मद्यासक्ति : (अल्कोहॉलिझम). संस्कृतीच्या उषःकालापासून मद्यप्राशन प्रचलित आहे. वेदकालीन वाङमयात सोमरसपान आणि मदिरापानाचा उल्लेख आढळतो. वेदपूर्वकालातही मादक पेयांचा वापर होत असे. मद्यसेवनाचे अतिरेक त्या काळात पण झाल्यामुळे त्याविरूद्ध दिलेल्या उपदेशाची नोंद ३,००० वर्षांपूर्वीच्या ईजिप्ती वाङमयात सेच वेदकालीन वाङमयात पण सापडते. परंतु विसाव्या शतका-तील मद्यप्राशनाचा सार्वत्रिक अतिरेक अपूर्व ठरलेला आहे. त्यामुळे मद्यासक्तीचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या वीस वर्षात तर जगभर  मद्यासक्ती ही एक अत्यंत बिकट सामाजिक-आर्थिक, नैतिक आणि वैद्यकीय समस्या होऊन बसली आहे.

मद्यासक्ती हा एक व्यसनाधीनतेचा प्रकार असून तो व्यक्तिमत्त्व-विकाराच्या सदरात मोडतो. मद्यप्राशन हे सामाजिक रीतीरिवाजपालन तसेच शीणपरिहार किंवा क्षुधावृद्धीपुरते मर्यादित न रहाता नशाप्राप्ती-साठी नियमितपणे केले जाते आणि कालांतराने ते एक सक्तियुक्त व्यसन बनते. ह्या अशा अतिरेकी मद्यप्राशनामुळे शारीरिक व मानसिक क्रियांत तसेच सामाजिक कर्तव्यांत बाधा येते तसेच व्यक्तीचे कौटुंबिक संबंधही बिघडतात व सामाजिक-आर्थिक पदच्युती होते.

मद्यासक्ती हा विकार आहे ह्या संकल्पनेला गेल्या दहा वर्षांतील संशोधनाने आव्हान दिलेले आहे. अनेक वर्षे मद्यासक्तीने विकारग्रस्त झालेले बरेच रूग्ण एकतर पूर्णपणे बरे झालेले आहेत किंवा सामाजिक बंधने पाळून मर्यादित मद्यसेवनास प्रवृत्त झालेले आढळून आले आहेत. पिण्याची अनिवार्य इच्छा तसेच पिण्यावर ताबा नसणे ही मद्यासक्तीची दोन मुख्य लक्षणे मद्यासक्ती नसलेल्या पिणार्‍यांतही आढळून आलेली आहेत. काही संशोधकांच्या मते पिणार्‍यांच्या रूग्णवृत्तांतात एका विशिष्ट टप्प्यापर्यंत त्यांचा पिण्यावर ताबा असतो पण नंतर ते तो गमावून विकारग्रस्त होतात.

आज मोठ्या शहरांत साधारणपणे शेकडा सात टक्के लोकांत मद्या-सक्ती आढळून येते. श्रमजीवी पुरूषांत व स्त्रियांत, विशेषतः खेड्या- तून शहरात आलेल्यात, मद्यासक्तीचे प्रमाण जास्त असते. तसेच हॉटेल व्यवसाय, विक्रयव्यवसाय, दारू विक्री इ. मद्यसेवनाशी संबंधित असलेल्यात आणि ३० ते ४० वर्षे वयाच्या मध्यम वर्गीयांतसुद्धा   ह्या व्यसनाचे प्रमाण अधिक असते. मद्यासक्ती जडण्याची शक्यता सामाजिक-आर्थिक बाबींवर जास्त अवलंबून असते. उदा., विशिष्ट समाजातील मद्यपानाची प्रथा व अभिवृत्ती तसेच उपलब्धता आणि किंमत अत्याधुनिक सामाजिक जीवनात मद्यपान ‘सामाजिक संसर्ग’ च ठरलेले आहे. कारण मद्यासक्त व्यक्ती ‘लांड्या कोल्ह्या’ प्रमाणे न पिणार्‍याची शेपटी कापण्याच्या खटपटीतच असते.

 मद्यासक्तीमुळे प्रथम मद्यसेवनाची सह्यता (टॉलरन्स) होऊन पुढे मानसिक व शारीरिक अवलंबित्व पण निर्माण होते. म्हणजे मद्यसेवन नियमित न केल्यास मानसिक व शारीरिक लक्षणे उदभवतात. उदा., निद्रानाश, क्षुधाक्षीणता, अस्वस्थता व कंपन.

 कारणमीमांसा : मद्यासक्तीचे काही महत्त्वाचे सिद्धांत असे आहेत : (१) मनोविश्लेषण सिद्धांत : ⇨ सिग्मंड फ्रॉइड यांच्या मते मद्या-सक्ती जडलेल्यांचे मौखिक दृढीकरण (ओरल फिक्सेशन) झाल्यामुळे तोंडावाटे मिळालेल्या सुखाने परागती तसेच वास्तवतेपासून पलायन  शक्य होते. सुप्त समलैंगिकता हे पण मद्यासक्तीचे एक मनोगतिकीय कारण मानले जाते. ⇨ अँल्फ्रेड अँड्लर यांच्या मते तीव्र न्यूनतेच्या प्रभावामुळे सतत असुरक्षिततेची भावना निर्मांण होऊन सामाजिक जबाबदारी टाळण्याची वृत्ती वाढते आणि त्यातूनच पिणे वाढते. कार्ल मेनिंगर यांनी मद्यासक्ती हा एक दीर्घ व संथ असा आत्महत्येचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केलेले आहे. पालकापासून मिळणारे प्रेम व संरक्षण न मिळाल्यामुळे उदभवणारी असुरक्षिततेची भावना तसेच पालकांच्या मद्यासक्तीचे उदाहरणही मद्यासक्तीस जबाबदार ठरते.(२) जननिक सिद्धांत : आनुवंशिक मौखिकतेमुळे तसेच आनु-वंशिक चयापचयी वैगुण्यांमुळे मद्य पिण्याची अनावर इच्छा होते. जास्त मद्य पचविण्याची क्षमताही आनुवंशिक असते, असे आढळून   आले आहे. (३) समाजशास्त्रीय सिद्धांत : आर्. एफ्. बेल्सच्या मते आजच्या बदलत्या संस्कृतीच्या तणावयुक्त सामाजिक परिस्थितीमुळे समायोजन साधणे जड जाते. म्हणून सांप्रतच्या संस्कृतीमान्य मद्यप्राशनाकडे प्रवृत्ती होते. शिवाय त्यामुळे चारचौघांत आत्मविश्वासाने वावरणे सोपे जाते आणि सुखही मिळते. आजकाल तर समाजाच्या काही घटकांत चार-चौघांनी मिळून वारंवार पिणे केवळ समाजमान्यच नव्हे, तर सक्तीचेही होऊन बसले आहे. (४) अध्ययन सिद्धांत : पिण्यामुळे चिंता व मनोविग्रह (इंटर्नल कॉन्फ्लिक्ट्स) तात्पुरते दूर होतात परंतु अंमल कमी झाल्यावर येणारी उद्विग्नता पुन्हा प्यायला भाग पाडते. अशा तर्‍हेने मिळणार्‍या आरामामुळे पिण्याच्या क्रियेचे प्रबलन होऊन पिण्याची सवय जडते. (५) व्यक्तिमत्त्व विकारी सिद्धांत : मद्यासक्तीचे व्यसन हे काही व्यक्तिमत्त्व विकाराचे लक्षण म्हणूनही उदभवू शकते. उदा., समाज- विघातक व्यक्तिमत्त्व, अपर्याप्त (इनअँडिक्केट) व्यक्तिमत्त्व. मद्यासक्ति- अभिमुख असे एक व्यक्तिमत्त्व असल्याचाही एक सिद्धांत आहे. ह्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू असे आहेत : सर्वसामान्य अपर्याप्तता परावलंबित्व तसेच जबाबदारी टाळण्याची वृत्ती काम, करमणूक आणि लैंगिक सुख यांचा अतिरेक करण्याची वृत्ती वाकबगारपणाचा अभाव आणि मत्सर तसेच वैमनस्य बाळगण्याची वृत्ती. त्यातून पुढे पश्चात्ताप आणि चिंता वाटून शेवटी आत्मघातकी प्रवृत्तीचे प्रबलन होते. म्हणजेच पिण्याचा अतिरेक करून ‘संथ आत्महत्या’ करण्याची वृत्ती दृढ होते. मद्यासक्तिअभिमुख व्यक्तिमत्त्वाचे मनोमापन करण्यासाठी ज्या तीन प्रमुख खास चाचण्या तयार केल्या गेल्या आहेत, त्यांचे प्रामाण्य ठर-विणार्‍या संशोधनातील निष्कर्ष निराशाजनक ठरले. त्यामुळे अशा   खास व्यक्तिमत्त्वाच्याच अस्तित्वाबद्दल शंका वाटू लागली आहे. (६) शरीरशास्त्रीय सिद्धांत : नियमित मद्यपानामुळे मस्तिष्क   पेशींना मद्याच्या शामक परिणामाची सवय होते. पुढे मद्य न घेतल्यास त्या पेशींचे कार्य अनियंत्रित होऊन मानसिक अस्वस्थता, कंपन, झटके इ. लक्षणे उदभवतात आणि व्यक्तीला पुन्हा पिण्याची जबरदस्त व अनिवार्य इच्छा (क्रेव्हिंग) होते. 


मद्यासक्तीचे प्रकार व लक्षणे : मद्यासक्तीच्या प्रकारांचे वर्गीकरण   दोन प्रकारचे आहे : (अ) ई. एम्. जेलिनेक यांनी पिण्याच्या    पद्धतीवर आधारलेले पिणार्‍यांचे ५ प्रकार वर्णिलेले आहेत (१९६०).  ते पुढीलप्रमाणे : (१) आल्फा मद्यपी : पिण्याच्या अतिरेक करूनही मद्यपानावर अवलंबून न राहणारे. (२) बीटा मद्यपी : अतिरेकी पिण्या-मुळे शारीरिक रोग जडलेले-उदा., यकृतसूत्रण-परंतु मद्यासक्ती नस-   लेले. (३) गॅमा मद्यपी : मद्यासक्ती कालांतराने वाढत जाणारे. (४)   डेल्टा मद्यपी : मद्यासक्ती जडूनसुद्धा पिण्याच्या प्रमाणावर ताबा ठेव-  णारे. (५) एप्सिलॉन मद्यपी : अधूनमधून मोठ्या प्रमाणात पिणारे. (आ) दुसरे वर्गीकरण चिकित्सकीय प्रकारांचे आहे : (१) मद्य-जनक गैरशुद्धी (ब्लॅकआउट) : अधूनमधून अतिरेकी पिण्यामुळे समाजविघातक वर्तन घडते परंतु त्याची स्मृती रहात नाही. (२)   विकृत नशा (पॅथॉलॉजिकल इंटॉक्सिकेशन) : मद्यपानामुळे अचानक बोधावस्था अकार्यक्षम होऊन काही मर्यादित काळ भ्रमिष्टावस्था होते व त्या काळापुरता स्मृतिलोप (अँग्नेशिया) होतो. हे लक्षण वैयक्तिक स्वभावप्रकृतीपेक्षा रक्तातील मद्याच्या प्रमाणावर जास्त अवलंबून असते. (३) कंपनमय मुग्धभ्रांती (डिलिरियम ट्रिमेन्स) : ही अवस्था सतत व अतिरेकी पिण्यामुळे तसेच दीर्घकालिक मद्यासक्तीमध्ये पिणे बंद केल्यास अथवा विशेष आजार वा इजा झाल्यामुळे जडते आणि साधारणपणे ३ ते १० दिवस टिकते. कमालीची अस्वस्थता, निद्रानाश, दिशाभूल, दृष्टीचे भ्रम-विशेषतः लहान आकाराचे प्राणी दिसणेही मुख्य लक्षणे आहेत. (४) मद्यासक्तिजन्य निर्वस्तुभ्रम : ही अवस्था दीर्घकालीन मद्यासक्तीमुळे विशेषतः अंतर्मुखी (स्किझॉईड) व्यक्तींत आढळते. मुख्य लक्षणे म्हणजे-सुस्पष्ट श्रुतिभ्रम आणि त्यांवर आधारलेले पीडनसंभ्रम (डिलुजन्स ऑफ परसिक्यूशन) तसेच त्यामुळे होणारी भावनाविवशता. (५) मद्यासक्तिजन्य प्रणालित संभ्रमविकृती : संशयी व्यक्तिमत्त्वात दीर्घकालीन मद्यासक्तीमुळे मूढश्रद्धा (संभ्रम) जडतात. विशेषतः पत्नीच्या चारित्र्याबद्दल संशय येऊन विकृत वर्तन घडते.  (६) कोरसॅको लक्षणसमूह : जरापूर्व काळात दीर्घकालिक मद्यासक्ती-मुळे मस्तिष्क कार्याचा र्‍हास होऊन निकट भूतकालीन घटनांचा स्मृतिलोप आणि दिशाभूल होते. विस्मृतीची जागा कपोलकल्पित  अनुभवाने भरून काढली जाते (कॉन्फॅब्यूलेशन). (७) काही व्यक्तीत दीर्घकालिक मद्यासक्तीचा शेवट बुद्धिभ्रंशात (डिमेंशिया) होतो आणि त्यामुळे व्यक्तिमत्त्वर्‍हास व स्मृतिलोप होऊन व्यक्ती सारा वेळ अस्वस्थ पण निष्क्रीय, गचाळ, गलिच्छ व परावलंबित अशा अवस्थेत राहते.  तसेच संशयी व भावनाविवश बनून अनैतिक वर्तनही करू लागते.

निदान : मद्यासक्तीची लक्षणे वैशिष्ट्यपूर्ण असल्याकारणाने इतर विकारांपासून मद्यासक्तीचे निदान करणे कठीण नव्हे. मात्र छिन्नमानस व अवसाद या विकारांत तसेच समाजविघातक व्यक्तिमत्त्वात मद्य-पानाचा अतिरेक हे एक लक्षण असते परंतु काळजीपूर्वक रूग्णवृत्तांत घेतल्यास त्या विकारांची इतर वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे स्पष्ट होतात.

उपचार : मद्यासक्तीचा यशस्वी उपचार ही मानसचिकित्सा क्षेत्रा-तील अत्यंत उद्वेगजनक व आव्हानकारक समस्या आहे. मद्यासक्ती दीर्घकाली होण्यास कारणीभूत असणारे सर्व कारक अजून पूर्णपणे सम- जले नसल्याने उपचाराचा फायदा तात्पुरताच होतो, असा सर्वसामान्य अनुभव आहे. काही संशोधकांचे मत असे आहे, की काहीही उप-चार न करणे किंवा एकदाच सल्ला देणे यामुळे होणारा फायदा आणि विशिष्ट पद्धतीने केलेला दीर्घ उपचार यांच्या उपयुक्ततेत विशेष फरक नसतो. उपचाराचा फायदा तंत्रापेक्षा त्या व्यक्तीवर व तिच्या सह-कार्यावर जास्त अवलंबून असतो, असे आता आढळून आले आहे. कच्चे व्यक्तिमत्त्व, क्षीण अस्मिता, सामाजिक-आर्थिक कमजोरी तसेच सतत पिण्यामुळे येणारी वोधनिक अकार्यक्षमता या कारकांमुळे उपचार अयशस्वी ठरतो.

सर्व उपचारपद्धतींचा मुख्य व सर्वमान्य हेतू म्हणजे मद्यपीला अति-रेकी मद्यपान कायमचे सोडून देण्यासाठी प्रेरित करणे. हे राक्षसी व्यसन खरोखरच सोडले पाहिजे, असे मनोमन पटल्याशिवाय आणि सहकार्य मनापासून करण्याची जबाबदारी पत्करल्याशिवाय यश येणे कठीण   असते. म्हणून कुठल्याही उपचाराचे प्रथम उद्दिष्ट म्हणजे, रूग्णाचे पुनर्शिक्षण व अभिप्रेरणा. त्यासाठी रूग्णवृत्तांताचा काळजीपूर्वक अभ्यास करून, रूग्णाची कौटुंबिक पार्श्वभूमी, बाल्यावस्थेतील त्याचे पालकांशी संबंध, सामाजिक संस्कार, व्यवसायक्षेत्रातील तणाव व   रूग्णाच्या कुटुंबातील समस्या नीट समजून घेणे आवश्यक आहे. वरील क्षेत्रांत आढळलेल्या तणावकारक अथवा निराशाजनक अशा स्मृती वा परिस्थिती दूर करण्यास रूग्णास मदत करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रूग्णाचा विश्वास प्रथम संपादन केला पाहिजे. त्यातून पुढे रूग्णाचे उपचारतज्ञाशी घनिष्ठ नाते (रॅपोर्ट) निर्माण झाले पाहिजे. त्यानंतरच पुढील उपचारपद्धतीचा वापर लाभदायक ठरतो.

मानसोपचार : रूग्णाच्या वैयक्तिक व मनोगतिकी समस्या – उदा., गंड, विग्रह-सोडविण्यासाठी मनोविश्लेषणीय आधारदायी किंवा  मर्मदृष्टीदायी (इनसाइट गिव्हींग) मानसोपचार केले जातात. वैय- क्तिक मानसोपचारांशिवाय समूह मानसोपचारांचाही अवलंब केला जातो. विशेषतः सामाजिक समायोजन व पुनर्वसन करण्यासाठी समूह मानसोपचाराचा फायदा होतो.

अनामिक मद्यपी (अल्कोहॉलिक अँनॉनिमस) : ह्या मद्यासक्तीतून पूर्णपणे बरे झालेल्यांनी चालविलेल्या जागतिक संघटनेचा कार्यक्रम समूह मानसोपचाराचाच एक प्रकार आहे. १९३५ पासून यशस्वी   वाटचाल करणार्‍या ह्या स्वयसेवी संस्थेची मुख्य आचरण उद्दिष्टे पुढीलप्रमाणे : (१) देवावर व मानवधर्मावर श्रद्धा. (२) प्रामाणिक आत्मपरीक्षण. (३) स्वतःच्या चुका मान्य करून त्या सुधारणे. (४) मद्यासक्तीस बळी पडलेल्या इतरांना व्यसनमुक्त करण्यास मदत देण्याची बांधिलकी पत्करणे. या संस्थेतील सदस्य आपल्यासारखेच मद्यासक्त  होते आणि संस्थेच्या मदतीने त्यांचे यशस्वी पुनरूज्जीवन झाले हे जाणून नवीन सभासद प्रेरित होतात. त्यांना ह्या वातावरणात अपराधी वाटत नाही व न्यूनता झपाट्याने कमी होते.


मद्यपानवर्जन : मद्यपान सोडल्याशिवाय कुठलाही उपचार यशस्वी होणे कठीणच. म्हणून संयम न पाळू शकणार्‍यांना रूग्णालयात ठेवून वैद्यकीय उपचार केले जातात. विशेषतः रक्तात भिनलेले मद्य धुवून काढण्यासाठी लवण-शर्कराविद्राव (ग्लुकोज-सलाइन इन्फ्यूजन)  सतत तीन ते चार दिवस दिले जाते. पिण्याची इच्छा होऊ नये म्हणून शांतक औषधे दिली जातात. सतत मद्यपानामुळे झालेली जीवनसत्त्वांची कमतरता-जास्त प्रमाणातील व जीवनसत्त्वांची अंतःक्षेपणे देऊन-दूर केली जाते.

मद्यासक्तांसाठी खास उपचारकेंद्रे : इतर मद्यासक्त रूग्णांबरोबर राहिल्यास मद्यासक्तीग्रस्तांना आपले व्यसन व दोष मान्य करून सुधारण्याची बांधिलकी पत्करणे सोपे जाते. अशा रूग्णांना नियमित समूह मानसोपचार आणि उपचारदायी समाज (थेरॅप्युटिक कम्युनिटी) ह्या महत्त्वाच्या उपचारांचा लाभ देण्यासाठी उभारलेली एक स्वतंत्र विभागाची यंत्रणा काही पाश्चिमात्य देशांत अत्यंत फलदायी ठरलेली आहे. अशा उपचारकेंद्रात उपचाराची मुख्य जबाबदारी तिथे   अहोरात्र असणार्‍या मानसचिकित्सी परिचारिकांवर सोपवलेली असते. रूग्णाचे व उपचारकर्त्या सेवकवर्गाचे प्रमाण शक्यतो तिनास एक, असे ठेवले जाते. त्यामुळे वैयक्तिक लक्ष देणे सुलभ होते.

मद्यविमुखता उपचार : मद्याविषयी असलेली आसक्ती दूर करण्यास ह्या उपचाराची मदत होते. हा उपचार ‘अध्ययन सिद्धांता’ वर  आधारलेला असून त्यासाठी घृणा, किळस, वेदना वगैरे अप्रिय अशा अनुभवांची सांगड मद्यपानामुळे होणार्‍या सुखकारक परिणामांशी   घातली जाते. असे बर्‍याच वेळा केल्यानंतर मद्यपानामुळे, अपेक्षित सुखाऐवजी अप्रिय अनुभव येतात आणि पुढे मद्यपान नकोसे वाटते [→मानसचिकित्सा (अध्ययन-उपचार)]. विमुखताकारक म्हणून वांतीजनक द्रव्ये-उदा., एमेटिन इंजेक्शन, वेदनामय असे विजेचे    सौम्य झटके (अँव्हर्शन शॉक्स) आणि अँटॅब्यूज नावाचे द्रव्य इत्यादींचा वापर केला जातो. अँटॅब्यूज चालू असताना मद्यप्राशन केल्यास काही वेळाने अत्यंत क्लेशमय असे अनुभव येतात. उदा., कंपन, घाम फुटणे, मळमळणे व गलितगात्र होणे. परंतु काही वेळा निपात (कोलॅप्स) होण्याचा संभव असल्यामुळे ह्या गोळ्यांचा वापर मर्यादित झालेला   आहे. ‘कोव्हर्ट कंडिशनिंग’ नावाच्या काल्पनिक –विमुखता अवलंबन उपचारात मद्यप्राशन करीत असताना भयानक अनुभव येतात, असे रसभरीत व अतिरंजित परंतु कल्पित वर्णन केले जाते आणि ते वारंवार ऐकून रूग्णाला खरोखरच मद्यपानाबद्दल शिसारी वाटू लागते. अध्ययन सिद्धांतांच्या तत्त्वावर आधारलेल्या दुसर्‍या एका उपचारात, कुटुंबियांच्या मार्गदर्शनावर भर दिला जातो. मद्यपीच्या पिण्याच्या क्रियेला अप्रत्यक्ष रीत्या परावृत्त कसे करावे ह्याचे तसेच पिणे टाळलेल्या वेळी त्या क्रियेला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देऊन तिचे प्रबलन कसे करावे ह्याचे मार्गदर्शन कुटुंबियांना दिले जाते. अध्ययन सिद्धांतावर आधारलेल्या स्वनिर्देशित नियंत्रणपद्धतीत रक्ततपासणीतर्फे स्वतःच्या रक्तातील मद्याच्या प्रमाणाचे तसेच दृश्य फीतमुद्रणातर्फे (व्हिडियो टेप रेकॉर्डिंग) स्वतःच्या झिंगलेल्या अवस्थेचे प्रतिसंभरण (फीड बॅक) करून मद्यासक्त व्यक्तीला स्वयंनियंत्रणाचे शिक्षण दिले जाते. ह्या दोन्ही पद्धती बर्‍याच यशस्वी ठरलेल्या आहेत.

पुनर्वसन व प्रतिबंधन : दीर्घकालिक मद्यासक्तीमध्ये पुनर्वसन यशस्वी झाल्याशिवाय पुनरावृत्ती टळणे कठीण असते. मद्यपान सोडलेल्या परंतु बेकार असलेल्या रूग्णाला नवीन नोकरी वा धंदा मिळवून देण्यास मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी अल्कोहॉलिक अँनॉ-निमससारख्या स्वयंसेवी व समाजकार्याला वाहून घेतलेल्या सेवा- भावी संस्थांचा फारच उपयोग होतो. कुटुंबकल्याणासाठीही रीतसर प्रयत्न झाला पाहिजे, नाहीतर कर्त्या व्यक्तीच्या दीर्घकालीन मद्यासक्ती- मुळे उदध्वस्त झालेले कौटुंबिक वातावरण व स्वास्थ्य सुधारणे कठीण होते आणि तसे न झाल्यास मद्यासक्तीची पुनरावृत्ती अटळ बनते. व्यसन सुटल्यावर ते पुन्हा जडू नये म्हणून ज्या विशिष्ट परिस्थिती अथवा प्रसंगांमुळे मद्यपान करण्याची गरज भासत असे, ती परिस्थिती पुन्हा उदभवणार नाही व तसे प्रसंग टळतील ह्याची खबरदारी घेण्या- साठी रूग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना तसेच मित्रपरिवाराला  प्रवृत्त केले पाहिजे. मोकळ्या वेळात मनाला आल्हाद देणारे व आत्म-प्रतिमा उज्ज्वल ठेवण्यास मदत करणारे नवीन विरंगुळे, उद्योग अथवा सामाजिक कार्ये रूग्णाला शिकवायला हवीत.

प्रतिबंधनासाठी मद्यपानाच्या राक्षसी परिणामांची कल्पना देऊन ग्रहणशील (ससेप्टिबल) व्यक्तींना परावृत्त करणे महत्त्वाचे आहे. हे शिक्षण कुमारावस्थेतच मिळणे जरूरीचे आहे. त्यासाठी शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात त्याचा समावेश केला पाहिजे. शिवाय सार्वजनिक प्रसिद्धी माध्यमांतून कमकुवत आर्थिक-सामाजिक गटातील जनतेला-विशेषतः झोपडपट्टीचे रहिवासी, औद्योगिक वसाहतीतील  कामगार तसेच शेतमजूर यांना –मद्यपानाच्या धोक्याविषयी लोक-शिक्षण दिले पाहिजे.

पाश्चात्त्य देशांत सण, समारंभ, जेवणावळी वगैरे सामाजिक प्रसंगी मद्यप्राशन करण्याची प्रथा आहे. तिथे मद्याऐवजी कमी मादक अस- लेली बिअरसारखी पेये देण्याची प्रथा पाडायचा प्रयत्न केला गेला होता  परंतु तो अजून यशस्वी ठरलेला नाही. मद्यपान करणार्‍यांना मद्यासक्ती जडू नये म्हणून फक्त सामाजिक समारंभ-सोहळ्यांच्या वेळी मर्यादित प्रमाणात पिण्यास प्रवृत्त करण्याची मोहीम अधिक यशस्वी झालेली आहे. कायदेशीर प्रतिबंध-उदा., दारूबंदी –बहुतेक राष्ट्रांतील आजपर्यंतच्या अनुभवाप्रणाणे अपयशी ठरलेला आहे परंतु  मद्यावर जादा कर, मद्यपानावर बंधने तसेच मद्याची मर्यादित उप-  लब्धता अशा उपायांनी काही देशांत सार्वजनिक मद्यप्राशन मर्यादित ठेवणे शक्य झाले आहे.


पहा : नशाबंदी.

संदर्भ : 1. Costello, C. G. Ed. Symptoms of Psychopathology, New York, 1970.

            2. Granville-Grossman, K. Ed. Recent Advances  in Clinical Psychiatry, Vol.3. Edinburgh, 1979.

            3. Kaplan,   H. Sadock, B. J. Modern Synopsis of Comprehensive Text-   book of Psychiatry, III, Bakimore, 1981.

            4. Miller, P. M. Behavioral Treatment of Alcoholism, Oxford, 1976.

            5. Ritson,    B. Hassall, C. The Management of Alcoholism, Edinburgh, 1970.

 शिरवैकर, र. वै.