मलस्सर : केरळ व तमिळनाडू राज्यांत विशेषतः पालघाट आणि त्रिचूर जिल्ह्यांतील जंगलात आढळणारी एक वैशिष्ट्यपूर्ण जमात. मलस्सर ही जातिव्यापक संज्ञा असून मलाई (महा) मलस्सर, मलचरिवन मलस्सर आणि नट्टू मलस्सर या नावांनी ज्ञात असलेल्या सर्व जमातींचा त्यात अंतर्भाव होते. यांची वस्ती मुख्यतः नेम्मार तालुक्यातील नेल्लीयमपती टेकड्यांवर, कोलेन्गोडेच्या जंगलात व थूथानपरा आणि पोथुमूडी गावांत आढळते. हे लोक ‘मलयारस’ या नावानेही ओळखले जातात. यांची लोकसंख्या ३,१४५ (१९७१) होती.
काळा वर्ण, कुरळे केस आणि मध्यम उंची ही त्यांची काही ठळक शारीरिक वैशिष्ट्ये होत. हे लोक तमिळ व मलयाळम् मिश्रित बोलीभाषा वापरतात. स्त्री-पुरुष अर्धनग्नमच असतात तथापि स्त्रिया कमरेला वस्त्र गुंडाळून त्याचा एक पदर वक्षःस्थळावरून खांद्यावर टाकतात. या जमातीतील स्त्रियांना आभूषणांची आवड आहे. मलस्सर जमातीतील बहुतेक लोक जंगल तोडून व जाळून त्या स्थळी शेती करतात. सुरुवातीस हे अन्नसंकलन करणारे म्हणून प्रसिद्ध होते. जंगलातून मध, फळे, मुळे, इ. ते गोळा करीत. पशुपालन, शिकार हे त्यांचे महत्त्वाचे व्यवसाय होत. आता ते मोलमजुरीचीही कामे करतात. जंगलातील हत्तींना पकडण्यासाठी व त्यांना माणसाळण्यासाठी या लोकांची मदत घेतली जाते. त्यांच्या झोपड्या साध्या, बांबूच्या बनविलेल्या, पण आकर्षक असतात. झोपडी जमिनीपासून थोड्या उंचीवर बांबूच्या काठ्यांनी केलेल्या व्यासपीठावर किंवा चौथऱ्यावर बांधलेली असते. ५ ते ६ झोपड्यांची त्यांची वस्ती असते. त्या वस्तीला ‘पथी’ म्हणतात. प्रत्येक पथीच्या प्रमुख व्यक्तीस ‘वेन्डारी’ म्हणतात. मलस्सर पूर्णतः मांसाहारी असूनही म्हैस, बैल, गाय या जनावरांचे मांस निषिद्ध मानतात. गाईला ते स्पर्शही करीत नाहीत.
मुले-मुली वयात आल्यानंतरच लग्ने होतात तथापि क्वचित बालविवाहही होतात. विवाहसमारंभ वधूच्या घरी होतो. लग्नविधी सोमवारी साजरा करतात. वधूमूल्याची चाल रूढ असून घटस्फोटाची प्रथा आहे. विवाहाच्या वेळी पितळेची ताली मुलीच्या गळ्यात बांधण्यात येते आणि एकाच थाळीत नवदांपत्य भोजन करते. नवरदेवाच्या हातात लोखंडाची आंगठी घालतात. मातृसत्ताक कुटुंबपद्धती असूनसुद्धा या जमातीत स्त्रियांची संख्या कमी असल्यामुळे बहुपतित्वाची चाल आहे. रजस्वला आलेल्या मुलीला सात दिवस अशौच मानून वेगळ्या झोपडीत ठेवतात. विवाहानंतर बुधवारी मुलीस नवऱ्याच्या घरी पाठवतात. कडार जमातीचे लोक आपणांस मलस्सर जमातीपेक्षा उच्च मानतात व म्हणूनच मलस्सर जमातीचे लोक कडार रहात असलेल्या भागापेक्षा खालच्या भागात वस्ती करून रहातात.
मलस्सरांमध्ये गोंदून घेण्याची हौस असून विशेषतः स्त्रिया चित्रविचित्र आकृत्या हातांवर गोंदवून घेतात.
मलस्सर हे वर्षातून एकदा एप्रिल महिन्यात मल्लुंग देवीला बकरा बळी देतात. रती, काली व मरिअम्मा या हिंदू देवींचीही ते पूजा करतात. ‘मनकडहा’ ही त्यांची प्रमुख देवी आहे. हे जडप्राणवादी असून त्यांचा भूताखेतांवर विश्वास आहे. जमातीच्या प्रमुखाला ‘मूप्पन’ म्हणतात. विवाहसमारंभात त्याला विशेष महत्त्व आणि अधिकार असतात. तो पंचायतीतील तंटे सोडवितो.
मलस्सर मृत व्यक्तीस आंघोळ घालून तेल लावून नव्या कपड्यात गुंडळतात आणि ताटीवरून तिला स्मशानभूमीकडे नेतात. मृत व्यक्ती पंचायतप्रमुख असेल, तर मृताबरोबर त्याची काठी, कपडे इ. वस्तूही ठेवतात. मृतास बसलेल्या स्थितीत त्रिकोणाकृती खड्ड्यात पुरतात. मृत व्यक्ती पुरुष असल्यास त्याची विधवा पत्नी पान खाऊन मृतव्यक्तीच्या डोळ्यावर पीक टाकते. तिसऱ्या दिवशी भात करून सात पानांवर ठेवतात व नंतर सर्वजण जेवतात. मृताशौच तीन दिवस पाळतात.
संदर्भ: 1.Luiz, A.A.D. Tribes of Kerala, New Delhi, 1962
2. Thurston, Edgur, Castes and Tribes of Southern India, Vol.IV, Madras, 1965.
शेख, रुक्साना
“