मॅलॅकाइट : (ग्रीन कॉपर कार्बोनेट). खनिज. स्फटिक एकनताक्ष, सुईसारखे पण क्वचित आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. सामान्यतः हे कणमय वा मातीसारख्या व कधीकधी झुंबराकार, तंतुमय इ. रूपांत आढळते. याचे पृष्ठ मऊ व गुच्छाकार, स्तनाकार किंवा मूत्रपिंडाकार असते आणि अंतर्गत रचना अरीय (त्रिज्यीय) असते. ⇨ पाटन : (001) चांगले, मात्र क्वचित दिसते. ठिसूळ. कठिनता ३·५–४. वि. गु. ३·९– ४·०३. चमक-स्फटिकांची हिऱ्यासारखी ते काचेसारखी, तंतुमय प्रकाराची रेशमासारखी वा मखमलीसारखी आणि संपुंजित प्रकाराची मंद. हे हिरव्या रंगाच्या विविध छटांचे असून कधीकधी यात विविध छटांचे पट्टे आढळतात. कस रंगापेक्षा फिकट, दुधी काचेप्रमाणे पारभासी ते अपारदर्शक [⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. Cu2CO3 (OH)2. बंद नळीत तापविल्यास यातून पाणी बाहेर पडते व त्याचा रंग काळा होतो. हे थंड अम्लांत विरघळताना फसफसते व हिरवा विद्राव तयार होतो. हे अतिशय विषारी आहे. तांब्याच्या खनिजांत बदल होऊन हे बनलेले असते. हे विस्तृतपणे आढळते. विशेषतः चुनखडकांमधील तांब्याच्या धातुक (कच्च्या धातूच्या) शिरांमधील वरच्या ऑक्सिडीभूत [⟶ ऑक्सिडीभवन धातुक निक्षेप] पट्ट्यात ॲझुराइट, क्युप्राइट, नैसर्गिक तांबे, लोहाची ऑक्साइडे. लोह व तांब्याची सल्फाइडे यांच्याबरोबर हे आढळते. अशा तऱ्हेने खालील भागात तांब्याचे सल्फाइडी धातुक असल्याचे हे निदर्शक आहे व अशा प्रकारे याचा तांब्याच्या धातुकांचा शोध घेण्यासाठी उपयोग करतात. हे कृत्रिम रीतीनेही बनविता येते.
रशिया, फ्रान्स, नैर्ऋत्य आफ्रिका, ऱ्होडेशिया, झाईरे, झँबिया, क्यूबा, चिली, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी इ. प्रदेशांत हे आढळते. भारतात आंध्र प्रदेश, बिहार, राजस्थान इ. भागांत तांब्याची धातुके आढळतात व त्यांपैकी काही ठिकाणी मॅलॅकाइट थोड्या प्रमाणात सापडते.
तांबे मिळविण्यासाठी याचा गौण धातुक म्हणून उपयोग होतो. याला चांगली झिलई होते व म्हणून विशेषतः रशियात शोभिवंत नक्षीकामात व शोभिवंत वस्तू (उदा., फुलदाण्या, रक्षापात्रे, दागिन्यांच्या पेट्या इ.) बनविण्यासाठी हे वापरतात. रत्न म्हणूनही याचा उपयोग होतो (उदा., ख्रिस्ती उच्च धर्मगुरूच्या छातीवरील रत्नजडित पदकामध्ये हा पवित्र खडा असतो) परंतु हे मऊ असल्याने टिकत नाही. याचे चूर्ण रंगद्रव्य म्हणून वापरतात.
हिब्रू ज्याला ‘सोहम’ म्हणतात तो दगड मॅलॅकाइट हा होय, असे काहींचे मत आहे. भूतबाधा, वीज पडणे, रोग वगैरेंपासून मॅलॅकाइटाने रक्षण होते, असा समज असल्याने काही लोक याची कडी वापरतात.
मॅलोच्या पानांसारखा याच्या रंगावरून हिरवा या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे मॅलॅकाइट हे नाव आले असावे.
पहा : तांबे.
ठाकूर, अ. ना.