मॅन्सफील्ड कॅथरिन : (१४ ऑक्टोबर १८८८–१ जानेवरी १९२३). इंग्रज कथालेखिका. जन्म वेलिंग्टन, न्यूझीलंड येथे. शिक्षण लंडनमध्ये. संगीतक्षेत्रात शिरण्याचा तिचा आरंभी विचार होता तथापि तो सोडून देऊन १९०९ मध्ये जॉर्ज बोडन ह्या गृहस्थांशी विवाह नंतर घटस्फोट (१९११). १९१३ मध्ये विख्यात साहित्यसमीक्षक जॉन मिडल्‌टन मरी ह्याच्याशी तिने विवाह केला. प्रकृती बिघडल्यामुळे फ्रान्स आणि जर्मनी ह्या देशांत तिला काही काळ वास्तव्य करावे लागले. फ्रान्समधील फोतेंब्लो येथे ती निधन पावली.

इन अ जर्मन पेन्शन (१९११) हा तिचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर ब्लिस (१९२०), द गार्डन पार्टी (१९२२), द डव्ह्‌ज नेस्ट (१९२३) हे तिचे विशेष उल्लेखनीय कथासंग्रह प्रसिद्ध झाले. तिच्या लेखनावर विख्यात फ्रेंच लेखिका सीदोनी गाब्रीएल कोलेत, रशियन कथाकार अंतॉन चेकॉव्ह आणि फ्रेंच कादंबरीकार मार्सेल प्रूस्त ह्यांच्या साहित्याचे संस्कार दिसून येतात परंतु तिच्या स्वतंत्र पृथगात्म प्रतिभेचाही प्रत्यय येतो. मानवतावादी दृष्टिकोण, मार्मिक व्यक्तिरेखन, वरवर साध्या वाटाणाऱ्या प्रसंगांमागील गुंतागुंत सूक्ष्मपणे दाखविणे आणि प्रभावी वातावरणनिर्मिती ही तिच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. समकालीन तसेच तिच्या नंतरच्या पिढ्यांतील लेखकांवर तिच्या कथालेखनाचा प्रभाव दिसून येतो.

तिचे रोजनामे (जर्नल्स) आणि तिची पत्रे मिडल्‌टन मरी ह्याने तिच्या निधनानंतर प्रसिद्ध केली.

संदर्भ : 1. Alpers, Anthony, Katherine Mansfield : A Biography, 1953.

            2. Berkman, Sylvia, Katherine Mansfield, A Critical study, 1951.

            3. Cape, Jonathan, The Life of Katherine Mansfield, London, 1980.

            4. Margalanner, Marvin, The Fiction of Katherine Mansfield, Carbondale, Illinois : U.I.S.      Illinois, 1971.

            5. Murry, John Middleton, Katherine Mansfield, and other Literary Portraits, 1949.

बापट, गं. वि.