मरी, जॉन मिड्लटन : ( ६ ऑगस्ट १८८९ – १३ मार्च १९५७ ). प्रसिद्ध इंग्रज साहित्यसमीक्षक. जन्म लंडनमध्ये. लंडनमधीलखाइस्ट हॉस्पिटल आणि ऑक्सफर्डचे ब्रेसनोजे कॉलेज ह्या शिक्षणसंस्थांतून त्याने शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ त्याने पत्रकारी केली. अथिनिअन आणि अँडेल्फी ह्या दोन वाङ्मयीन नियतकालिकांचा तो काही काळ संपादक होता. ( १९१९- २१ १९२३ – ४८ ). जॉइस कॅरी, डी. एच्. लॉरेन्स, कॅथरिन मॅन्लफील्ड ( १९१८ मध्ये मिड्लटन मरीने हिच्याशी विवाह केला ) ह्यांच्याशी त्याची गाढ मैत्री होती व त्या मैत्रीतून मरीला लेखनाची स्फूर्ती मिळाली. साहित्य, धर्म, अर्थशास्त्र, लैगिंक मानसशास्त्र, समकालीन राजकारण आदी विषयांवर मरीने सु. ६० पुस्तके लिहिलेली आहेत.
मरीच्या उल्लेखनीय ग्रंथांत अँस्पेकट्स ऑफ लिटरेचर ( १९२० ), कीट्स अँड शेक्सपिअर ( १९२५ ), सन ऑफ वूमन, स्टोरी ऑफ डी. एच्. लॉरेन्स ( १९३१ ), कॅथरिन मॅन्सफील्ड अँड अदर लिटररी पोट्रेट्स ( १९४९ ), बिट्वीन टू वर्ल्ड्स ( १९३५ , आत्मचरित्र ) ह्यांचा समावेश होतो. समाजवाद, साम्यवाद, ख्रिस्ती धर्म, लोकशाही ह्यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर मरीने आपल्या ग्रंथांतून केलेली भाष्ये वाचनीय आहेत. लेखकांचे ग्रंथ समजून घ्यावयाचे असतील, तर त्याच्या खाजगी जीवनाचा परिचय करून घेणे अत्यावश्यक आहे. असे मरीचे मत होते. आपल्या आत्मचरित्रात त्याने दाखविलेला प्रांजळपणा त्या दृष्टीने लक्षणीय ठरतो.
लंडन येथेच त्याचे निधन झाले.
संदर्भ : Lea, Frank A. The Life of John Middleton Murry, London, 1959.
देसाई, म. ग.