मस्तिष्का वरणशोथ : (मेनिंजायटीस). मेंदू व मेरुरज्जू (पाठीच्या कण्यातून जाणारा तंत्रिकांचा-मज्जातंतूंची-दोरीसारखा जुडगा) यांवरील कलामय (पातळ पटलामय) आवरणांच्या दाहयुक्त सुजेला मस्तिष्कावरणशोथ म्हणतात. ‘मस्तिष्क-मेरुरज्जू आवरणशोथ’, ‘मस्तिष्क मेरुरज्जू’ आणि ‘पृषत ज्वर’ अशी आणखी काही नावे या रोगास आहेत. ही एकाखाली एक अशी तीन आवरणे असून त्यांना अनुक्रमे दृढतानिका, जालतानिका व मृदुतानिका असे म्हणतात. या आवरणांचया वर्णनाकरिता ‘तंत्रिका तंत्रावरील आवरणे’ हा भाग पहावा. शोथ जेव्हा दृठतानिकेपुरताच मर्यादित असतो तेव्हा त्याला दृढतानिकाशोथ किंवा स्थालावरणशोथ म्हणतात आणि जालतानिका व मृदुतानिका यांच्या शोथाला विरलतानिकाशोथ म्हणतात. मेरुरज्जू मस्तिष्कावरणशोथच्या बहुसंख्य रुग्णांत विरलतानिका शोथाचे प्रमाण अधिक असते.

वर्गीकरण : मस्तिष्कावरणशोथाचे वर्गीकरण संप्राप्तीनुरुप करतात. (१) पूयुक्त अथवा सपूय : मेनिंगोकोकाय अथवा नायसेरिया मेनिंजिटिडीस न्यूमोकोकाय स्टॅफिलोकोकाय, ही मोफायलस इन्फूल्युंझी, एश्चेरिकिया, कोलाय या पूयोत्पादक सूक्ष्मजंतूंमुळे होणारा प्रकार.

(२) कणोतक उत्पादन :  क्षयरोग जंतू, कॉक्सिडिऑइड्स, क्रिप्टोकॉकस हिस्टोप्लाझ्मा व इतर कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), ट्रिपोनेमा पॅलिडम [मस्तिष्कावरण-रक्तवाहिनी उपदंश ⟶ उपदंश] यांमुळे आवरणावर कणोतकाची (नवीन सूक्ष्म रक्तवाहिन्यांची व कोशिकांची-पेशींची–वाढ होऊन ती वाढ कणांसारखी दिसणाऱ्या ऊतकाची ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा समूह) निर्मिती होते.

(३) अपूतिक : बहुतकरून व्हायरसजन्य असून पू अथवा कणोतक निर्मिती नसते. गालगुंडास कारणीभूत असणारे व्हायरस, आतड्यांतील व्हायरस गट, नागिणीचे [मेखला परिसर्पाचे ⟶ परिसर्प] व्हायरस, ⇨ बालपक्षाघाताचे (पोलिओचे) व्हायरस कारणीभूत असतात.

(४) नवजात अर्भकातील मस्तिष्कावरणशोथ : लहान मुलांतील  किंवा प्रौढांतील विशिष्ट लक्षणांचा अभाव असलेला हा प्रकार ए. कोलाय किंवा स्ट्रेप्टोकोकायजन्य असतो. यामध्ये ज्वर व मानेचा ताठपणा या प्रमुख लक्षणांचा अभाव असतो.

(५) निकटवर्ती प्रतिक्रिया : प्रत्यक्ष मस्तिष्कावरणाची विकृती नसताना निकटवर्ती ऊतकातील विकृतीमुळे मस्तिष्क-मेरुद्रव (मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार देणारा द्रव) दूषित होणे हे या संज्ञेने दर्शविले आहे. कर्णपश्चास्थिशोथ [⟶ कान], मस्तिष्क विद्रधी (ऊतक विघटनामुळे तयार झालेल्या पोकळीत पू साठणे) उत्यादींमुळे मस्तिष्कावरणापर्यंत संसर्ग पोहोचतो.

(६) आभासी  मस्तिष्कावरणशोथ : प्रत्यक्ष मस्तिष्कावरणसोथ नसताना डोकेदुखी, मान व पाठ ताठ होणे इ. लक्षणे न्यूमोनियासारख्या काही रोगांत उद्‌भवतात परंतु त्यांमध्ये मस्तिष्क-मेरुद्रव प्राकृतिक (सर्वसामान्य) असतो.

प्रस्तुत नोंदीत नेहमी आढणाऱ्या दोन प्रकारच्या मस्तिष्कावरणशोथांची माहिती दिली आहे : (१) मेनिंगोकोकायजन्य मस्तिष्कावरणशोथांची माहिती दिली आहे : (१) मेनिंगोकोकायजन्य मस्तिष्कावरणशोथ आणि (२) क्षयरोगजंतूजन्य मस्तिष्कावरणशोथ.

मेनिंगोकोकायजन्य मस्तिष्कावरणशोथ : संप्राप्ती : मेनिंगोकॉकस हा सूक्ष्मजंतू डिप्लोकॉकस (एकमेकांस जोडलेल्या द्विकोशिकीय स्वरूपातील सूक्ष्मजंतूंच्या गटात मोडतो. त्याचे उपगट पाडलेले असून त्यांपैकी काही रोगोत्पादक आहेत. पुष्कळ वेळा हे सूक्ष्मजंतू शरीराच्या नासाग्रसनी भागात (नाकाच्या मागील बाजूच्या व तोंडातील छताच्या मऊ भागाच्या वरच्या घशाच्या भागात) मृतजीवी (मृत ऊतक कोशिकांवर उपजीविका करणारे) म्हणून जगतात आणि कोणतीही हानी किंवा रोग उत्पन्न करीत नाहीत. अशा व्यक्तींना ‘तात्पुरते रोगवाहक’ म्हणतात. सूक्ष्मजंतूंची रोगोत्पादकता वाढते व रोगप्रतिकारक्षमतेतील दोष हे रोग उत्पन्न करण्यास मदत करतात. दाट वस्तीमुळे रोगवाहकांच्या संख्येत वाढ होऊन साथ उत्पन्न होते आणि ती फैलावण्यास मदत होते. रोगवाहकांची संख्या २०% पेक्षा  अधिक झाल्यास साथीचा धोका वाढतो.

हा रोग सर्व जगभर आढळतो. कोणत्याही वयात उद्‌भवू शकणारा हा रोग विशेषेकरून बालवयात अधिक प्रमाणात आढळतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांत प्रमाण अधिक असते. उष्ण कटिबंधीय प्रदेशात मोसमी हवा मानाच्या रोगाच्या प्रादुर्भावावर परिणाम होतो. रोगाचा फैलाव प्रत्यक्ष बिंदुक संसर्गाने (बोलताना, खोकताना वा शिंकताना हवेत फेकल्या जाणाऱ्या तुषांराद्वांरे होणाऱ्या संसर्गाने) होतो. सूक्ष्मजंतू उष्णता व शुष्कतेमुळे जलद नाश पावत असल्यामुळे अप्रत्यक्ष संसर्ग असंभवनीय असतो.

विकृतिविज्ञान : नासाग्रसना भागाच्या श्लेष्मकलेखालील (बुळबुळीत पातळ अस्तराखालील) रक्तवाहिन्यांत प्रवेश केल्यानंतर सूक्ष्मजंतू रक्तप्रवाहाद्वारे मेंदूतील झल्लरी जालिकेत [⟶तंत्रिका तंत्र] प्रवेश करतात आणि मस्तिष्कावरणांत व मस्तिष्क-मेरुद्रवात शिरतात.

मस्तिष्कावरणशोथाची सुरुवात नेहमी जंतुरक्ततेपासून (सूक्ष्मजंतूंचा रक्तात प्रवेश होऊन ते रक्तपरिवहनाबरोबर सर्व शरीरात पसरल्याने निर्माण होणाऱ्या अवस्थेपासून) होते. बहुधा आवरणाचे तिन्ही थर शोथग्रस्त होतात. श्वेतकोशिकामय निःस्त्राव, तंत्वी (एक पांढरटसर न विरघळणारे प्रथिन) व मृत सूक्ष्मजंतू हे मस्तिष्क विवरे य अधोजालतानिका अवकाश यांमध्ये साचतात. पूयरक्ततेमुळे रक्तवाहिन्यांच्या अंतःस्तरावर परिणाम होऊन काही ऊतकांवर गंभीर परिणाम होतात.


लक्षणे : एकाएकी रोगाची सुरुवात होऊन ज्वर, डोकेदुखी, अस्वस्थता व उलट्या ही लक्षणे उद्‌भवतात. तापमान ३८.९ ते ३९.५ से. पर्यंत वाढते. तीव्र डोकेदुखी बहुधा पश्चकपालास्थीभोवती जाणवते. प्रकाश असह्य होतो. मुग्धभ्रांती (एक प्रकारचा मानसिक क्षोभ) व चिडखोरपणा ही लक्षणे दिसतात. रोगी उजेडाकडे पाठ करून एका अंगावर पडून राहतो. त्याला हालवलेले आवडत नाही व तो रागावतो. मान ताठ बनते कारण तिच्या पश्चभागातील स्नायूंचे जोरदार आकुंचन होते. पाठीचे अंतर्नमन (आतील बाजूस वळण्यची क्रिया) मर्यादित होते. तपासणीत पुढील दोन विशेष लक्षणे आढळतात. (१) कर्निग लक्षण : (व्ही कर्निग या रशियन वैद्यांच्या नावावरून ओळखण्यात येणारे लक्षण). पाय पोटावर वळलेला असताना गुडघ्यापासून खालचा भाग सरळ करता येत नाही. याला मांडीच्या पश्चभागातील स्नायूंचे (धोंड स्नायूंचे) जोरदार आकुंचन कारणीभूत असते. (२) ब्रडझिन्सकी लक्षण : (जे फोन ब्रडझिस्की या रोलिश वैद्यांच्या नावावरून ओळखण्यात येणारे लक्षण). मान व डोके छातीकडे वळविण्याची प्रयत्न केल्यास (परकृत) दोन्ही पायांचे आपोआप अंतर्मन होते. एक मांडी पोटाकडे वळविल्यास स्वकृत) दुसरी आपोआप पोटाकडे वळते.

४०% रुग्णांमध्ये त्वचेवर पुरळ उमटतो. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उमटणारा पुरळ बहुधा दोन्ही हातापायांवर धडापेक्षा अधिक असतो. त्याचे छोट्या रक्तस्त्रावांत व काही जागी मोठ्या आकारमानाच्या रक्तस्त्रावांत रुपांतर होते. या कारणांमुळे या रोगाला ‘पृषत ज्वर’ हे नाव मिळाले आहे.

आ.१ मोनिंगोकोकायजन्य मस्तिष्कावरणशोथामध्ये रुग्णाची मागे वळलेली मान व डोके.लहान वयातील रुग्णांच्या लक्षाणांचा विशेष उल्लेख करावा लागतो. जेवढे वय लहान तेवढी प्रारूपिक (नमुनेदार) लक्षणे कमी असतात. डोकेदुखी, कर्निग लक्षण व ब्रडझिन्सकी लक्षण ही मस्तिष्कशोथाची लक्षणे १२ महिने वयानंतर दिसतात परंतु ती ६ ते १२ महिने वयात अत्यल्प आणि ६ महिन्यांखालील वयात त्यांचा जवळजवळ अभाव असतो. पुष्कळ वेळा रोगाची सुरुवात झटक्यांनी होते. मूल चिडखोर बनते व आहार नाकारते, त्याला जवळ घेतलेले आवडत नाही व पाळण्यात घातल्यावर शांत होते.

कोणताही विशेष इलाज न करता काही रोगी तिसऱ्या आठवड्यापासून सुधारू लागतात, तर काही बेशुद्धी येऊन मरतात. 

 

आ. २, कर्निग लक्षण : (अ) पाय गुडघ्यात सरळ करता येतो (प्राकृतिक) (आ) पाय गुडघ्यात सरळ करता येत नाही (मस्तिष्कावरणशोथ). उपद्रव : अलीकडील प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांच्या उपयोगामुळे उपद्रवांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. उपचार वेळेवर 

सुरू न झालेल्या किंवा अपुऱ्या झालेल्या रुग्णामध्ये काही उपद्रव आढळतात. (१) तंत्रिका तंत्रासंबंधीचे उपद्रव : सहाव्या, सातव्या किंवा तिसऱ्या मस्तिष्क तंत्रिकांचा [⟶ तंत्रिका तंत्र] अल्पकालीन पक्षाघात कधी कधी आढळतो. अकारण टिकून राहिलेला ज्वर, गुंगी व उलट्या ही लक्षणे जलशीर्ष [मस्तिष्क विवरात प्रमाणापेक्षा जास्त मस्तिष्क-मेरुद्रवाचा संचय होणे ⟶ तंत्रिका तंत्र] उद्भवत असण्याची दर्शक असतात. (२) ज्ञानेंद्रिये : अंतर्कर्णात संसर्ग प्रत्यक्ष फैलावून ५% रुग्णांमध्ये कायमचा बहिरेपणा येण्याची शक्यता असते. कधी कधी  दृक्तंत्रिकेच्या (मेंदूकडून डोळ्याकडे येणाऱ्या मुख्य तंत्रिकेच्या) अपर्कषामुळे अंधत्व येते. (३) इतर उपद्रव : नितंब, गुडघा व पाय या भागांतील मोठ्या रक्तस्त्रावामध्ये कोथ (शरीरभाग मृत होऊन सडू लागणे) संभवतो. कधी कधी पायांच्या बोटांमध्येही कोथ उद्‌भवतो. परिह्रद्शोथ (ह्रदयाभोवतील पटलमय आवरणाचा शोथ), ह्रदंतस्तरशोथ (ह्रदयाच्या पटलमय अंतःस्तराचा शोथ) आणि ह्रद्स्नायुशोथ या विकृती ५% रुग्णांत आढळतात. २ ते १०% रुग्णांमध्ये बहुसंधिशोथ उद्‌भवतो. कधी कधी ज्वर पुनरावर्तित होतो किंवा उपचारानंतरही चालूच राहतो. अशा वेळी मस्तिष्क-मेरुद्रवाची तपासणी वारंवार करावी लागते.

निदान : सर्वसाधारणपणे प्रौढ रुग्णातील डोकेदुखी, उलट्या व मानेचा ताठपणा ही लक्षणे मस्तिष्कावरणशोथाकडे लक्ष ओढतात. त्यामुळे मस्तिष्क-मेरुद्रवाची प्रयोगशालेय तपासणी अपरिहार्य ठरते. प्रकाश असह्यता आणि वरील तिन्ही लक्षणे तीव्र व अल्पकालीन असल्यास पूयोत्पादन मस्तिष्कावरणशोथ निदान जवळजवळ निश्चित समजावे. लहान मुलांत निदान अवघड असते. अकारण उद्‌भवणारे झटके, उलट्या, ज्वर व जवळ घेण्याबद्दलची नाराजी ही लक्षणे लहान मुलांत मस्तिष्क-मेरुद्रव तपासणीची आवश्यकता दर्शवितात.

मस्तिष्कावरणशोथाची शंका असल्यास कटि-सूचिवेध (खालून तिसऱ्या व चौथ्या मणक्यांच्यामध्ये सुई खुपसून) किंवा बृहत्कुंड सूचिवेध [निमस्तिष्काचा खालचा पृष्ठभाग आणि लंबमज्जेचा पश्च भाग यांच्या मधील मोठ्या अवजालतानिका अवकाशात सुई खुपसून ⟶तंत्रिका तंत्र] करून मस्तिष्क-मेरुद्रव काढून घेऊन त्याची प्रयोगशालेत तपासणी करणे जरूर असते. या द्रवात पुढील गोष्टी आढळतात : दाब २०० ते ३०० मिमी. (पाऱ्याच्या स्तंभाइतका) (अंगावर झोपल्या अवस्थेत प्राकृतिक दाब ४.५ ते १३.५ मिमी. एवढा असतो). नेहमी स्वच्छ असणारा द्रव गढूळ किंवा स्पष्टपणे पूमिश्रित आढळतो. प्रथिनांचे प्रमाण ४०० मिग्रॅ./मिली.) वाढते. ग्लुकोजचा (प्राकृतिक ८०-१०० मिग्रॅ. प्रतिशत) जवळजवळ अभाव असतो. क्लोराइडे कमी होतात. सूक्ष्मजंतू काचपट्टीवर सूक्ष्मदर्शकाखाली किंवा प्रयोगशालेत संवर्धनात दिसतात. बहुरूपकेंद्रक (ज्यांना केंद्रकांचे-कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या गोलसर पुंजाचे-अनेक केंद्रके असल्यासारखे खंड पडलेले आहेत अशा) कोशिकांचे प्रमाण वाढलेले असते आणि त्यांमध्ये (कोशिकांतर्गत) सूक्ष्मजंतू आढळतात.


फलानुमान : (रोगाची लक्षणे व स्वरूप यांवरून रुग्ण बरा होण्यासंबंधीचे काढण्यात येणारे अनुमान). अर्भके व वृद्ध या वयोगटांत फलानुमान गंभीर असते. त्यामानाने पाच ते दहा वर्षे वयोगटातील मृत्युप्रमाण कमी असते. पूर्वी ७०% असलेले मृत्युप्रमाणे नव्या रासायनिक चिकित्सेनंतर १०% वर घसरले आहे. तरीदेखील बहिरेपणा, अंधत्व यांसारख्या परिणामभूत विकृती उरण्याची शक्यता असते. कधी कधी मस्तिष्क तंत्रिकांचा पक्षाघात व मनोदोष टिकून राहतात. उपचार जेवढे लवकर सुरु होतील तेवढे फलानुमान उत्तम असते.

उपचार : प्रतिबंधात्मक उपाय इतर सर्व संसर्गजन्य रोगांप्रमाणे ताबडतोब अंमलात आणावे लागतात. रोग्याचे विलगीकरण आणि विविक्ती (विशिष्ट रोगांचे रुग्ण अलग अलग ठेवणाऱ्या) रुग्णालयात हलविणे नेहमी हितावह असते. संपर्कित व्यक्तींचा नासाग्रसनी स्त्राव कापसाच्या बोळ्यावर घेऊन त्याची काचपट्टीवर प्रयोगशालेय तपासणी करून त्यात मेनिंगोकोकाय आढळल्यास अशा व्यक्तींना विलग्नवासात ठेवणे जरूर असते. नातलग आणि अगदी जवळचा संपर्क आलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक रासायनिक चिकित्सा करणे उपयुक्त असते. त्याकरिता सल्फोनामाइडे किंवा रिफॅम्पिन (६०० मिग्रॅ. दिवसातून दोन वेळा, दोन दिवस) देतात. मेनिंगोकोकाय गटाच्या ए आणि सी प्रकारच्या सूक्ष्मजंतूंकरिता पाश्चात्त्य देशातून लस उपलब्ध आहे. ती फक्त ग्रहणशील व्यक्तींकरिता प्रतिबंधात्मक म्हणून वापरतात. रासायनिक चिकित्सेऐवजी व्यक्तिंकरिता प्रतिबंधात्मक म्हणून वापरतात. रासायनिक चिकित्सेऐवजी ती कधीही वापरीत नाहीत.

रोगाचा संशय आल्याबरोबर कारणीभूत सूक्ष्मजंतूकरिता प्रयोगशालेय तपासणी करून निश्चिती करण्यापूर्वीच सूक्ष्मजंतूकरिता जास्तीत जास्त सूक्ष्मजंतू-प्रकारांवर उपयुक्त असलेल्या प्रतिजैव औषधांची योजना करणे अत्यावश्यक असते. सर्वोत्तम औषध पेनिसिलीन असून त्याची अधिहर्षता (ॲलर्जी) असल्यास अथवा वयोपरत्वे अँपिसिलीन, जेन्टामायसीन किंवा क्लोरँफिनिकॉल ही औषधे वापरता येतात. मस्तिष्कावरणशोथ ही एक वैद्यकीय आणीबाणी असल्यामुळे ही औषधे नीलेतून अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) देतात. वयोपरत्वे ताबडतोब सुरु करावयाच्या औषधी मात्रा कोष्टक क्र. १ मध्ये दर्शविल्या आहेत.

कारणीभूत रोगजंतूंच्या निश्चितीनंतर पुढील मात्रा योजना संपूर्णपणे वैद्यकीय सल्ल्यानुसार करतात. परिणामकारक व गुणकारी प्रतिजैव औषधे सुरू असताना शुश्रूषा व योग्य देखभाल अत्यावश्यक असतात. त्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा व नासा संभरण (नाकात रबरी नलिका घालून तीमधून अन्नपुरवठा करणे) यांचा समावेश 

कोष्टक क्र. १. मस्तिष्कावरणशोथातील प्रतिजैव औषधांची तातडीची मात्रा

वयोगट 

औषध 

इष्टतम नीला-अंत:क्षेपणाने २४ तासांत 

प्रौढ

पेनिसिलीन

२४ दशलक्ष एकक

७ वर्षे वयावरील

पेनिसिलीन, अँपिसिलीन

३,६०,००० एकक/किग्रॅ. शरीरवजन ३०० मिग्रॅ./ किग्रॅ. शरीरवजन

७ वर्षे वयाखाली

अँपिसिलीन, क्लोरँफिनिकॉल

३०० मिग्रॅ./ किग्रॅ. शरीरवजन १०० मिग्रॅ./ किग्रॅ. शरीरवजन

नवजात अर्भक ३ महिन्यापर्यंत

अँपिसिलीन, जेन्टामायसीन

२०० मिग्रॅ./ किग्रॅ. शरीरवजन ५-६ मिग्रॅ./ किग्रॅ. शरीरवजन

 

असतो. उपद्रवाकडे लक्ष ठेवून त्यावर ताबडतोब उपचार करणे जरूर असते. योग्य प्रतिजैव औषधाची मात्रा ज्वररहित झाल्यावर पाच ते सात दिवस ठेवतात. नवजात अर्भकातील मस्तष्कावरणशोथाचे उपचार कमीत कमी तीन आठवडे चालू ठेवावे लागतात.

क्षयरोगजंतुजन्य मस्तिष्कावरणशोथ : संप्राप्ती : जेव्हा शरीरात जागृत क्षयरोग असतो तेव्हा त्या रोगाच्या कोणत्याही अवस्थेत क्षयरोगजंतुजन्य मस्तष्कावरणशोथाचे उत्पन्न होण्याची शक्यता असते. किंबहुना ही विकृती फुप्फुस, ⇨लसीका ग्रंथी (लसीका वाहिनीतील लसीका ऊतकाचा ग्रंथीसारखा पुंजका), वृक्क (मूंत्रपिंड), अस्थी किंवा सांधा यांपैकी कोणत्याही भागातील प्रथमिक क्षयरोगाचा दुय्यम परिणाम म्हणून नेहमी उद्‌भवते. दोन ते पाच वर्षे वयोगटात ती प्रामुख्याने आढळते परंतु कोणत्याही वयोगटात उद्‌भवू शकणारी ही विकृती एक वर्ष वयाखालील बालकांत सहसा आढळत नाही. लहान मुलांत श्वासनालाजवळील (कंठापासून फुप्फुसांपर्यंत जाणाऱ्या कूर्चामय व पटलमय नळीजवळील) मध्यावकाशातील (दोन फुप्फुसांच्या आवरणांच्या मधल्या भागांतील) किंवा आंत्रबंधातील (पश्च उदरभित्तीला आतडे जोडणाऱ्या बंधातील) लसीका ग्रंथींमधील सूक्ष्मजंतू रक्तप्रवाहातून मस्तिष्कावरणापर्यंत पोहोचतात. प्रौढामध्ये क्षयरोगाचा अंतिम आजार मस्तिष्कावरणशोथ असू शकतो. कुंग-क्षय (राळ्याएवढे छोटे छोटे क्षयरोगजुंतुजन्य उंचवटे फुप्फुसांवर किंवा मस्तिष्कावरणाशोथ उत्पन्न होण्याचा नेहमीच धोका असतो. ही विकृती बहुधा मानवी प्रकारच्या क्षयरोगजंतूमुळे उत्पन्न होते. अगदी क्वचित गोकुलीय जंतू कारणीभूत असतात. [⟶ क्षयरोग].


विकृतिविज्ञान : मेंदूमध्ये रक्ताधिक्य होते व सूज येते. मस्तिष्कावरणे जोड व पिवळसर घट्ट निःस्त्राव तळभागी गोळा होतो. कधी कधी तीव्र मस्तिष्कशोथ उत्पन्न होतो.

लक्षणे : रोगाची सुरुवात हळूहळू व न कळत होते. दोन किंवा तीन आठवड्यांच्या अनिश्चित स्वरूपाच्या आजारानंतर मुख्य लक्षणे दिसू लागतात. पूर्वरूप आजारात मुलाच्या वागण्यात बदल आढळतो. ते खेळण्यात रमत नाही, अधूनमधून अती चिडखोरपणा, क्षुधानाश व वजन हळूहळू घटणे आढळतात. डोकेदुखी, उलट्या, पोटदुखी व मलवरोध ही लक्षणे मस्तिष्कवरणशोथची दर्शक असतात. ज्वर सुरू होतो, परंतु तापमान सहसा ३९ सें. पेक्षा वर जात नाही व हा प्रकार अनियमित असतो. शारीरिक तापसणीत कोठेतरी क्षयरोग असल्याचे निर्दशनास येते. पहिल्या आठवड्यानंतर मानेचा व पाठीचा ताठपणा दिसू लागतो परंतु तो मेनिंगोकोकायजन्य शोथासारखा जोरदार नसतो. गुंगी वाढत जाते व बेशुद्धी येते. अधूनमधून मूल पूर्णपणे शुद्धीवर असते (स्वस्थकाल), हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे. मस्तिष्क तंत्रिकांचा पक्षाघात आणि कधीकधी तिर्यक्‌दृष्टी व दुहेरी दृष्टी या विकृती दुसऱ्या आठवड्यात उद्‌भवतात. तिसऱ्या आठवड्यात गंभीर बेशुद्धी येते आणि उपचार न झालेला रोगी तीन आठवड्यांत निश्चित दगावतो.

निदान : मेंदू आणि मेरुरज्जू यांना गंभीर व कायमची हानी पोहचण्यापूर्वीच या रोगाचे निदान होणे आवश्यक असते. मस्तिष्क-मेरुद्रवाची तपासणी जरूरीची असते. या द्रवाचा दाब वाढलेला असून ते स्वच्छ किंवा किंचित गढूळ असते. द्रवात बहुकेंद्रकीकोशिका व लसीका कोशिका यांचे मिश्र किंवा फक्त लसीका कोशिकाच असतात. प्रथिनांचे प्रमाण बरेच वाढलेले असून ग्लुकोज कमी असते. किंचित काल काचनलिकेत द्रव ठेवल्यानंतर त्यात पांढरा कोळिष्कासारखा क्लथ (साखा) दिसतो. द्रवाची सूक्ष्मजंतूकरिता काळजीपूर्वक तपासणी व त्याचे प्रयोगशालेय संवर्धन निदानास उपयुक्त असतात. मांतू परीक्षा (शार्ल मांतू या फ्रेंच वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारी परीक्षा) ८५-९०% रुग्णांत रोग-अस्तित्वदर्शक मिळते. या परीक्षेकरिता ५ एकक ट्युबरक्युलीन त्वचेच अंतःक्षेपणाने दिल्यानंतर ४८ तासांनी त्या जागी सु. १० मिमी. आकारमानाची हाताला लागणारी गाठ रोग असल्याचे दर्शविते. मात्र ही परीक्षा ऋण मिळाल्यास रोग नाही असे समजता येत नाही. याकरिता इतर परीक्षाही महत्त्वाच्या असतात. छातीची क्ष-किरण तपासणी अपरिहार्य असते. कोष्टक क्र. २ मध्ये तीन प्रकारच्या मस्तिष्कावरणशोथांतील मस्तिष्क-मेरुद्रवाच्या प्रयोगशालेय तपासणीत आढळणारे फरक दर्शविले आहेत.

उपचार : निश्चित निदानानंतर मान्य अशा तीन क्षयरोगरोधी औषधांची ताबडतोब योजना करावी. (१) स्ट्रेप्टोमायसीन स्ल्फेट अंतर्स्नायू अंतःक्षेपणाने जास्तीत जास्त १ ग्रॅ. मात्रा दररोज. (२) पॅरा-ॲमिनो सॅलिसिलिक अम्ल (पास) जास्तीत जास्त १५ ग्रॅ. दररोज तोंडाने. (३) आयसोनियाझीड जास्तीत जास्त १ ग्रॅ. दररोज तोंडाने. या औषधांबरोबर त्यांची विषाक्तता कमी होण्याकरिता दररोज १० मिग्रॅ. पिरिडॉक्सीन देतात. स्ट्रेप्टोमायसिनाऐवजी रिफँपिसीन वापरता येते. तिन्ही औषधे तीन महिने दररोज दिल्यानंतर त्यांपैकी एक बंद करून आयसोनियाझीड व पास किंवा आयसोनियाझीड एक बंद करून आयसोनियाझीड व पास किंवा आयसोनियाझीड आणि रिफँपिसीन ही संयुक्त चिकित्सा अठरा महिन्यांपर्यंत चालूच ठेवावी लागते. 

 

अती गंभीर आजारात स्ट्रेट्टोमायसीन अंतर्मेरुनाल अंतःक्षेपणाने (कटि-सूचिवेध करून) देता येते. कॉर्टिकोस्टेरॉइडे, प्रेडनिसोलोन किंवा डेक्सॅमेथासोन यांचा कधी कधी उपयोग होतो. वरील औषधी 

कोष्टक क्र. २ मस्तिष्कावरणशोथाच्या तीन मस्तिष्क-मेरुद्रवात आढळणारे फरक

मस्तिष्क-मेरुद्रव

मस्तिष्कावरणशोथ प्रकार 

सपूय 

क्षयरोगजंतुजन्य 

अपूतिक 

दृश्य स्वरुप

गढूळ, पिवळसर

स्वच्छ कधी कधी कोळिष्कासारखा क्लथ

स्वच्छ कधी कधी गढूळ

कोशिका

बहुकेंद्रकी

लसीकाकोशिका किंवा बहुकेंद्रकी व लसीका कोशिका मिश्र

लसीका कोशिका किंवा मिश्र

प्रथिने

०.१-०.५% किंवा अधिक

०.१ %

०.१-०.५% क्वचित अधिक

क्लोराइडे (मिग्रॅ. %)

६५०-६८०

५१० पेक्षा कमी

प्राकृतिक ७२०-७५०

ग्लुकोज (मिग्रॅ.%)

अत्यल्प किंवा अभाव

५० पेक्षा कमी

प्राकृतिक ८०-१००

सूक्ष्मजंतू

काचपट्टीवर किंवा संवर्धनात मिळतात

काचपट्टीवर किंवा संवर्धनात मिळतात

अभाव


 

योजनेशिवाय निष्णात शुश्रूषा, योग्य पोषण वगैरेंची गरज असते.

फलानुमान : रासायनिक चिकित्सेमुळे, लवकर निदान व उपचार सुरू केल्यास ९०% रुग्ण बरे होतात. उशिरा उपचार केल्यास हे प्रमाण ६०% पर्यंत घसरते. शिवाय बरे होणाऱ्यांमध्ये मनोदोष, अपस्मार (फेफरे), बहिरेपणा, अंधत्व इ. दुष्परिणाम उरतात व ते कधी कधी कायम स्वरूपाचे असतात.

पहा : तंत्रिका तंत्र क्षयरोग.

संदर्भ : 1. Datey, K. K. Shah, S. J. Ed., A. P. I. Textbook of Medicine Bombay, 1979.

            2. Davidson, S. MacLeod, J., Ed., The Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1973.

            3. Krupp, M. A. Chatton, M. J., Ed., Current Medical Diagnosis and Treatment, Singapore, 1983.

            4. Petersdorf, R. G. and Others, Ed., Harrison’s Principles of Internal Medicine. Singapore, 1983.

            5. Scott, R. B. Ed., Prince’s Textbook of the Practice of Medicine, Oxford, 1978.

 

 

भालेराव, य. त्र्य.