मत्स्य विकार : निरीक्षण, अभ्यास, संशोधन वा मनोरंजन करण्यासाठी जलजीवालयांत, तसेच अन्नासाठी वा पारधीसाठी मोठ्या जलाशयांत विविध जातींच्या माशांचे संवर्धन करण्या त येते. हे संवर्धन योग्य प्रकारे होण्यासाठी माशांचे निरनिराळे विकार व त्यांवरील उपाय यांविषयी माहिती असणे आवश्यक असते. तथापि माशांसारख्या जलचर प्राण्यांच्या विकारांविषयी तुलनेने थोडीच माहिती उपलब्ध आहे. रोगकारकाच्या प्रकारानुसार सांसर्गिक व असांसर्गिक असे माशांच्या विकारांचे वर्गीकरण करता येईल.

सांसर्गिक विकार : हे विकार फैलावणारे असून माशांची दाटी, अधिकतर शारीरिक संपर्क व शरीरक्रियेत निर्माण झालेल्या त्याज्य द्रव्यांचा वाढता संपर्क यांमुळे रोगकारकांचा थेट स्पर्शाने प्रसार होणे सहज शक्य असते. असे विकार सूक्ष्मकारकांचा थेट स्पर्शाने प्रसार सहज शक्य असते. असे विकार सूक्ष्मजंतू, व्हायरस, कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), आदिजीव (प्रोटोझोआ) व रोगकारक अन्य जीवोपजीवी (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणारे जीव) यांमुळे असे विकार होतात.

सूक्ष्मजंतुजन्य विकार :  हे मुख्यतः कमी प्रकाशात राहाणाऱ्या व चयापचयात (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींत) बिघाड होऊन अशक्त झालेल्या माशांत आढळतात. पक्ष (पर), क्लोम (कल्ले), शेपूट, तसेच नाजूक अंतर्गत इंद्रिये यांना सामान्यतः सूक्ष्मजंतूंचा उपसर्ग होतो.

एरोमोनास पंक्‌टॅटा  या सूक्ष्मजंतूमुळे कार्प, गोड्या पाण्यातील ईल, पाइक, व्हायटिंग व पर्च या माशांना द्रवसंचयी विकार [अंतर्गत इंद्रियांत वा ऊतकांत (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या−पेशींच्या−समूहांत) द्रव साठण्याचा सांसर्गिक विकार] होतो. रोगट कार्पचा रंग हिरवा होतो तसेच त्यात यकृताचा ऱ्हास, पानथरीची वाढ आणि पांडुरोग (रक्तक्षय), व्रणोत्पत्ती व सांगाड्यातील विकृती उद्‌भवतात. संसर्गित ईलमध्ये गुदाजवळील वा पक्षांजवळील त्वचा लाल होऊन व्रणयुक्त चट्टे व स्थानिक सूज दिसते. त्यातून पुढे आंधळेपणा, आंत्रशोथ (आतड्याची दाहयुक्त सूज) व शरीरांतर्गत रक्तस्राव उद्‌भवण्याची शक्यता असते. पाण्यात सूक्ष्मजंतुभक्षक (सूक्ष्मजंतूंवर जीवोपजीवी असलेले व्हायरस) सोडणे किंवा स्ट्रेप्टोमायसीन वा क्लोरोमायसेटीन अन्नातून देणे अथवा टोचणे हे उपचार करतात.

ए. सामनिसिडामुळे सामनच्या पाठीवर पक्षांच्या बाजूने गळवे होतात आणि हे जंतू रक्तप्रवाहात शिरल्यास⇨जंतुविषरक्ततेमुळे मासा मरतो. हीमोफायलस पिसियममुळे ट्राउटला ‘व्रण विकार’ होतो.

व्हिब्रिओ अँग्विलॅरियम हे जंतू सागरी ईल व पाइकवर आक्रमण करतात. ईलमध्ये हृदय संसर्गित होते व अंगग्रही हालचाली (अतिशय ताणामुळे स्नायू ताठर झाल्याने होणार्याह विचित्र हालचाली) होऊन तो मरतो (या रोगाला ‘लाल विकार’ असे म्हणतात).

जलजीवालयांत बंदिस्त असलेल्या गोड्या पाण्यातील माशांत सर्वसामान्यतः आढळ णारा सूक्ष्मजंतुजन्य पक्ष कुजणारा रोग बीजाणुजनक नसलेल्या (प्रजोत्पादक घटक निर्माण न करणाऱ्या), ग्रॅम-रंजक-अव्यक्त (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेने तयार होणारा जांभळटसर रंग टिकून रहात नाही) अशा बहुरूपी बॅसिलसमुळे उद्‌भवतो. संसर्गित माशांच्या स्ववल्यांवरील त्वचेला शोथ (दाहयुक्त सूज) येतो, पक्ष गळतात, व्रण निर्माण होतात आणि सरतेशेवटी त्यांना जंतुविषरक्ततेमुळे मृत्यू येतो.त्वचा करडी, फिकट व ठिगळे लावल्यासारखी होऊन डोळ्यातील स्वच्छमंडलाचा (बुबळाच्या पुढच्या पारदर्शक भागाचा) किंवा संपूर्ण डोळ्याचा ऱ्हास होतो. एक लिटर पाण्यात एक ग्रॅम अल्ब्युसीड किंवा पाण्यात मीठ (०.४−०.६%) घालणे हा या रोगावर परिणामकारक उपचार आहे.

लेपिडॉरथोसी सूक्ष्मजंतूंमुळे बेटा मॅक्रोपोडस  वंशांतील माशांना त्वचाशोथ होतो.

मिक्झोबॅक्टिरिएलीझ या सूक्ष्मजंतूंच्या गणातील अनेक जाती माशांच्या क्लोमांचा अतिशय क्षोभ व ऊतकमृत्यू घडवून आणतात. अन्य जातींमुळे ‘कॉलमनॅरिस’ हा विकार होतो व त्यामुळे शरीरावर पिवळ्या उघड्या जखमा दिसतात.

माशांचा क्षयरोग ह मायकोबॅक्टिरियम  वंशातील सूक्ष्मजंतूंमुळे होतो. यात काही न खाणे, वजन घटणे, त्वचा पांढरी फटक होणे, रक्तस्राव व व्रण, उघड्या जखमा, अवयवाच्या टोकांचा ऱ्हास किंवा ते संपूर्ण नाहीसे होणे, जबड्याची विकृती व पृष्ठवंशाला (पाठीच्या कण्याला) आलेला बाक ही लक्षणे दिसतात. मायकोवॅक्टिरियम पिसियम ही जाती सोनमासा व गोड्या पाण्यातील इतर सर्व माशांना रोगाच्या दृष्टीने फारच अपायकारक असते.


सूक्ष्मजंतूंमुळे माशांना होणाऱ्या इतर विकारांमध्ये कार्प माशांना होणारा वृक्क (मूत्रपिंड) विकार व द्रवसंचयी विकार आणि ट्राउटच्या क्लोमांना येणारा शोफ (द्रवयुक्त सूज) यांचा समावेश होतो.

व्हायरसजन्य विकार : चपटे मासे, लाल मुलेट इत्यादींमधील लसीका पुटी विकार [ज्यात लसीकायुक्त पुटी तयार होतात असा विकार ⟶ लसीका तंत्र] हा शरीरावरील व पक्षांवरील पांढऱ्या गाठींनी प्रकट होणारा विकार तंतुजनक कोशिका व अस्थिजनक कोशिका यांच्या अतिवृद्धीमुळे होतो. अनेक चपट्या माशांच्या अंगावर दिसणारी त्वचीय व बाह्यत्वचीय अंकुरार्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या अंकुरासारख्या गाठी नव-प्लॅस्टिक विकार) ही ‘माशांच्या देवी’ म्हणून संबोधिली जातात. व्हायरसजन्य जंतुविषरक्तता हा ट्राउट माशांना होणारा एक भयंकर विकार आहे. या विकारात स्नायू, यकृत, वाताशय (हवेची पिशवी), आतडे, वृक्क, मेंदू इत्यादींवर दुष्परिणाम होतात. ट्राउटच्या पिलांना ‘सांसर्गिक अग्निपिंड (स्वादुपिंड) ऊतकमृत्यू’ हा विकार होतो. त्यात रोगी मासे गिरमिटासारखी हालचाल करतात. त्यांच्या आतड्यात श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) जमल्यामुळे पित्ताचे उत्पादन थांबते. पाइकमधील द्रवसंचयी विकार व मोलिनिसियाच्या घशातील अर्बुद हे विकारही व्हायरसांमुळे होतात.

कवकजन्य विकार : माशांमधील कवकजन्य विकारांचे तीन प्रकार आहेत.

(१) त्वचा-कवक-रोग : हे रोग योग्य देखरेख नसलेल्या गोड्या पाण्याच्या तलावांत सामान्यतः सॅप्रोलेग्निया बुरशीमुळे होतात. या कवकाची माशांच्या पुष्कळ जातींना बाधा होते व त्यामुळे त्वचा, पक्ष, डोळे, तोंड व क्लोम यांवर कापसासारखी वाढ येते. तिचे लोकरीसारखे पांढुरके ठिपके होतात.

(२) क्लोम-कवक-रोग : कार्प, पाइक, टिंका टिंका इत्यादींसारख्या उष्ण कटिबंधातील नद्यांतील माशांना ब्रँकिओमायसीज डेमिग्रान, ब्रँ. सँग्विनिस यांची बाधा होते. आश्रयी माशाच्या ऊतकाच्या जागी कवकतंतूंचीच वाढ झाल्यामुळे क्लोमांना होणा रा रक्तपुरवठा थांबतो, त्यामुळे सूज येते व रक्तबाहिन्या नाश पावतात. याचा परिणाम म्हणून क्लोम कुजतात.

(३) सार्वदेहिक रोग : हा रोग मुख्यतः इक्थिओस्पोरिडियम हॉफेरी या कवकामुळे सागरी व गोड्या पाण्यातील माशांना होतो. यात माशांचे हृदय, अंतर्गत इद्रिये व पार्श्विक काया स्नायू यांना उपसर्ग पोहचतो. मॅकेरेल, हेरिंग, रेनबो ट्राउट इ. माशांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढते. क्लुपिया हॅरिंगसमध्ये हा रोग साथीच्या स्वरूपात पसरत असून त्यामुळे विशिष्ट भागात या माशांची संख्या खूपच घटते. रोगग्रस्त मासे झोके घेतल्यासारखी चमत्कारिक हालचाल करतात व त्यामुळे या विकाराला ‘झोके विकार’ म्हणतात. कवकसंसर्गामुळे गपी माशांत लिंग बदल झाल्याची नोंद आढळते. ॲस्परजिलसमुळे कार्पमध्ये पर्युदर (उदर व त्याच्या तळाशी असलेल्या पोकळीत भिंतींच्या आतील बाजूवर आणि तीमधील अंतर्गत इंद्रियांवर पसरलेले पातळ अस्तरासारखे पटल) व अंडाशय यांना बाधा होते. काही मिनिटे पोटॅशियम परमँगॅनेट स्नान (१ ग्रॅ./१०० लि. पाणी. ९० मिनिटे), लवण स्नान (३० ग्रॅ. मीठ/१ लि. पाणी), मोरचूद स्नान (५ ग्रॅ./१० लि. पाणी), सिल्व्हर प्रोटिनेट स्नान (०.००००१ ग्रॅ. कॉलरगॉल १ लि. पाण्यात) इ. किंवा टिंक्चर आयोडीन लावणे हे यावरील उपचार होत.

आदिजीवजन्य विकार : कॉस्टिया नेक्टॅरीक्स या कशाभिकायुक्त (चाबकाच्या दोरीसारख्या लांब, नाजूक व बारीक जीवद्रव्यीय−सजीवांच्या कोशिकेतील अत्यावश्यक द्रव्याच्या बनलेल्या−संरचनेने युक्त) आदिजीवापासून ‘सांसर्गिक मलिनता’ हा रोग प्रामुख्याने जलजीवालयातील माशांच्या क्लोमांना व त्वचेला झालेला आढळून येतो. नियमितपणे १% लवण स्नान अथवा १:२००० या प्रमाणातील फॉर्माल्डिहाइड स्नान या रोगावर उपायकारक ठरतात.

ट्रिपॅनोसोमा सायप्रिनी या कशाभिकायुक्त आदिजीवामुळे सोनमाशाला⇨निद्रारोग  जडतो. ऊडिनियम लिग्नेटिकममुळे ‘तांबेरा’, ‘सोनेरी धूळ’ वा ‘मखमली विकार’ होतो. त्यामुळे क्लोमांच्या प्रच्छदांना (आवरणांना) बरीच सूज येते. हे आदिजीव क्लोमकक्षामध्ये आणि तोंडात प्रवेश करून श्वसनामध्ये व्यत्यय आणू शकतात. १.५ ग्रॅ. क्विनीन डायहायड्रोक्लोराइड १०० लि. पाण्यात विरघळवून तयार केलेल्या विद्रावात २-३ दिवस स्नान घालणे किंवा ३−५% लवण विद्रावाचे काही मिनिटे स्नान घालणे हितकारक असते.

आयमेरिया सायप्रिनी या बदराणूमुळे (कॉक्सिडिया गणातील आदिजीवामुळे) माशांना आंत्रशोथ होतो. त्याच्या इतर जातींचा उपद्रव ईल, सार्डीन, गॅडिड इ. माशांना होतो. मिक्झोस्पोरिडिया वर्गातील मिक्झोसेमा सेरेब्रॅलिस  या आदिजीवामुळे  सामन माशांना होणा रा रोग फार भयंकर असून त्याविषयी बरीच माहिती उपलब्ध आहे. या रोगामुळे माशाच्या कवटीत उपसर्ग होऊन त्याच्या हालचालीतील समन्वय ढळतो आणि त्याच्या हाडांना व पृष्ठवंशाला विरूपता येते. मायक्रोस्पोरिडिया वर्गातील नोसेमा या आदिजीवामुळे स्टिकलबॅक व मिनो माशांमध्ये लहान अर्बुदे होतात. इक्थिओस्पोरियम या पक्ष्माभिकायुक्त (मोकळ्या पृष्ठावर सूक्ष्म, नाजूक व कंपनशील वाढींनी युक्त असलेल्या) आदिजीवामुळे चॅरॅसीड, सायप्रिनीड व सिक्लिड या माशांत ‘पांढऱ्या) ठिपक्याचा विकार’ होतो. क्लोरामीन, ॲटेब्रीन व ॲक्वॅरॉल ही औषधे यावर उपयुक्त असतात.


अन्य जीवोपजीवीजन्य विकार :  पुष्कळ माशांना कृमींचा उपद्रव होतो. डिंभावस्थेतील (भ्रूणा नंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या क्रियाशील  पूर्वावस्थेतील) कृमी फार महत्त्वाचा असतो. प्रौढ कृमी अन्नमार्गात (आतड्यात) आढळतात पण डिंभ हे मांसात किंवा अंतस्त्यांत (उदर व छातीच्या पोकळीतील इंद्रियांत) सापडतात. त्यामुळे आश्रयी माशाची वाढ खुरटणे, ऊतक भंग पाव णे, चयापचयजन्य बिघाड व कधीकधी मृत्यू इ. परिणाम दिसतात.

जायरोडँक्टिलस एलेगान्स हा ट्रिमॅटोड कृमी सागरी व गोड्या पाण्यातील माशांत आढळतो. डॅक्टिलोजायरस, निओडॅक्टिलोराहातात व नुकसान करतात. डिप्लोस्टोमम स्पॅथिसीमय ह्या आणखी एका ट्रिमॅटोडमुळे माशांना ‘कृमी अंधत्व’ हा विकार होतो. क्लिनोस्टोमम वंशातील जातींमुळे जलजीवालयातील माशांमध्ये ‘पीत डिंभक’ विकार होतो. त्यामुळे माशांच्या अंगावर पिवळसर पूयिका (पू-संचय असलेले पुरळाचे फोड) येतात. ऑपिस्थॉर्किस फेलिनियसच्या डिंभान गोड्या पाण्यातील खाद्य माशांना बाधा होण्याची शक्यता असते व त्यामुळे त्यांना वैद्यकीय महत्त्व आहे.

स्केट व रे यांसारख्या सागरी माशांत, तसेच गोड्या पाण्यातील जातींत सेस्टोड कृमींना आश्रय मिळतो.

अँफिलिना पोलिॲसीआ ही जाती स्टर्जनच्या पर्युदरगुहेत राहते. लिग्युला इन्टेस्टिनॅलिस कार्प व पर्च यांच्या देहगुहेत वाढते. या जीवोपजीवींच्या विपुल संख्येमुळे माशांचे इतर अवयव एवढे दाबले जातात की, त्या अवयवांचे कार्य थांबू शकते. असा मासा बांझ होतो. असाच प्रकार शिस्टोसेफॅलस सॉलिडस कृमीच्या डिंभामुळे स्टिकलबॅकमध्ये होतो.

बर्‌बॉट (लोटा लोटा) व पाइक (एसॉक्स ल्यूसिअस) यांच्या देहगुहेत डायफायलोवोथ्रियम लेटमचे डिंभ आढळतात. अशा रोगग्रस्त माशांची न उकडलेली आतडी मानवाच्या खाण्यात आली, तर हे डिंभ त्याच्या शरीरात प्रवेश करीत असल्यामुळे वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाचे ठरतात.

ॲकँथोसेफाला संघातील जीवोपजीवींमुळे, तसेच शंभराहून अधिक जातींच्या सूत्रकृमींमुळे माशांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर घटण्याचा संभव असतो.

जळवांसारख्या बाह्य जीवोपजीवींमुळेही माशांमध्ये विस्तृत प्रमाणा वर नुकसान होते. चुनकळीचे स्नान (२ ग्रॅ./१ लि. पाणी) किंवा लायसॉल या जंतुनाशकाचे स्नान (२ ग्रॅ./५ लि. पाणी) हे उपचार काही सेकंद केल्यास परिणामकारक ठरतात.

कोपेपोडांच्या पुष्कळ जाती व माशांवरील ऊ (आर्ग्युलस) हे कवचधारी प्राण्यांपैकी माशांवरील जीवोपजीवी आहेत.

असांसर्गिक विकार : ‘मेलॅनोसिस’ किंवा संपूर्ण काळा रंग येणे हा विकार काही संकरित माशांत आढळतो. एरवी चमकदार रंग असलेल्या काही माशांच्या पिल्लांच्या अंगावर जन्मतः असामान्य काळ्या रंगाचे चट्टे असतात. प्रमाणाबाहेर कृष्णरंजक द्रव्य असलेल्या कोशिका ही एक प्रकारची धोक्याची सूचना असू शकते. अशा कोशिका अत्यंत मारक अर्बुदांच्या (कृष्णमांस कर्काच्या) पूर्वगामी असू शकतात. एक जननिक घटक त्यास कारणीभूत असतो.

जलजीवालयातील माशांच्या अर्बुदांचा विशेष अभ्यास करण्यात आला असून त्यावरून माशांतील अर्बुदे सौम्य वा मारक असू शकतात, असे दिसून आले आहे. काही अर्बुदे रंगीत असतात व कृत्रिम मत्स्यखाद्य हे याचे कारण असावे, असे काहींचे मत आहे.

कधीकधी माशांना अस्तिमार्दव (ठिसूळ हाडे) किंवा अस्तिमांस कर्क (हाडाचे अर्बुद) यांचा त्रास होऊ शकतो. या अवस्थेत रक्तातील अम्ल फॉस्फेटेज या एंझाइमाची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनाची) वाढ होते आणि त्यामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होऊन व त्याची चलनशीलता वाढून हाडांना विरूपता येते.


गलगंड (अवटू ग्रंथीची अर्बुदे) हा विकार माशांत सामान्यतः दिसतो. अर्बुदे वाढली तर श्वसनात व्यत्यय येतो व सरतेशेवटी मासा मरतो. सुरुवातीच्या अवस्थांत त्यावर आयोडीन व पोटॅशियमआयोडाइडयांचा उपचार करतात (१ भाग आयोडीन : १०० भाग पोटॅशियम आयोडाइड या प्रमाणात खाद्यात मिसळून देतात).

नेत्र-अर्बुद विकार मोठ्या प्रमाणावर अंतःप्रजनित (निकट संबंध व जवळचे नाते असलेल्या माशांच्या लैंगिक संबंधातून प्रजनन झालेल्या) सोनमाशांत सर्रास आढळतो. कुपोषणामुळे लिपॉइडोसिस (स्निग्ध पदार्थांच्या चयापचयात होणारा बिघाड) व यकृत ऱ्हास हे विकार माशांना होऊ शकतात. आहारात पँटोथिनिक अम्लाची कमतरता असल्यास पिलांना नीलकोश विकार (पीतक कोशाचे−पोषक द्रव्ययुक्त कोशाचे−आकारमान वाढणे) होतो व त्यामुळे चयापचय बिघडतो. सुरुवातीला भ्रूणाच्या विकासात बिघाड झाल्यास किंवा सदोष जननिक संयोग झाल्यास सयामी जुळे (वक्ष अथवा उदर या ठिकाणी जोडले गेलेले जुळे मुशी व ट्राउट यांमध्ये), छिन्न पक्ष, विवर्णता (रंगहीनता पर्च व सोनमासा यांमध्ये), लिंग बदल (असिपुच्छ माशात) इत्यादींसारख्या अनैसर्गिक बावी घडतात.

विकारांशी संबंधित असलेले काही घटक : हे परिसरीय किंवा आहारविषयक असू शकतात. अम्लीय पाणी [pH ५.०० पेक्षा कमी ⟶ पीएच मूल्य] व प्रमाणाबाहेर कमी तापमान यांमुळे काही कार्प अशक्त होतात. नायट्रोजनाने अतिसंतृप्त झालेल्या (जास्तीत जास्त प्रमाणापेक्षाही विरघळलेल्या नायट्रोजनाचे प्रमाण अधिक असलेल्या) पाण्यामुळे ट्राउटमध्ये सामान्यतः ‘पॉप आय’ म्हणून ओळखला जाणारा डोळ्याचा विकार होतो. डोळ्याच्या खोबणीतून वायूचे बुडबुडे बाहेर पडतात व त्यामुळे डोळे पुढे येतात. आहारातील आयोडिनाच्या कमतरतेमुळे गलगंड आणि बायोटिनाच्या उणिवेमुळे ‘नील श्लेष्म विकार’ होतो.

ट्राउटमध्ये नील श्लेष्म विकारात त्याचे शरीर एका निळसर पटलाने आच्छादले जाते. या पटलापैकी काही भाग नंतर गळून पडतात व माशाचे शरीर ठिगळे लावल्यासारखे दिसते. या विकारात श्लेष्मा तयार होण्याची क्रिया बिघडते, झटके येतात व मृत्यूचे प्रमाण बरेच जास्त असते. सामनमध्ये बायोटिनाच्या न्यूनतेमुळे स्नायूंची अपपुष्टी व अंगग्रही (स्नायू ताठर होणारे व हालचालीत बीजडपणा येणारे) झटके येतात.

मासे हा मानवी आहाराचा एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे संसर्गित किंवा रोगट मासे खाण्यात आल्यास खाणाऱ्याला त्रास होतो. गोड्या पाण्यातील, विशेषतः दूषित पाण्यातील मासे हे एश्चेरिकिया कोलाय, शिगेला,कलॉस्ट्रिडियम यॉटथुलिनम, कलॉ, टेटॅनी व स्टॅफिलोकॉकस ऑरियस यांसारख्या सूक्ष्मजंतूंचे वाहक असतात. कच्चा किंवा अर्धवट शिजलेला मासा खाल्ल्यास मानवाला डायफायलोबोथ्रियम लेटम या फीतकृमीची बाधा होते. तसेच काही माशांतील ट्रिमॅटोड व सूत्रकृमी यांमुळे मानवात रक्तानुरागी श्वेतकोशिकाधिक्यासारखी (इओसीन या गुलाबी रंजकद्रव्याने सहजपणे अभिरंजन करता येणाऱ्या पांढऱ्या कोशिकांचे रक्तातील प्रमाण नेहमीपेक्षा अधिक होणारी अवस्था उद्‌भवण्यासारखी) गंभीर अवस्था निर्माण होते.

संदर्भ : 1. Davis, H. S. Culture and Diseasese of Game Fishes, Cambridge, 1956.

           2. Duijn, C. Van, Diseases of Fishes, London, 1967.

           3. Khanna, S. S. An Introduction to Fishes, Allahabad, 1980.

           4. Reichenback-Klinke, H. H. Elkan, E. The Principal Diseases of Lower Vertebrates, London, 1965,

           5. Russel, F. S. Ed., Advances in Marine Biology, Vol. 4, New York, 1966.

मसुरेकर, व. भा. (इं.) जमदाडे, ज. वि. (म.)