मगध विद्यापीठ : बिहारमधील एक विद्यापीठ. १९४३ साली गया येथे ‘गया महाविद्यालय’ स्थापन झाले. त्याचेच पुढे मगध विद्यापीठात रुपांतर झाले (१ मार्च १९६२). इतिहासप्रसिद्ध बोधगया हे मगध विद्यापीठाचे प्रमुख केंद्र असून ते गयापासून १५ किमी. वर वसले आहे. २० ऑगस्ट १९६४ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यापीठाच्या इमारतीचा शिलान्यास समारंभ पार पडला व १५ डिसेंबर १९६९ रोजी विद्यापीठाच्या अध्यापन विभागाच्या कार्यालयाचे गांधी मैदानाजवळील ‘रेड हाउस’ मध्ये स्थलांतर करण्यात आले. बिहार राज्य विद्यापीठ अधिनियम १९६६ अन्वये विद्यापीठाचे नियमन केले जाते.
अध्यापनात्मक व संलग्नक असे या विद्यापीठाचे स्वरूप आहे. गया तसेच नगरपालिकेचे क्षेत्र वगळून उरलेला पाटणा शहराचा भाग, नालंदा, भोजपूर व रोहटास हे जिल्हे विद्यापीठाच्या कक्षेत येत असून ५० घटक महाविद्यालये, २८ संलग्न महाविद्यालये, एक सरकारमान्य संस्था व १७ अध्यापन विभाग आहेत. हिंदी, उर्दू, बंगाली, ओडिया किंवा इंग्रजी ह्या भाषा पदवी अभ्यासक्रमापर्यंत वैकल्पिक माध्यम म्हणून घेता येतात. त्यापुढील शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच आहे. जून–मे असे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष असून त्यात तीन सत्रे आहेत. मानव्यविद्या, विज्ञान, वाणिज्य, विधी, सामाजिक विज्ञाने व वैद्यक ह्या विद्यापीठाच्या विद्याशाखा आहेत. संस्कृत आणि पाली, उर्दू, अनुप्रयुक्त अर्थशास्त्र आणि वाणिज्य, भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतिविज्ञान, प्राणिविज्ञान, प्राच्यविद्या, राज्यशास्त्र व मानसशास्त्र हे विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग आहेत. येथे एल्. एन्. मिश्रा आर्थिक विकास व समाजपरिवर्तन संस्था असून बिहार राज्य सरकारद्वारा संचालित नवनालंदा महावीर संस्था आहे. या संस्थेत पाली भाषेचे पदव्युत्तर अध्ययन व संशोधन चालते. विद्यापीठातील एकूण विद्यार्थिसंख्या १,१२,६०५ व अध्यापकसंख्या ३,३०२ होती (१९८२–८३).
विद्यापीठाने त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर पाठनिर्देशन केले जाते. याशिवाय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना चर्चासत्राचाही लाभ घेता येतो. सर्व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना छात्रसेना शिक्षण आवश्यक केले आहे.
विद्यापीठीय आवारातच आरोग्यकेंद्र आहे. ते विद्यापीठीय विद्यार्थी, कर्मचारी व अध्यापक यांना विविध प्रकारच्या आरोग्यसेवा पुरविते. विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी काही विद्यावेतने व शिष्यवृत्त्या यांची तरतूद आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय समृद्ध असून त्यात १,४५,०,४७ ग्रंथ व २५० नियतकालिके होती (१९८२–८३). विद्यापीठाचे याच वर्षाचे उत्पन्न ९.८२ कोटी व खर्च ९.३९ कोटी रू. होता.
मिसार, म. व्यं.