मॅगेलनी मेघ : आकाशगंगेच्या बाहेर पण आकाशगंगेला सर्वांत जवळ असलेल्या अभ्रिकेसारख्या (तेजोमेघासारख्या) दिसणाऱ्या या दोन दीर्घिका (तारामंडळे) भगोलाच्या (पृथ्वीवरील निरीक्षकाला अवकाशातील तारे वगैरे खस्थ पदार्थ ज्या अनंत त्रिज्येच्या एका विस्तीर्ण गोलाला आतून जडविल्यासारखे दिसतात त्या गोलाच्या) दक्षिण ध्रुवाकडील अंगास आहेत. फर्डिनंड मॅगेलन (१४८०–१५२१) या सुप्रसिद्ध सागरी पर्यटकाचे नाव या दीर्घिकांना देण्यात आले आहे. यांपैकी एक मोठी व दुसरी लहान आहे. एडविन पी. हबल यांच्या वर्गीकरणाप्रमाणे व दीर्घिकांना खडबडीत कडा असून तेजस्वी गाभा नसल्याने या अनियमित आकाराच्या (आकारहीन) दीर्घिका आहेत. त्यांना भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका म्हणावे, असे काही ज्योतिर्विदांचे मत आहे [⟶ दीर्घिका].
मोठी दीर्घिका [विषुवांश ५ ता. २६ मि., क्रांती–६९° ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] ही असिदंष्ट्र (डोराडो) व त्रिकूट (मलयाचल, मेन्सा) या तारकासमूहांत आहे आणि लहान दीर्घिका (विषुवांश ० ता, ५६ मि., क्रांती–७३°) कारंडव (तुकाना) या तारकासमूहात आहे. या दीर्घिका पृथ्वीवरून सु. १५ उ. अक्षांशाच्या दक्षिणेकडील स्थानांवरून नुसत्या डोळ्यांनी अंधुक ढगासारख्या दिसू शकतात. हे अंधुक ढग आकाशगंगेपासून सुटलेले किंवा आकाशगंगेचे उपग्रह असल्यासारखे दिसतात. भगोलाचा दक्षिण ध्रुवबिंदू व या दोन दीर्घिका मिळून एक समभुज त्रिकोण दिसतो. आपली आकाशगंगा ही ‘स्थानिक समूह’ रूपात दिसणाऱ्या १७ दीर्घिकांपैकी एक दीर्घिका असून त्यांमध्ये दोन तिळी (जवळजवळ असलेल्या तीन दीर्घिका) आहेत. आकाशगंगा व दोन मॅगेलनी मेध मिळून एक तिळे होते आणि एम ३१, एम ३२ व एनजीसी २०५ या दीर्घिका मिळून दुसरे तिळे होते.
मोठी दीर्घिका आकाशगंगेच्या मध्यापासून १,८०,००० प्रकाशवर्षे दूर असून तिचा व्यास सु. ३०,००० प्रकाशवर्षे (कोनीय व्यास ७° ) आहे. या दीर्घिकेचे वस्तुमान सूर्याच्या ५ X १०९ पट आहे. लहान दीर्घिकेपासून ही सु. २३° कोनीय अंतरावर दिसते. या मोठ्या दीर्घिकेत ५ लक्ष महातारे, असंख्य सामान्य तारे, सामूहिक तारे, युग्म तारे, चल तारे, काही नवताऱ्यांचे अवशेष, सु. ३० गोलाकार तारकागुच्छ, सेफीड चल तारे, महत्तम तारे, वायुरूप मेघ, वायू व आंतरतारकीय धूळ यांचा समावेश आहे [⟶ अभ्रिका आंतरतारकीय द्रव्य तारा]. वायूचे वस्तुमान एकंदर दीर्घिकेच्या वस्तुमानाच्या एकचतुर्थांश आहे. या दीर्घिकेत मृग नक्षत्रातील अभ्रिकेहून कितीतरी पटीनी मोठी व तेजस्वी फासाकार अभ्रिका एनजीसी २०७० चा अंतर्भाव असून ही ज्ञात असलेल्या सर्व अभ्रिकांहून अधिक तेजस्वी आहे. या अभ्रिकेच्या फासाच्या वेटोळ्यात ३० डोराडस ही सूर्याच्या २०,००,००० पट दीप्ती असलेली अत्यंत तेजस्वी अभ्रिका आहे. या फासाकार अभ्रिकेचा व्यास २०० प्रकाशवर्षे असून ती इतकी मोठी आहे की, ती मृग नक्षत्रातील अभ्रिकेजवळ आणली, तर सर्व मृग नक्षत्र व्यापून टाकील. यांशिवाय या दीर्घिकेत एनजीसी १९१० हा तारकागुच्छ असून त्यात एस डोराडो हा चल महातारा आहे. याची दीप्ती सूर्याच्या दीप्तीच्या ५ लक्ष पट आहे.
लहान मॅगेलनी दीर्घिका आकाशगंगेच्या मध्यापासून २,०५,००० प्रकाशवर्षे दूर असून तिचा व्यास सु. १५,००० प्रकाशवर्षे (कोनीय व्यास ४° ) आहे. या दीर्घिकेचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या ४ X १०८ पट आहे. ही दीर्घिका अंधुक असून पौर्णिमेच्या रात्री दिसू शकत नाही. या दीर्घिकेतील वायूचे वस्तुमान एकंदर दीर्घिकेच्या वस्तुमानाच्या एकतृतीयांश आहे. यामध्ये आंतरतारकीय धूळ जवळजवळ नसल्यामुळे या दीर्घिकेमधून दूर पाहताना त्या दिशेतील अन्य दीर्घिका दिसू शकतात. हिच्यात थोडे नील महातारे असून प्रकार I च्या सामूहिक ताऱ्यांचे [⟶ तारा] प्रमाण जास्त आहे पण प्रकार II च्या सामूहिक ताऱ्यांची संख्या मोठ्या दीर्घकेतील तशा ताऱ्यांपेक्षा जास्त आहे.
मॅगेलनी दीर्घिकेमधील सेफीड रूपविकारी ताऱ्यांचा अभ्यास करताना दूरदूरच्या दीर्घिकांची अंतरे काढण्याची एक अभिनव पद्धत शोधली गोली. १९२० मध्ये हार्लो शॅफ्ली यांनी इतर शास्त्रज्ञांच्या मदतीने असे दाखविले की, अशा ताऱ्यांची दीप्ती ही दीप्तीमध्ये होणाऱ्या बदलाच्या आवर्तकालाशी (बदलाच्या एका आवर्तनास लागणाऱ्या काळाशी) सम प्रमाणात असलेली दिसते. स्पंदनाचा आवर्तकाल जितका कमी तितका तारा कमी तेजस्वी असे ठरविता येते. वस्तुमान व दीप्ती यांमधील संबंध माहीत असल्यामुळे वस्तुमान व आकारमान याविषयी कल्पना करता येऊन ताऱ्यांच्या समूहांची वर्गवारी ठरविता येते. मॅगेलनी दीर्घिका आकाशगंगेला अगदी जवळ असल्यामुळे या पद्धतीचा उपयोग करून दुसऱ्या दीर्घिकांमधील सेफीड रूपविकारी तारे, तेजस्वी B व A तारे, तांबडे महातारे व सामान्य नवतारे यांच्या अंगभूत दीप्तींमधील परस्परसंबंध ठरविता येऊ लागले.
दोन्ही दीर्घिकांत मिळून जवळजवळ ५० बिंबाभ्रिका आहेत. सेफीड रूपविकारी तारे लहान दीर्घिकेत बहुसंख्येने असून दुसरे रूपविकारी तारे बहुसंख्येने दोहोंमध्ये आहेत. दोन्ही दीर्घिकांचे दूर जाण्याचे सूर्यसापेक्ष अरीय वेग २६० किमी./से. आणि २६० किमी./से. आहेत परंतु आकाशगंगेच्या केंद्रसापेक्ष पाहताना वेग शून्य असल्याचे आढळते. यावरून या दीर्घिका आकाशगंगेभोवती ग्रहासारख्या भ्रमण करीत असाव्यात असा निष्कर्ष निघतो. मॅगेलनी दीर्घिकांच्या दक्षिण ध्रुवापासून आकाशगंगेला येऊन भिडणारा विद्युत् भाररहित हायड्रोजन वायूचा पट्टा किंवा प्रवाह आढळला आहे. आकाशगंगा व मॅगेलनी दीर्घिका एकमेकींच्या गुरूत्वाकर्षणाच्या बंधनात असून वेलीय (भरती-ओहोटी सदृश) परिणामामुळे हायड्रोजनाचा प्रवाह निर्माण झाला आहे असे वाटते. मोठ्या मॅगेलनी दीर्घिकेच्या आतील दोन किलोपार्सेक (६,५२० प्रकाशवर्षे) भाग हा घन पदार्थासारखा वलन करीत असून त्याच्या एक फेऱ्यास काही शेकडो दशलक्ष वर्षे लागतात. याचा वलनाक्ष दृष्टिरेषेला २५° ते ४५° नी कललेला वाटतो.
लंडन येथील क्वीन मेरी कॉलेजातील ज्योतिर्विवदांना मोठ्या दीर्घिकेत कार्बन मोनॉक्साइडचे रेणू असल्याचे आढळले आहे. आकाशगंगेच्या शेजारच्या दीर्घिकेत ताऱ्यांची निर्मिती कशा प्रकारे होत असावी, याचा विचार करताना या माहितीचा उपयोग होईल. लहान दीर्घिकेतील हायड्रोजन वायूच्या मेघांच्या गतीचा अभ्यास करताना त्यामध्ये भिन्न गतीचे दोन विभाग असलेले आढळले. त्यांमधील तारे व आयनीभवन झालेले (विद्युत् भारित अणूंनी बनलेले) हायड्रोजन मेघ यांच्या गतींच्या निरीक्षणांतही तीच वस्तुस्थिती असल्याचे आढळले. यावरून लहान मॅगेलनी दीर्घिका ही एकामागे दुसरी असलेली जोड दीर्घिका असून तिचे घटक एकमेकांपासून ३० किमी./से. गतीने दूर जात आहेत या त्यामुळे मॅगेलनी मेघ हे प्रत्यक्ष निळे आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
गोखले, मो. ना. नेने, य. रा.