माइस्टर सिंगर : संगीत जाणणाऱ्या जर्मन कवींचा एक वैशिष्ट्यपूर्ण संप्रदाय. चौदावे ते सोळावे शतक असा ह्या संप्रदायाचा कालखंड साधारणतः सांगता येईल. पूर्वकालीन बारा श्रेष्ठ कवींचा (मास्टर्स) वारसा ते सांगत असल्यामुळे त्यांना ‘माइस्टरसिंगर’ (इं. अर्थ मास्टरसिंगर) म्हणून ओळखले जाते. ह्या संप्रदायातील कवी मुख्यतः कारागीर आणि व्यापारी वर्गातले होते. कवितेचा विषय, छंद, भाषा इ. बाबतींतल्या नियमांबाबत हे कवी अत्यंत काटेकोर होते. संगीत आणि काव्यकला शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी बंधुत्वकल्पनेवर आधारलेले त्यांचे संघ (गिल्ड्स) तयार झाले होते त्यांनी ठिकठिकाणी गीतशाळाही काढल्या होत्या.
ह्यांच्या कवितेचे विषय सामान्यतः धार्मिक असून तिचा सूर बोधवादी होता. ह्या संप्रदायातील उल्लेखनीय कवींत हान्स रोझेन्प्लूट, हान्स फोल्झ आणि ⇨ हान्स झाक्स (१४९४–१५७६) ह्यांचा समावेश होतो.
कुलकर्णी, अ. र.
“