कॉलिंझ, विल्यम : (२५ डिसेंबर १७२१ – १२ जून १७५९). एक इंग्रज कवी. जन्म चिचिस्टर येथे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर. अनेक महत्त्वाकांक्षी वाड्.मयीन संकल्प त्याने केले. तथापि अस्थिर मन आणि आजारपण यांमुळे ते पूर्णत्वाला जाऊ शकले नाहीत. अधूनमधून त्याला वेडाचे झटकेही येत. चिचिस्टर येथेच आपल्या बहिणीच्या घरी त्यास अकाली मृत्यू आला.

उत्कृष्ट ओडरचनेबाबत कॉलिंझची ख्याती आहे. ‘ओड टू ईव्हनिंग’, ‘ओड टू सिंप्लीसिटी’ आणि ‘ओड ऑन द पॉप्युलर स्यूपरस्टिशन्स ऑफ द हायलॅंड्स ऑफ स्कॉटलंड’ ही त्याची विशेष ख्यातनाम अशी ओडरचना. वेचक शब्दयोजना, गेयता, निर्दोष रचना आणि चिंतनशीलता हे त्याच्या काव्यरचनेचे लक्षणीय विशेष होत. 

देवधर, वा. चिं.