महू : मध्य प्रदेश राज्याच्या इंदूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ७५,६९७ (१९८१). रस्त्याने व लोहमार्गाने हे इंदूरपासून नेर्ऋत्येस २१ किमी. वर वसले असून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग येथून जातो. हे खांडव्याशी मीटरमापी लोहमार्गाने व रस्त्याने जोडले आहे. येथे विमानतळही आहे. पूर्वीचे महू हे सध्या ‘महूगाव’ या नावाने ओळखले जाते. नवीन महू हे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. पूर्वीच्या इंदूर संस्थानातील ब्रिटिश लष्करी छावणीचे हे मुख्य ठिकाण (कँटोनमेंट) होते. सर जॉन मॅल्‌कम याने मंदसोरच्या तहान्वये १८१८ मध्ये जुन्या महू गावाजवळ ही छावणी वसविली. १८५७ च्या उठावात येथेही अस्थिरता उद्‌भवली होती परंतु लगेचच तिचा बीमोड करण्यात आला. आजही एक प्रमुख कँटोनमेंट म्हणून महूला महत्त्व आहे. लष्कराचे ‘कॉलेज ऑफ कॉम्बॅट’ व ‘इन्फंट्री स्कूल’ ही येथे आहेत. श्रावण शुद्ध पष्ठीला नवीन शहरात भुजारियाची वार्षिक यात्रा भरते. शहरातून तीन साप्ताहिके प्रसिद्ध होतात. येथे उच्च शिक्षणापर्यंतच्या वेगवेगळ्या शैक्षणिक तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. शहरात दुग्धोत्पादन व्यवसाय महत्त्वाचा आहे. महूगावातही काही शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था व आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचे महू हे जन्मगाव होय.

चौधरी, वसंत