मल-अरयन : (मलई अरयन). द. भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी जमात. यांची वस्ती मुख्यतः केरळ राज्यातील कोट्ट्यम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांत आढळते. त्यांची लोकसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार ४,१९४ होती.
त्यांच्या नावाची व्युत्पत्ती अरस्सान (राजा) आणि मल (टेकडी) या दोन सर्वनामांतून झाली असून जंगलचा राजा असा त्याचा मथितार्थ आहे. ते स्वतःस केरळमधील मूळ रहिवासी व गौतम आणि अहल्या यांचे वंशज मानतात. त्यांच्या सहा प्रमुख बहिर्विवाही कुळी (इल्लाम) आहेत: बल, एन्ना, भुंडू, पुथनी, कुरंगन आणि पंथियी. यांशिवाय चेरमन पेरूमल याला दिलेल्या विविध देणग्यांच्या वस्तूंवरून मल, नेल्लिपल्ली, मोदलिकड वगैरे आणखी पाच कुळींची नावे आढळतात.
सुदृढ बांधा, मध्यम उंची, इतर आदिवासी रहिवाशांपेक्षा काहीसा उजळ तपकिरी वर्ण, काळे भोर डोळे, कुरळे केस व दाट भुवया ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. स्त्री-पुरूष दोघेही कानात अलंकार घालतात. स्त्रिया कानात सोन्याचा ठक नावाचा अलंकार, हातात बांगड्या व नाकात नथणी घालतात. हे लोक इतर जमातींपेक्षा प्रगत असून त्यांच्या राहणीमानावर आधुनिकतेचा परिणाम झालेला दिसून येतो. मलयाळमची अपभ्रष्ट बोली ते बोलतात. ही जमात मांसाहारी असून हरिण, सांबर, कोंबडी यांचे मांस ते खातात. त्यांना माकडाचे मांस विशेष आवडते. ताडी व अराका ही त्यांची आवडती मद्यपेये होत. उत्तम शिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. या जमातीचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असून भात, मिरी ही प्रमुख पिके काढतात. अनेकांची स्वतःची जमीन आहे. काही तुरळक प्रमाणात मजुरी करतानाही हे लोक आढळतात. राखीव जंगलातील लोक मिरीचे पीक काढतात आणि जंगलातील वनस्पती , लाकूड इ. विकून उदरनिर्वाह करतात.
यांची स्थिर वस्ती डोंगराच्या उतारावर स्वतंत्र घरे वा झोपड्या बांधून खेड्याच्या स्वरूपात आढळते. घराभोवती पामची झाडे आणि इतर वनराजी असते. घरे सामान्यतः दगड-मातीची असून पायापासून मीटरभर उंच चौथऱ्यावर असतात. हे लोक बांबूच्या चटयांचा वापर घरात सर्रास करतात. यांचा पोषाख साधा असून पुरूष धोतर व शर्ट वापरतात, तर स्त्रिया साडी व पोलके घालतात. ते बहिर्विवाही कुळीत विवाह करितात. मुलीच्या लहानपणी नाममात्र लग्ना (पृथक् विवाह) करतात. त्याला ‘तालीकेटूकल्याणम्’ म्हणतात. आते-मामे भावंडांच्या विवाहाला अग्रक्रम दिला जातो. वधूमूल्याची प्रथा नाही. विवाहविधी साधाच असून भूतपिशाचांची बाधा होऊ नये, म्हणून तो वधूच्या घरी रात्री साजरा केला जातो. वधूवर केळीच्या एकाच पानावर बसून जेवतात. नंतर वर वधूच्या गळ्यात ताली बांधतो. वधू वराच्या घरातील एखादी वस्तू उचलून ‘ही माझ्या वडिलांची आहे’ असे म्हणते तेव्हा वर ती हिसकावून घेतो. नंतर विड्याची वधूवरांत देवाणघेवाण होऊन विवाहविधी पूर्ण होतो. शरीरसंबंधास वर्ज्य असलेल्या कुळीत विवाह केल्यास जमात बहिष्कृत करते. बहुपत्नीत्व प्रचलित असून घटस्फोट मान्य आहे. तो जमात प्रमुख व वधूच्या पित्याच्या संमतीने दिला जातो. घटस्फोटानंतर ताली परत दिली जाते. घटस्फोट पुरूषाकडून दिला असेल, तर त्याला विवाह खर्च भरून द्यावा लागतो. घटस्फोटानंतर सज्ञान मुले पित्याकडेच राहतात. पुनर्विवाह, परित्याग रूढ असून देवर-मेहुणी विवाह प्रचलित आहे. स्त्री-पुरूष दोघांना संपत्तीत समान हक्क असून स्त्रियांस स्वतंत्र संपत्तीचा अधिकार आहे. या जमातीत दत्तकथा रूढ असून दत्तकानंतर मुलगा झाल्यास दोघांना समान वारसाहक्क असतो. पूर्वी या जमातीत मातृसत्ताक कुटुंबपद्धती प्रचलित होती. अद्यापि ही पद्धती काही कुटुंबांत आढळते परंतु सामान्यतः पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ असून बापाकडून मुलाकडे वारसाहक्क जातो.
रजस्वला मुलीस व स्त्रीस सात दिवस तर प्रसूतीनंतर स्त्रीस ३० दिवस जननाशौचास्तव वेगळ्या झोपडीत ठेवतात. काका किंवा मामाकडून बालकाचे नामकरण केले जाते.
जमातीत गावपंचायत असते. गाव प्रमुखास पेरंबन किंवा कनिक्करन म्हणतात. जमातीत मंत्रवेदी हा मांत्रिक असून तो जमातीतील धार्मिक बाबी तसेच वैदूचे काम करतो. हे लोक जडप्राणवादी असून हिंदू देवदेवतांना भजतात. दुर्गा, भगवती, षष्ठा इ. देवतांना ते भजतात तसेच सर्पपूजा, पूर्वजपूजा आणि भूतपिशाच यांनाही ते भजतात. जादूटोणा आणि चेटूकविद्येत त्यांची ख्याती असून इतर आदिवासी त्यांच्या या दैवीशक्तीबाबत बिचकून असतात.
हे लोक मृतास पुरतात. तत्पूर्वी मृत व्यक्तीस आंघोळ घालतात.नंतर नव्या कापडात गुंडाळून प्रेतावर तांदळाच्या अक्षता टाकल्यावर पुरतात. अनैसर्गिकरित्या मृत्यू आल्यास सर्व विधींना काडछाट देतात.मुलगा हा सर्व अंत्यविधी पार पाडतो. मृताशौच सोळा दिवस पाळतात. शिवरात्रीला ते प्रार्थना करून मृतात्म्यास अन्नदान करतात. पुरलेल्या स्थळी मोठे दगड ठेवतात. प्रमुखाचे थडगे असलेल्या ठिकाणी त्याची शस्त्रास्त्रे, भांडीकुंडी व इतर आवडीच्या वस्तू ठेवतात. अशा वस्तूंची पूजा जमातीत पूर्वजपूजा म्हणून रूढ आहे. पुरातत्वज्ञांना मल-अरयनांच्या डॉलमेनमधून मध्याश्मयुगीन हत्यारे उपलब्ध झाली आहेत.
संदर्भ : 1. Krishna Iyer, L. A. Bata Ratnam, L. K. Anthropology in India, Bombay, 1961.
2. Luiz, A. A. D. Tribes of Kerala, Madras, 1962.
3. Registrar General & Census Commissioner for India, Census of India 1961 Vol. VII Kerala, New Delhi, 1974.
4. Thurston, Edgar, Castes and Tribes of Southern India Vol. IV, New York, 1965.
शेख, रुक्साना
“