मॅर्डाक, जॉर्ज पीटर : (११ मे १८९७− ). सुप्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. त्याचा जन्म सधन, सुसंस्कृत व उदारमतवादी कुटुंबात मेरिडन (कनेक्टिकट-अ.सं.सं.) येथे झाला. हॅरिएट एलिझाबेथ (ग्रेव्हज) आणि जॉर्ज ब्रॉन्सन मर्डाक हे आईवडील. ते मेरिडन येथील शेताची व्यवस्था पाहत. वडिलांनी त्याच्या कलानुसार त्यास शिक्षण दिले. येल व हॉर्व्हर्ड यांसारख्या ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्याने शिक्षण घेऊन ए.बी. (१९१९) व पीएच्.डी. (१९२५) या पदव्या मिळविल्या. पहिल्या महायुद्धातील सक्तीच्या लष्करी भरतीमुळे त्याच्या औपचारिक शिक्षणात अडथळे आले. ॲल्बर्ट जी. केलरच्या मार्गदर्शनाखाली त्याने समाजशास्त्र व मानवशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. याशिवाय इतिहास, कायदा, भूगोल इ. अनेक विषयांतही तो रस घेत असे आणि वाचन करी. त्याने कर्मेन एमिली स्वॅन्सन या युवतीबरोबर १९२५ मध्ये लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे. तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्याने यूरोप-आशिया खंडांचा दौरा केला. यानंतर सुरूवातीस त्याने मेरिलॅण्ड विद्यापीठात काही वर्षे अध्यापन केले. पुढे त्याची येल विद्यापीठात मानवशास्त्र विषयाचा साहाय्यक प्राध्यापक (१९२८) आणि नंतर तेथेच प्राध्यापकपदी नियुक्ती झाली (१९३८). या पदावर दुसऱ्या. महायुद्धातील अमेरिकेच्या नौदलातील अधिकारी म्हणून केलेली तीन वर्षाची (१९४३−४६) सेवा वगळता तो एकवीस वर्षे होता (१९६०). पुढे त्याची नियुक्ती पिट्सबर्ग विद्यापीठात अँड्र्यू मेलॉन प्राध्यापक म्हणून सामाजिक मानवशास्त्र विषयासाठी करण्यात आली (१९६०−७३). निवृत्तीनंतर तो दोन वर्षे गुणश्री-प्राध्यापक म्हणून येथेच राहिला.
मॅर्डाक याने अनेक समाजांचा व त्यांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आहे. त्याच्या एकंदर अभ्यास-संशोधनात एक समान विचारधारा दिसून येते. त्याच्या मते निरनिराळ्या समाजांची रचनात्मक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये जरी विभिन्न असली, तरी मानवी समाजाची काही मूलभूत समान प्रक्रियात्मक वैशिष्ट्ये सर्वत्र आढळतात. आपल्या संशोधनामध्ये अशा सार्वत्रिक-पायाभूत अनुक्रमांचा व आकृतिबंधांचा शोध घेण्याचा त्याने प्रयत्न् केलेला आहे.
विविध समाज व त्यांची संस्कृती यांचा तुलनात्मक अभ्यास करावयाचा असेल, तर प्रत्यक्ष क्षेत्र-अभ्यास पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. असे त्याचे ठाम मत होते. त्यानुसार त्याने अनेक समाजांचा विशेषतः इंका, हैदा, विटोटो, नायजेरियन यांचा तेथे जाऊन प्रत्यक्ष अभ्यास केला. त्याचप्रमाणे येल येथील मानवी संबंधाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेमध्ये काम करीत असताना, त्याने विविध संस्कृतींची विपुल माहिती गोळा केली. या माहितीवर आधारित आउटलाइन ऑफ कल्चरल मटेरियल्स (१९३८) हा ग्रंथ संपादित केला.
विविध संस्कृतींमागील समान घटकतत्वांचा शोध घेणे, हे तत्व त्याने कसोशीने पाळले. त्यासाठी विविध संस्कृतींची विखुरलेली माहिती संग्रहीत करून त्याची बृहद्सूची तयार करावी, असे त्याला वाटू लागले. त्यानुसार त्याने इथ्नॉग्राफिक बिब्लिसऑग्रफी ऑफ नॉर्थ अमेरिका ही सूची प्रसिद्ध केली (१९४१). हे त्याचे अत्यंत भरीव कार्य समजले जाते.
मॅर्डाक याने अनेक विषयांवर जरी संशोधनपर लेखन केले असले तरी त्याने लिहिलेला सोशल स्ट्रक्चर (१९४९) हा ग्रंथ शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने एक अभिजात कलाकृती मानावी लागेल. या ग्रंथात त्याने २५० संस्कृतींचा तुलनात्मक करून अगम्य आप्तसंभोग नातेसंबंधाची वर्गवारी व वारसागणती यासंबंधी काही मूलभूत महत्वाचे सिद्धांत मांडले आहेत. त्याच्या या ग्रंथामुळे कुटुंबव्यवस्था व नातेसंबंध यांच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली, असे मानले जाते.
मॅर्डाक याला शास्त्रीय अध्ययनाबरोबरच व्यावसायिक व संघटनात्मक कार्यामध्येही बराच रस होता. सोसायटी फॉर अप्लाइड अँथ्रपॉलॉजी व अमेरिकन अँथ्रपॉलॉजीकल असोसिएशन या संस्थांचा तो अनेक वर्षे अध्यक्ष होता. अप्लाइड अँथ्रपॉलॉजी ही संस्था स्थापन करण्यात त्याने पुढाकार घेतला. १९६२ मध्ये त्याने इथ्नॉपलॉजी नावाचे नियतकालिक सुरू केले. थोड्याच अवधीत त्यास आंतरराष्ट्रीय किर्ती लाभली.
मॅर्डाक याच्या संशोधन-लेखनाचा यथोचित गौरव त्याला मिळालेल्या अनुक्रमे व्हायकिंग फंड (१९४९), हर्बर्ट इ. ग्रेगरी (टोकिओ १९६६), हक्सली (लंडन १९७१) इ. पदकांवरून दिसतो. प्राध्यापक म्हणून काम करीत असताना त्याने नॅशनल रिसर्च कौन्सिल, नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सिस, अमेरिकन अँथ्रपॉलॉजिकल असोसिएशन, अमेरिकन इथ्नॉलॉजिकल सोसायटी आदी संस्थांत सभासद, उपाध्यक्ष, अध्यक्ष इ. नात्यांनी अनेक वर्ष काम केले.
मॅर्डाक याने स्वतःची अशी वेगळी तात्त्विक शाखा काढली नाही. विद्यार्थी व सहकारी यांच्याबरोबर त्याच्या विचारांचे आदानप्रदान नेहमी चालू असे. स्वतःचे एखादे मत चुकीचे असेल, तर तो त्याची निःसंकोच जाहीर कबुली देई. यावरून त्याची विज्ञाननिष्ठा व प्रांजल विद्वत्ता दिसून येते.
मॅर्डाक याच्या वैज्ञानिक कार्याचे समालोचन केले असता, त्याच्या अभ्यासामध्ये विविध समाज व संस्कृती यांचा तौलनिक अभ्यास करून त्यातून सार्वत्रिक व मूलभूत तत्वांचा शोध घेणे, ही मध्यवर्ती प्रेरणा दिसून येते.
मॅर्डाक याने स्फुटलेख, शोधनिबंध आणि ग्रंथ या स्वरूपात विपुल लेखन केले. त्यांची संख्या सत्तरांहून अधिक आहे. काही ग्रंथ त्याने संपादिले व काहींचे भाषांतरही केले आहे. आवर प्रिमिटिव्ह काँटम्पोररीज (१९३४), आफ्रिका : इट्स पीपल्स अँड देअर कल्चरहिस्टरी (१९५९), कल्चर अँड सोसायटी (१९६५) इ आणखी काही ग्रंथ महत्वाचे आहेत.
संदर्भ : Goedenough, W.H. Ed. Explorations in Cultural Anthropology : Essays in Honor of George Peter Murdock, New York, 1964.
भोईटे, अनुराधा
“