिहासाचे दाखले आढळतात व काव्यमय दृष्टीही दिसते तथापि माओचा वेगळेपणा चीनच्या विशिष्ट परिस्थितीत शेतमजुरांना संघटित करून चीनमध्ये क्रांती घडवून आणण्यात त्याने दाखविलेली स्वतंत्र विचारसरणी व मान्य पोथीनिष्ट सिद्धांतांविरुद्ध वागण्याचे मनोधैर्य या गुणांत आहे. या गुणांच्या मागे माओ हा साम्यवादी असूनही त्याची कट्टर राष्ट्रवादी दृष्टी दिसते. त्यामुळेच चिनी जनतेवर माओ इतका प्रभाव कन्फ्यूशिअसनंतर कोणत्याही नेत्याने आतापर्यंत पाडलेला दिसत नाही.
अखेरच्या दिवसांत पार्किन्सन्सच्या आजाराने तो जखडला गेला. साहजिकच माओ प्रकृती अस्वाथ्यामुळे सार्वजनिक जीवनापासून अलिप्त एकांत स्थळी राहिला तथापि त्याची पत्नी झियांग क्वंग सर्व समारंभांना हजर राहत असे आणि माओनंतर बहुधा तीच पक्षाची अध्यक्ष होईल, असे राजकीय वर्तुळात विचार प्रसृत झाले पण माओचे पीकिंगमध्ये आकस्मिक निधन झाल्यानंतर चीनच्या अंतर्गत राजकारणाला वेगळी दिशा प्राप्त झाली व कट-कारस्थानांना उत आला.
संदर्भ : 1. Bandyopadhyaya, Jayantanuja, Mao-Tse-Tung and Gandhi, Madras, 1973.
2. Ch’en, Jerome, Ed. Mao Papers : Anthology and Bibliography, Oxford, 1970.
3. Devillers, Philippo, Trans, White, Tony, Mao, London, 1969.
4. Garvey, J. E. Marxist-Leninist China : Military and Social Doctrine, New York, 1960.
5. Griffith, S. B. The Chinese People’s Liberation Army, London, 1968.
6. Snow, Edgar, Red Star Over China, London, 1969.
७. दळवी, म. य. माओ आणि चीन, औरंगाबाद १९८४.
ओक, द. ह.
“