मॅरांटामॅरांटा : (कुल-मॅरेंटेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पती, आवृत्तबीज उपविभाग] एकदलिकित वर्गातील एक प्रजाती. ह्यामध्ये सु. २३ जातींचा अंतर्भाव असून त्यांचा प्रसार उष्ण कटिबंधी अमेरिकेती आहे. तथापि इतर देशांत बागांत, पादपगृहांत (विशिष्ट तापमान, प्रकाश, सावली इ. नियंत्रित परिस्थिती ठेवलेल्या बंदिस्त खोल्यांत) किंवा कुंड्यांतून त्यांची लागवड करतात. त्यांना शोभिवंत व विविध प्रकारे चित्रित पाने असतात. कॅलाथिया प्रजातीतील जातींतही अशीच आकर्षक पाने आढळतात. या वनस्पतींना ओलसर जमीन व छाया मानवते. मॅरांटाच्या जाती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या), उंच किंवा खुज्या उभ्या किंवा पसरट ⇨ औषधी असतात. पाने मूलज (मुळांच्या वरच्या टोकावर येणारी) किंवा स्कंधोद्‌भव (वायवी खोडावरची) फुले लहान व मंजरी किंवा शाखायुक्त मंजरीवर येतात. यांची इतर शारीरिक लक्षणे मॅरेंटेसी कुलात [⟶ सिटॅमिनी] वर्णिल्याप्रमाणे असतात. संदले ३, सर्व सारखी, तरवारीसारखी पुष्पमुकुट कमीअधिक नलिकाकृती व सामान्यपणे तळाशी पसरट तीन पाकळ्या काहीशा सारख्या व टोकाकडे नागफडीप्रमाणे वाकलेल्या बाहेरील दोन वंध्य केसर पाकळ्यांसारखे, दिखाऊ, लंबगोल पण तळाशी निमुळते किंजपुटात एक कप्पा असतो [⟶ फूल]. फळ (बोंड) एकबीजी बीज अध्यावरणयुक्त (बीजावरच्या नित्य आवरणावर एक अधिक आवरण असलेले) असते व परिपुष्काने (गर्भाच्या अन्नांशाबाहेरच्या ऊतकाने म्हणजे समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहाने) नालासारखा गर्भ वेढलेला असतो. या प्रजातीत मूलक्षोड व ग्रंथिक्षोड [⟶ खोड] आढळते व ते कमीजास्त प्रमाणात जाड किंवा स्थूल असते. त्यांचा उपयोग लागवडीकरिता होतो. मॅरांटा ॲरुंडिनॅशिया (वेस्ट इंडियन आरारूट) ह्या जातीच्या खोडापासून ‘आरारूट’ मिळते.

पहा : आरारूट तवकीर सिटॅमिनी.

जमदाडे, ज. वि.