मॅलरी, सर टॉमस : (?–१४ मार्च १४७१) मध्ययुगीन इंग्रज साहित्यिक, मॉर्ट द आर्थर ह्या विख्यात रोमॅन्सचा कर्ता. त्याची जन्मतारीख अज्ञात आहे तसेच त्याच्या जीवनाविषयीचे अन्य तपशीलही फारसे उपलब्ध होत नाहीत. मॉर्ट द आर्थर ह्या रोमॅन्समध्ये लेखकाने केलेल्या स्वतःच्या उल्लेखावरून ‘सर टॉमस मॅलरी’ हे त्याचे नाव असल्याचे दिसून येते. हा ग्रंथ आपण इंग्लंडचा राजा चौथा एडवर्ड ह्याच्या कारकीर्दीच्या नवव्या वर्षात ( ४ मार्च १४६९–३ मार्च १४७०) लिहिला, असेही त्याने म्हटले आहे. रोमॅन्सलेखनाच्या वेळी लेखक तुरुंगात होता, असेही त्यातील उल्लेखावरून दिसते. ह्या सर्व उल्लेखांच्या आधारे ‘सर टॉमस मॅलरी’ म्हणून जो ओळखण्यात आला आहे, तो वॉरिकशरमध्ये राहणारा होता. त्यालाही तुरुंगवास घडला होता. १४६८ आणि १४७० ह्या साली चौथ्या एडवर्डने गुन्हेगारांना जी सार्वात्रिक माफी जाहीर केली होती, त्यातून ‘नाइट’ असलेल्या एका टॉमस मॅलरीला वगळण्यात आले होते. यॉर्कशरमध्ये राहणारा एक टॉमस मॅलरी ह्या रोमॅन्सचा कर्ता असावा, असेही मत पुढे आलेले आहे तथापि ह्या टॉमस मॅलरीला ‘नाइट’ हा किताब मिळाल्याचा पुरावा कोठे आढळलेला नाही. वॉरिकशरमध्ये राहणाऱ्या टॉमस मॅलरीला ‘नाइट’ हा किताब निश्चितपणे मिळालेला होता म्हणून मॉर्ट द आर्थर ह्या रोमॅन्सचा कर्ता तोच असावा असे सामान्यतः मानले जाते. ह्याचे सारे आयुष्य मारामाऱ्या, लूटमार व दंगेधोपे ह्यात गेले. त्याला मृत्यूही तुरुंगातच आला असावा.

मध्ययुगीन इंग्रजी साहित्यात फ्रेंच वीरकाव्यांवर आधारलेल्या रोमॅन्सचा बराच प्रसार झाला होता. शूर, दिलदार नायक, सद्‌गुणी, सौंदर्यसंपन्न नायिका, जादू व चमत्कार ह्यांनी भरलेल्या ह्या काव्यांची कथानके ग्रीक, रोमन, फ्रेंच व पौर्वात्य कथा तसेच वेल्समधील आर्थर राजाच्या आख्यायिका ह्यांतून घेतलेली असत. मॅलरीचा मॉर्ट द आर्थर हा रोमॅन्स आर्थर राजाच्या आख्यायिकांवर आधारलेला आहे.

आर्थर राजाच्या शूर वीरांनी सजविलेले गोलमेज, आर्थर राजाची राणी ग्विनिव्हिअर व त्याचा सरदार लान्सलट ह्यांच्यातील अनैतिक संबंधांमुळे आर्थरच्या राज्याचा झालेला ऱ्हास , त्याच्या सरदारांनी ख्रिस्ताचा पवित्र चषक (होली ग्रेल) शोधण्याचे केलेले प्रयत्न आणि त्यांत स्वच्छ चारित्र्य असलेल्या गॅलॅहॅड ह्याला लाभलेले यश हा त्या रोमॅन्समधील मुख्य कथाभाग होय. मॅलरी हा एक कुशल निवेदक होता. ह्या रोमॅन्सच्या मूळ फ्रेंच आधारग्रंथांतील शब्दावडंबर काढून टाकून आर्थर राजाच्या कथेतील उदात्तता, अद्‌भुतरम्यता आणि कारुण्य ह्यांची प्रभावी प्रचीती त्याने भावगेय शैलीत लिहिलेल्या रोमॅन्समधून दिली आहे.

आठ कथांचा मिळून तयार करण्यात आलेला हा रोमॅन्स विल्यम कॅक्स्‌टन ह्याने प्रथम छापला (२१ भाग, १४८५).

संदर्भ : 1. Lumiansky, R. M. Malory’s Originality : A Critical study of Le Morte D arther, 1964.

            2. Scudder, V. D. Le Morte d’ Arthur of Sir Thomas Malory and its Sources, 1917.

            3. Vinayer, E. Ed. The Works of Sir Thomas Malory, 3 Vols., 1947.

नाईक, म. कृ.