मंदाकिनी नदी : भारतवर्षातील एक पवित्र नदी. हिच्या उगमाविषयी विविध मते आहेत. पुराणांत गंगा नदीला मंदाकिनी म्हटल्याचे आढळून येते तर सतलज नदीच्या उगमप्रवाहालाही मंदाकिनी हेच नाव होते. मंदाकिनी नदी ऋक्ष पर्वतात (विंध्य पर्वताचा पूर्व भाग) उगम पावून ⇨चित्रकूट पर्वताच्या पायथ्याजवळून वाहते, असा महाभारतात उल्लेख आहे तर चित्रकूट पर्वतपायथ्याजवळून वाहणारी पयस्विनी (पैसुनी) म्हणजेच मंदाकिनी असेही मानले जाते. मात्र रघुवंशातील उल्लेखावरून व जनरल कनिंगहॅमच्या मते मंदाकिनी ही पयस्विनी नदीची उपनदी आहे. मालविकाग्निमित्रातील उल्लेखावरून ही नदी मध्य भारतात असून कदाचित नर्मदा नदी म्हणजेच मंदाकिनी असावी. ही नदी कैलास पर्वताच्या पायथ्याजवळील मंदोदक सरोवरातून उगम पावते व हिच्या परिसरात देव, गंधर्व, अप्सरा यांचे वास्तव्य असते, असा मत्स्यपुराणात उल्लेख आहे. त्यामुळे त्याकाळी तिला ‘देवलोकातील गंगा’ म्हणत असत.
उत्तर भारतातील ⇨अलकनंदा नदीची उपनदी कालीगंगा ही ‘मंदाकिनी’ या नावानेही ओळखली जाते. याशिवाय तिला ‘पश्चिम काली’ किंवा ‘मंदाग्नी’ (मंदागिन) अशीही नावे आहेत. ही नदी गढवाल हिमालयाच्या केदार पर्वतात उगम पावते व रूद्रप्रयागजवळ अलकनंदा या गंगेच्या शीर्षप्रवाहाला येऊन मिळते. येथे मंदाकिनी नदीचा प्रवाह संथ असून बद्री-केदारकडे जाणारी वाट या नदीच्या काठाने जाते. अलकनंदा व मंदाकिनी या नद्यांच्या संगमावर रूद्रप्रयाग हे तीर्थक्षेत्र आहे.
चौंडे, मा. ल.