मयूराक्षी प्रकल्प : बिहार राज्याच्या संथाळ परगणा जिल्ह्यातील मयूराक्षी नदीवरील जलसिंचन प्रकल्प. जलसिंचन हा जरी या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असला, तरी या प्रकल्पाद्वारे ४,००० किवॉ. इतकी जलविद्युत् निर्मिती केली जाते. तसेच यामुले काही प्रमाणात पूरनियंत्रणही शक्य झाले आहे.त्यामुळे याला बहूउद्देशीय प्रकल्पच म्हणावे लागेल. प्रकल्प जरी लहान असला, तरी याची बांधणी उत्कृष्ट केलेली आहे. संथाळ परगणा जिल्ह्याला लागूनच बीरभूम जिल्हा (प. बंगाल) असून तेथील दुष्काळी परिस्थीतीवर मात करण्याच्या उद्देशाने प. बंगाल राज्य शासनाने पहिल्या पंचवार्षिक योजनाकाळात ‘मयूराक्षी नदीखोर प्रकल्प’ हाती घेतला. बिहारच्या संथाळ परगमा जिल्ह्यातील डोंगरळ प्रदेशात उगम पावून प. बंगालमध्ये भागीरथी नदीला मिळणार्या मयूराक्षी (मोर) या सु. २५० किमी. लांबीच्या नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. संथाळ परगणा जिल्ह्यातील मासनजोर येथे मयूराक्षी नदी अरूंद अशा दरीतून वाहते, तेथेच नदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरणाची उंची ४७.२ मी. व लांबी ६६० मी. सून त्याला २१ दरवाजे आहेत. धरणाचे काम जून १९५५ मध्ये पूर्ण झाले. याला मासनजोर धरण असेही संबोधले जाई परंतु हे धरण कॅनडाच्या तांत्रिक सहकार्याने बांधण्यात आल्याने त्याला कॅनडा धरण असे नाव देण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे संथाळ परगणा जिल्ह्यतील सु. १०,००० हेक्टर क्षेत्राला तसेच बीरभूम व मुर्शिदाबाद जिल्ह्यांतील (प. बंगाल राज्य) सु. २,६०,००० हे. क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. यापैकी सु. ८,००० हे क्षेत्र रब्बी पिकांखालील आहे. जलसिंचनाखालील जमीन लोभ प्रकारची, भाताला पोषक असून त्यामुळे भात उत्पादनात फार वाढ झाली आहे. उसाच्या उत्पादनातही बरीच वाढ झालेली दिसून येते. धरणाच्या उजवीकडील दारांमधून प. बंगालला, तर डावीकडील दोन दरवाज्यांमधून मयूराक्षी डाव्या कालव्या द्वारे संथाळ परगण्याला पाणीपुरवठा केला जातो. १९५६ मध्ये डाव्या कालव्यामध्ये काम पुर्ण झाले.
धरणाच्या खालच्या बाजूस ३२ किमी. वर असलेल्या तिलपारा (वीरभूम जिल्हा) येथे एक अपवाहन बंधारा बांधून तेथे जलविद्यूत् निर्मिती केंद्र उभारण्यात आले आहे. २,००० किवॉ क्षमतेचा पहिला जलविद्यू त् निर्मिती संच डिसेंबर १९५६ मध्ये, तर दुसरा फ्रेब्रुवारी १९५७ मध्ये कार्यान्वित झाला. येथील वीज बीरभूम मुर्शिदाबाद व संथाळ परगणा या जिल्ह्यांना पुरविली जाते. या संपूर्ण प्रकल्पाचा जास्तीजास्त फायदा प. बंगाल राज्याला होतो. येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा संपूर्ण खर्च (सु. २.७५ कोटी रूपये) प. बंगाल राज्य शासनाने केला. मयूराक्षीच्या ब्राह्याणी, द्वारका, वक्रेश्वर व कोपाई या चार उपनद्यांवरही लहानसहान बंधारे बांधण्यात आले आहेत.
चौधरी, वसंत