मराठे, संजीवनी रामचंद्र : ( १४ फेब्रुवारी १९१६ – ). विशेषकरून गीतरचना व सुस्वर काव्यगायन यांसाठी मान्यता पावलेल्या एक आधुनिक मराठी कवयित्री. संजीवनींचा जन्म पुण्याचा. शिक्षणही पुण्यातच झाले. महिला विद्यापीठाच्या जी. ए. व एम्. ए. पदव्या त्यांनी संपादन केल्या. शाळकरी वयातच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. या रचनांचा काव्य – संजीवनी ( १९३२ ) हा त्यांचा पहिला संग्रह असला, तरी संजीवनींची रसिकांना खरी ओळख झाली ती राका ( १९३८ ) ह्या संग्रहातून ( काव्य – संजीवनीतील निवडक रचनाही त्यात पुनर्मुद्त केलेली आहे ).
त्यानंतरची संजीवनींची कविता संसार ( १९४३ ), छाया ( १९४९ ), चित्रा ( १९५७ ) व चंद्रफूल ( १९५१ ) या कवितासंग्रहांतून प्रकाशित झाली आहे. भावपुष्प ( १९५१ ) व परिमला ( १९५९ ) हे त्यांचे गीतसंग्रह. संजीवनी ( १९७६ ) हा त्यांच्या निवडक कवितेचा संपादित संग्रह. तसेच काही बालगीतसंग्रह व लाडकी लेक ( १९७६ ) ही अनुवादित बालकादंबरिका ह्यांचाही त्यांच्या साहित्यसेवेत समावेश होते.
संजीवनींनी काव्यलेखनास प्रारंभ केला तो काळ तांबे व रविकिरण मंडळ यांच्या प्रभावाचा होता. साहजिकच तांबे यांच्या गीतशैलीची सार्वत्रिक मोहिनी आणि रविकिरणमंडळाने निर्माण केलेले काव्यगाय नास अनुकूल असे वातावरण यांच्या संस्कारांतून संजीवनींची कविता गेय रूपात अवतरली आणि त्यांच्या गोड गळ्याची तिला उत्तम जोड मिळाली. रवींद्रनाथ टागोरांच्या काव्याची मोहिनीही त्यांत्यावर होती. तांबे यांची जीवनसृष्टी, सौंदर्यशक्ती, तसेच शब्दकळा, आविष्कराचे वळण यांचा संजीवनींच्या कवितेवरील संस्कार स्पष्ट आहे मात्र तांब्यांप्रमाणे त्यांची प्रतिभा नाट्यगीतानुकूल नाही. तसेच मनोरमा रानडे यांच्या काव्यातून आधुनिक सुशिक्षित, सुसंस्कृत स्त्रीमनाचा विशेषत: तिच्या प्रणयभावनेचा, जो एक सहजमोकळा आविष्कार घडण्यास प्रारंभ झाला होता, त्याची परंपराही संजीवनींच्या कवितेत पृथगात्य स्वरूपात प्रवाहित झालेली दिसते. प्रणयानुभवातील तरल स्पंदने, त्याची स्वप्निलता, अलौकिकता व्यक्त करणारी त्यांची कविता तिच्या अस्सलपणामुळे व वेगळेपणामुळे विशेष मनोवेधक ठरली. ‘शांत सागरी कशास उठविलीस वादळे’ हे गीत याचे उत्कृष्ट प्रातिनिधिक उदाहरण होय.
स्वप्नाळू प्रणयिनीचे व संसारी गृहिणीचे भावविश्व चित्रित करणारी संजीवनींची कविता प्राधान्याने स्वत:तच केंद्रित झाली आहे. आपल्या भाविश्वाचे भान विसरून स्वत:पलीकडच्या एखाद्या अनुभवाशी एकरूप झाल्याची ‘एक सानशी कळशी’ ( छाया ) सारखी उदाहरणे मोजकी आहेत. आत्मप्रतीतीच्या परिघाबाहेर गेली की, त्यांची कविता सांकेतिक व क्षीण होते, हे राष्ट्रप्रेमाचा आविष्कार करणार्या त्यांच्या रचनेतून स्पष्ट होते.
संजीवनींच्या काव्यातून प्रीतीच्या पृथगात्म चित्रणाच्या बरोबरीने सौंदर्यपूजक वृत्ती, सश्रद्धता, वात्सल्यादि स्त्रीसुलभ भाव इत्यादींचा आविष्कारही आढळतो. त्यांचे अनुभवविश्व तसे साधे, व्याप व व्यामिश्रता या दृष्टीनी मर्यादित, असे असले तरी या कवयित्रीने आत्मप्रत्ययाशी व स्वत:च्या काव्यप्रकृतीशी प्रामाणिक राहून निर्मितीतील स्वत्व राखले आहे, हे महत्त्वाचे होय. त्यांच्या अनुभवविश्वाला असलेला निरागसतेचा रंग हे त्याचे एक वेधक वैशिष्ट्य आहे. संजीवनींच्या पुढील काळातील रचनेवर मराठी काव्यातील नवीन प्रवाह, स्थित्यंतरे यांचे बाह्य संस्कार झालेले दिसतात. यातून अनुभवातील अंतर्मुखता तसेच रचनेतील साक्षेप व संयम वाढलेला दिसला, तरी त्या कवितेचा गाभा तोच राहिला आहे. संजीवनींच्या बालगीतांचा स्वतंत्र उल्लेख आवश्यक आहे. मुलांचे अनुभव प्रौढ जाणिवेचे वा भाषेचे वजन येऊन देता, अस्सलपणे साकार करण्याचे श्रेय त्यांनी मिळविणे आहे. महाराष्ट्र शासनाने बरं का ग आई ( १९६२ ) व हसू बाई हसू ( ९१६३ ) या त्यांच्या संग्रहांना प्रथम पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव केला आहे.
जोशी, सुधा प्र.