मधमाशी : हायमेनॉप्टेरा गणाच्या क्लीस्टोगॅस्ट्रा उपगणातील एपॉयडीया या अधिकुलात कीटकांच्या सु. २०,००० जाती आहेत.कीटकांना इंग्रजीत ‘बी’ या सामान्य नावाने ओळखण्यात येते. त्यांपैकी मधमाशी हा एक कीटक होय. या अधिकुलाचे तेरा कुलांत विभाजन केले आहे. यांपैकी एपिडी या कुलात मधमाश्यांचा समावेश होतो. एपिस हा मधमाश्यांचा मुख्य वंश होय. या वंशातील सर्व मधमाश्यांना नांगी असते. आणि त्यांना दुखावल्यास त्या नांगी मारतात. या मधमाश्यांचे दोन विभाग करता येतील. पहिल्या विभागात प्रकाशात एकच पोळे बांधणाऱ्या एपिस डॉरसॅटाए. फ्‍लोरिया या मधमाश्या, तर दुसऱ्या विभागात जास्त फण्या अससलेली आणि अंधारात, झाडांच्या ढोल्यांत किंवा दगडांच्या कपारीत पोळी बांधणाऱ्या ए. मेलिफेराए. इंडिका या जातींच्या मधमाश्या समाविष्ट आहेत.

आ. १. मधमाशीच्या जाती : (अ) एपिस इंडिका; (आ) ए. फ्लोरिया; (इ) ए. डॉरसॅटा; (ई) ए. मेलिफेरा : (१) राणी, (२) कामकरी (३) नर.

ए. मेलिफेरा ही मधमाश्यांची जगातील प्रसिध्द जाती आहे. या जातीच्या मधमाश्या यूरोप व आफ्रिकेत आढळतात. यूरोपातून ती अमेरिकेत नेण्यात आली. यूरोप आणि अमेरिकेतील या जातीच्या उपजाती पुढीलप्रमाणे आहेत : (१) इटालियन, (२) कॉकेशियन, (३) कार्निओलान व (४)  जर्मन. याच जातीच्या आफ्रिकेतील उपजाती (१) इंटरमीसा, (२) लामास्की (ईजिप्शयन), (३) कॅपेन्‍सिस (केप), (४) अँडॅन्सोनी (आफ्रिकी) या आहेत. ए. डॉरसॅटा, ए. इंडिकाए. फ्लोरिया या भारतात आढळणाऱ्या मधमाश्यांच्या प्रमुख जाती आहेत.

मधमाशी या कीटकाचा मानवाशी संबंध सु. ४,००० वर्षांपूर्वी आला असावा. वेदकालीन वाङ्‍मयात व इतर धार्मिक ग्रंथात मधमाशी व मध यांचे उल्लेख आहेत. माणसाळविलेल्या प्राण्यांत मधमाशीचे स्थान फार महत्त्वाचे आहे.

निरनिराळ्या जातींच्या मधमाश्यांच्या आकारमानात खूपच फरक आहे. ए. फ्लोरिया ही मधमाशी आकारमानाने सर्वांत लहान आहे. हिची लांबी ८ते १३ मिमी. असते. ए. डॉरसॅटा ही मधमाशी १८ ते २१ मिमी. लांब असते. पूर्ण वाढ झालेल्या मधमाशीच्या शरीराचा रंग काळा किंवा तपकिरी असतो.

शरीररचना : शरीरावर केसांचे आवरण असते. डोके वक्षाइतकेच (छातीइतकेच) रूंद असते व पुढून पाहिल्यास त्रिकोणी दिसते. ते वक्षाला पटलयुक्त अरूंद मानेने जोडलेले असते. बाजूस असलेले संयुक्त डोळे अंडाकृती  असतात व डोक्यावर तीन अक्षिका (साधे डोळे म्हणजे प्रकाशग्राही कोशिकांचे-पेशींचे-समूह व अधूनमधून रंगद्रव्ययुक्त कोशिका यांनी बनलेले डोळे) असतात [⟶ डोळा]. उदोष्ठधर (भालाच्या अग्रभागी असणारे कॅल्शियमयुक्त पट्ट) लांबट, जिव्हा लांब, उत्तर स्पर्शक (मुखाच्या मागे असलेले सांधेयुक्त संवेदी उपांग) एक खंडाचा बनलेला असतो. पंखांच्या  दोन जोड्या लांब आणि निरूंद असून अग्र (पुढील) पंखांवर शिरा असतात. पाय बळकट; उदर छेदित (रूंद टोक असलेले), लांबोळके पण शरीराच्या इतर भागांपेक्षा कमी केसाळ असते. उदराचा सहावा खंडबहिरागत (इतर भागांच्या मानाने पुढे आलेला) असून उदराच्या शेवटी वाकडी, काटेरी नांगी असते. [⟶ कीटक].

मधमाशीचा पचनमार्ग मुख, ग्रसनी (घसा), ग्रसिका (ग्रसनी ते जठरापर्यंतचा भाग; यात विस्तारित झालेला आणि मधु-जठर या नावाने ओळखण्यात येणारा भाग असतो),संबंधित लाला ग्रंथी, जठर (यात अन्नाचे पचन व शोषण होते), अग्रांत्र (आतड्याचा पुढील भाग) व गुदांत्र यांनी बनलेला आतड्याचा भाग व शेवटी गुदद्वार असा असतो. उत्सर्जक इंद्रिये (मालपीगी नलिका; मार्चेल्लो मालपीगी या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या नलिका) रक्तातील निरूपयोगी द्रव्ये पचनमार्गात जठर व गुदांत्र यांच्या संधिस्थानापाशी सोडतात.

रक्ताभिसरण तंत्र (संस्था) हे विवृत (खुले) असून अंतर्गत इंद्रिये रक्ताने आवेष्टिलेली असतात. पचन झालेले अन्नद्रव्य रक्ताद्वारे ऊतकांकडे (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांकडे) वाहून नेले जाते व चयापचयात (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक आणि रासायनिक घडामोडींत) निर्माण होणारी निरूपयोगी द्रव्येही वाहून नेली  जातात. नलिकाकार हृदय रक्ताभिसरणाचे कार्य करते. बाह्य वातावरणाला (श्वसन रंध्रांनी) जोडलेल्या नलिकांच्या बनलेल्या श्वसन तंत्राद्वारे जरूर त्या इंद्रियाला ऑक्सिजन पुरविला जातो व निरूपयोगी कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर काढून टाकला जातो.

तंत्रिका तंत्र हे चांगला लक्षणीय स्वरूपाचा मेंदू व उदराच्या पश्च भागापर्यंत विस्तारलेली तंत्रिका रज्जू आणि तिला जोडलेल्या ७ तंत्रिका गुच्छिका (तंत्रिका कोशिकांचे पुंज) यांचे बनलेले असते. स्‍नायू तंत्र काहीसे जटिल (गुंतागुंतीचे) असून पंखांचे स्‍नायू सर्वांत शक्तीमान असतात  व त्यामुळे मधमाशी जवळजवळ आपल्या शरीराच्या वजनाइतका भार वाहून नेऊ शकते. फक्त कामकरी मधमाश्यांच्या उदरखंडांच्या खालच्या भागावर मेण ग्रंथी असतात. या ग्रंथीतून एक प्रकारचा द्रव (मेण) स्रवतो व त्याचा हवेशी संपर्क आल्यावर तो घनरूप होऊन त्याच्या पत्र्या बनतात.

नर व राणी माश्यांत चांगली विकसीत जननेंद्रिये असतात. कामकरी माश्या या माद्याच असतात पण त्यांची जननेंद्रिये पूर्ण विकसितही झालेली नसतात व क्रियाक्षमही नसतात. राणी व कामकरी माश्यांतील नांगी म्हणजे रूपांतरीत अंडनिक्षेपक (अंडी योग्य जागी सोडणारी विशेष संरचना) असून कामकरी माश्या तिचा उपयोग गांधील माश्या व इतर दंश करणाऱ्या कीटकांप्रमाणे भक्ष्याला मारण्याकरिता न करता फक्त संरक्षणासाठी करतात.

आ. २. मधमाशीची (केसाळ आवरण काढून टाकल्यावर) बाह्य शरीररचना : (१) शृंगिका, (२) डोके, (३) संयुक्त डोळा, (४) अक्षिका, (५) वक्ष, (६) पंख, (७) उदर, (८) नांगी, (९) पाय, (१०) शुंडा (सोंढ), (११) जांभिका, (१२) अधरोष्ठ, (१३) जंभ, (१४) उत्तरोष्ठ.

ज्ञानेंद्रिये : उच्च प्रतीची संवेदनाग्रहणक्षमता असलेल्या कीटकांपैकी मधमाशी ही एक आहे. स्पर्शाला संवेदनशील असलेले केस तिच्या शरीराच्या विविध भागांवर असतात. शृंगिकांवर हजारो गंधसंवेदनाग्राहक असतात. मुखावरील रुचि-इंद्रियांद्वारे मधमाशीला एखादा द्रव गोड, अम्‍लीय, क्षारीय (अल्कलाइन) वा लवणयुक्त आहे हे समजते. अक्षिकांच्या साहाय्याने ती प्रकाश व अंध:कार यांत भेद करू शकते, तर संयुक्त नेत्रांनी ती रंग, आकार आणि रूप यांच्यातील फरक ओळखू शकते. हिरव्या, निळ्या, पिवळ्या व जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील मानवी डोळ्याला अदृश्य असलेल्या) किरणांत ती भेद करू शकते; पण तांबड्या किरणांना ती असंवेदनाशील आहे. संयुक्त नेत्राद्वारे वस्तूचे संकलित चित्र मिळत असल्याने मधमाशीला गतिमान वस्तूंचे ज्ञान सहजतेने होते. तिला कालाची जाणीव व स्मरणशक्ती  असल्याने ती एखाद्या शेतातील विशिष्ट क्षेत्रात दिवसामागून दिवस योग्य वेळी पुन:पुन्हा परतताना आढळते. मधमाश्यांची बौद्धिक पात्रता व शिकण्याची पात्रता यांसंबंधी कार्ल फोन फ्रिश या जर्मन शास्रज्ञांनी महत्त्वाचे प्रयोग केले. तसेच कामकरी मधमाश्या मकरंद मिळण्याचे ठिकाण सापडल्यावर इतर कामकरी मधमाश्यांना ते ठिकाण, त्याची दिशा, अंतर व तेथे मिळणाऱ्या मकरंदाचा अंदाज यांविषयी माहिती देण्यासाठी जी विशिष्ट प्रकारची हालचाल (नृत्य) करतात यासंबंधीही फ्रिश यांनी मह्त्त्वाचे संशोधन केले आहे. [⟶ प्राण्यांचे वर्तन; फ्रिश, कार्ल फोन].

आ. ३. कामकरी माधमाशीची अंतर्रचना : (१) मेंदू, (२) महारोहिणी, (३) ग्रसिका, (४) मधु-जठर, (५) ग्रंथिल-जठर, (६) हृदय, (७) मालपीगी नलिका, (८) अग्रांत्र, (९) गुदांत्र, (१०) गुदद्वार, (११) तंत्रिका-रज्जू, (१२) जठर, (१३) लाला वाहिनी, (१४) लाळ सोडणारी पिचकारी, (१५) जीभ, (१६) मुख, (१७) चूषण पंप.

मधमाश्याचा समूह(किंवा वसाहत) : मधमाश्या हे समाजप्रिय कीटक होत. त्या समूहाने (वसाहत करून) राहतात आणि मध व मेण या पदार्थाची निर्मिती करतात. मधमाश्या मेणाच्या पत्र्या किंवा फण्या तयार करतात व या फण्यांत त्यांची अंडी व डिंभ (अळ्या) राहू शकतील अशा आकाराच्या कोशाची रचना करतात. नंतर या फण्या झाडांच्या ढोल्यांत, गुहेत, भिंतीच्या पोकळीत किंवा कृत्रिम पोळ्यात चिकटविल्या जातात. डिंभांना नियमित अन्नपुरवठा केला जातो व त्याची योग्य अवस्थेपर्यंत वाढ झाली की, कोशावर मेणाचे किंवा रेशमी तंतूचे आवरण घातले जाते.

या समूहातील प्रौढ व पूर्ण वाढ झालेल्या मधमाश्यांचे त्यांच्या कार्यानुरूप वर्गीकरण करता येईल. राणीमाशी ही समूहातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक समूहात एक राणीमाशी असते व त्या समूहाचे मातृत्व तिच्याकडे असते. ही  राणीमाशी जननक्षम असून सदैव निषेचित (फलित) अंडी घालीत राहते व त्यामुळे समूहांची संख्या वाढत राहते. निषेचित अंड्यांपासून निर्माण झालेल्या डिंभांस कामकरी माश्यांकडून राजरस (विशेष प्रभावी चिकटसर आहारद्रव्य; रॉयल जेली) मिळाला की, या डिंभाचे रूपांतर जननक्षम अशा राणीमाशीत होते. हा रस म्हणजे कामकरी माश्यांच्या जिव्हाग्रंथीपासून (मुखाच्या तळापासून निघणाऱ्या जिभेसारख्या मध्यस्थित रचनेच्या खाली असलेल्या ग्रंथीपासून) निर्माण होणारा स्राव असतो. राणी माशीस काटेरी नांगी असते; पण तिचा उपयोग दुसऱ्या राणीमाशीस  मारण्यास केला जातो. ए. मेलिफेरा जातीच्या मधमाश्यांची राणीमाशी १५ ते २० मिमी. लांब असते.

कामकरी माश्या हा समूहाचा दुसरा घटक होय. या माश्या वंध्य (वांझ) असतात. एका समूहात यांची संख्या खूपच म्हणजे शेकडा ९९ पेक्षाही जास्त असते. ए. मेलिफेरा या मधमाश्यांचा समूह २० ते ५० हजार माश्यांचा असू शकतो. कामकरी माश्या निषेचित अंड्यांपासून निर्माण होतात. पोळे तयार करणे, मध, मकरंद व पराग जमा करणे आणि हे करत असतानाच परपरागण करणे [एका फुलातील पराग दुसऱ्या फुलावर टाकणे; ⟶ परागण], डिंभांना व राणी माशीला अन्न देणे व पोळ्याची निगा राखणे ही कामे कामकरी माशा करतात. यांनाही चांगली वाढ झालेली काटेरी नांगी असते आणि तिचा उपयोग त्या पोळ्याच्या व त्यांच्या समूहाच्या संरक्षणाकरिता करतात. मृत मधमाश्या पोळ्यातून बाहेर काढून दूर टाकून देण्याचे महत्त्वाचे कार्यही काही कामकरी माश्या करतात असे दिसून आले आहे. यामुळे मृत मधमाश्या पोळ्यात साठत नाहीत आणि त्यांच्यामुळे उद्‍भवणारे रोग व आकर्षित होणारे अपायकारक कीटक वा इतर जीवजंतू यांपासून पोळ्याचे संरक्षण होते.

समूहाचा तिसरा घटक म्हणजे नरमाशी हा होय. हे नर अनिषेचित अंड्यांपासून निर्माण होतात व प्रौढावस्थेत राणीमाशीशी संभोग करतात. यांना नांगी नसते.

पोळ्याची फणी एका विशिष्ट पध्दतीने तयार केली जाते. मेणाच्या थरावर षट्‍कोणी कोश तयार केल्यावर दोन थर त्यांच्या कोश नसलेल्या पृष्ठावर एकमेकांस चिकटविले जातात. कोशाच्या पोकळीचा उतार नेहमी  चिकटविलेल्या पृष्ठाकडे असतो. उदराच्या खालील बाजूस असलेल्या विशिष्ट ग्रंथींतून मेण बाहेर येते. हे मेण तोंडात घेऊन जंभ ग्रंथीच्या स्रावाबरोबर त्याचे चर्वण केले जाते व ते एकरूप झाल्यावर त्यातून ह्या मेणाच्या फण्या बनविल्या जातात. कामकरी माशीला सु. ४५० ग्रॅम मेण तयार करण्याकरिता ९ किग्रॅ. मध वापरावा लागतो. प्रोपोलिन या नावाने ओळखले जाणारे तपकिरी रंगाचे रेझिनासारखे संयोजक द्रव्य (सिमेंट) या माश्या वनस्पतींपासून मिळवितात आणि पोळे चिकटविण्यास वा त्यातील चिरा बुजविण्यास अगर इतर दुरूस्ती करण्यास त्याचा उपयोग करतात.

पोळ्यातील फण्यांच्या ज्या भागात मध साठविला जातो ते कोश फणीच्या वरच्या बाजूस व कडेस असतात आणि ते मधाने भरले म्हणजे मेणाने बंद केले जातात. फणीचे जे कोश मध्यभागी किंवा खालील भागावर असतात, त्यांना शिशुकोश म्हणतात. काही कोश कामकरी माश्यांची अंडी व डिंभ यांकरिता असतात. त्यांचे आकारमान मध साठविण्याकरिता योजलेल्या कोशांएवढेच असते. अंड्यातून डिंभ बाहेर आल्यावर तो भोवती ‘कोकून’ म्हणजे संरक्षक कवच असलेल्या अवस्थेत (कोशावस्थेत) जातो. राणीमाशीच्या विकासाकरिता असलेले कोश मोठ्या आकारमानाचे असतात. हे एका पोळ्यात किती असतील, हे त्या त्या ऋतूवर, मधमाशीच्या जातीवर व समूहाच्या गरजेवर अवलंबून असते. नरांकरिता असलेले कोश दिसण्यात कामकरी माश्यांकरीता असलेल्या कोशांसारखेच पण मोठ्या आकारमानाचे असतात. या कोशांचा व्यास जास्त असतो. यांत घातलेली अंडी अनिषेचित असतात व यथाकाल त्यांतून डिंभ बाहेर पडतात. या डिंभांचा विकास नरांत होतो.

ज्या डिंभांचे रूपांतरण कामकरी माश्यांत व्हावयाचे असते, त्यांना आयाचे काम करणाऱ्या कामकरी माश्या आपल्या मुखातील द्रव पदार्थ अन्न म्हणून खाऊ घालतात.काही कालानंतर या द्रव पदार्थांएवजी त्यांना मध, परागकण व पाणी दिले जाते. ज्या डिंभांचे रूपांतरण राणीमाशीत व्हायचे असते, त्यांना त्यांच्या संपूर्ण डिंभावस्थेत विशिष्ट प्रकारचे अन्न दिले जाते. हे अन्न पहिले एकदोन दिवस सोडल्यास इतर डिंभांस दिले जात नाही.

वनस्पतींच्या फुलांपासून मिळविलेल्या मकरंदाचे कामकरी माश्यांच्या शरीरातील मधु-जठरात मधात रूपांतर होते. मधु-जठरात जमा केलेला मकरंद पोळ्यात परत आल्यावर इतर कामकरी माश्यांना दिला जातो. या मकरंदाचे मधात रूपांतर झाल्यावर किंवा त्यापूर्वीही कामकरी माश्या पोळ्यातील योग्य त्या कोशात त्याचा साठा करतात. या माश्यांच्या जठरांतून मधु-जठरात डोकावणारा झडपवजा असा एक दांडा असतो. माशीच्या जठरात तिचे स्वत:चे अन्न म्हणून किती मकरंद जावा, हे या दांड्याद्वारे नियंत्रित केले जाते. काही कीटकांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ⇨ मधुरसाचाही मध बनविण्यासाठी या कामकरी मधमाश्या उपयोग करतात. मधात थोड्या प्रमाणात परागकण मिसळून तयार झालेल्या मिश्रणाचा प्रौढ मधमाश्यांना अन्न म्हणून अत्यंत थंड ऋतूत किंवा अडीअडचणीस उपयोग केला जातो. फुलांपासून मिळवलेले परागकण व मध या मिश्रणाचा पाव बनविला जातो व पिलांचे अन्न म्हणून त्याचा उपयोग करण्यात येतो.

कामकरी माश्या जलसंचयातून पाणी घेतात किंवा कधीकधी मकरंदातूनही वेगळे काढून घेतात. या पाण्याचा उपयोग डिंभांना आणि पिलांना पाणी पुरविण्याकरिता होतो. प्रौढ माश्यांनाही हे पाणी मिळते.

पूर्ण वाढ झालेल्या तरूण कामकरी माश्या राजरस निर्माण करतात. हा रस सुरुवातीस सर्व डिंभास देण्यात येतो; पण अल्प काळातच सर्व डिंभांना हा रस देण्याचे बंद करून ज्या डिंभांचे राणीमाश्यांत रूपांतरहोणार असेल, त्यांना मात्र त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत अन्न म्हणून हा रस पुरविला जातो.

आ. ४. मधमाशीची नांगी : (१) नांगी, (२) विष ग्रंथी, (३) विषकोष, (४) योनी, (५) अंडाशय.

मधमाशीची नांगी : हायमेनॉप्टेरा गणातील मादी कीटकांच्या अंडनिक्षेपकाचे रूपांतर होऊन त्यातून मधमाशीच्या नांगीचा विकास झालेला आहे. काही कीटकांत तर कीटकांच्या शरीरास टोचणे किंवा वनस्पतीस भोक पाडून त्यात अंडी घालणे या क्रिया अंडनिक्षेपकाच्या साहाय्याने केल्या जातात. मधमाशींची नांगी ही  अंडनिक्षेपकापासून झाली असल्यामुळे टोचणे हा तिचा नैसर्गिक गुणधर्म आहे. अंडी घालण्याऐवजी  या इंद्रियातून विष सोडले जाते. उदराच्या शेवटच्या खंडावर नांगी असते. तिचा दांडा बाहेर डोकावत असतो. हा दांडा तीन भागांचा बनलेला असतो. वरील भाग सुईसारखा अणकुचीदार असतो, तर या सुईच्या दोन्ही बाजूंस भाल्यासारखी पण दाते असलेली दोन पाती असतात. या तीनही भागांचा मिळून झालेला दांडा आतून पोकळ असतो व त्यात विषकोशातील विष भरलेले असते. विषकोशात विष ग्रंथीत तयार झालेल्या विषाचा संग्रह असतो. अणकुचीदार सुईस दोन्ही बाजूंस तीन-तीन दाते असतात. भाल्यासारख्या पात्यांस बाजूस उलटे वळलेले नऊ किंवा दहा दाते असतात. जेव्हा नांगीचा उपयोग करावयाचा नसतो, तेव्हा हा नांगींचा दांडा आत उदरात ओढून घेतलेला असतो. जेव्हा मधमाशी नांगी मारते तेव्हा उदराचा शेवटचा भाग खाली वाकलेला आसतो व नांगीचा दांडा कातड्यात खुपसला जातो. दांड्यातील अणकुचीदार सुईच्या आणि भाल्यांच्या बाजूस असलेल्या उलट्या वळलेल्या दात्यांमुळे आत गेलेला दांडा बाहेर येऊ शकत नाही. जेव्हा मधमाशी उडण्याचा प्रयत्‍न करते तेव्हा हा दांडा व त्याबरोबर शरीरातील विषकोष व विषग्रंथी मधमाशीच्या शरीरातून बाहेर टाकली जातात. मधमाशी  फक्त एकदाच नांगी मारू शकते व त्यानंतर अल्पावधीत ती मरते. राणीमाशीच्या नांगीचा दांडा कामकरी माशीच्या दांड्यापेक्षा आकारमानाने मोठा असतो व विषाचा साठाही पुष्कळ असतो.

नांगीतील विष : जेव्हा मधमाशी नांगी मारते तेव्हा ती नांगी तुटून कातडीत राहते व तीतून हळूहळू शरीरात विष सोडले जाते. या विषास पिकलेल्या केळासारखा वास असतो व ते कडू असते, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. हे विष जर तोंडावाटे पोटात गेले, तर त्याचा काही परिणाम होत नाही, तसेच अखंड अशा कातडीवर पडले,तरी बाधत नाही. एफ्. फ्ल्युरी या शास्त्रज्ञांना मधमाशीच्या विषाचे विश्लेषण केले असता ट्रिप्टोफेन, कोलीन, ग्‍लिसरीन, फॉस्फोरिक अम्‍ल, पामिटिक अम्‍ल, ब्युटिरिक अम्‍ल व नायट्रोजनरहित असे अज्ञात द्रव्य ही द्रव्ये आढळली. या विषात फॉर्मिक अम्‍ल नसते.

ज्या ठिकाणी नांगी मारली जाते त्या जागी सूज व लाली येते आणि या जागेच्या मध्यभागी तांबडा ठिपका दिसू लागतो. जर नांगी व विषकोश कातडीत रूतलेला असेल, तर तो उपटून काढू नये कारण यामुळे कोशातील विष जखमेत त्वरित उतरते. त्याऐवजी अंगठ्याने नांगी मारलेल्या जागेजवळ हळूहळू दाब दिल्यास रुतलेली नांगी वर येते व विषकोशातून जखमेत विष पसरत नाही. हळूहळू  वेदना कमी होतात व सूज उतरते. जिवंत व उडणारी मधमाशीच नांगी मारते असे नाही, तर अर्धवट दुखावलेली मरणाच्या दारात असलेली मधमाशीसुध्दा तितक्याच तीव्रतेने नांगी मारू शकते.

काही लोकांना मधमाशीच्या नांगीतील विषाची ⇨ अलर्जी असते. त्यांच्या अंगावर नांगी मारलेल्या ठिकाणीच नाही तर इतरत्रही लाल चट्टे उठतात, क्वचित प्रसंगी अतिसार, मानसिक आघात, रक्तदाबातील फरक, जीभ सुजणे व बेशुध्द होणे हेही घडते. संधिशोथ (सांध्यांची दाहयुक्त सूज) हा विकार मधमाशी चावल्याने बरा होतो असा समज आहे पण या बाबतीत अजून निर्णायक मत उपलब्ध नाही. मधमाश्यांच्या नांगीतील विष सांधेदुखी, नितंबशूल, तंत्रिकाशोथ (मज्जातंतूंची दाहयुक्त सूज) इ. विकारांवर उपयुक्त आहे. असे म्हणतात. [⟶ कीटकदंश].

मधमाशीचे जीवनचक्र : मधमाशीच्या जीवनचक्रातील निरनिराळ्या अवस्थांचा काल सभोवतालच्या तापमानावर अवलंबून असतो. ए. जी. लॉकहीड यांच्या प्रयोगांवरून निरनिराळ्या अवस्थांचा काल (कोष्टकात दाखविल्याप्रमाणे) निश्चित करण्यात आला आहे.

मधमाशीच्या जीवनचक्रातील निरनिराळ्या अवस्थांचा काल (दिवसांत)

माशी अवस्था अंडे डिंभ कोशावस्था एकूण
राणीमाशी ७-८ १५-१६
नरमाशी १४ २४
कामकरीमाशी ४-५ ११-१२ १८-२०

कामकरी माशीची आयुर्मर्यादा वर्षातील कालानुसार पुष्कळच बदलते असे दिसून आले आहे. खुणा केलेल्या माश्यांवर प्रयोग केल्यावर असे आढळून आले आहे की, सर्वसाधारण पोळ्यातील कामकरी माशीची अपेक्षित आयुर्मर्यादा मार्चमध्ये सु. ३५ दिवस व जूनमध्ये सु.१८ दिवस, असते. याउलट सप्टेंबर व ऑक्टोंबर या काळात पाळलेल्या कामकरी माश्या हिवाळाभर जिवंत राहतात. अशा माश्यांचा आयुर्मर्यादेचा उच्चांक ३०४ दिवसांचा आढळलेला आहे. कामकरी माश्यांची आयुर्मर्यांदा परागकणांच्या वापराचे प्रमाण व पोळ्यातील विविध कामे यांच्यावर बहुश: अवलंबून असते. नरांची आयुर्मर्यादा उन्हाळ्यात सु. ५९ दिवस असते, तर हिवाळ्यात राणीमाशीविरहीत पोळ्यात ते यापेक्षाही अधिक काळ जगू शकतात, असे दिसून आले आहे. राणीमाश्या ८ वर्षांहूनही अधिक काळ जगल्याची उदाहरणे आहेत, तथापि कोणत्याही प्रकारे विक्षोभित झालेल्या पोळ्यातील राणीमाशीची आयुर्मर्यादा सरासरीने ३ वर्षांच्या जवळपास असते.

जुन्या व्यवस्थित स्थापन झालेल्या पोळ्यातून किंवा मोहोळातून काही वेळा राणीमाशी, नरमाश्या व कामकरी माश्या यांचा मोठा थवा बाहेर पडतो व नवीन पोळे स्थापन करण्याकरिता योग्य ठिकाण निवडण्यासाठी दूरवर जातो. हे थवे का बाहेर पडतात याचे निश्चित कारण अजून ज्ञात नाही; पण जुन्या पोळ्यातील गर्दी कमी करण्याकरिता ते बाहेर जात असावेत, असा अंदाज आहे. या क्रियेस मधमाश्यांचे सामूहिक उड्डाण असे म्हणता येईल. अशी सामूहिक उड्डाणे एका हंगामात अनेक वेळा झालेली आढळतात. नव्या राणीमाश्यांची व नरांची पिढी वयात आली की, अशी उड्डाणे होतात. नव्या राणीमाश्या जुन्या पोळ्यात राहतात व त्यातील जी सर्वांत शक्तीमान असते ती इतर राणीमाश्यांना मारून टाकते व समूहाचा ताबा घेते. यानंतर ती नराबरोबर मधुचंद्र-उड्डाण करते व परत पोळ्यावर अंडी घालण्यास  सुरूवात करते. हा क्रम सतत चालू असतो.

राणीमाशी व नर यांचे मीलन उड्डाणातच कोणत्याही ऋतूत होते. राणीमाशीची शुक्रग्राहिका (पुं-जनन कोशिका ग्रहण करणारा भाग) नरापासून मिळालेल्या शुक्राणूंनी भरून जाते. पुढील काळात कामकरी माश्या व राणीमाश्या निर्माण करण्याकरिता घातलेली सर्व अंडी निषेचित करण्यास पुरतील इतके शुक्राणू या शुक्रग्राहिकेत संग्रहित केलेले असतात. शुक्रग्राहिकेतील संग्रहित शुक्राणूंची जीवनशक्ती राणीमाशीच्या पूर्ण प्रजोत्पादक काळात कायम राहते. मधुचंद्र-उड्डाणात राणीमाशीचे अनेक नरांशी क्रमाक्रमाने मीलन होते. मीलनानंतर नराचा शिश्नकंद तुटून राणीमाशीच्या जननमार्गात तसाच राहतो. राणीमाशीचे त्याच नराशी मीलन तिच्या आयुष्यात फक्त एकदाच होते. मीलनानंतर नर कामकरी माश्यांकडून कधी कधी मारले जातात. जर ते ताबडतोब मारले गेले नाहीत व अन्नाचा तुटवडा पडला तर त्यांची हत्या होते.

परागकणातील महत्त्व : मध व मेण या दोन वस्तूंच्या उत्पन्नाच्या दृष्टीने मधमाश्यांचे फार महत्त्व आहे; पण याहीपेक्षा कृषिक्षेत्रात परपरागण हे मधमाश्यांचे फार महत्त्वाचे कार्य आहे. या क्रियेचे दूरगामी परिणाम फार व्यापक स्वरूपाचे आहेत. पुष्कळशा फळबागात शेतकरी मधमाश्यापालन करणाऱ्यांची मदत घेतात. जेव्हा फळझाडांस फुले आली असतील, तेव्हा मधमाश्यांकडून परपरागण केले जाते. पुष्कळ फळझांडांची फुले या क्रियेने फलित झाल्यावर उत्तम फळे देतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर सध्या तरी  परपरागणाचा दुसरा मार्ग ज्ञात नाही. प्रत्येक एकर क्षेत्राच्या फळबागेत निदान एक तरी मधमाश्यांचे पोळे असणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या जाती : भारतात आढळणाऱ्या मधमाश्यांच्या तीन प्रसिध्द जाती खालीलप्रमाणे आहेत.

(१) एपिसडॉरसॅटा : ही डोंगरी मधमाशी भारतात आढळणाऱ्या मधमाश्यांत आकारमानाने सर्वांत मोठी आहे व ती डोंगरमाथ्यापासून उतरणीवर सर्वत्र आढळते. हिला ‘आग्या माशी’ असे म्हणतात. या माश्यांच्या समूहाचे पोळे झाडाच्या फांद्यांवर किंवा मोठ्या इमारतीच्या छताला चिकटलेले असते. ह्या पोळ्यातील फणी साधारणपणे १ मी. लांब व ०.७५ मी. रूंद असते. वनविभागात एकाच झाडावर किंवा खडकावर अनेक पोळी असलेली आढळतात. या मधमाश्या खूप मध जमा करतात. एका फणीत सरासरीने सु. २७ किग्रॅ. मध व १.१ किग्रॅ. मेण मिळू शकते. या मधमाश्यांच्या उघड्यावर राहण्याच्या सवयीमुळे त्यांना कृत्रिम मधुपेट्यांत ठेवता येत नाही. याखेरीज या मधमाश्या फार चिडखोर व चावऱ्या आहेत आणि त्या प्रत्येक ऋतूत आपल्या पोळ्याची जागा बदलतात.

(२) एपिस इंडिका : ही भारतीय मधमाशी भारतात २,७५० मी. उंचीपर्यंत सर्वत्र आढळते. नैसर्गिक वातावरणात या मधमाश्यांची पोळी आच्छादित अशा गुंफा, झाडांच्या ढोल्या, खडकांतील छिद्रे किंवा भिंतीतील गाभारे या ठिकाणी आढळतात. एकाच ठिकाणी एकमेकांच्या बांजूस अनेक पोळी बांधली जातात. कधीकधी घरात अडगळीच्या ठिकाणी किंवा माळ्यावर टाकलेल्या रिकाम्या पेट्यांतही या मधमाश्यांचे पोळे आढळते. भारतात आढळणाऱ्या मधमाश्यांतील हीच एक जात कृत्रिम पेटीत पोळे करून राहू शकते. या मधमाशीच्या पठारावर राहणारी व डोंगराळ प्रदेशात राहणारी अशा दोन उपजाती आहेत. डोंगराळ प्रदेशात  राहणाऱ्या मधमाश्या आकारमानाने मोठ्या, रंगाने काळ्या व मध जमविण्यात पटाईत अशा आहेत. पठारावर राहणाऱ्या माणसाळविलेल्या मधमाश्यांच्या एका पोळ्यापासून सु. २.७ किग्रॅ. मध मिळतो. या जातीच्या एका पोळ्यापासून सर्वात अधिक म्हणजे ७ किग्रॅ. मध जमा करता आला आहे. याउलट डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या मधमाश्यांच्या पोळ्यांतून ३.५ ते १३ किग्रॅ. मध जमा करता आला आहे. या जातीच्या एका पोळ्यापासून सर्वात जास्त म्हणजे ४३ किग्रॅ. मध जमा झाल्याचे आढळले आहे. हिमाचल प्रदेशामधील कुलू खोऱ्यातील १,५२५ मी. वर आढळणाऱ्या मधमाश्या सर्वांत चांगल्या आहेत, असे दिसून आले आहे.

(३) एपिस फ्लोरिया : ही आकारमानाने लहान असलेली मधमाशी तळहाताएवढ्या आकारमानाची एकेकटी पोळी उघड्यावर बांधते. ही जाती आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची नाही. ह्या मधमाश्या बंगाल, आसाम, तमिळनाडू, मलबार व मध्य भारत या भागांत आढळतात. प्रत्येक पोळ्यापासून फक्त काही ग्रॅम इतकाच मध मिळतो.

इतर कुलांतील संबंधित कीटक : एपॉयडिया या अधिकुलातील एपिडीखेरीज इतरही काही कुले मधमाश्यांचा अभ्यास करताना विचारात घेण्यासारखी आहेत. झायलोकोपिडी, बाँबिडी आणि मेलिपोनिडी ही ती कुले होत.

झायलोकोपिडी कुलातील कीटकांना ‘भुंगे’ असे म्हणतात. संस्कृत वाङ्‍मयात यांचा भ्रमर किंवा मधुकर असा उल्लेख आहे. इंग्रजीत यांना का कार्पेंटर बी (सुतार माशी) असे म्हणतात. झायलोकोप वंशातील हे कीटक भारतात सर्वत्र आढळतात. यांचे समूह झाडांच्या ढोल्यात आढळतात. काही जाती राहण्यास विशिष्ट प्रकारची झाडेच पसंत करतात. एका कोशात (कप्प्यात) एक अंडे व त्यास पुरेल इतका मध व पराग यांचे मिश्रण ठेवले जाते. नर व मादी ओळखणे सोपे जाते. भुंग्यांच्या काही जाती दिनचर तर काही रात्रिंचर आहेत. इमारती लाकडास भोके पाडून हे भुंगे लाकडाचे फार नुकसान करतात. [⟶ भुंगा].

बाँबिडी कुलातील माश्याही त्यांच्या गुंजारवाबद्दल प्रसिध्द आहेत. या माश्या उद्योगी असून आपले काम फार कौशल्याने करतात. यांचे आकारमान मध्यम ते ९-३० मिमी. लांब इतके असू शकते. या शरीराने बळकट असून केसाळ असतात. यांचा रंग काळा, पांढरा, पिवळा, नारिंगी, व लाल या सर्व रंगाच्या मिश्रणाने बनलेला असतो. त्या सामाजिक जीवन जगतात. त्यांच्या समूहात मोठ्या आकारमानाची राणीमाशी, भिन्नभिन्न आकारमानांच्या कामकरी माश्या आणि राणीमाशी व कामकरी माशी यांच्या मधील आकारमान असलेले नर असतात. राणीमाशीचे नराशी मीलन झाल्यावर काही काल ती झाडाच्या ढोलीत किंवा जमिनीत खड्डयात शीतनिष्क्रियतेत जाते (हिवाळ्यातील निष्क्रिय अशा गुंगीच्या अवस्थेत जाते) व वसंत ऋतूत बाहेर येते. उंदीर किंवा घुशीच्या बिळात ती आपले वारूळ निर्माण करते. पुरेशा अन्नाचा साठा वारूळात झाला म्हणजे ती अंडी घालण्यास सुरूवात करते आणि या अंड्यांतून बाहेर पडलेले डिंभ या जमविलेल्या अन्नावर वाढतात. या वारूळात मधमाशीच्या पोळ्यातल्या सारखे कोश नसतात. लवकरच डिंभांचे रूपांतरण होऊन लहान आकारमानाच्या कामकरी माश्या तयार होतात. या कामकरी माश्या डिंभांची काळजी घेतात. यामुळे राणीमाशीकडे फक्त अंडी घालण्याचेच काम उरते. लवकरच २० ते ३० सेंमी. व्यासाच्या बिळात मोठे वारूळ तयार होते. कामकरी माश्यांनी तयार केलेल्या काही कोशांत डिंभ आढळतात, तर काहींत मध व परागांचा साठा केलेला दिसतो. थंडीच्या ऋतूत नर व माद्या निर्माण होतात. माद्यांशी समागम केल्यावर नर मरतात. निषेचित माद्या शीतनिष्क्रियतेसाठी पुन्हा दुसरी जागा शोधतात व पुन्हा वरच्यासारखे जीवनचक्र सुरू होते. ह्या माश्यांच्या जिभा लांब असल्यामुळे फुलातील पराग व मकरंद जमविणे त्यांना सोपे जाते. पराग व मकरंद खोल ठिकाणी असलेल्या फुलांत परपरागण करण्याकरिता ह्या लांब जिभांच्या माश्यांची आवश्यकता असते व त्यामुळे कृषिक्षेत्रात काही विशिष्ट जातींच्या वनस्पतींतील प्रजनन होण्यासाठी या माश्या आवश्यक आहेत. या जातीतील कामकरी माश्यांची नांगी फार प्रभावी असते.

मेलिपोनिडी या कुलातील माश्यांना नांगी नसते. भारतात आढळणाऱ्या प्रसिध्द डामरी मधमाशीचा या कुलात समावेश होतो. या माश्या मेलिपोनाट्रायगोना या वंशांतील आहेत. या माश्यांच्या पुष्कळ जाती आहेत. या आसाम व वायव्य सरहद्दीजवळ आढळतात. मध उत्पादन करणाऱ्या माश्यांत या माश्या आकारमानाने सर्वात लहान आहेत. यांच्या पोळ्यातील पिशवीसारख्या फण्या मेण व रेझिने यांच्या मिश्रणाच्या आणि प्रोपोलिसाने जोडून बनविलेल्या असतात. यांच्या पोळ्यात मध अत्यल्प असतो व तो काढणे अवघड असते; पण तो औषधी आहे असे म्हणतात. या माश्या रंगाने काळ्या, किरमिजी किंवा पिवळ्या असतात. ट्रायगोना मिनिमा ही मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळणारी माशी अवघी २ मिमी. लांब असते. तर याउलट दक्षिण अमेरिकेत आढळणारी मेलिपोना इंटरप्टा ही माशी १२ ते १५ मिमी. लांब असते. पूर्ण वाढ झालेली माशी मधमाशीसारखी दिसते. या माशीला नांगी नसते किंवा असली तरी तिची वाढ झालेली नसते. डोके समोरून रूंद, डोळे लहान, अक्षिका सरळ रेषेत, वक्ष गोल, पंख नाजूक व कमी शिरा असलेले, उदर लहान व लंबाकृती असते. नर व कामकरी माश्यांच्या उदरावरील ग्रंथींतून मेण स्रवते. ह्या माश्याही समाजप्रिय आहेत. या पोळे बांधतात व त्यातील फण्यांवर डिंभांकरिता कोश तयार करतात. मकरंद व पराग गोळा करून कोशात ठेवले जातात व डिंभांना पुरेल इतके अन्न कोशात ठेवल्यावर त्यांत अंडी ठेवली जातात.मधामाश्यांसारखे डिंभांस रोज अन्न दिले जात नाही. यांची पोळी झाडांच्या ढोल्यांत, खडकांत अथवा भिंतीत चिकटविलेली आढळतात. पोळे बनविण्याकरिता ह्या माश्या जो रेझीनमिश्रित पदार्थ वापरतात, त्यास ‘माश्यांचे डामर’ किंवा ब्रह्मदेशात  ‘प्वीन्येट’ असे म्हणतात. हा पदार्थ पाण्यात उकळल्यावर खनिज तेलात मिसळतात आणि त्याचे तयार झालेले द्रावण होड्या व मचवे यांतील भेगा बुजविण्यासाठी वापरण्यात येते. हे डामर वनसंपत्ती म्हणून महत्त्वाचे आहे.

मधमाश्यांचे शत्रू : मधमाश्यांच्या पोळ्यात शिरून त्यांचा नाश करणारा मुख्य शत्रू गॅलेरिया मेलोनेला हा पतंग होय. याचे डिंभ पोळ्यात शिरून मधमाश्यांच्या पिलांचा नाश करतात.तसेच पराग खाऊन टाकून पोळ्यातील फण्यांचेही नुकसान करतात. अक्रॉइया ग्रिझेला हा दुसरा पतंगही मधमाश्यांच्या पिलांचा नाश करतो. यांखेरीज काही पाली, कोळी व मुंग्या यांचाही पोळ्यास उपद्रव होतो. भारतातील मधमाश्यांस ‘लागट (सांसर्गिक) रोग’ होत नाहीत.

ब्राउला सीका या जातीच्या उवेत हवाई जीवन जगण्यास लागणाऱ्या इंद्रियांचा र्‍हास झालेला असून हा कीटक मधमाशीच्या पाठीवर चिकटलेला आढळतो व मधमाशीच्या तोंडातील मकरंद व लाला ग्रंथीचा स्राव खाऊन तो जगतो, असे आढळले आहे.

पहा : कीटक; कीटकदंश; मध; मधमाशीपालन; मेण.

संदर्भ : 1. Butler, C. G. The World of the Honey Bee, London, 1962.

2. Dines, A. M. Honeybees From Close-up, London, 1968.

3. Doering, H. A. Bee Is Born, New York, 1962.

4. Frisch, Karl von. The Dancing Bees, London, 1965.

5. Frisch, Karl von, Bees : their Vision, Chemical Senses and Language, New York, 1961.

6. Grout, R. A. Ed., The Hive and the Honey Bee, Hamilton, III., 1963.

7. Hoyt, M. The World of Bees, London, 1966.

8. Ribbands, C. R. The Behavlour and Social Life of Honeybees, New York, 1968.

9. Singh, S. Beekeeping in India, New Delhi, 1962.

10. Tickner Edwardes, Rev, E. The Lore of the Honey Bee, London, 1964.

11. Whithead, S. B.; Shaw, F. R. Honeybees and their Management, Toronto, 1959.

इनामदार, ना. भा.