मॅकलाउड (मॅक्लिऑड), जॉन जेम्स रिकार्ड : (६ सप्टेंबर १८७६–१६ मार्च १९३५). ब्रिटिश शरीरक्रियावैज्ञानिक. ⇨ इन्शुलीन या महत्त्वाच्या हॉर्मोनाच्या [⟶ हॉर्मोने] शोधासंबंधी केलेल्या कार्याबद्दल त्यांना १९२३ सालचे वैद्यक वा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक ⇨ सर फ्रेडरिक ग्रांट बँटिंग यांच्याबरोबर विभागून मिळाले.
मॅकलाउड यांचा जन्म क्लूनी (स्कॉटलंड) येथे झाला. ॲबर्डीन येथील मारिशाल कॉलेजात वैद्यकाचे शिक्षण घेऊन १८९८ मध्ये एम्. बी., सीएच्. बी. ही पदवी संपादन केली. त्याच वेळी त्यांना अँडरसन प्रवासी शिष्यवृत्ती मिळाली व त्यामुळे त्यांनी लाइपसिक येथील फिजिऑलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये जीवरसायनशास्त्राचा एक वर्ष अभ्यास केला. १९०० साली लंडन हॉस्पिटल मेडिकल कॉलेजमध्ये शरीरक्रियाविज्ञानाचे निदेशक व १९०२ मध्ये जीवरसायनशास्त्राचे अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. रॉयल सोसायटीचे मॅकिनॉन संशोधक म्हणूनही त्यांची निवड झाली. त्याच सुमारास त्यांनी केंब्रिज येथे पदव्युत्तर शिक्षण घेऊन सार्वजनिक आरोग्यशास्त्राची पदविका मिळविली. १९०३ मध्ये अमेरिकेतील क्लीव्हलँड येथील वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाच्या प्राध्यापकपदावर त्यांची नियुक्ती झाली. तेथे १५ वर्षे अध्यापन व संशोधन केल्यावर कॅनडातील टोराँटो विद्यापीठात १९१८ मध्ये ते शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक झाले आणि नंतर तेथील शरीरक्रियाविज्ञानाच्या प्रयोगशाळेचे संचालक व पुढे वैद्यक शाखेचे अधिष्ठाते झाले. १९२८ मध्ये ते स्कॉटलंडला परतले व ॲबर्डींन येथे शरीरक्रियाविज्ञानाचे रेगिअस प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.
इन्शुलिनाचा शोध लागण्यापूर्वी सु. १० वर्षे अगोदर १९१३ मध्ये मॅकलाउड यांनी ⇨ मधुमेह व त्याचे विकृतिवैज्ञानिक शरीरक्रियाविज्ञान यांसंबंधी एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी कार्बोहायड्रोटांच्या चयापचयावर [शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींवर ⟶ चयापचय] व मधुमेहावर केलेल्या संशोधनामुळे टोराँटो विद्यापीठात नियुक्ती होण्याच्या सुमारास त्यांना या विषयांतील एक तज्ञ म्हणून मान्यता मिळाली होती. १९२१ मध्ये त्यांनी बँटिंग यांना अग्निपिंडातील लांगरहान्स द्वीपकांच्या [⟶ अग्नि पिंड] कार्यावर संशोधन करण्यास परवानगी दिली व ⇨ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांना त्यांचे साहाय्यक म्हणून नेमले. मॅकलाउड यांनी स्वतः या संशोधनात सक्रिय भाग घेतला होता परंतु या संशोधनाचे प्रथम यश ते स्कॉटलंडला गेले असताना त्यांच्या गैरहजेरीत मिळाले. परत आल्यावर त्यांनी स्वतःचे ऑक्सिजनन्यूनतेसंबंधीचे (रक्तातील ऑक्सिजनाचे प्रमाण शरीरक्रियेला आवश्यक असणाऱ्या प्रमाणापेक्षा कमी होण्यासंबंधीचे) कार्य थांबवून प्रयोगशाळेची सर्व साधने या नव्या संशोधनास उपलब्ध करून दिली. जे. बी. कॉलिप या जीवरसायनशास्त्रज्ञांच्या सहकार्याने उपचारांत वापरण्यास योग्य असे इन्शुलिन वेगळे करण्यात आले व १९२२ सालच्या प्रारंभी त्याचा यशस्वी रीत्या मधुमेहावर उपयोग करण्यात आला. तत्पूर्वी १९२१ मध्ये मॅकलाउड यांनी प्राकृतिक सर्वसाधारण) व अग्निपिंड काढून टाकलेल्या प्राण्यांच्या रक्तातील शर्करा पातळी नियंत्रण आणि शर्करा चयापचयातील यकृत, स्नायू व अग्निपिंड यांचे कार्य यांसंबंधी सखोल परीक्षणाचे कार्य केले होते.
बेस्ट व कॉलिप यांच्या सहकार्याबद्दल बँटिंग यांनी नोबेल पारितोषिकाच्या आपल्या वाटणीच्या रकमेपैकी निम्मी बेस्ट यांना आणि मॅकलाउड यांनी त्यांच्या रकमेपैकी निम्मी कॉलिप यांना वाटून दिली. नोबेल पारितोषिकाखेरीज मॅकलाउड यांना मॅथ्यूज डंकन व फाइफ जेमिसन पदके (१८९८), अमेरिकन फिजिऑलॉजिकल सोसायटीचे अध्यक्षपद (१९२३), लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व (१९२३), टोराँटो, वेस्टर्न रिझर्व्ह, ॲबर्डीन इ. विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या वगैरे मानसन्मान मिळाले. त्यांनी प्रॅक्टिकल फिजिऑलॉजी (१९०३), रिसेंट ॲडव्हान्सेस इन फिजिऑलॉजी (१९०५), डायबेटीस : इट्स फिजिऑलॉजिकल पॅथॉलॉजी (१९१३), फंडामेंटल्सन ऑफ फिजिऑलॉजी (१९१६), फिजिऑलॉजी अँड बायोकेमिस्ट्री इन मॉडर्न मेडिसीन (१९१८) इ. ग्रंथ व विविध विषयांवरील संशोधनात्मक निबंध लिहिले. ते ॲबर्डीन येथे मृत्यू पावले.
भालेराव, य. त्र्यं.