महादेवाचे डोंगर : भारतातील मध्य प्रदेश राज्याच्या दक्षिणमध्य भागातील डोंगररांगा. वालुकाश्मयुक्त अशा या डोंगररांगा सातपुडा पर्वताच्याच शाखा असून यांमध्ये छोटीछोटी पठारे व तीव्र उताराचे कडे आढळतात. त्यांची निर्मिती कार्बॉनिफेरस कालखंडात (२,८९९ लक्ष ते ३,४५० लक्ष वर्षापूर्वी) झालेली असावी. या डोंगररांगांचे उत्तरेकडील उतार मंद व दक्षिणेकडील उतार तीव्र आहेत. या रांगांत २७५ पासून १,१०० मीटरपर्यंत कमीजास्त उंचीचे भाग जवळजवळ असलेले आढळतात. डोंगरांगांची दिशा पूर्व-ईशान्येकडे असलेली दिसते. येथील तलशिला तांबट मृदेने आच्छादलेल्या असून त्यांवर पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. येथे मँगॅनीज व थोडाबहुत दगडी कोळसा मिळतो. लाकूडतोड, लोणारी कोळसा तयार करणे खाणकाम, शेती, पशुपालन हे येथील लोकांचे व्यवसाय होत. शेतीतून गहू, ज्वारी, कापूस इ. पिके घेतली जातात. या भागात प्रामुख्याने गोंड आदिवासींची वस्ती आहे. याच डोंगररांगांत ⇨पंचमढी हे गिरिस्थान आहे.
चौधरी, वसंत
“