मनगट : हात (पंजा) व प्रवाह [कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग ⟶ बाहू] यांमधील शरीरभागाला मनगट म्हणतात आणि हे दोन भाग ज्या सांध्यामुळे जोडले जातात त्याला मणिबंध संधी अथवा मनगडी सांधा म्हणतात. प्रामुख्याने प्रबाहूतील बाह्यस्थी व मनगटातील प्राणि बंधास्थी यांमधील हा सांधा असल्यामुळे त्याला बाह्यस्थि-मणिबंधास्थी संधी असेही म्हणतात.

मनगटी सांध्यांची रचना : प्रबाहूतील दुसऱ्या हाडाच्या (अंतरास्थीच्या) खालच्या टोकाखाली असणारे उपास्थी बिंब (उपास्थीची-कूर्चेची –पांढरी चकती) व काही मणि बंधास्थी मिळून पूर्ण मनगटी सांधा बनतो. मणिबंधास्थी एकूण आठ असून ही लहान हाडे समीपस्थ व दूरस्थ अशा दोन ओळींत प्रत्येकी चार अशी रचलेली असतात. समीपस्थ ओळीत बाहेरून आत किंवा पार्श्वबाजूकडून अभिमध्य बाजूकडे असणारी रचना पुढीलप्रमाणे असते. (१) नौकास्थी (२) अर्धचंद्राकृती अस्थी (३)  त्रिकोणीस्थी व (४) कलायास्थी . दूरस्थ ओळीत बाहेरून आत (१) चतुष्कोणई अस्थी (२) चतुष्कोणाभ अस्थी, (३) शिरकात्थी व (४) अंकुशाकार अस्थी अशी रचना असते.

आ. १. मनगटी सांध्यातील अस्थिरचना ( उभा छेद : ( १ ) अंतरास्थी, ( २ ) उपास्थी बिंब, ( ३) कलायास्थी, ( ४ ) त्रिकोणास्थी, ( ५ ) अंकुशाकार अस्थी, ( ६ ) चतुष्कोणाम अस्थी, ( ७ ) चतुष्कोणी अस्थी, ( ८ ) शिरकास्थी, ( ९ ) नौकास्थी, ( १० ) अर्धचंद्राकृती अस्थी, ( ११ ) बाह्यास्थी.

समीपस्थ ओळीतील कलायास्थी वाटाण्याच्या आकाराचे हाड असून ते त्रिकोणास्थीच्या पुढील बाजूस असते व त्याहाडाशी सांधलेले असते. इतर सर्व मणिबंधास्थी शेजारच्या हाडांशी सांध्यांनी जोडलेले असतात.कलास्थायी वगळून इतर तीन समीपस्थ अस्थींचा मिळून एक बहिर्वक्र पृष्ठभाग बनतो. बाह्यास्थीचे खालचे टोक व अंतरास्थीच्या खालच्या टोकाखाली असणारे उपस्थी बिंब मिळून जो अंतर्वक्र पृष्ठांभाग बनतो तो वर उल्लेखिलेल्या बहिर्वक्र पृष्ठभागांशी सांधला जाऊन मनगडी सांधा बनतो. 

मणिबंधास्थीचा पृष्ठीय पृष्ठभाग काहीसा बहिर्वक्र असतो आणि अग्रपृष्ठभागावर खोल अंतर्वक्रता असते. या अंतर्वक्रतेला मणिबंधीय सीता (खाच) म्हणतात. हाडांना जोडणार्‍यात बळकट तंतुमय परिवाहकामुळे (उपबंधामुळे) या सीतेचे बोगद्यासारख्या संरचनेत रूपांतर होते. या बोगद्यातून प्रवाहाकडून हाताकडे जाणार्‍याय तंत्रिका (मज्जातंतू) व कंडरा जातात.  तंतुमय उपबंधामुळे मनगटाची ताकद वाढते व अभिवर्तक (वाकविण्याची क्रिया करणार्‍या) स्नायूंची कार्यक्षमताही वाढते. सर्व मणिबंधास्थी यांच्या खडबडीत भागावर असलेल्या छोट्या छोट्या संधिबंधानी एकमेकांत जखडलेले असतात व हे संधिबंध करतलीय (तळहाताकडील) आणि पृष्ठीय अशा दोन्ही बाजूंवर असतात.

रक्त व तंत्रिका पुरवठा : अस्थी आणि संधिबंध यांना अरीय (त्रिज्यीय) रोहिणी व अंतरास्थी रोहिणी यांच्या लहान लहान शाखा रक्तपुरवठा करतात. अभिमध्य तंत्रिका व अरीय तंत्रिकायांच्या शाखा तंत्रिका पुरवठा करतात.

हालचाली : मनगटाच्या प्रमुख हालचाली पुढीलप्रमाणे असतात. 

(१) अंतर्नमन: तळहात प्रबाहूजवळ घेण्याची क्रिया.या क्रियेत बाह्यस्थि-मणिबंधास्थी संधी आणि मध्य-माणिबंधास्थी संधी हे दोन्ही भाग घेतात. त्यांपैकी मध्य –मणिबंधास्थी संधी अधिक चलनक्षम असतो.

(२)प्रसारण : तळहात वरील क्रियेच्या उलट वळवणे. या क्रियेत वरील दोन्ही संधी भाग घेत असले, तरी बाह्यस्थि-मणिबंधास्थी संधी अधिक चलनक्षम असतो.

वरील दोन्ही हालचाली त्या घडून येण्यास कारणीभूत असणार्‍याल स्नायूंच्या प्रतिरोधक क्रियांमुळे मर्‍यादित केल्या जातात.

आ. २. उजव्या मनगटावरील संधिबंध : ( अ ) करतलीय ( आ ) पृष्ठीय. 


(३)अभिवर्तन : तळहात अंतरास्थीच्या बाजूकडे वळवण्याची क्रिया. ही क्रिया प्रामुख्याने आणि बहुतांशी बाह्यस्थि-मणिबंधास्थी सांध्यांच्या हालचालीमुळे होते. या क्रियेत अर्धचंद्राकृती अस्थींची हालचालही भाग घेते. हात प्रबाहूच्या सरळ रेषेत असताना हे हाड उपास्थी बिंब व बाह्यस्थीच्या खालच्या टोकाशी संलग्न असते. परंतु अभिवर्तनात ते बिंबापासून दूर सरकून फक्त बाह्यास्थीशी संलग्न होते.

(४)अपवर्तन : तळहात बाह्यस्थिच्या बाजूस वळविणे. ही क्रिया जवळ जवळ पूर्णपणे मध्य-मणिबंधास्थी  संधीमध्ये होते. या क्रियेत शिरकास्थी व अंकुशाकार अस्थी या दोहोंची विशिष्ट हालचाल होते.

(५)पर्यावर्तन : यात मनगटाची गोलाकार हालचाल होते. या क्रियेत अंतर्नमन, अभिवर्तन, प्रसारण व अपवर्तन क्रमशः लागोपाठ होतात. तशाच या उलट्या क्रमानेही होऊ शकतात.

महत्व : मनगटाजवळ अरीय रोहिणी बाह्यास्थीवर फक्त त्वचेखालीच असल्यामुळे रूग्णपरीक्षेत तिचा नाडी परीक्षेसाठी उपयोग होतो. हाताच्या सर्व हालचाली मनगटाशी संबंधित असल्यामुळे मनगटी सांध्यांना दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले आहे. भाकरी मिळविणे व भाकरी खाणे या दोन्हीकरिता मनगटाची असणारी आवश्यकता निर्विवाद आहे.

आ. ३. मॉडेलुंग विद्रूपता

काही प्रमुख संबधीत विकृती : मॉडेलुंग विद्रुपता: अंतरास्थीच्या खालच्या टोकाचा स्थानभ्रंश किंवा अपूर्ण संधिच्युती जन्मजात असू शकते. त्यामुळे मनगटाची जी विद्रुपता उत्पन्न होते तिला ओ.डबल्यू. मॉडेलुंग या जर्मन शस्त्रक्रिया तंज्ञांच्या नावावरून मॉडेलुंग विद्रपता म्हणतात. ती मध्ये मनगटाच्या मागील बाजूस अंतरास्थीचे खालचे टोक जादा बाहेर येण्यापासून हात बाह्यस्थिकडे अधिक वळण्यापर्यंत विद्रुपता आढळते.कधीकधी बाह्यस्थीच्या खालच्या टोकाच्या अस्थिभंगातील खालचा छोटा तुकडा वर सरकल्यामुळे अशीच विद्रुपता निर्माण होते.

कॉलेस अस्थिभंग : पडताना तळहातवर शरीराचा भार पडून मनमाड – मनमोहन, लोककवीबाह्यास्थीच्या खालच्या भागात अस्थिभंग होऊन तुटलेला छोटा तुकडा पृष्ठीय भागात पुढे येतो. बहुधा पन्नाशीवरील व्यक्तीत आढळणार्‍या या अस्थिभंग प्रकाराला अब्राहम कॉलेस या आयरिश शस्त्रक्रिया तंज्ञांच्या नावावरून कॉलेस अस्थिभंग म्हणतात. या अस्थिभंगामुळे मनगटाजवळ येणारी विद्रुपता वैशिष्ट्येपूर्ण असून, ती पाश्चात्य लोकांच्या जेवणात वापरण्यात येणार्‍या काट्यासारखी दिसते म्हणून तिला भोजन काटा विद्रुपता असेही म्हणतात.

आ. ४. कॉलेस अस्थिभंग : ( १ ) मनगटाची : ( १ ) मनगटाची विद्रूपता, ( २ ) जेवणाचा काटा, ( ३ ) बाह्यास्थीचा भंग.


कीनबॉख रोग : मणिबंधास्थीपैकी अर्धचंद्राकृती अस्थीचे अपपोषण होऊन ती मऊ बनून तिचे छोटे तुकडे होणार्या् विकृतीला रोबेर्ट कीनबॉख या ऑस्ट्रियन क्ष-किरण तज्ञांच्या नावावरून कीनबॉख रोग म्हणतात. निश्चित कारण अज्ञात असलेली ही विकृती या अस्थीला वारंवार इजा पोहचणाश व्यवसायात (उदा. मनगटाचा पुढचा भाग टोला मारण्यासारखा वापरणे) उदभवते. परिणामी संबंध सांध्याचा अस्थिसंधिशोथ (अस्थिसंधीची दाहयुक्त सूज) उदभवतो. 

इतर विकृती : संधिवात, संधिवाताम संधिशोथ, अस्थिसंधिशोथ यासारख्या सांध्यांच्या रोगांत मनगटी सांध्यामध्ये विकृतीचा नेहमी धोका असतो. मणिबंधीय सीतेतून अभिमध्य तंत्रिका तळहातात उतरते. या ठिकाणी काही कारणामुळे तंत्रिकेवर दाब पडल्यामुळे मणिबंध बोगद्यातील संपीडन नावाची विकृती उत्पन्न होते. तळहातात वेदना, मुंग्या, बधिरता इ. लक्षणे आढळतात. शस्त्रक्रियेने हा दाब कमी केल्यास रूग्णास एकदम आराम पडतो.

आ. ५. मणिबंध पतन

भुजा स्थीच्या अरीय तंत्रिकेसमीपच्या भागाचा अस्थिभंग त्यातंत्रिकेस इजा करण्यास कारणीभुत होतो. परिणामी कधीकधी मणिबंध पतन विकृती उत्पन्न होते. मणिबंध प्रसारक स्नायूंच्या तंत्रिका पुरवठ्यात व्यत्यय आल्यामुळे अंतर्नमनाच्या स्नायूंच्या अनिर्बंधित क्रियाशीलतेमुळे मनगटाजवळ हात सारखा अंतर्नमित राहतो. सुमारे दोन महिन्यांत सुधारणा न झाल्यास शस्त्रक्रिया करून गुंतलेली अरीय तंत्रिका सोडवावी लागते.जरूर पडल्यास ती जोडावीही लागते. 

  

पहा : बाहू, हात.

संदर्भ : 1. Adams, C.J. Outline Orthopedics, Edinburgh. 1973.

            2. Hollinshed, W.H. Textbook of Anatomy ,New Delhi,1974.

            3. Rains ,A.J.H. Rotchi H.D.Ed. Bailey and Love Short Prnctice of Surgery, London, 1977.

            4. Warwick, R. Williams, P.L.Ed. Grays Anatomy, London. 1973.   

                                       

कुलकर्णी, श्यांमकांत, भालेराव ,य.त्र्यं.