मॅगेलन, फर्डिनंड : (१४८०–२७ एप्रिल १५२१). पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला पोर्तुगीज समन्वेषक व दर्यावर्दी. एका सरदार घरण्यात सब्रोझ येथे जन्म. पोर्तुगालच्या राजघराण्याशी नाते असल्यामुळे हा लहानपणापासूनच राणीकडे कामासाठी राहिला होता. १४९५ मध्ये मॅगेलन पोर्तुगीज राजा मॅन्युएलच्या दरबारात सेवा करू लागला.
तॉर्देसील्यासच्या प्रसिद्ध तहान्वये (१४९४) स्पेन व पोर्तुगाल ह्या दोन महासागर समन्वेषणाच्या बाबतीतील आद्य प्रवर्तक देशांमध्ये समुद्रपार शोधांचे विभाजन करण्यात आले होते. केप व्हर्द बेटांच्या पश्चिमेकडे १,१७६ नाविक मैलांवर उत्तर अटलांटिकमधून जाणाऱ्या मध्यान्हवृत्तास या दोन्ही देशांनी सीमांतरेषा मानली. या रेषेच्या पश्चिमेकडील भागात लागलेल्या वा लागण्याची शक्यता असलेल्या शोधांचे श्रेय स्पेनकडे, तर रेषेच्या पूर्वेकडील भागात लागलेल्या वा लागणाऱ्या शोधांचे श्रेय पोर्तुगालने आपल्याकडे घ्यावे, असे ठरविण्यात आले. दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून केप ऑफ गुड होपद्वारे हिंदी महासागरात शिरण्याचा पोर्तुगालचा उद्देश या करारामुळे साध्य झाला.
फ्रॅन्सिस्कू द आल्मेईदा या पहिल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोहिमेमध्ये (१५०५) मॅगेलन सामील झाला. या मोहिमेचे उद्देश भारतात स्थापन करण्यात आलेल्या पोर्तुगीज तळांचे एकत्रीकरण करणे, तसेच हिंदी महासागरातील व्यापारमार्गावर स्वामित्व प्रस्थापित करणे, असे होते. १६ मार्च १५०६ रोजी कननोर (केरळ) येथे झालेल्या चकमकीत तो जखमी झाला. नंतर मोझँबीकमधील सोफाला बंदरी किल्ला बांधण्याकरिता नूनू पेरेइराबरोबर मॅगेलनची व्हाइसरॉयने रवानगी केली. १५०८ मध्ये तो परत भारतात आला. ३ फेब्रुवारी १५०९ रोजी दीवच्या लढाईत तो जखमी झाला. १५११ मध्ये मॅगेलनने मलॅका या मलेशियाच्या प्रवेशद्वारावर कबजा मिळविण्याच्या मोहिमेमध्ये भाग घेतला व ते काबीज केले. डिसेंबर १५११ मध्ये मलॅकाहून उत्तर जावा, सेलेबीझ इ. बेटांना भेटी देऊन तो मोलकाझमधील बांदा, अँबोइना इ. बेटांपर्यंत जाऊन पोहोचला. तेथे मसाल्याच्या पदार्थांचे वैपुल्य त्याला आढळून आले. पूर्वेकडील सु. ३,२०० किमी. वरील मोलकाझ ही मसाल्याची बेटे बळकाविण्याचे पोर्तुगालचे नंतरचे महत्त्वाचे उद्दिष्ठ होते. १५१२ साली मॅगेलन पुन्हा पोर्तुगालला परतला. पोर्तुगालने मोरोक्को घेण्यासाठी १५१३ मध्ये पाठिविलेल्या सैन्यात मॅगेलनचाही समावेश होता. या लढाईत मॅगेलन शौऱ्याने लढला, तथापि तो जबर जखमी होऊन कायमचा लंगडा झाला. पोर्तुगीजांनी मोरोक्कोमधील ॲझमूर हे शहर जिंकले. मॅगेलनच्या शौर्यामुळे त्याला रणांगणात बढती मिळाली, तथापि पोर्तुगीज राजा पहिला मॅन्युएल याने ही बढती मिळाली, तथापि पोर्तुगीज राजा पहिला मॅन्युएक याने ही बढती मिळाली, तथापि पोर्तुगीज राजा पहिला मॅन्युएल याने ही बढती देण्याचे नाकारले व अन्यत्र कोठेही सेवाचाकरी मॅगेलनने करावी, असे सुचविले. त्यामुळे मॅगेलनने पोर्तुगाल सोडून स्पेनमध्ये जाण्याचे व स्पेनच्या राजदरबारी चाकरी करण्याचे ठरविले. त्यानुसार रूई फॅलेइरो ह्या आपल्या विश्ववर्णनज्ञ (खगोलशास्त्रज्ञ) स्नेह्यासह तो स्पेनमधील सेव्हिल या शहरी गेला आणि त्याने स्पॅनिश दरबारात आपली सेवा रूजू केली. या दरबारात पोर्तुगालचा त्याग करून सेवाचाकरी करणारी काही माणसे होती त्यांपैकी बार्बोसा ह्या अधिकार्यानच्या मुलीशी-बीएट्रिझसी-मॅगेलनने लग्न केले (१५१७).
पश्चिमेकडून हिंदुस्थानला जाण्यासाठी मार्ग शोधून काढण्याच्या कोलंबसच्या प्रयत्नांत अमेरिकेचा शोध लागला होता. व्हास्को नून्येथ बॅल्बोआ ह्या स्पॅनिश समन्वेषकाने (१४७५–१५१९) पनामाच्या संयोगभूमीवरील उंच शिखरावरून पॅसिफिक महासागराचे निरीक्षण केले होते, तथापि पुढे जाण्याचे धाडस अद्यापि कोणीही केलेले नव्हते. मॅगेलनने स्पेनचा राजा पाचवा चार्ल्स याच्यापुढे मसाल्याच्या बेटांपर्यंत जाण्याची योजना मांडली. अखेरीस चार्ल्सने मॅगेलनच्या मोहिमेस मान्यता दिली. तीनुसार जवळजवळ एक वर्ष तयारी करण्यात घालविल्यानंतर २० सप्टेंबर १५१९ रोजी मॅगेलनने ‘सॅनअँटोनिओ’, ‘त्रिनिदाद’, ‘कन्सेप्शन’, ‘व्हिक्टोरिया’ व ‘सँटिआगो’ ही पाच जहाजे, शिधासामग्री, सु. २५० माणसे यांसमवेत स्पेन सोडण्याची सिद्धता केली. दुर्दैवाने ही पाच जहाजे सागरगामी अशी नव्हती त्याचप्रमाणे खलाशी म्हणून मॅगेलनने निवडलेली माणसे विविध देशांची (सु. नऊ देशांची) असून आपल्या नेत्याविषयी विश्वास वा श्रद्धा बाळगणारी नव्हती. मॅगेलनबरोबर त्याचा मेहुणा दुआर्ते बार्बोसा, झ्युआउं सेराओ हा सँटिआगो जहाजाचा अतिशय विश्वासू व समर्थ कप्तान, तसेच आंतॉन्यो पीगाफेत्ता हा इटालियन इतिहासकार, ही मंडळी होती. वेडाचा झटका आल्याने फॅलेइरोला या मोहिमेत सहभागी होता आले नाही. मॅगेलनने २० सप्टेंबर १५१९ रोजी आपली पत्नी व तान्हा मुलगा यांचा निरोप घेऊन आपल्या मोहिमेचे स्पेनच्या सान्लूकार दे बारामेदा बंदरातून प्रस्थान ठेवले. मोहिमेतील पाचही जहाजांचा हा ताफा २६ सप्टेंबर रोजी तेनेरीफ बेटांपाशी गेला ३ ऑक्टोबर रोजी ब्राझीलच्या दिशेने हा ताफा गिनीच्या किनाऱ्याने पुढे सरकला. हा प्रवास सुगम झाला, तथापि पुढे आणखी दक्षिणेकडे जाताना त्यांना वादळांना तोंड द्यावे लागले. २९ नोव्हेंबर रोजी हा ताफा सेंट ऑगस्टीन भूशिराच्या नैर्ऋत्येस ८१ नाविक मैलांवर जाऊन पोहोचला. फ्रिओ भूशिराला वळसा घालून मॅगेलन १३ डिसेंबर रोजी रीओ दे जानेरोच्या उपसागरात शिरला. दक्षिण अमेरिकेच्या टोकाशी समुद्र असावा व त्यातून आपल्याला पलीकडे जाता येईल, अशी त्याची ठाम समजूत होती. ११ जानेवारी १५२० रोजी तो दक्षिण अमेरिकेतील ला प्लाता नदीच्या विस्तीर्ण खाडीत शिरला. तेथून मार्ग असावा या समजुतीने समन्वेषणात त्याने २–३ आठवडे घालविले व अखेरीस तो पुन्हा दक्षिणेस वळला. हिवाळ्याचा त्रास होऊ लागल्याने ४९° २०′ दक्षिण अक्षांशावर असलेल्या सेंट ज्युलियन बंदरामध्ये मॅगेलनच्या ताफ्याने मार्च ते ऑगस्ट १५२० पर्यंत मुक्काम केला. बऱ्याच दिवसांच्या प्रवासामुळे व नवीन वातावरणाने जहाजांवरील खलाशी बेचैन झाले होते. त्याचे पर्यवसान त्यांच्या अयशस्वी बंडात झाले. ईस्टरच्या मध्यरात्री स्पॅनिश कप्तान व खलाशी यांनी पोर्तुगीज नेत्याविरुद्ध गंभीर बंड उभारले. मॅगेलनने हे बंड अतिशय कठोरपणे मोडून काढले. या बंडातील अधिकाऱ्यांना मॅगेलनने कडक शिक्षा केल्या-एकाला त्याने मारून टाकले, तर दुसऱ्याला अन्नपाण्याविना एका निर्जन बेटावर सोडून दिले. २४ ऑगस्ट १५२० रोजी या मोहिमेने सेंट ज्युलियन बंदर सोडले व जहाजे पुढे हाकारली. यानंतर सँटिआगो हे जहाज सांताक्रूझ नदीमुखापाशी फुटल्याने त्यावरील खलाशांना इतर जहाजांमध्ये सामावून घेण्यात आले. या बंदराच्या आजूबाजूच्या भागातील लोकांचे (आदिवासींचे) पाय प्रमाणापेक्षा मोठे दिसल्यावरून मॅगेलनने या प्रदेशाला दिलेले ‘पॅटागोनिया’ (पॅटॅगोन-मोठ्या पायांचे) हे नाव आजही प्रचलित आहे. २१ ऑक्टोबर रोजी मॅगेलनच्या जहाजांचा ताफा दक्षिण अमेरिकेच्या टोकाशी-व्हर्जिन्स भूशिरापाशी-पोहोचला व तेथून सु. ५२° ५०′ द. अक्षांशावरील एका सामुद्रधुनीत शिरला. या प्रवासात मॅगेलनच्या ताफ्यातील सॅन अँटोनिओ या जहाजाच्या कप्तानाने या मोहिमेतून अंग काढून घेतले व त्याने स्पेनकडे जहाजासह प्रयाण केले. ५५० किमी. लांबीची ही सामुद्रधुनी पार करण्यास मॅगेलन व त्याच्या लोकांना सु. ३८ दिवस लागले. या सामुद्रधुनीतून प्रवास करणारा मॅगेलन हा पहिला यूरोपीय होय, म्हणून तिला ‘मॅगेलनची सामुद्रधुनी’ असे नाव पडले. सामुद्रधुनीच्या दक्षिणेकडील भूखंडावर खूप ज्वाला दिसत, म्हणून या भागाला मॅगेलनने ‘टिएरा डेल फ्यूगो’ (लॅड ऑफ फायर-अग्निस्थली) हे नाव दिले. पहिल्या पाचांऐवजी केवळ तीनच जहाजांनी २८ नोव्हेंबर १५२० रोजी प्रशांत महासागरात प्रवेश केला. या महासागराच्या शांत स्वरूपामुळे मॅगेलने त्याला ‘पॅसिफिक’ हे नाव दिले. पॅसिफिकमधून उत्तरेकडे प्रदीर्घ काळ व अतिशय खडतर असा या मोहिमेचा प्रवास चालू झाला. हा प्रवास जवळजवळ ११० दिवस चालू होता. आंतॉन्यो पीगाफेत्ता या इतिहासकाराने लिहिलेल्या आपल्या प्रवासवर्णनात मॅगेलन व त्याचे सहकारी ११० दिवस ताज्या अन्नावाचून तसेच प्रवास करीत होते आणि त्यांना ६ मार्च १५२१ रोजी ग्वॉम बेटावरून काही अन्नपदार्थ मिळाले, असा वृत्तांत आहे. या वेळेपर्यंत मोहिमेतील खलाशी स्कर्व्ही रोग व उपासमार यांमुळे अत्यंत हैराण व त्रस्त झाले होते. असे असूनही मॅगेलनने आपली जहाजे फिलिपीन्सपर्यंत नेटाने व जोमाने हाकारली. १६ मार्च रोजी ते फिलिपीन्सच्या सामार बेटावर आले. या बेटांना मॅगेलनने ‘सेंट लॅझारझ’ हे नाव दिले होते ७ एप्रिल रोजी मॅगेलनने सेबू बेटात प्रवेश केला. तेथील राजाला त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारावयास लावून स्पेनचे स्वामित्व मान्य करावयास भाग पाडले. सेबूच्या राजाचे व शेजारील माक्टान बेटावरील राजाचे वैर होते व त्या दोहोंमध्ये त्या वेळी लढाई चालू होती. सेबू राजाशी सख्य केल्याने साहजिकच मॅगेलन या संघर्षात नाइलाजाने गुंतला गेला व परिणामी त्याला आपल्या प्राणाला आणि सेबू राजाला आपल्या स्वातंत्र्याला मुकावे लागले. माक्टान बेटावरच मॅगेलनचे स्मारक उभारण्यात आले आहे.
पीगाफेत्ताने आपल्या वृत्तांतामधून मॅगेलनच्या दृढ निश्चियाची, साहसी व वीरोचित वर्तनाची जी प्रशंसा केली आहे, तिला नंतरच्या प्रसंगामुळे पुष्टी मिळाल्याचे आढळते. या मोहिमेला मॅगेलनसारख्याच्या समर्थ व खंबीर नेतृत्वाशिवाय पर्याय नव्हता व त्याच्या मृत्यूनंतर या मोहिमेला त्याच्यासारखा वारसदार मिळू शकला नाही. मॅगेलनच्या मृत्यूनंतर या मोहिमेचे पूर्ण विभाजन झाले. ८ सप्टेंबर १५२२ रोजी ‘व्हिक्टोरिया’ हे मसाल्याच्या पदार्थांनी भरलेले एकच जहाज डेल कानो याच्या नेतृत्वाखाली १७ खलाशांसमवेत स्पेनच्या सेव्हिल बंदराला भग्नावस्थेत परतले. डेल कानोने हे जहाज मायदेशी परतताना हिंदी महासागरातून व केप ऑफ गुड होपला वळसा घालून आणले व अशा तऱ्हेने सबंध जगाचे प्रथमच समन्वेषण पूर्ण केले स्पेनच्या राजाने त्याचा यथोचित सन्मान केला.
मॅगेलनच्या भाग्यात सलग अशी संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिण जरी नव्हती, तरी तो पश्चिमेकडून सेबूपर्यंत आला होता व पूर्वेकडूनही तेथपर्यंतचा त्याचा प्रवास झाला होता. त्यामुळे समन्वेषणाच्या इतिहासात पृथ्वी-प्रदक्षिण करणारा पहिला वीर म्हणून त्याला मान आहे. त्याने या मोहिमेची केलेली संपूर्ण योजना तसेच त्या योजनेला दिलेले सम्यक्, कुशल तसेच धाडसी दिग्दर्शन यांमध्ये त्याचे कर्तृत्व दिसून येते. पूर्वेकडून पश्चिमेकडे पॅसिफिक महासागर ओलांडणारा मॅगेलन हा पहिला समन्वेषक असून त्याने ‘नव्या जगापासून फारच थोडे दिवस पश्चिमेकडे जहाजातून गेल्यास ईस्ट इंडीज ही बेटे लागतील’ या त्या वेळी प्रचलित असलेल्या कल्पनेला खोटे ठरविले. कारण प्रत्यक्षात त्याला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लागला. या मोहिमेमुळे जगाच्या ज्ञानात अतिशय मोलाची भर पडली. मॅगेलनने आपल्या मोहिमेमुळे पॅसिफिकचा प्रचंड विस्तार जगापुढे आणला. तसेच केवळ दक्षिण गोलार्धातील आकाशात आढळणाऱ्या दीर्घिका निदर्शनास आणल्या. त्यामुळे त्या दीर्घिकांना त्याचे नाव देण्यात आले असून त्या ‘मॅगेलनी मेघ’ या नावाने ओळखल्या जातात. सेबूच्या राजाला मॅगेलनने स्पेनशी स्वामित्वनिष्टा स्वीकारावयास लावली आणि यायोगे त्याने फिलिपीन्समध्ये स्पेनचा प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला हा त्याचा प्राथमिक हेतू मानला, तर पुढे १५६० मध्ये स्पॅनिश साम्राज्याचा फिलिपीन्स हा एक भाग बनला, ही मॅगेलनच्या वर्तृत्वाची फार मोठी जमेची बाजू मानली पाहिजे.
पहा : भूगोल.
संदर्भ : 1. Beaglehole, John C. The Exploration of the Pacific, Stanford, 1966.
2. Parr, C. Mckew, Ferdinand Magellan, Circumnavigator, New York, 1964.
गद्रे, वि. रा. शाह, र. रू.
“