भ्रूणविज्ञान : भ्रूणाच्या विकासातील प्राथमिक अवस्थांचा अभ्यास या विज्ञानाच्या कक्षेत येतो. या क्रियेची सुरुवात एका जटिल (गुंतागुंतीची रचना असलेल्या) कोशिकेपासून (पेशीपासून) होते, या कोशिकेस अंडे म्हणतात. ठोकळमानाने प्राण्याचा प्रौढावस्थेपर्यंत होणारा विकास म्हणजे भ्रूणविज्ञान असे मानले, तरी सर्वसाधारणपणे जरायुज (जिवंत पिलांना जन्म देणाऱ्या) प्राण्यात भ्रूणाचा जन्म होईपर्यंत किंवा अंडज (अंडी घालणाऱ्या) प्राण्यात भ्रूण अंड्यातून बाहेर पडेपर्यंत भ्रूणविज्ञानाची मर्यादा समजली जाते. काही प्राण्यांत अंड्यातून भ्रूण बाहेर पडल्यावर त्याच्या रूपांतरणाचा अभ्यासही भ्रूणविज्ञानाच्या कक्षेत धरला जातो. प्रस्तुत नोंदीत प्रथमतः भ्रूणविज्ञानातील मूलभूत क्रिया, निरनिराळ्या प्रणिवर्गांतील (वा संघांतील) भ्रूणविकासाची वैशिष्ट्ये, प्रयोगिक भ्रूणविज्ञान, रासयनिक भ्रूणविज्ञान व शेवटी मानवी भ्रूणविज्ञान अशी विषयाची मांडणी केली आहे.

प्राण्यात अंड्याचे निषेचन (फलन) झाले की, त्याच्या विकासास सुरुवात होते. निषेचनक्रियेत शुक्राणूच्या (पुं-जनन कोशिकेच्या) स्पर्शाने अंडे उत्तेजित होते व नंतर शुक्राणू अंड्यात शिरल्यावर दोहोंच्या पूर्वकेंद्रकांचा (निषेचनक्रियेत संयोग पावून युग्मजाचा केंद्रक-कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा गोलसर पुंज-तयार करणाऱ्याच युग्मकी केंद्रकांचा) संयोग होतो. यामुळे दोन्ही जनकांची गुणसूत्रे [आनुवंशीक लक्षणे एका पिढीतून पुढील पिढीत नेणारे सुतासारखे सूक्ष्म घटक ⟶ गुणसूत्र] व त्याबरोबरच दोन्ही जनकांचे आनुवंशिक गुणधर्मही एकत्र आणले जातात. पूर्वकेंद्रकांचा संयोग होऊन जी कोशिका तयार होते, तिला युग्मज असे म्हणतात. त्या युग्मजाचे विभाजन होऊन त्यापासून बहुकोशिक (अनेक कोशिकांनी बनलेली) एकभित्तिका बनते. या एकभित्तिकेतील कोशिकांची पुनर्मांडणी होऊन भ्रूणास जो आकार मिळतो, त्यास आद्यभ्रूण असे म्हणतात. या स्थितीतूनच पुढे तीन भ्रूणीय स्तरांची निर्मिती होते. हे तीन स्तर बाह्यस्तर, मध्यस्तर व अंतःस्तर या नावांनी ओळखले जातात. यानंतर भ्रूणाची वाढ झापाट्याने होते.

ही वाढ होत असतानाच कोशिकांचे विभेदन (कार्य विभागणीनुसार होणारे रूपांतर), ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांची) रचना, अल्पविकसित अवयवांचा उगम या क्रिया चालूच असतात. विभेदनामुळे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या कोशिका (उदा., चर्मकोशिका, यकृतकोशिका, स्नायुकोशिका इ.) तयार होतात. यांच्या समूहांचीच पुढे ऊतके होतात व त्यांतूनच  अवयवांचा विकास होतो. या सर्व क्रिया प्रत्येक कोशिकेच्या केंद्रकात असलेल्या जीनांच्या (गुणसूत्रातील आनुवंशिक घटकांच्या एककांच्या) नियंत्रणाखाली होत असतात. भ्रूणात विकास पावत असलेले तंत्रिका तंत्र (मज्जांसंख्या) व हॉर्मोन (वाहिनीविहीन ग्रंथींतून स्रवणाऱ्या  उत्तेजक स्रावांची) यंत्रणा यांचेही भ्रूणविकासावर नियंत्रण असते.

सस्तन प्राण्यांत व तर काही पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत विकास होणाऱ्या अंड्यास सर्व अल्पविकसित अवयव प्राप्त झाल्यावर ‘गर्भ’ असे म्हणतात. मानवाच्या भ्रूणास गर्भ ही संज्ञा प्राप्त होण्यास सु. दोन महिने लागतात.

काही उभयचर (पाण्यात व जमिनीवर राहणाऱ्या) व अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसणाऱ्या) प्राण्यांत भ्रूण पूर्ण विकास होण्यापूर्वीच अंड्याचे कवच फोडून बाहेर येतो व स्वावलंबी जीवन जगू लागतो. या अवस्थेत डिंभ असे म्हणतात. काही कालाने या डिंभाचे प्रौढात रूपांतरण होते. भैकेराचे बेडकात व सुरवंटाचे फुलपाखरात होणारे रूपांतरण ही या प्रकारची दोन उत्कृष्ठ उदाहरणे आहेत. [⟶ डिंभ].

मधमाशीसारख्या काही कीटकांत शुक्राणूशिवाय अंड्याचा विकास होऊ शकतो. या प्रकारास नैसर्गिक अनिषेकजनन म्हणतात. अशा अंड्यापासून नर निर्माण होतात. जर अंड्यांचे निषेचन झाले, तर त्यांपासून माद्या निर्माण होतात. यांपैकी थोड्या माश्या राणी माश्या म्हणून तर बहुसंख्य माश्या कामकरी माश्या म्हणून जगतात.

काही वेळा बेडकाच्या अंड्याचा विकास शुक्राणूशिवाय करता येतो. या अंड्यास सुईने टोचले वा तर काही रसायनाने उद्दीपित केले, तर त्याचा विकास सुरू होतो. या क्रियेस कृत्रिम अनिषेकजनन म्हणतात. यावरून असे अनुमान निघते की, भ्रूणविकासाच्या क्रियेस अंड्याच्या व शुक्रणूच्या पूर्वकेंद्रकांच्या संयोगाची आवश्यकता नाही. दोन जनकांमुळे होणाऱ्या प्रजोत्पादनास मात्र आनुवंशिकतेच्या दृष्टीने असा संयोग होणे आवश्यक आहे.

भ्रूणविकासाची मूलभूत वैशिष्ट्ये : निषेचित अंड्याचा विकास होत असतान ज्या निरनिराळ्या अवस्था आढळतात, त्या पुष्कळ प्राण्यांत सर्वसाधारणपणे सारख्या असतात. ज्या प्राण्यांत लैंगिक जननपद्धती अस्तित्वात आहे त्या प्राण्यांच्या मादीत ⇨अंडकोश व नरात  वृषण या ग्रंथी असतात. यांपासूनच पुढे अनुक्रमे अंडे व शुक्राणू तयार होतात. या ग्रंथींतील कोशिका द्विगुणित (गुणसूत्रांची संख्या दुप्पट असलेल्या) असतात. शरीरातील इतर कोशिकांप्रमाणे यांच्या केंद्रकांत प्रत्येक गुणसूत्राची एक जोडी असते. या जोडीतील गुणसूत्रांस समजात (ज्यांच्यावरील जीनांचा अनुक्रम एकसारखा असतो अशी) गुणसूत्रे म्हणतात. या कोशिकांची वाढ लिंग ग्रंथीत समविभाजन पद्धतीने [जिच्यात प्रत्येक संतति-कोशिकोला जनक-कोशिकेत असलेल्या गुणसूत्रांच्या संचासारखाच संच मिळतो अशा विभाजन पद्धतीने ⟶ कोशिका] होते. यामुळे प्रत्येक कोशिकेत डीएनएच्या [डोऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाच्या ⟶ न्यूक्लिइक अम्ले] रूपात समजात गुणसूत्रांची एक जोडी असते. यांपैकी काही कोशिकांचे परिवतन अंडजनक आणि शुक्रकोशिकाजनक या विशिष्ट प्रकारच्या कोशिकांत होते. समविभाजनानेच अंडजनकापासून अपक्वांड (अपक्व अंडे) व शुक्रकोशिकाजनकापासून शुक्रकोशिका तयार होतात. यानंतर लागोपाठ दोनदा अर्धसूत्रण विभाजन [ज्यात गुणसूत्रांची मूळची द्विगुणित संख्या कमी होऊन निम्मी होते असे विभाजन ⟶ कोशिका] होते पण हे होत असताना गुणसूत्राचे विभाजन मात्र एकदाच होते. पर्यायी निर्माण होणाऱ्या कोशिकांत गुणसूत्रांच्या जोड्या न आढळता फक्त एकच संच आढळतो. याचाच अर्थ द्विगुणित कोशिकांचे एकगुणित (गुणसूत्रांचा एकच संच किंवा द्विगुणितापेक्षा निम्मी संख्या असलेल्या) कोशिकांत रूपांतर होते. अपक्वांडाच्या पहिल्या अर्धसूत्रण विभाजनास जास्त अवधी लागतो. या काळात पुढे भ्रूणास उपयुक्त ठरणारी पीतक (निर्जीव पोषक द्रव्य), पीतक कण अशी द्रव्ये अंड्यात तयार होतात व यामुळे त्याचे आकारमानही मोठे होते. याच वेळी कोशिकाद्रव्यात (केंद्रकाव्यतिरिक्त कोशिकेतील जीवद्रव्यात म्हणजे जिवंत द्रव्यात) पुढे विकासास लागणारी जटिल यंत्रणा निर्माण होते. पहिल्या अर्धसूत्रण विभाजनात मूळ गुणसूत्रांचे विभाजन होते पण ही अर्धगुणसूत्रे एकमेकांपासून विलग होत नाहीत. फक्त गुणसूत्रांच्या जोड्यांचे विभाजन होते व पहिल्या अर्धसूत्रण विभाजनानंतर तयार झालेल्या दोन कोशिकांत प्रत्येकी एक संच जातो. या संचातील गुणसूत्रे अर्धगुणसूत्रांत विभागली गेलेली असल्यामुळे दुसऱ्या विभाजनानंतर तयार होणाऱ्या. प्रत्येक कोशिकेत वर वर्णन केल्याप्रमाणे गुणसूत्रांची एकगुणित स्थिती आढळते.


या अर्धसूत्रण विभाजनांमुळे एका अपक्वांडापासून फक्त एक अंडे व तीन त्यक्त कोशिका (अपक्वांडापासून अलग होणाऱ्या लहान कोशिका) तर एका शुत्रकोशिकेपासून चार शुक्राणुजनक-कोशिका निर्माण होतात. यांचे रूपांतर पुढे शुक्राणूंत होते. अर्धसूत्रण विभाजन पूर्ण झाल्यावर जे अंडे तयार होते, त्यातील आणि शुक्राणूतील केंद्रकास पूर्वकेंद्रक असे म्हणतात.

युग्मके : पुष्कळशा प्राण्यांच्या शुक्रणूंत सारखेपणा आढळतो. पोरिफेरा (स्पंज) हा प्राणिसंघ सोडून इतर सर्व प्राण्यांत शुक्राणूंची उत्पत्ती वृषणात होते. वर वर्णन केल्याप्रमाणे अर्धसूत्रण विभाजन  झाल्यावर शुक्रांणूच्या पूर्वकेंद्रकात एकगुणित गुणसूत्रे शिल्लक राहतात. शुक्राणूच्या रचनेत लंबवर्तुळाकार डोके व लांब शेपटी असते. अशी रचना साधारणपणे सर्व प्राण्यांत आढळते. माणसाच्या शुक्राणूची लांबी ०.०६ मिमी. असून त्याचे डोके ०.००५ मिमी. इतके असते. शुक्राणूत कोशिकाद्रव्य फार थोडे असते. या द्रव्याच्या साहाय्याने शेपटीची हालचाल व निषेचनाच्या वेळी अंड्यास चिकटणे या क्रिया शुक्राणूस करता येतात. शुक्राणूची निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होते. एका स्खलनात कोट्यवधी शुक्राणू बाहेर पडतात. [⟶ शुक्राणु].

अंडकोशात अंड्यांची निर्मिती होते. निरनिराळ्या प्राण्यांत अंड्यांचे आकारमान निरनिराळे असते. प्राण्याचे अडे त्याच्या शरीराच्या इतर कोशिकांपेक्षा आकारमानाने मोठे असते. याचे कारण त्यात पीतक व इतर अन्नद्रव्यांचा संचय केलेला असतो. अंड्याच्या अर्धसूत्रण विभाजानानंतर ते निपेचनास योग्य होते. दोनदा अर्धसूत्रण विभाजन झाल्यावर तीन त्यक्त कोशिका अलग होतात. अंडे साधारणतः गोलाकार असते. काही प्राण्यांत ते लंबवर्तुळाकारही असते. अंडे जरी बाहेरून गोलाकार दिसले, तरी त्याच्या आतील संरचनेत ध्रुवता (एका निश्चित अक्षाचे अस्तित्व) आढळते. केंद्रक अंडकोशिकेच्या मध्यावर नसते म्हणजेच त्याची स्थिती असममध्य असते. पीतकाचा साठा केंद्रकाच्या विरुद्ध टोकाच्या भागात असतो. यामुळे अंड्यात केंद्रकानजीकच्या सक्रिय (अथवा प्राणिज) ध्रुवापासून (भ्रूणाचा डोक्याकडील भाग तयार करणाऱ्या टोकापासून) विरुद्ध टोकाच्या पीतकयुक्त अल्पवर्धी (किवा शाकीय अथवा पोषण) ध्रुवास जोडणारा एक अक्ष तयार होतो. अशा संरचनेचा कमी पीतक असलेल्या अंड्यांचा अभ्यास करण्यास उपयोग होतो. पक्षी व सरीसृप (सरपटणाऱ्या) प्राण्यांच्या अंड्यात पीतकाचे प्रमाण पुष्कळ असते. ह्या अंड्यांचा अभ्यास करण्यास वरील संरचनेचा उपयोग होत नाही. [⟶ अंडे].

पुष्कळ प्राण्यांत भ्रूणाचे लिंग त्याच्या गुणसूत्रांवर अवलंबून असते. गुणसूत्रांची एक जोडो समजात नसते. ज्या लिंगात अशी असमजात जोडी असेल ते लिंग विषमयुग्मक व दुसरे समयुग्मक असते. समजात गुणसूत्रास XX असे संबोधिले, तर विषमगुणसूत्र जोडीस XY असे संबोधावे लागेल. ज्या प्राण्यात मादी XX असेल, त्यात तिच्यापासून होणारी सर्व अंडी X गुणसूत्र असणारी म्हणजे सारखी असतील. याच जातीच्या XY नरापासून निर्माण होणारे शुक्राणू अर्धे X गुणसूत्राचे, तर अर्धे Y गुणसूत्राचे असतील. यामुळे फलनानंतर अर्धी प्रजा XX गुणसूत्राची म्हणजे माद्या व अर्धी XY गुणसूत्राची म्हणजे नर असण्याची संभाव्यता आहे. असा लिंगनिर्मितीचा प्रकार इतर पुष्कळ प्राण्यांबरोबर मानवातही आढळतो. पक्षी, फुलपाखरे व तर काही प्राण्यांत याविरुद्ध परिस्थिती आढळते. यात मादी XY तर नर XX असतो. बाकीची क्रिया वरीलप्रमाणेच घडते. [⟶ लिंग].

निषेचन : शुक्राणू व अंडे यांचा संयोग होण्याकरिता निरनिराळ्या प्राण्यांत निरनिराळ्या यंत्रणा अस्तित्वात आहेत. काही वेळा अत्यंत जवळ असूनही शुक्राणू अंड्याकडे रासायनिक कारणामुळे आकर्षिला न जाता केवळ योगायोगाने जवळ जातो. अंड्यावर पटले असतात व ती जातिविशिष्ट असतात. ज्या जातीचे अंडे असेल त्याच जातीचा शुक्राणू या पटलांस चिकटतो. सस्तन प्राण्यात अंड्यावर दोन पटले असतात. काही जातींत अंड्यांतून व शुक्राणूंतून काही  विशिष्ट रासायनिक द्रव्ये बाहेर पडतात आणि यांच्या विक्रियेमुळे शुक्राणूंचे अंड्याकडे होणारे आकर्षण व त्याचा अंड्यात होणारा प्रवेश वैशिष्ट्यपूर्ण असतो. शुक्राणूच्या पूर्वकेंद्रकापुढे डोक्याच्या टोकावर अक्रोसोम या नावाचे एक कोशिकांग असते. यामुळे शुक्राणूला अंड्याचे पटल छेदून आत शिरता येते आणि अंड्याच्या व शुक्राणूच्या जीवद्रव्यकलांचा (बाह्य पृष्ठभागावरील जीवद्रव्यापासून बनलेल्या पातळ थरांचा) संयोग होतो. काही जातींत शुक्राणूस आत शिरता यावे म्हणून अक्रोसोमापासून अंडपटलास छेदणारे लायसीन नावाचे द्रव्य निर्माण होते. इतर काही जातींत अक्रोसोमापासून एक तंतू निर्माण होतो व त्याच्या साहाय्याने अंडपटल छेदले जाते. शुक्राणूच्या व अंड्याच्या जीवद्रव्य-कलांचा संयोग झाला म्हणजे अंडे उत्तेजित होते. याचे परिणाम निरनिराळ्या जातींत निरनिराळे होतात. शुक्राणूचा अंडपटलास स्पर्श झाल्याबरोबर अंडपटलावर एक अपवर्जनाची प्रतिक्रिया उद्भवते व त्यामुळे दुसरा शुक्राणू अंड्यात शिरू शकत नाही. हे अपवर्जन कसे होते, हे अजून नीटसे समजलेले नाही. शुक्राणूच्या स्पर्शाने उत्तेजित झालेल्या अंड्यात जर अजून अर्धसूत्रण विभाजन पूर्ण झालेले नसेल, तर ते ताबडतोब पूर्ण होते. याचप्रमाणे इतरही बऱ्याच जीवरासायनिक विक्रिया व शरीरक्रियावैज्ञानिक विक्रिया अंड्याच्या कोशिकाद्रव्यात सुरू होतात. आत शिरलेला शुक्राणू अंड्याच्या पूर्वकेंद्रकाकडे आकर्षिला जाऊन दोन्ही पूर्वकेंद्रकांचा संयोग होतो व युग्मजाचे द्विगुणित केंद्रक अस्तित्वात येते. यानंतर काही क्षणांतच भ्रूणाच्या विकासास सुरुवात होते.

आ. १. अंड्यांचे प्रकार व विदलनाचे आकृतिबंध (अंड्याचा प्रकार त्यात सामावलेल्या पीतकावर अवलंबून असतो पीतकाचे वितरण बारीक टिपक्यांनी दर्शविले आहे पीतकाच्या वितरणावर विदलनाचा आकृतिबंध अवलंबून असतो) : (१) समपीतकी, समविभाजी व पूर्णमंजी (३) अमर्यादित गोलार्धपीतकी, तंब्कडीसदृश विभाजी व अर्धमंजी (४) केंद्रपीतकी, पृष्ठस्थ विभाजी व अर्धभंजी.

अंड्यांचे प्रकार : अंड्याच्या सक्रिय ध्रुव  भागात केंद्रक असते. या भागात पीतक अगदी कमी प्रमाणात असते. याउलट  दुसऱ्या टोकाकडील अल्पवर्धी ध्रुवाजवळ पीतकाचे प्रमाण पुष्कळ असते. अंडकोशात अंडे असतानाच त्यातील पीतकाचे प्रमाण व ते कोठे केंद्रित झालेले आहे, हे विचारात घेऊन अंड्याची वर्गवारी करता येते. ज्या अंड्यात पीतक कमी आहे व ते सर्व कोशिकाद्रव्यात मिसळले आहे अशा अंड्यास समपीतकी म्हणतात.


शिशुधान (पिलांच्या विकासासाठी मादीच्या उदरावर स्तन ग्रंथी आवेष्टित करणारी कातडी पिशवी असणाऱ्या) व इतर सस्तन प्राण्यांची अंडी अशा प्रकारची असतात. ज्यांत पीतकाचे प्रमाण अधिक असते अशी म्हणजे गोलार्धपीतकी अंडी दोन प्रकारची असतात. पहिल्या प्रकारात पीतक अल्पवर्धी ध्रुवाजवळ केंद्रित असते. ही उभयचर प्राण्यांत सापडणारी अंडी मर्यादित गोलार्धपीतकी म्हणून ओळखली जातात. दुसऱ्या म्हणजे अमर्यादित गोलार्धपीतकी अंड्यात पीतकाचे प्रमाण पुष्कळ असते. अल्पवर्धी ध्रुवाच्या भागातच नव्हे, तर सक्रिय ध्रुवापर्यंत ते पसरलेले असते. यामुळे अंड्याच्या कोशिकाद्रव्याची केंद्रकासह पीतकावर एक तबकडी तयार होते. अशी अंडी सरीसृप व पक्षी वर्गात आढळतात. ज्या अंड्यात पीतक मध्यावर केंद्रित झालेले असते व त्याभोवती कोशिकाद्रव्याचे कडे असते अशा अंड्यास केंद्रपीतकी म्हणतात. ही अंडी   ⇨आर्थ्रोपोडा संघातील (सांधेयुक्त पाय असलेल्या प्राण्यांच्या संघातील) प्राण्यांत आढळतात.

समपीतकी व मर्यादित गोलार्धपीतकी अंडी पूर्णभंजी (पीतकाचे प्रमाण कमी असल्याने पूर्ण विदलन होणारी) असतात. यात सर्व अंडे विभाजनात भाग घेते. अमर्यादित गोलार्धपीतकी व केंद्रपीतकी अंडी अर्धभंजी (पीतक भरपूर असल्याने अर्धवट विदलन होणारी) असतात. यात फक्त अंड्याच्या कोशिकाद्रव्याचे विभाजन होते.

विदलन : निषेचनामुळे अंड्याचे युग्मजात रूपांतर होते आणि थोडक्याच अवधीत त्याचे समविभाजन सुरू होते व नवीन कोशिका निर्माण होतात. या प्रक्रियेस विदलन म्हणतात. विदलनामुले निर्माण झालेल्या कोशिकांस कोरकखंड म्हणतात. समविभाजनामुळे प्रत्येक कोरकखंडाच्या केंद्रकातील गुणसूत्रे व जननिक वृत्त (आनुवंशिक गुणधर्मांची माहिती) युग्मजाच्या केंद्रकासारखीच असतात. विदलनाचा आकृतिबंध प्राण्याच्या जातीवर अवलंबून असतो. समपीतकी अंड्यातील पीतक कोशिकाद्रव्यात एकसारखे वितरित झालेले असते. जेव्हा या अंड्याचे विदलन होते व यातून समविभाजनाने दोन कोशिका निर्माण होतात, तेव्हा त्यांत युग्मजाच्या केंद्रासारखा द्विगुणित केंद्रक असतो. या दोन्ही कोशिकांचे आणखी विभाजन होते व हा क्रम असाच पुढे चालू राहतो.

गोलार्धपीतकी अंड्यात पीतक एका टोकाला व कोशिकाद्रव्य दुसऱ्या टोकाला असते. कोशिकाद्रव्यात युग्मजाचे केंद्रक असते. सर्व अंड्याचे विदलन होत नाही. फक्त केंद्रकाचे समविभाजन व कोशिका द्रव्याचे विभाजन होऊन दोन कोशिका तयार होतात. असेच विभाजन पुढे चालू राहून पीतकावर एक कोशिकांची तबकडी तयार होते. हा प्रकार बऱ्याच मत्स्य वर्गीय प्राण्यांत, तसेच सेफॅलोपोडा (ऑक्टोपस, नॉटिलस इ. सागरी प्राण्यांचा समावेश असलेल्या वर्गीतील प्राणी शीर्षपाद), पक्षी, सरीसृप व अंडजस्तनी प्राणी (अंडी घालणारे सस्तन प्राणी, उदा., प्लॅटिपस) यांत आढळतो. अशा विदलनास आंशिक विदलन असे म्हणतात.

कीटकांचे अंडे केंद्रपीतकी असते. यात पीतक मध्यभागात केंद्रित असते व त्याभोवती कोशिकाद्रव्याचे कडे असते. युग्मकाच्या केंद्राकाचे पीतकात पुष्कळ वेळा समविभाजन होऊन बरीच केंद्रके तयार होतात. या केंद्रकांभोवती कोशिकाद्रव्य नसल्यामुळे त्यांना खाऱ्या  अर्थाने कोशिका म्हणता येत नाही. अशी शेकडो केंद्रके तयार झाल्यावर ती पीतकाबाहेरील कोशिकाद्रव्याच्या कड्यात शिरतात व तेथे प्रत्येक केंद्रकाभोवती थोडे कोशिकाद्रव्य व कोशिकाद्रव्याबाहेर जीवद्रव्यकला निर्माण होऊन कोशिका तयार होतात.

विदलनातील कोशिकांचे विभाजन चालूच राहते. यात केंद्रकाचे समविभाजन होत असल्यामुळे प्रत्येक कोशिकेतील केंद्रक गुणसूत्रात व जननिक वृत्तात युग्मजाच्या केंद्रकासमान असते. काही प्राण्यांत यास अपवादात्मक परिस्थिती आढळते. साधारणपणे विदलनाच्या प्राथमिक अवस्थेत तयार झालेल्या कोशिका ऊर्फ कोरकखंड प्रत्येक जातीत एक विशिष्ट आकृतिबंध दाखवतात. या अवस्थेत कोशिकेवर काही खूण करून तिचा विकास कसा होत गेला, हे समजणे शक्य होते. निषेचनापूर्वी किंवा निषेचनानंतर अंड्याच्या कोशिकाद्रव्यात होणाऱ्या फरकामुळेही विदलनाच्या आकृतिबंधात फरक पडतो. पृष्ठवंशी प्राण्यांच्या विकासात विदलनकालात द्विपार्श्व सममिती [फक्त एकाच प्रतलाने शरीर विभागले असता त्याचे दोन सारखे  प्रतिबिंबरूप भाग पडणारी रचना ⟶ प्राण्सममिति] आढळते. ⇨अनेलिडा (वलयी) व  ⇨मॉलस्का (मृदुकाय) या संघांतील प्राण्यांतील विदलन सर्पिल (मळसूत्राकार) असते, तर तारामिनाचे विदलन अरीय (त्रिज्यीय) असते.

ज्या अंड्यांत कोशिकाद्रव्याची संघटना जटिल व उच्च स्वरूपाची असते, त्यांच्या कोरकखंडांचा विकास एकमेकांशी संलग्न न राहता स्वतंत्र रीत्या होतो. याउलट ज्या अंड्यात कोशिकाद्रव्य संघटित नसते, त्याच्या कोरकखंडांचा विकास बाजूच्या कोरकखंडावर अवलंबून असतो.

जेथे संपूर्ण अंडे विदलनात भाग घेते, तेथे विदलनाच्या अखेरीस भ्रूणाचा आकार तुतीच्या फळासारखा होतो. यानंतर कोशिकांची संख्या वाढत जाते आणि भ्रूणाचा आकार पोकळ चेंडूसारखा होतो. या अवस्थेस एकभित्तिका असे म्हणतात. एकभित्तिकेच्या पोकळीस कोरकगुहा असे म्हणतात. या पोकळीत द्रव पदार्थ असतो.

एकभित्तिका : या अवस्थेचे पुढील सहा प्रकार आढळतात : (१) शलाकाकृती : कोरकगुहा असलेली. (२) विकेंद्री (एका बाजूस सरकलेली) : कोरकगुहा असलेली. या प्रकारची एकभित्तिका गोलार्धपीतकी अंड्यापासून निर्माण होते. (३) त्रिमितीय : यात लांबट आकाराच्या कोशिकांचा एक स्तर असतो व कोरकगुहा सहसा नसते. (४) मूलपुंज : या एकभित्तिकेत कोरकगुहा नसते. आतील स्तराच्या कोशिका बाहेरपर्यंत आणि बाहेरील आतपर्यंत पोहोचत नाहीत. (५) पृष्ठस्तरीय : या एकभित्तिकेत कोशिकांचा स्तर पीतकावर असतो य कोरकगुहा नसते. ही केंद्रपीतकी अंड्यापासून निर्माण होते. (६) तबकडीसदृश : या एकभित्तिकेत कोशिकांची तबकडीसारखी रचना पीतकावर तयार होते आणि ही तबकडी व पीतक यांच्यामध्ये एक गुहा तयार होते. कधीकधी या गुहेस कोरकगुहा म्हणतात पण ती खरी कोरकगुहा नसून जननद गुहा होय, ही अमर्याद गोलार्धपीतकी अंड्यापासून निर्माण होते.


आ. २. एकभित्तिकेचे प्रकार : (१) शलाकाफृती – कोरकगुहा असलेली, (२) विकेंद्री – कोरकगुहा असलेली, (३) त्रिमितीय – लांबट व कोरकगुहा नसलेली, (४) मूलपुंज – कोरकगुहा नसलेली, (५) पृष्ठस्तरीय – कोरकगुहा नसलेली, (६) तबकडीसदृश – जननद गुहा असलेली.आद्यभ्रूण व प्राथमिक जननस्तर : एकभित्तिकेच्या अवस्थेनंतर कोरकखंडांच्या स्थानात बरीच पुनर्रचना होते. परिणामी यातूनच आद्यभ्रूणाची निर्मिती होते. ही पुनर्रचना सुत्रूत्र असते. चेंडूच्या आकाराच्या एकभित्तिकेतून द्विस्तरीय भ्रूण तयार होतो.  काही प्राण्यांत हे अगदी सोप्या रीतीने घडते. अल्पवर्धी ध्रुवाच्या भागाचे सक्रिय ध्रुवाच्या भागात अंतर्बलन (घड्या पडून आतील बाजूल वळणे) होते व एकभित्तिकेस वाटीचा आकार येतो. हे होत असताना  कोरकगुहा नाहीशी होते. बाटीच्या पोकळीस आद्यांत्र (आद्यआ. ३. आद्याभ्रूणाची निर्मिती व प्रकार : (अ) मूलपुंजाचे कोटरीकरण : (१) बाह्यास्तर, (२) अंतःस्तर (आ) अधिवर्धन : (१) विकेंद्री एकभित्तिका, (२) अधिवर्धन, (३) कोरकरंध्र (इ) अंतर्वर्धन-प्रवेशन (ई) अंतर्वर्धन - विलगीकरण (उ) अंतर्वर्धन-अंतःस्थापन (ऊ) अंतर्वर्धन-अंतर्वलन. आतडे) म्हणतात. इतर काही प्राण्यांत असलाच प्रकार पण थोड्या निराळ्या तऱ्हेने होतो. या अवस्थेस आद्यभ्रूण म्हणतात. आद्यभ्रूणाच्या बाहेरील कोशिकांच्या स्तरास बाह्यस्तर म्हणतात. जसजसा भ्रूणाचा विकास होत जातो तसतसे या  बाह्यस्तरापासून त्या प्राण्याचे आवरण, त्वचा, तंत्रिका तंत्र, ज्ञानेंद्रिये व तर ऊतके निर्माण होतात. आद्यभ्रूणाच्या बाह्यस्तराच्या आत अंतःस्तर असतो. पुष्कळदा या स्तराच्या कोशिकांपासून नलिका तयार होते. या नलिकेस आद्यांत्र म्हणतात. या आद्यांत्राच्या कोशिकांपासूनच विकासक्रमात आंत्र व  त्याच्याशी संलग्न असलेल्या ग्रंथी निर्माण होतात.

बाह्यस्तर आणि अंतःस्तर यांना विकास होत असतानाच त्यांच्यामध्ये मध्यस्तराची निर्मिती होते. या स्तराच्या कोशिका आद्यभ्रूण अवस्थेच्या अखेरीस दिसू लागतात. या स्तरापासून प्राण्याचे स्नायू, उत्सर्जन तंत्र (शरीरक्रियेस निरूपयोगी असणारी द्रव्ये बाहेर टाकून देणारी यंत्रणा) आणि जनन तंत्र यांची निर्मिती होते. प्रगत प्राण्यांत मध्यस्तरात एक पोकळी निर्माण होते, तिला देहगुहा म्हणतात. या देहगुहेतच यथाकाल तर इंद्रियांचा विकास होतो.

मूलपुंज या एकभित्तिकेत नव्याने एक गुहा निर्माण होते. या गुहेभोवती कोशिकांची पुनर्रजना होते. या गुहेस आद्यांत्र म्हणतात. आतील कोशिकांपासून अंतःस्तर, बाहेरील कोशिकांपासून बाह्यस्तर व या दोहोंमधे मध्यस्तर निर्माण होतो व याप्रमाणे आद्यभ्रणाचा विकास पूर्ण होतो.

काही प्राण्यांत सक्रिय ध्रुवाकडील लहान कोशिकांचे विभाजन होऊन त्या अल्पवर्धी ध्रुवाकडील मोठ्या कोशिकांवर आवरणाप्रमाणे पसरतात. परिणामी लहान कोशिकांचा स्तर बाहेरील बाजूस व मोठ्या कोशिका आतील बाजूस अशी रचना निर्माण होते. या प्रकारास अधिवर्धन आतील बाजूस अशी रचना निर्माण होते. या प्रकारास अधिवर्धन म्हणतात. बाहेरील लहान कोशिकांपासून बाह्यस्तर व आतील मोठ्या कोशिकांपासून अंतःस्तर निर्माण होतो. या अंतःस्तरातील काही कोशिकांचे विभाजन होऊन त्यांपासून मध्यस्ताच्या कोशिका निर्माण होतात व त्यांची स्थापना बाह्यस्तर व अंतःस्तर या दोहोंमध्ये होते. अल्पवर्धी ध्रुवाच्या काही भागावर बाह्यस्तराच्या कोशिका असत नाहीत. या लहान वर्तुळाकार भागास कोरकरंध्र असे म्हणतात. या अवस्थेस आद्यभ्रूण म्हणतात.

सरीसृप प्राणी व पक्षी यांची एकभित्तिका तर प्राण्यांपेक्षा निराळी असते. यात आद्यभ्रूण निर्माण होण्यापूर्वी कोशिकांच्या तबकडीच्या कडांपासून नवीन कोशिका तयार होतात आणि त्या तबकडीखालील गुहेत सरकतात. कोशिका तबकडीपासून विलग झाल्यावर त्यांच्यापासून अंतःस्तर तयार होतो. याच सुमारास तबकडीवर एक आद्यरेषा दिसू लागते. तिच्या दोन्ही बाजूंस पश्च भागाकडे मध्यस्तर निर्माण करणाऱ्या कोशिका सरकू लागतात. आतील कोशिकांपासून अंतःस्तर, तबकडीतील कोशिकांपासून बाह्यस्तर व वर निर्देश केलेल्या कोशिकांपासून मध्यस्तर निर्माण होतात आणि आद्यभ्रूण विकास पावतो.

ऊतके व आद्येंद्रियांची घडण व कोशिकांचे विभेदन : आद्यभ्रणात बाह्यस्तर, अंतःस्तर व मध्यस्तर हे तीन जननस्तर तयार झाल्यावर विशिष्ट जागी व सापेक्षतेने आद्येंद्रियांचा उगम होतो. ही आद्येंद्रिये पूर्वनिर्धारित (आधीच निश्चित केलेल्या) रीतीने विकास पावतात आणि इंद्रिय तंत्रात त्यांचे स्वाभाविक स्वरूप व कार्य अंगिकारतात. कोणत्याही इंद्रियाच्या विकासाची सुरूवात प्रथम एका कोशिकापुंजातून होते. हे पुंज जननस्तरात अढळतात. या पुंजात असलेल्या कोशिकांचा आकार कधीकधी बदलतो. प्रत्येक आद्येंद्रियात हळूहळू बदल होत जातात. हे  बदल कोशिका विभेदनाच्या रूपाचे असतात आणि यांचे पर्यवसान कोशिका विशिष्टीकरणात होते. यामुळे साध्या कोशिकांपासून तंत्रिका तंत्रातील किंवा इतर तंत्रांतील विशिष्ट कोशिकांची निर्मिती होते. भ्रूणाचा विकास होत असताना आद्यभ्रूण अवस्थेनंतर कोशिकांचे विभेदन होऊन निरनिराळी ऊतके तयार होतात. कोशिकांचा आकार, आकारमान, कोशिकांगे, प्रथिने, एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करण्याचे कार्य करणारी प्रथिने), जीवरासायनिक द्रव्ये, कोशिकांचे कार्य व कोशिकांचा परस्परसंबंध यांतून ही भिन्नता निर्माण होते. कोशिकांतील फरक हे स्थिर स्वरूपाचे असतात व समविभाजनाने निर्माण होणाऱ्या कोशिकांत ते आढळतात.


कोशिकांची आनुवंशिक लक्षणे सारखी असली, तरीही हे विभेदन आढळते. कोशिका विभेदनाची कारणे अजून पूर्णपणे समजलेली नाहीत. असा एक अंदाज आहे की, जरी प्राण्याच्या प्रत्येक कोशिकेत आनुवंशिक लक्षणे सारखी असली, तरी त्यांपैकी कोणत्या गुणांचा केव्हा विकास व्हावा हे केंद्रकाच्या सभोवती असलेल्या कोशिकाद्रव्यावर अवलंबून असते.

भ्रूणाची वाढ : जसजसे भ्रूणाचे वय वाढते तसतशी त्याच्या द्रव्यात व आकारमानात वाढ होते. विदलनकालात ही वाढ जाणवत नाही. कोरकगुहेत द्रव पदार्थाची वाढ झाल्यामुळे द्रव्यातही वाढ झाल्यासारखी वाटते पण खरी वाढ आद्यभ्रूण अवस्था प्राप्त झाल्यावर आढळते. समविभाजनापूर्वी कोशिकाद्रव्य वाढून पूर्वीच्याच आकार मानाच्या व द्रव्याच्या दोन कोशिका निर्माण होतात. कोशिकांची संख्या वाढल्यामुळे भ्रूणही वाढलेला दिसतो. काही कोशिकांचे आकारमान त्यांतील कोशिकाद्रव्य वाढऱ्यामुळे व समविभाजन न झाल्यामुळे मोठे होते. या बरोबरच कोशिकांत पाण्याचे अभिशोषण (शोषून घेणे) होते, तसेच कोशिकांच्या दरम्यान तंतू व आधारद्रव्ये निर्माण होतात. या सर्व क्रिया भ्रूणाची वाढ दर्शवितात. भ्रूणाच्या शरीराचे काही भाग व काही अवयव जास्त झपाट्याने वाढतात. अंडज प्राण्यात ही वाढ अंड्यातील पीतकाच्या साह्याने होते, तर जरायुज प्राण्यात तीच मातेच्या रक्तातून मिळणाऱ्या  द्रव्याच्या साह्याने होते.

अपृष्ठवंशी प्राण्यांचे भ्रूणविज्ञान : अपृष्ठवंशी प्राण्यांचा निपेचित अंड्यापासून होणाऱ्या  विकासाचा अभ्यास या विज्ञानाच्या कक्षेत येतो. ⇨ कॉर्डेटा संघ (पृष्ठरज्जू – म्हणजे शरीराच्या वरच्या भागात असणारा लवचिक आधार–अक्ष वा आधारकणा–असलेल्या प्राण्यांचा संघ) वगळून बाकीचे सर्व संघ अपृष्ठवंशी म्हणून समजले जातात. कॉर्डेटा संघाचे काही आद्य प्राणीही अपृष्ठवंशी म्हणून समजले जातात. कॉर्डेटा संघाचे काही आद्य प्राणीही अपृष्ठवंशी म्हमून समजले जातात. कॉर्डेटा संघाचे काही आद्य प्राणीही अपृष्ठवंशी आहेत. एकंदर सु. १२ लक्ष माहीत असलेल्या प्राण्यांच्या जातीपैकी शेकडा ९० जाती अपृष्ठवंशी प्राण्यांच्या आहेत. सर्व अपृष्ठवंशी प्राण्यांत आढळेल असे एकही सर्वसाधारण लक्षण सांगता येणार नाही. पाठीच्या कण्याचा अभाव एवढेच एक अभाववाची लक्षण म्हणता येईल. या सर्व प्राण्यांच्या विकासात अतिशय वैचित्र्य आहे.

अपृष्ठवंशी प्राण्यांचे तुलनात्मक शारीर (शरीर रचनेच्या दृष्टीने निरनिराळ्या प्राण्यांचा करण्यात येणारा तुलनात्मक अभ्यास) असे दर्शविते की, त्यातील निरनिराळ्या संघांत एकसूत्रता नाही. प्रदेश संघाचा रचनात्मक आराखडा वेगळा आहे व त्या संघातील निरनिराळ्या विभागांत परिस्थितीनुरूप बदल घडून आले आहेत. अपृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूणविकासाबद्दल शास्त्रज्ञांतही एकमत नाही. त्यातल्या त्यात ॲनेलिडा व आर्थ्रोपोडा हे प्राण्यांचे संघ एकमेकांस जवळचे आहेत. या प्राण्यांचे एकमेकांशी असलेले संबंध समजण्यास ⇨पुराजीव विज्ञानाची विशेष मदत झालेली नाही कारण यांचे जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) आढळन नाहीत. तुलनात्मक शारीर व पुराजीवविज्ञान यांतून अपृष्ठवंशी संघांच्या परस्परसंबंधाविषयी विशेष माहिती उपलब्ध नसल्यामुळे भ्रूणविकासाच्या तुलनात्मक अभ्यासावर अवलंबून रहावे लागते. याच्या मुळाशी अशी कल्पना आहे की, प्राण्यांच्या प्रौढावस्थेपेक्षा त्यांच्या भ्रूणावस्थेत जास्त साम्य आढळते. हे जरी ढोबळमानाने खरे असले, तरी अपृष्ठवंशी प्राण्यांच्या डिंभांच्या शरीररचनेत परिस्थितीनुरूप बरेच फरक घडून येतात.

सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, सागरी प्राण्यांच्या भ्रूणविकासात क्रमविकासानुरूप (उत्क्रांतीनुरूप) विशेष फरक झाले नाहीत. याउलट गोड्या पाण्यात वा जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या भ्रूणविकासात बरेच फरक झाले आहेत. यामुळे शास्त्रज्ञांचे लक्ष प्रथम सागरी प्राण्यांच्या भ्रूणविकासाकडे केंद्रित झाले. कोणत्याही प्राण्याच्या भ्रूणविकासाच्या अभ्यासाबरोबरच कोशिकांचे विभेदन, या विभेदनात जीनांचे महत्त्व वगैरे प्रश्नांस जास्त महत्त्व देणे जरूर आहे. पुष्कळ अपृष्ठवंशी सागरी प्राण्यांची अंडी भ्रूणविकासाचा अभ्यास करण्यास योग्य असतात कारण ती पारदर्शक असून त्यांचे निषेचन करणे सोपे असते. ती प्रयोगशाळेत वाढविता येतात व विपुल प्रमाणात मिळू शकतात.

जेव्हा अंड्याचा विकास होऊन तयार झालेला भ्रूण प्रौढासमान दिसतो व त्याची फक्त वाढ व्हावयाची असते तेव्हा अशा विकासास समविकास म्हणतात. जेव्हा अंड्यातून बाहेर आल्यावर भ्रूणाची शरीररचना प्रौढाप्रमाणे नसते व तरीही तो स्वतंत्र जीवन जगतो तेव्हा या अवस्थेस डिंभ असे म्हणतात. अन्न मिळविणे व जातीचा प्रसार करणे हेच डिंभाचे कार्य असते. याकरिता डिभावस्थेत विशिष्ट इंद्रियेही प्राप्त केली जातात. डिंभाचे प्रौढात रूपांतरण होते तेव्हा ही इंद्रिये नाश पावतात. काही प्राण्यांत डिंभ प्रौढात रूपांतरण होण्यापूर्वी एकापेक्षा जास्त अवस्थांतून जातो.

भ्रूणविकास बहुकोशिक प्राण्यांमध्ये आढळतो. जरी काही अपृष्ठवंशी प्राण्यांत प्रजोत्पदान हे अलैंगिक असले, तरी सर्वसाधारणपणे लैंगिक प्रजननाची पद्धती सर्वत्र आढळते. अपृष्ठवंशी त्रिस्तरीय प्राण्यांचे दोन विभाग करण्यात आलेले आहेत. यांपैकी पहिल्या विभागास ड्यूटेरोस्टोमिया व दुसऱ्या विभागास प्रोटोस्टोमिया असे म्हणतात. हे विभाजन भ्रूणविकासाच्या काही वैशिष्ट्यांवर आधारले आहे. या वैशिष्ट्यांत अंड्याच्या विदलनाचे प्रकार, कोरकखंडापासून निर्माण होणारे अवयव, जननस्तर (त्यातल्या त्यात मध्यस्तर व देहगुहा), कोरकरंध्र व भ्रूणाचे मुख किंवा गुदद्वार यांचा परस्परसंबंध आणि डिंभ यांचा समावेश होतो.


आ. ४. तारामिनाचा विकास : (अ) अनिपेचित समपीतकी अंडे (आ) शुक्राणू टिकटलेले उत्तेजित अंडे (इ) द्विकोशिका अवस्था (ई) चतुष्कोशिका अवस्था (उ) अष्टकोशिका अवस्था (ऊ) एकभित्तिका (ए) आद्यभ्रूणाची प्राथमिक व मधली अवस्था : (१) बाह्यस्तर, (२) मध्यस्तर, (३) अंतःस्तर, (४) कोरकरंध्र (ऐ) विकसित आद्यभ्रूण : (१) देहगुहा कोष्ठ, (२) आंत्र, (३) गुद (ओ) आद्य वायपिनॅरिया डिंभ : (१) पक्ष्माभिकायुक्त पट्ट, (२) मुख, (३) आंत्र, (४) गुद (औ) विकसित वायपिनॅरिया डिंभ (क) ब्रॅकित्रोलेरिया डिंभ (ख) नवजात तारामीन.

ड्यूटेरीस्टोमिया : ⇨तारामीन, ⇨ मंगुरतारा, ⇨ समुद्री अर्जिन, वॅलॅनोग्लॉसस, ⇨ कीटोग्नॅथा इ. अपृष्ठवंशी प्राण्यांचा व रज्जुमान संघातील पाठीचा कणा नसलेल्या ⇨ट्यूमिकेटा व ⇨अँफिऑक्सस या प्राण्यांचा या विभागात समावेश होतो. यांत अंड्यांचे विदलन अरीय किंवा द्विपार्श्व स्वरूपाचे असते. कोरकखंडापासून शरीराचे कोणते अवयव तयार व्हावयाचे हे बरेच उशीरा ठरते. मध्यस्तर व देहगुहा एकाच वेळी उत्पन्न होतात. कोरकरंध्राचे रूपांतर गुदद्वारात होते. या विभागातील प्राण्यांचे डिंभ प्रोटोस्टोमिया प्राण्यांच्या डिंभापेक्षा निराळे असतात.

तारामिनाचा भ्रूणविकास : तारामिनाचा समावेश ⇨एकायनोडर्माटा या संघात होतो. ड्यूटेरोस्टोमिया या विभागातील प्राण्यांच्या भ्रूणविकासाचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तारामिनाची मादी समुद्राच्या पाण्यात अंडी घालते. यामुळे जवळपास असलेले नर तारामीन शुक्राणूंचे सिंचन करण्यास उद्युक्त होतात. अंड्यांचे निपेचन पाण्यातच होते. ही अंडी समपीतकी आहेत. अड्याची दोन्ही अर्थसूत्रण विभाजने शुक्राणूचा अंड्यात प्रवेश होण्यापूर्वीच झालेली असतात. दोन्ही पूर्वकेंद्रकांचे मीलन झाल्यावर युग्मज तयार होतो. अंड्याचे विदलन पूर्णभंजी असते. पहिल्या विदलनानंतर दोन सारख्या आकारमानाच्या कोशिका तयार होतात. या कोशिकांचे आणखी विदलन झाल्यावर एकभित्तिका तयार होते. या एकभित्तिकेच्या कोशिकांवर पक्ष्माभिका (ज्यांच्या लयबद्ध फटकाऱ्यांनी प्राणी एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात वा आजूबाजूच्या द्रव पदार्थात प्रवाह उत्पन्न होतात अशा कोशिकांपासून निघालेल्या केसांसारख्या सूक्ष्म, नाजूक व कंपनशील वाढी) निर्माण होतात. या अवस्थेत हा भ्रूण अड्यांबाहेर पडतो व पाण्यात पोहू लागतो. एकभित्तिकारूपी भ्रूण पाण्यात पोहू लागला की, कोशिकांची वाढ होऊन जननस्तर निर्माण होतात व यातूनच शोवटी आद्यभ्रूण निर्माण होतो. एकभित्तिकेच्या अल्पवर्धी ध्रुवाजवळच्या भागाचे अंतर्वलन होते व या भागातील कोशिकांचा अंतःस्तर तयार होतो. या अंतर्वलनामुळे भ्रूणाचा आकार लांबट होतो आणि अंतःस्तर तयार होतो. या अंतर्वलनामुळे भ्रूणाचा आकार लांबट होतो आणि अंतःस्तराच्या कोशिकांचे अस्तर असलेली व एकच छिद्र असलेली नलिका तयार होते. या नलिकेचेच यथाकाल आंत्रात रूपांतर होते. याच्या छिद्रास कोरकरंध्र म्हणतात व याचेच पुढे  गुदद्वारात रूपांतर होते. आंत्राची लांबी वाढून त्याच्या दोन बाजूंस दोन कोष्ठ (पिशव्या) निर्माण होतात. यांची वाढ होऊन काही कालाने हे कोष्ठ आंत्रापासून विलग होतात. या कोष्ठांच्या पोकळीचेच देहगुहेत रूपांतर होते. या देहगुहेस सर्व बाजूंनी अस्तरासारख्या असलेल्या कोशिकांचा मध्यस्तर तयार होतो. आद्यभ्रूणाच्या बाहेरील अंगावर असलेल्या कोशिकांपासून बाह्यास्तर बनतो. या बाह्यत्तराच्या काही कोशिका डोक्याच्या भागात अंतर्वलित होतात आणि त्यांपासून मुख तयार होते.


विभेदक वाढीमुळे शरीराचा मध्यभाग मोठा होतो व त्यातच उदराची निर्मिती होते. ग्रसिकेने (अन्ननलिकेने) उदर मुखास जोडले जाते व आंत्राने ते गुदद्वारास जोडले जाते. मुखाभोवती  पक्ष्माभिका निर्माण होतात. या पक्ष्माभिकांचा संचलनासही (चरनवलनासही) उपयोग होतो. या अवस्थेत भ्रूणाचा जो आकार होतो, त्याला बायपिनॅरिया डिंभ म्हणतात. या डिंभावर दोन्ही बाजूंस हातासारख्या रचना निर्माण होतात व या रचनांच्या बाजूने पक्ष्माभिकांचे पट्टे असतात. यांच्या साहाय्याने डिंभाचे संचलन सुकर होते. काही कालाने या रचना डोक्यापर्यंत वाढतात. यांची टोके चिकट असतात. या रचनांना ‘ब्रॅकिओलर बाहू’ व या अवस्थेत या डिंभाला ब्रॅकिओलेरिया म्हणतात. या चिकट टोकांमुळे हा डिंभ कोणत्यातरी पदार्थास चिकटतो आणि त्यानंतर त्यात जटिल स्वरूपाचे रूपांतरण होते. डिंभाच्या पुच्छभागात उजव्या बाजूस पाच खंड निर्माण होतात व यांपासून तारामिनाच्या पाच भुजा तयार होतात. डिंभाच्या डाव्या भागापासून मुखीय बाजू तयार होते. या रूपांतरणाच्या कालात डिंभाच्या बऱ्याच इंद्रियांचा ऱ्हास होतो व त्यांच्या जागी तारामिनास उपयुक्त अशी नवी इंद्रिये निर्माण होतात. रूपांतरणानंतर तयार झालेला लहानसा नवजात तारामीन स्वतंत्र जीवन जगू लागण्याच्या सुमारास अवघ्या १. मिमी. व्यासाचा असतो.

आ. ५. प्रारूपिक (नमुनेदार) प्रोटोस्टोमियाचा विकास : प्रारूपिक (नमुनेदार) प्रोटोस्टोमियाचा विकास : (अ) सर्पिल विदलनातील अष्टकोशिका अवस्था : यात अल्पवर्धी ध्रुवयुक्त चार लहान कोशिका सक्रिय ध्रुवयुक्त चार मोठ्या कोशिकांच्या विदलन खोबणींवर आलेल्या आहेत (आ) सर्पिल विदलन पुठे चालू असून मध्यस्तराची निर्मिती एकाच कोशिकेपासून होत आहे : (१) भावी मध्स्तर (इ) ट्रोकोफोर डिंभाचा लांबीला समांतर व मध्यभागी घेतलेला छेद : (१) मध्यस्तर, (२) मुख, (३) नालकेशिका (वृक्ककातील पोकळ व पक्ष्माभिकायुक्त कोशिका), (४) गुद, (५) अंतःस्तर, (६) कोरकगुहा, (७) बाह्यस्तर.प्रोटोस्टोमिया : या विभागात एक्टोप्रॉक्टा, फोरोनिडिया, ब्रॅकिओपोडा, मॉलस्का, सायपंक्युलिडा, एकियुरॉयडिया, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, प्लॅटिहेल्मिंथिस व ॲकँथोसेफाला या संघांतील प्राण्यांचा समावेश होतो. यात अंड्याचे विदलन पुष्कळदा सर्पिल असते. प्रत्येक कोरकखंडापासून शरीराचा कोणता भाग निर्माण होणार हे बरेच अगोदरपासून ठरलेले असते. . उदा., काही प्राण्यांत मध्यस्तर कोणत्या कोशिकेपासून बनणार हे जेव्हा अंड्याचे विदलन होऊन २० कोशिका तयार होतात, त्या वेळीच ठरले जाते. या २० कोशिकांपैकी एका कोशिकेचे समविभाजन होऊन दोन कोशिका तयार होतात व त्या मुखाच्या बाजूंस स्थिर होतात. यांच्या समविभाजनाने यथाकाल मध्यस्तराचा कोशिकापुंज तयार होतो व त्यातच देहगुहा निर्माण होते. कोरकरंध्रापासून मुखरंध्र तयार होते. शेवटी ट्रोकोफोर नावाचा डिंभ तयार होतो व त्याचे यथाकाल रूपांतरण होऊन प्राणी अस्तित्वात येतो. सर्वसाधारणपणे प्रोटोस्टोमिया विभागात समाविष्ट केलेल्या प्राण्यांच्या भ्रूणविकासात  जास्त समानता आढळते.

या विभागात समाविष्ट केलेल्या प्राण्यांपैकी ॲनेलिडा, मॉलस्का, सायपंक्युलिडा व एकियुरॉयडिया या संघांतील प्राण्यांच्या भ्रूणविकासाचा तौलनिक अभ्यास केल्यावर असे आढळून आले की, या चार संघाचा एकमेकांशी जातिविकासविषयक (क्रमविकासविषयक किंवा पूर्वजांच्या इतिहासविषयक) संबंध असावा. यातूनच यांचे प्लॅटिहेल्मिंथिस संघाशी असलेले संबंधही दिसून आले. या सर्व संघांतील प्राण्यांच्या अंड्यांचे विदलन सर्पिल आहे. कोशिकांचा विकास पूर्वनियोजित आहे व ट्रोकोफोर डिंभांत साम्य आहे. सर्पिल विदलनानंतर कोरकखंडाचे विभाजन होऊन बृहत्‌खंड (मोठे भाग) व सूक्ष्मखंड (अती बारीक भाग) निर्माण होतात. यांपैकी सूक्ष्मखंडांच्या  काही कोशिकांपासून बाहेरील मध्यस्तर व काही कोशिकांपासून आतील मध्यस्तर निर्माण होतात.

ॲनेलीड प्राण्यात ट्रोकोफोर डिंभाचे रूपांतरण प्रौढात होते पण मॉलस्क प्राण्यांत ट्रोकोफोरपासून व्हेलिजर नावाचा डिंभ तयार होतो व शेवटी त्याचे रूपांतरण प्रौढात होते.

विदलनानंतर निर्माण झालेल्या कोरकखंडाचा किंवा सूक्ष्मखंडांचा विकास जरी पूर्वनियोजित असला, तरी काही प्राण्यांत प्रायोगिक क्रियेनंतर या विकासाच कालावधी लांबविण्यात यश आले आहे. दोन किंवा चार कोरकखंड निर्माण झाल्यावर प्रत्येक कोरकखंडापासून पूर्ण डिंभाचा विकास करणे झाले आहे.

पृष्ठवंशी प्राण्यांचा भ्रूणविकास : मूलभूत वैशिष्ट्ये : या प्राण्यांचा शुक्राणूंत पुष्कळच सारखेपणा आहे. क्वचित त्यांच्या संचलन व्यवस्थेत फरक आढळतात. शुक्राणूंतील द्रव्य हे मुख्यतः केंद्रकाचे बनलेले असते. त्यात कोशिकाद्रव्य फारच थोडे असते. शुक्राणूचे केंद्रक एकगुणित असते. शुक्राणूत बाह्य फरकांप्रमाणेच काही रासायनिक फरक आढळतात. हे फरक एंझाइमे व इतर जटिल रेणूंच्या स्वरूपाचे आहेत.


अंड्याचे आकारमान सर्वसाधारापणे शुक्राणूच्या मानाने खूपच मोठे असते. काही पक्ष्यांच्या अंड्याचा व्यास कित्येक सेंमी. असतो, तर काही अंडी सूक्ष्म असतात. अंड्याचा आकार केवढाही असला, तरी त्यात एकच एकगुणित केंद्रक असते आणि त्याचे द्रव्य त्याच जातीच्या शुक्राणूच्या केंद्रकाइतके असते. मत्स्य व उभयचर या वर्गांतील प्राण्यांच्या माद्या त्यांची अंडी पाण्यात घालतात, सरीसृप प्राणी व पक्षी आपली अंडी जमिनीवर घालतात. सस्तन प्राण्यांची अंडी निषेचनांनंतर मादीच्या गर्भाशयात वाढतात. मादीने जमिनीवर अंडे घालण्याच्या वेळी त्यावर एक कवच असते व धातलेली  अंडी अचल असतात. अंड्यांच्या रक्षणाकरिता प्रत्येक जातीत निरनिराळी व्यवस्था आढळते. भ्रूणाच्या विकासाकरिता व वाढीकरिता लागणारी पोषक द्रव्ये पीतकात असतात व त्याचा भरपूर साठा अंड्यात असतो. अंडे मादीच्या शरीरात असताना व त्यावर कवच निर्माण होण्यापूर्वीच हा पीतकाचा साठा त्यात केला जातो. अंड्याचे अंतिम आकारमान त्यात असलेल्या पीतकाच्या संचयावर अवलबून असते. ज्या अंड्यावर ती घालण्यापूर्वी मादीच्या अंडवाहिनीत कवच निर्माण होते, त्या प्राण्यात अड्याचे निपेचन अंडवाहिनीत कवच निर्माण होण्यापूर्वींच होते. उच्च सस्तन प्राण्यांच्या अंड्यात पीतक नसते म्हणून  त्यांचे आकारमानही फार लहान असते. ही अंडी निषेचनानंतर मादीच्या गर्भाशयात वाढतात. या अंड्यांना विकासाकरिता लागणारे अन्नद्रव्य प्रथम मादीच्या अंडवाहिनीत असलेल्या द्रवातून मिळते व नंतर अपरेद्वारे (वारेतून) मादीच्या रक्तातून मिळते. अंड्याची संख्या नियमित असते. साधारणपणे पृष्ठवंशी प्राण्यांची अंडी गोलीय आकाराची असतात. यातील केंद्रक विकेंद्री असून ते पीतक नसलेल्या कोशिकाद्रव्यात अंड्यांच्या  पृष्ठभागावर असते. केंद्रकाजवळच्या भागास सक्रिय ध्रुव व केंद्रकाच्या विरुद्ध अंगास असलेल्या भागास अल्पवर्धी ध्रुव म्हणतात. या दोन ध्रुवांस जोडणाऱ्या रेषेस अक्ष असे म्हणतात. या ध्रुवतेचा पीतकाच्या वितरणावरही परिणाम होतो. सक्रिय ध्रुवाजवळ कमी पीतक असते, तर अल्पवर्धी ध्रवुवाजवळ जास्त पीतक असते. काही मत्स्य, सरीसृप प्राणी व पक्षी यांच्या अंड्यांत पुष्कळ पीतक असते. पीतकाच्या पृष्ठभागावर अगदी थोडे कोशिकाद्रव्य व त्यात केंद्रक असते, याला जनन-तबकडी म्हणतात.

आ. ६. माशाचा भ्रूणविकास : (१) व (२) अर्धभंजी विदलन (अनुक्रमे ४ तासांच्या व ५ तासांच्या वेळची अवस्था), (३) कोरकचर्म कोशिका पीतकावर पसरतात व आद्य-इंद्रियाच्या निर्मितीची सुरूवात (२ दिवस), (४) कोसिकांचे विभेदन व इंद्रियांची निर्मिती पुढे चालू (३ १/२ दिवस), (५) भ्रूण अंड्याच्या बाहेर पडतो (८ दिवस), (६) भ्रूणाची वाट व विकास पुढे चालू (१२ दिवस)

सर्व पृष्ठवंशी प्राण्यांचे भ्रूण विकासाच्या प्राथमिक अवस्थेत एकमेकांशी पुष्कळच साम्य दर्शवितात. जसजशी भ्रूणाची वाढ होते जाते तसतसे त्यांच्या फरक पडत जातात. हे फरक बहुतांशी भ्रूणबाह्य पटलांत (विकासाच्या काळात भ्रूणाभोवती असणाऱ्या पटलीय संरचनांत), जीवनास लागणाऱ्या वायुविनिमयात व क्षेप्य (निरूपयोगी) द्रव्याच्या उत्सर्जनात आढळतात. सरीसृप प्राणी, पक्षी व सस्तन प्राणी यांच्या अंड्यांचा विकास पाण्यात होत नाही. या प्राण्यांत भ्रूण स्वतःभोवती ⇨उल्ब नावाचे बाह्य पटल निर्माण करतो म्हणून या प्राण्यांस ‘उल्बी प्राणी’ म्हणतात. मत्स्य व उभयचर या वर्गातील प्राण्यांची अंडी पाण्यात घातली जातात व पाण्यातच विकास पावतात. यांच्या भ्रूणास उल्बाची गरज भासत नाही म्हणून त्यांना ‘अनुल्बी प्राणी’ म्हणतात.

मत्स्य वर्ग व उभयचर वर्ग : या वर्गांतील प्राण्यांच्या पाण्यात घातालेल्या अंड्यांभोवती एक अर्धपारदर्शक पटल असते. याला अंडवेष्ठ असे म्हणतात. ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड यांची पाण्यातून देवाणघेवाण करणे हे या पटलाचे कार्य असते. या पटलाद्वारेच भ्रूणातील नायट्रोजनयुक्त द्रव्यांचे उत्सर्जन होते.

मत्स्य वर्गांतील प्राण्यांची अंडी गोलार्धपीतकी असतात. यांच पीतक भरपूर प्रमाणात असते. कोशिकाद्रव्य अल्प प्रमाणात असून त्यापैकी बहुतेक सक्रिय ध्रुवाजवळ साठविलेले असते. याची केंद्रकासह एक जनन-तबकडी तयार होते. फक्त या तबकडीच्या भागातच विदलन होते व त्यातून कोरकचर्मा निर्माण होते. भावी अंतःस्तर निर्माण करणाऱ्या काही कोशिका कोरकचर्माच्या मध्यभागापासून निराळ्या होऊन भ्रूणाच्या पश्च (मागील) भागाकडे जातात व तेथे भ्रूणढाल (कोशिकांची पातळ तबकडी) तयार होते. यापासूनच पुढे भ्रूणाचा विकास होतो. भावी मध्यस्तराच्या कोशिकांचे कोरकचर्माच्या पश्च भागात अंतर्वलन होऊन ह्या भ्रूणढालीचा आकार लांबट होतो. याबरोबरच कोरकचर्माच्या कोशिका पीतकावर पसरतात आणि त्यामुळे शेवटी पीतक एका कोशात (पिशवीसारख्या संरचनेत) साठविले जाते. या कोशास पीतककोश म्हणतात. हा अंतःस्तर व मध्यस्तर कोशिकांचा बनलेला असतो. या पीतककोशात मध्यस्तरापासून रक्तवाहिन्या तयार होतात आणि त्यांतून पीतकातील अन्नाचा विकास पावणार्यात भ्रूणास पुरवठा केला जातो. या रक्तवाहिन्यांना पीतक रक्तवाहिन्या म्हणतात. केंद्रीय तंत्रिका तंत्राचे [⟶ तंत्रिका तंत्र] प्रारंभिक स्वरूप मत्स्याच्या भ्रूणविकासात वैशिष्ट्यपूर्ण असते. भ्रूणढालीच्या पृष्ठीय (वरच्या) मध्यरेपेवर बाह्यस्तराचा एक घन कणा तयार होतो व पुढे काही कालाने या कण्यापासून पोकळ पृष्टीय तंत्रिका नलिका तयार होते. या नळीच्या खालील बाजूस असलेल्या मध्यस्तराच्या कोशिकांपासून अनुदैर्घ्य (लांबीला समांतर असलेला) पृष्ठरज्जू तयार होतो. या पृष्ठरज्जूच्या दोन्ही बाजूंस असलेल्या मध्यस्तर कोशिकांपासून कायखंड बनतात. हे कायखंड पृष्ठवंशी प्राण्यांच्या विकासातील एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेत. भ्रूणढालीच्या खालच्या भागावर असलेल्या अंतःस्तरीय कोशिकांच्या वलनाने एक नलिका तयार होते आणि हिचेच रूपांतर पुढे अन्ननलिकेच्या अस्तरात होते. ही अंतःस्तरीय कोशिकांची बनलेली अन्ननलिका कोरकरंध्राला मिळत नाही. तिच्यावर डोक्याच्या भागात दोन्ही बाजूंस क्लोमदरणांच्या (कल्ल्यांमधील फटींच्या) जोड्या तयार होतात. अस्थिमत्स्यांत (ज्यांचा सांगाडा हाडांचा बनलेला असतो अशा माशांत) अंतःस्तराचा काही भाग नसतो. मत्स्यभ्रूणाचा विकास व वाढपीतककोशातून मिळणाऱ्या पीतकाच्या साह्याने होते व हळूहळू पीतककोशाचे आकारमान लहान होत जाते. शेवटी त्याचे अवशेष भ्रूणांच्या अधर (खालच्या) देहभित्तीत विरून जातात. (आ.६).


आ. ७. बेडकाचा भ्रूणविकास : (अ) युग्मज : (१) सक्रिय ध्रुव, (२) अल्पवधीं ध्रुव (आ) द्विकोशिका अवस्था (इ) चतुष्कोशिका अवस्था (ई) अष्टकोशिका अवस्था (उ) एकभित्किका : (उ १) वाह्यांग, (उ २) आंतरांग : (१) कोरकगुहा (ऊ) आद्यास्त्रूणाची प्रारंभिक अवस्था : (ऊ १) वाह्यांग, (ऊ २) आंतरांग : (१) कीरकरंध्राची पृष्ठभागीय घडी (ए) पीतक गुडदी अवस्था : (ए १) बाह्यांग : (१) पीतक गुडदी, (ए २) अनुदैर्घ्य छेद : (१) आद्यांत्र, (२) आद्यांवाचे छत, (३) कोरकगुहा, (४) पीतक गुडदी, (ए ३) अनुप्रस्थ छेद : (१) बाह्यस्तर, (२) मध्यस्तर, (३) अंतःस्तर, (४) आद्यांत्र, (५) आद्यांत्राचे छत (ऐ) तंत्रिका दुमड अवस्था : (१) तंत्रिका दुमडी, (२) पृष्ठरज्जू, (३) देहगुहा, (४) मध्यस्तर, (५) आद्यांत्र, (६) अंतःस्तर, (७) यकृत, (८) आंतरांग मध्यस्तर, (९) देहगुहा, (१०) कायिक मध्यस्तर (औ) पुच्छ कलिका अवस्था : (औ१) अनुदैर्घ्य छेद : (१) यकृत, (२) अग्रमस्तिष्क, (३) मध्यमस्तिष्क, (४) पश्चमस्तिष्क, (५) मेरुरज्जू, (६) मध्यस्तर, (७) पचन मार्ग, (८) पृष्ठरज्जू, (९) गुद, (१०) बाह्यत्वचा, (११) पीतक (अंतःस्तरातील कोशिकांमधील पचन मार्गाचा जाड तळ या कोशिकांचा वनलेला असतो), (औ)२ बाह्य दृश्य : (१) क्लोम-दरणे (क) भैकेर : (१) बाह्य क्लोम, (२) सेपटी (ख) प्रौढ बैडूक. ---⟶

बेडकाचे भ्रूणविज्ञान : कॉर्डेटा संघातील उभयचर वर्गाच्या भ्रूणविकासाचे आदर्श उदाहरण म्हणजे बेडकाचा विकास होय. या प्राण्याच्या माद्या आपली अंडी गोड्या पाण्यात घालतात. या अंड्यांच्या सक्रिय अर्धगोलावर रंगद्रव्य असते. त्यामुळे हा अर्धगोल अल्पवर्धी अर्धगोलापेक्षा जास्त काळपट दिसतो. मादी अंडी घालीत असताना तिच्या पाठीवर चढून बसलेला नर त्या अंड्यांवर शुक्राणूचा वर्षाव करीत असतो. हे शुक्राणू पाण्यातच अंडी निषेचित करतात. बेडकाटी अंडी अर्धगोलार्धपीतकी असतात. शुक्राणूचा स्पर्श होण्यापूर्वी अंड्याच्या केंद्रकाचे पहिले अर्धसूत्रण विभाजन झालेले असते. शुक्राणूचा स्पर्श झाल्याबरोबर अंडे उत्तेजित होते व दुसरे अर्धसूत्रण विभाजन पूर्ण होते. शुक्राणूच्या स्पर्शाने अंडे उत्तेजित झाल्याबरोबर अंडे उत्तेजित होते व दुसरे अर्धसूत्रण विभाजन पूर्ण होते. शुक्राणूच्या स्पर्शाने अंडे उत्तेजित झाल्याबरोबर काळपट रंगाच्या सक्रिय अर्धगोलाची बाह्यत्वचा ज्या ठिकाणी शुक्राणूचा स्पर्श झाला असेल त्या ठिकाणापर्यंत सरकते व यामुळे या भागात करडी कोर (करडा कोरीसारखा आकार) तयार होते.

शुक्राणूच्या व अंड्याच्या पूर्वकेंद्रकांचे मीलन झाल्यावर द्विगुणित केंद्रक तयार होते. यानंतर अंड्याच्या विदलनास सुरुवात होते. विदलनाचे पहिले प्रतल सक्रिय व अल्पवर्धी ध्रुवांस स्पर्श करते व करड्या कोरीचे विभाजन करते. यामुळे अंड्याचे दोन खंड निर्माण होतात. एका खंडापासून भ्रूणाची उजवी बाजू व दुसऱ्यापासून डावी बाजू निर्माण होते. या दोन खंडाच्या प्रतलास काटकोन करून होणाऱ्या अनुदैर्घ्य विभाजनामुळे चार खंड तयार होतात. हे चारी खंड आकारमानाने सारखे असतात. यांना कोरकखंड असेही म्हणतात. प्रत्येक खंडात एक द्विगुणित केंद्रक असते. यापुढे अनुपस्थ (आडवे) विभाजन होते व त्यामुळे या चार कोरकखंडांचे आठ कोरकखंड होतात. यांपैकी सक्रिय ध्रुवाकडील चार खंड आकारमानाने लहान व रंगद्रव्ययुक्त असतात. यांना सूक्ष्मखंड असेही म्हणतात. अल्पवर्धी ध्रुवाकडील चार कोरकखंड आकारमानाने मोठे असतात. यांत रंगद्रव्य नसते. पीतकाचा साठा मात्र भरपूर असतो. यांना बृहत्‌खंड असेही म्हणतात. पुढील विभाजनात या बृहत्‌खंडांचे विभाजन हळू होते यामुले यांची संख्या सूक्ष्मखंडापेक्षा पुष्कळ कमी असते. काही काळ विभाजन झाल्यावर चेंडूच्या आकाराची एक बहुकोशिक एकभित्तिका तयार होते. एकभित्तिकेच्या आत सक्रिय ध्रुवाकडील भागात एक गुहा तयार होते, तिला कोरकगुहा म्हणतात. ती विकेंद्री असते. बेडकाच्या आद्यभ्रूणाचा विकास जटिल स्वरूपाचा आहे. यात एकभित्तिकेच्या निरनिराळ्या भागांतील कोशिकांची अदलाबदल होते. सक्रिय अर्धगोलातील भावी बाह्यस्तर निर्माण करणारे सूक्ष्मखंड  अल्पवर्धी अर्धगोलात असलेल्या आणि भावी अंतःस्तर निर्माण करणाऱ्या  बृहत्‌खंडावर पसरतात. या आवरणात एक लहान रंध्र शिल्लक राहते. त्यातून आतील बृहत्‌खंड खंड दिसू शकतात.


या रंध्रास कोरकरंध्र असे म्हणतात. आद्यभ्रूणाच्या विकासात कोरकरंध्राची पृष्ठीय सीमा दाखविणारी एकभित्तिय दुमडीची एक पृष्ठभागीय घडी असते. या कोरकरंध्राच्या कडेच्या कोशिकांचे अंतर्वलन होते. हा भाग म्हणजे भ्रूणाची भावी पृष्टीय बाजू होय. या कोशिकांच्या हालचालीमुळे आद्यांत्राचे छत तयार होते. करड्या कोरीच्या बाजूच्या कोशिकांचे व नंतर अधर भागातील कोसिकांचे अंतर्वलन होते. याच वेळी अल्पवर्धी अर्धगोलातील बृहत्‌खंडांची आतल्या आत अंतःस्तर म्हणून फेरमांडणी होऊन आंत्राचा तळ व बाजू तयार होतात. या सर्व क्रियांत कोशिकांच्या संख्येत वाढ होते व यामुळे कोरकगुहेचे आकारमान लहान होते. बृहत्‌खंडाच्या काही कोशिका कोरकरंध्रातून पीतक गुडदी (कोरकरंध्र अंशतः बंद करणाऱ्या पीतकयुक्त कोशिकांचा समूह) म्हणून दिसतात. अंतःस्तराच्या बाजू पृष्ठभागाकडे जाऊन एकमेकींस जुळल्या म्हणजे अन्ननलिका तयार होते. ही नलिका कोरकरंध्राने बाहेर उघडते व या रंध्राचे रूपांतर पुढे गुदद्वारात होते. यानंतर आंत्राच्या विरुद्ध दिशेस मुखद्वाराचे रंध्र निर्माण होते. सुरुवातीस मध्यस्तर आंत्राच्या छतांच्या रूपात असतो आणि तो अंतःस्तरापासून आंत्रनलिका तयार झाल्यावर बाजूस बाह्यास्तर व अंतःस्तर यांमधून अधर बाजूपर्यंत पसरतो. मध्यस्तराच्या पृष्टीय भागात अग्रभागापासून पश्चभागापर्यंत पृष्ठरज्जू तयार होतो. पृष्ठरज्जू हे कॉर्डेटा संघाचे वैशिष्ट्यपूर्ण इंद्रिय आहे. पृष्ठरज्जूच्या दोन्ही बाजूंस  असलेला मध्यस्तर जाड होतो व त्याचे खंडीकरण होऊन त्याचे कायखंड तयार होतात. या खंडांतूनच पुढे कशेरुकदंडाच्या (पाठीच्या कण्याच्या) कशेरूकांची किंवा मणक्यांची तसेच स्नायूंची निर्मिती होते. या जाड मध्यस्तराच्या बाजूलाच पातळ मध्यस्तर असतो. याला वृक्कखंडक (उत्सर्जन तंत्राचे मूलभूत भाग) म्हणतात. याच्या जवळच अधर बाजूस मध्यस्तराचा जाड पट्टा असतो, त्याचे विभाजन होऊन हळूहळू एक पोकळी तयार होते. तिला देहगुहा म्हणतात.

बाह्यस्तराशी लागून असलेल्या मध्यस्तरास कायिक मध्यस्तर म्हणतात. बाह्यस्तराबरोबरच हा स्तरही शरीराची देहभित्ती निर्माण करण्यात भाग घेतो. अंतःस्तराशी लागून असलेल्या मध्यस्तरास आंतरांग-मध्यस्तर म्हणतात. या आंतरांग-मध्यस्तरापासून पचन तंत्र व त्याची आनुषंगिक इंद्रिये निर्माण होतात. आद्यभ्रूणाचा विकास पूर्ण होण्यापूर्वीच इतर अवयवांच्या निर्मितीस सुरवात होते. पृष्ठरज्जूच्या पृष्ठभागावर असलेला बाह्यस्तर व त्याच्या बाजूस असलेला मध्यस्तर यांपासून तंत्रिका पट्ट तयार होतो. या पट्टाच्या बाजू वर उचलल्या जाऊन त्यांची तंत्रिका दुमड बनते. ही दोन्ही बाजूंची दुमड एकमेकीस चिकटली की, त्यांतून पृष्ठीय पोकळ तंत्रिका नलिका तयार होते. या नलिकेवर त्वचेतील बाह्यस्तराचे आवरण असते. अग्रभागात या तंत्रिका नलिकेचे विभ्राजन होऊन अग्रमस्तिष्क (पुढचा मेंदू), मध्यमस्तिष्क (मधला मेंदू) व पश्चमस्तिष्क (मागचा मेंदू) असे भाग पडतात [⟶ तंत्रिका तंत्र]. पश्चमस्तिष्कानंतर राहिलेल्या तंत्रिका नलिकेचा मेरुरज्जू बनतो. या तंत्रिका नलिकेपासूनच प्रौढावस्थेत आढळणारे तंत्रिका तंत्र निर्माण होते. ज्या वेळी तंत्रिका पट्टाच्या बाजूस असलेल्या तंत्रिका दुमडी एकमेकींस चिकटतात व तंत्रिका नलिका तयार होते, त्या वेळी या नलिकेचा पृष्ठभाग व त्यावर असणाऱ्या देहभित्तीचा बाह्यस्तर यांच्या दरम्यान एक कोशिकासमूह दिसतो. या समूहास तंत्रिका शिखा म्हणतात. यातील कोशिका थोड्याच अवधीत, एकेकट्या अशा भ्रूणाच्या शरीरातील सर्व भागांत, आद्यभ्रूण अवस्थेत निर्माण झालेल्या जननस्तरामध्ये स्थिर होतात. या कोशिकांचे स्थलांतरण हे फेरमांडणीच्या स्वरूपाचे असते. तंत्रिका शिखेमधील कोशिकांपासून भ्रूणाच्या धडातील पुष्कळ अवयवांचा उगम होतो. मेरू तंत्रिकेच्या पृष्ठीन गुच्छिकांच्या (तंत्रिका कोशिकांच्या समूहांच्या) पृष्ठीन मूलाच्या कोशिका केवळ तंत्रिका शिखेच्या कोशिकांमधूनच उद्‌भवतात. तंत्रिका आवरणातील काही कोशिकाही यापासूनच उद्‌भवतात. त्वचेत आढळणाऱ्या रंगद्रव्य कोशिकांचा उद्‌भव तंत्रिका शिखेतील कोशिकांपासून होतो. उभयचर प्राण्यांच्या डिंभाच्या पुच्छात आढळणारे संयोजी (जोडण्याचे कार्य करणारे) ऊतकही तंत्रिका शिखेच्या कोशिकांमुळेच तयार होते. या कोशिका डोक्याच्या भागात जास्त बहुगुणी असतात. या भागात असलेल्या परिसरीय तंत्रिका तंत्राच्या काही कोशिका आणि काही रंगद्रव्य कोशिका, तसेच कंकालातील (सांगड्यातील) आंतरंग-कवटी व तिच्यापासून पुढे निर्माण होणारा जबडा व क्लोम-कमानी, उभयचर प्राण्यातील दंत व कवटीच्या त्वचा-अस्थी (त्वचेच्या संयोजी ऊतकांचे सरळ अस्थिभवन होऊन तयार झालेली हाडे) हे सर्व तंत्रिका शिखेच्या कोशिकांमुळेच निर्माण होते.

तंत्रिका शिखेच्या सखोल अभ्यासामुळे जननस्तर उपपत्तीस धक्का बसला आहे. या उपत्तीनुसार समजात इंद्रिये एकाच जननस्तरापासून निर्माण झाली असावीत, असे समजले जात असे पण या इंद्रियांच्या घडणीत बाह्यस्तरापासून निर्माण झालेल्या तंत्रिका शिखेच्या कोशिकांचाही वाटा आहे, असे आढळून आले आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की कोणत्याही पूर्ण वाढ झालेल्या कोशिकेचे गुणधर्म ती कोणत्या जननस्तरापासून निर्माण झाली, यावरच काही अवलंबून नसते. तंत्रिका नलिकेच्या अधर भागी पृष्ठरज्जू असतो. अग्रभागात डोक्याच्या दोन्ही बाजूंस क्लोम-दरणांच्या जोड्या उत्पन्न होतात. या क्लोम-दरणांजवळच बाहक्लोमांच्या साह्याने क्लोमांकडे सतत पाण्याचा प्रवाह जातो त्यामुळे श्वसनक्रियेस लागणाऱ्यात वायूची देवाणघेवाण होते. याच सुमारास अग्रभागात अधर बाजूस आद्यांत्रापासून आदियकृताची निर्मिती होते.

जसजसा भ्रूणाचा विकास होते जातो तसतसे आद्यांत्राच्या तळाकडील अंतःस्तर कोशिकांतील पीतक कमी होत जाते व यामुळे त्या कोशिकांचे आकारमानही लहान होते. भ्रूणाचा आकार सरळ होत जातो आणि पृष्ठापासून अधर बाजूपर्यंतची जाडीही कमी होते. पृष्ठरज्जूच्या लांबीतही वाढ होते. या सर्व फरकांमुळे पोहण्यास योग्य व ज्यास आपले अन्न आपल्या तोंडाने आजूबाजूच्या पाण्यातून घेता येईल असा डिंभ तयार होतो. त्यास ⇨मैकेर असे म्हणतात. याच अवस्थेत तो अंड्याबाहेर पडून स्वतंत्र जीवन लगू लागतो. काही काळ याप्रमाणे स्वतंत्र जीवन जगल्यावर व भैकेराची वाढ झाल्यावर या डिंभाचे जटिल स्वरूपाचे रूपांतरण होते. रूपांतरणाच्या क्रियेत भैकेराच्या शेपटीचे शरीरात शोषण होते, पुढचे व मागचे पाय निर्माण होतात व तोंडाच्या भागातही फरक पडतात. शरीराच्या आतील इंद्रियांतही बरेच फरक पडून डिंभावस्थेत कार्यान्वित असलेल्या बऱ्याच इंद्रियांचा लोप होतो. या फरकांमुळे जो डिंभ फक्त पाण्यात जिवंत राहू शकला असता, तो आता जमिनीवर बेडकाच्या रूपाने वावरू लागतो मात्र याही रूपात जमिनीवर त्याला आर्द्रतेची आवश्यकता असते. [⟶ बेडूक] .

सरीसृप प्राणी व पक्षी : सरीसृप प्राण्यांची व पक्ष्यांची अंडी आणि या दोन्ही वर्गांतील अंड्यांचा भ्रूणविकास यांत पुष्कळ साम्य आहे म्हणून या दोन्ही वर्गांचा समावेश सॉरॉप्सिडा या विभागात केला जातो. यांची अंडी अमर्यादित गोलार्धपीतकी असतात. यांतील कोशिकाद्रव्य सक्रिय ध्रुवजावळ असते व त्यांचा आकार तबकडीसारखा असतो. अंड्याचे निषेचन अंडवाहिनीत होते. मैथुनाच्या वेळी नर आपले शुक्राणू या वाहिनीत सोडतो. निषेचनानंतर जेव्हा अंडे बाहेर पडण्याकरिता पुढे सरकू लागते तेव्हा त्याच्याभोवती कोशिकाविरहित पटल निर्माण होते. हे पटल अंडवाहिनीच्या भित्तीकोशिकांपासून निर्माण होते. या पटलात कठीण कवचाचाही अंतर्भाव असतो. हे कवच सरीसृप प्राण्यांत कातड्यासारखे चिवट असते. तर पक्षी वर्गात कॅल्शियमयुक्त असून कठीण व ठिसूळ असते.


जनन-तबकडीचे आंशिक विदलन होऊन कोरकखंड तयार होतात व त्यांतूनच कोरकचर्म निर्माण होते. कोरकचर्म व त्याखाली असलेले मुक्त कोशिकाद्रव्य हे पीतकावर पसरतात आणि यामुळे कोरकचर्माच्या मध्यावर एक तबकडीसदृश एकभित्तिका तयार होते. या एकभित्तिकेच्या पश्चभागातील खालच्या स्तरातील कोशिका विलग होऊन त्यांचा अंतःस्तर तयार होतो. परिणामी भ्रूणढाल तयार होते. पृष्ठभागावरील पुष्कळ कोशिका भावी मध्यस्तर व पृष्ठरज्जू निर्माण करणाऱ्या असतात.

पक्षी वर्गातील मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंस असलेल्या कोशिका स्थलांतर करून आद्यरेषेच्या अग्र भागातील आद्य खळग्यात अंतर्वलित होतात. यातूनच पुढे पृष्ठरज्जूची निर्मिती होते. या आद्य खळग्याच्या आद्य पन्हळीतून मध्यस्तर व अंतःस्तर तयार होतात. यापुढील विकास साधारणपणे बेडकाच्या विकासाप्रमाणेच असतो.

भ्रूणबाह्यस्तर : भ्रूणाच्या बाहेरच्या कोरकचर्माच्या भागास भ्रूणबाह्यस्तर किंवा भ्रूणकला अथवा गर्भकला म्हणतात [⟶ गर्भकला]. सरीसृप प्राण्यांत व पक्षी वर्गात चार प्रकारचे भ्रूणबाह्यस्तर असतात. ते अनुक्रमे  ⇨उल्ब, ⇨ जरायू, ⇨ अपरापोषिका व पीतककोश हे होत. हे अंड्याच्या कवचाच्या आत असतात. भ्रूणबाह्यमध्यस्तराचे स्तर एकमेकांपासून विलग होतात व त्यांत भ्रूणबाह्य देहगुहा तयार होते. ही गुहा बाहेरील बाजूने कायिक मध्यस्तराने आणि आतील बाजूने आंतरांग-मध्यस्तराने मर्यादित असते.

कायिक मध्यस्तराच्या घड्या व बाजूचा बाह्यस्तर यांपासून दोन भ्रूणबाह्यस्तर निर्माण होतात. यांपैकी आतील स्तरारा उल्ब व बाहेरील स्तरास जरायू म्हणतात. यांपैकी  उल्ब हे नाळेच्या जवळ शरीरभित्तीशी अखंड असते. उल्बाच्या आत उल्बगुहा असते व ती उल्बद्रवाने भरलेली असते. विकसित होत असलेला भ्रूण या द्रवातच तरंगत असतो.

आ. ८. पक्ष्यातील भ्रूणबाह्यस्तर : जरायु-अपरापोषिका : (१) उत्त्र, (२) उल्बगुहा, (३) अपरापोषिका गुहा, (४) कवच, (५) नाभिरज्जू (नाळ), (६) पीतक, (७) अल्ब्युमीन (प्रथ्रिन), (८) पीतककोश, (९) कवच पटल, (१०) हवा, (११) भ्रूणबाह्य देहगुहा.जरायू अंड्याच्या कवचाच्या आतील बाजूस अस्तरासारखे असते. दरम्यान भ्रणाचा बाह्य अंतःस्तर व मध्यस्तराचा आंतरांग हे पीतकावर पसरतात आणि यांपासून पीतककोश तयार होतो. यावरच हळूहळू रक्तवाहिन्या दिसू लागतात. या रक्तवाहिन्यांच्या साहाय्याने भ्रूणास जीवनद्रव्ये मिळतात. हळूहळू जरायूची वाढ पीतककोशावरपर्यंत होते. भ्रूणाची बाह्य देहगुहा जरायू, उल्ब व पीतककोश याच्या दरम्यान दिसू लागते. मध्यस्तराच्या आंतरांगस्तराचा व अंतास्तराचा एक कोष्ठ आंत्रापासून तयार होतो, याला अपरापोषिका म्हणतात. अपरापोषिकेची बाहेरची भित्ती व जरायू यांचे मीलन होते, व त्यांतून जरायु-अपरापोषिक पटल तयार होते. हे अंड्याच्या कवचाच्या आतील बाजूस अस्तराप्रमाणे असते. या पटलात पुष्कळ रक्तवाहिन्या असतात व त्यांच्या साहाय्याने भ्रूणास सच्छिद्र कवचातून ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांची देवणघेवाण करता येते. अपरापोषिकेच्या पोकळीत भ्रूणाने बाहेर उत्सर्जित केलेल्या नायट्रोजनयुक्त द्रव्याचा साठा असतो. अंडे फुटून भ्रूण बाहेर पडताना अपरापोषिका, उल्ब व जरायू हे अंड्यातच राहतात पण पीतकाकोश मात्र भ्रूणाच्या अधर देहभित्तीतून आत घेतला जातो. [⟶ अपरापोषिका उल्ब गर्भकला जरायु वार – २].

सस्तन प्राणी : इतर पृष्ठवंशी प्राण्यांपेक्षा या प्राण्यांसे वैशिष्ट्य म्हणजे यांच्यात मादी पिलास अंगावरील स्तन ग्रंथीने दूध पाजते. हे प्राणी जरायुज आहेत. मत्स्य वर्गीत व सरीसृप प्राण्यांतही काही प्राणी जरायुज आहेत. सरीसृप व पक्षी वर्गांत आढळणारे चारही भ्रूणस्तर सस्तन प्राण्यात आढळतात. आद्य सस्तन प्राणी सोडून इतर सर्व सस्तन प्राण्यांत भ्रूणाच्या पोषणासाठी, श्वसनासाठी व उत्सर्जनासाठी अपरा (वार) नावाचे इंद्रिय असते.

सर्वसाधारण सस्तन प्राण्यांचा विकास समपोतकी अड्यांपासून होतो. ही अंडी मैथुनानंतर अंडवाहिनीत निषेचित होतात. पूर्ण अंड्याचे विदलन होऊन गोल आकाराची एकभित्तिका तयार होते. हिलाच कोरकपुटी असेही म्हणतात. या कोरकपुटीच्या पातळ भित्तीस भ्रूणपोषक असे म्हणतात. हा भ्रूणपोषक एका जागी जाड होतो. या जागेस अंतर्कोशिकासमूह म्हणतात. मानवाच्या भ्रूणविकासात या अंतर्कोशिकासमूहात एक पोकळी निर्माण होते. हिचे अस्तर बाह्यस्तराचे असते व हिला उल्बगुहा म्हणतात. अंतर्कोशिकासमूहातील काही कोशिका विलग होऊन त्यांपासून अंतःस्तराचे अस्तर असलेला रिक्त पीतककोश तयार होतो. उल्बगुहा व पीतककोश यांच्या दरम्यान असलेल्या दोन स्तरांच्या तबकडीपासून भ्रूणाची निर्मिती होते. भ्रूणपोषकाची वाढ झपाट्याने होते व त्याच्या कोशिकांपासून बाह्यभ्रूण पटले व अपला या इंद्रियांचा काही भाग तयार होतो.

अंतर्कोशिकासमूह शरीर देठाने भ्रूणपोषकाशी जोडला जातो भ्रूणाच्या पश्च आंत्रातून निर्माण झालेला कोष्ठ शरीर देठाच्या मध्यस्तरात शिरतो व यापासून अपरापोषिकेचा अंतःस्तर भाग निर्माण होतो. शरीर देठाच्या अपरापोषिका मध्यस्तरात निर्माण झालेल्या रक्तवाहिन्यांना नाभिरक्तवाहिन्या  असे म्हणतात. या रक्तवाहिन्यांतून रक्ताचा प्रवाह जरायूच्या ज्या भागापासून जरायु-अपरापोषिक अपरा निर्माण होते, त्या भागाकडे जातो व त्या भागापासून रक्त परत शरीर देठाच्या (अपरापोषिक) मध्यस्तरात जाते. इतर काही सस्तन प्राण्यांत सरीसृप  प्राण्यांप्रमाणे किंवा पक्षी वर्गाप्रमाणे विस्तृत अपरापोषिक कोश आढळतो. अवशेषरूप रिकाम्या पीतककोशामद्ये पीतकी अभिसरणाची वाढ होते. उल्बगुहेचा शीघ्रगतीने विस्तार होतो आणि या गुहेतच पीतक रक्तवाहिन्या, शरीर देठ व उल्बगुहेच्या नाभिरक्तवाहिन्या सामावल्या जातात. याचे पर्यवसान नाळ तयार होण्यात होते. या नाळेमुळे भ्रूण अपरेशी जोडला जातो व भ्रूणास मातेच्या रक्तातून अन्नपुरवठा होऊ लागतो.


प्रायोगिक भ्रूणविज्ञान : प्रत्येक प्राण्याचा विकास निपेचित अंड्यापासून होतो. हे निषेचित अंडे एककोशिकेसमान असते. सुरुवातीस अगदी रचनाविरहित असणार्याप या कोशिकेपासून जटिल जीव निर्माण होतो. प्रथम या निषेचित अंड्याचे विदलन होते. परिणामी निर्माण होणाऱ्या कोरकखंडापासून निरनिराळी ऊतके व इंद्रिये तयार होतात.

वर्णनात्मक अभ्यासावरून आपल्याला निरनिराळ्या प्राण्यांच्या भ्रूणविकासाचे ज्ञान झाले आहे व या ज्ञानाच्या आधारे काही ठोकताळेही बसविले गेले आहेत पण या वर्णनात्मक ज्ञानाने बऱ्याच गोष्टीचा उलगडा होत नाही. उदा., प्राण्याच्या डोळ्याचा विकास कसा होतो हे जरी समजले, तरी तो का होतो याचे कारण अज्ञातच राहते. हे कारण समजण्याकरिता विश्लेषणात्मक किंवा प्रायोगिक स्वरूपाचे संशोधन आवश्यक आहे. या संशोधनांचे महत्त्व व्हिल्हेल्म रु. (१८५०-१९२४) या जर्मन शास्त्राज्ञांनी प्रथम ओळखले. त्यांनी बेडकाच्या अंड्यावर १८८५ पासून प्रयोग केले. यानंतर या क्षेत्रात हान्स श्पेमान (१८६९-१९४१) या जर्मन शास्त्रज्ञांनी पुष्कळ संशोधन केले. त्यांनी ‘भ्रूण अंगकर्ता’ (लगतच्या भागाचा वा भागांचा विकास होण्याच्या दृष्टीने उद्दीपन करणारा भ्रूणाचा कोणताही भाग उदा., कोरकरंध्राची अग्र घडी) ही संकल्पना पुढे मांडली. या संशोधनाबद्दल त्यांना १९३५ साली नोबेल पारितोषिक मिळाले. आर्. जी. हॅरिसन (१८७०-१९५९) या अमेरिकन शास्त्रज्ञांनीही या क्षेत्रात मूलभूत स्वरूपाचे काम केले आहे.

आ. ९. माशाच्या डिंभातील सायुक्लोपिया विकृती : (अ) प्राकृतिक डिंभ (आ) मध्यनेत्र असलेला डिंभ : (१) डोळा.परिसरीय कारक : पूर्व संशोधनावरून एक गोष्ठ स्पष्ट झालेली आहे आणि तो म्हणजे निषेचित अंड्यात भ्रूणाच्या विकासात लागणारी सर्व सामग्री उपलब्ध असते. यात आनुवंशिक गुणधर्म ज्यांत समाविले आहेत असे जीनही केंद्रकात असतात. तरीही ज्या परिसरात अंड्याची वाढ होते त्या परिसराचाही अंड्याच्या विकासावर परिणाम होतो. निरनिराळे भ्रूण निरनिराळ्या परिसरीय स्थितीशी मिळतेजुळते घेतात. यात तापमान, ऑक्सिजनाचा दाब वगैरेंचा समावेश आहे.यात थोडाफार फरक पडला, तर भ्रूणाचा विकास हळू किंवा वेगाने होतो. जर हा फरक मोठ्या प्रमाणात पडला, तर भ्रूणात विकृती निर्माण होते. पाण्यात वाढणाऱ्या मत्स्य वर्गाच्या किंवा उभयचर प्राण्याच्या भ्रूणावर लिथियम क्लोराइडाच्या विरल विद्रावाचा परिणाम होऊन डोक्याची विकृती निर्माण होते. यापैकी ‘सायक्लोपिया’या नावाची विकृती प्रसिद्ध आहे, या विकृतीत बाजूच्या दोन डोळ्यांऐवजी एकत्र मध्यनेत्र तयार होतो.

अशा प्रकारच्या विकृतींचा अभ्यास करून भ्रूणविकासासंबंधी बऱ्याच गोष्टांचा उलगडा झाला आहे. असेही आढळले आहे की, एकाच प्रकारची विकृती निरनिराळे परिसरीय फरक करूनही निर्माण करता येते. उदा., मध्यनेत्र हा नुसत्या लिथियम क्लोराइडाच्या परिणामामुळेच होत नाही, तर मॅग्नेशियम क्लोराइडाचा उपयोग करून किंवा तापमानात वाढ करूनही निर्माण करता येतो. याउलट असेही आढळले आहे की, एकाच रसायनामुळे त्याचा कमीजास्त प्रमाणात व निरनिराळ्या वेळी वापर केल्यास, निरनिराळ्या विकृती निर्माण होतात. उदा., जर कोंबडीच्या अंड्यात २४ तासांनंतर इन्शुलिनाचे काही प्रमाणात अंतःक्षेपण केले (आत घातले), तर वाढणाऱ्या भ्रूणाच्या शेपटीत विकृती निर्माण होते पण जर याच प्रमाणात  इन्शुलिनाचे अंतःक्षेपण तीन किंवा चार दिवसांचा भ्रूण असलेल्या अंड्यात केले, तर भ्रूणाच्या पायात विकृती निर्माण होते. उंदराच्या नऊ किंवा दहा दिवसांच्या भ्रूणावर जर तीनशे राँटगेन मात्रेच्या प्रारणाचे उद्भासन केले [⟶ प्रारण जीवविज्ञान], तर डोळ्याच्या विकृती निर्माण होतात पण जर हीच मात्रा अकरा दिवसांच्या  भ्रूणास दिली, तर पायात विकृती निर्माण होते. यावरून असे दिसते की, प्रत्येक इंद्रियाच्या विकासात असा एक काल असतो की, ज्या वेळी त्याच्या कोशिकांवर परिसरीय कारकांचा त्वरित परिणाम होतो. या कालास क्रांतिक काल असे म्हणतात.

भ्रूणविकासात इंद्रियांची उत्पत्ती कशी होते याविषयी दोन सिद्धांत बऱ्याच दिवसांपासून प्रचलित आहेत. यांपैकी पहिल्या सिद्धांतास पूर्वनिर्धारित सिद्धांत व दुसऱ्यास अनिर्धारित विकास सिद्धांत असे म्हणतात. पहिल्या सिद्धांताप्रमाणे भ्रूणात उत्पन्न होणारी सर्व इंद्रिये अंड्यात अंतर्भूत असतात व जसजसा अंड्याचा विकास होतो तसतशी ही इंद्रिये स्पष्ट होऊ लागतात. थोडक्यात म्हणजे अंडे हे प्रौढावस्थेची अल्पाकृती होय. याउलट अनिर्धारित विकास सिद्धांतानुसार अंड्यात कोणतीही संरचना अंतर्भूत नसते. अंड्यातील जननिक वृत्तानुसार आणि परिसरीय कारकांनुसार इंद्रियांची वाढ होते. प्रायोगिक भ्रूणविकासाच्या अभ्यासामुळे या दोन्ही सिद्धांतांची छाननी करणे शक्य झाले.

हान्स ड्रीश या जर्मन शास्त्रज्ञांनी १८९१ साली सागरी अर्चिन या प्राण्याच्या अंड्यावर प्रयोग करून असे दाखवून दिले की, निपेचित अंड्याचे विभाजन होऊन दोन कोरकखंड निर्माण झाल्यावर जर हे कोरकखंड  एकमेकांपासून  विलग केले, तर प्रत्येक कोरकखंडापासून एक पूर्ण विकास पावलेला भ्रूण तयार होतो. जर अंड्यात इंद्रिये घडविणारी संघटना असती, तर या दोन कोरकखंडांत तिचे विभाजन झाले असते व एका कोरकखंडापासून एक पूर्ण भ्रूण तयार न होता अर्धभ्रूण तयार झाला असता. या प्रयोगावरून अनिर्धारित विकास सिद्धांतास पुष्टी मिळते. यानंतरच्या  काळात मत्स्य वर्गातील व उभयचर वर्गातील प्राण्यांच्या अंड्यांवरही असेच प्रयोग केले गेले व त्यावरूनही अनिर्धारित विकास सिद्धांतास पुष्टी मिळाली. सॅलॅमँडर या प्राण्याच्या निषेचित अंड्याचे पहिल्या विदलनाच्या खाचेत बारीक केसाने अथवा रेशमाच्या धाग्याने विभाजन केले, तर झालेल्या दोन खंडांपासून प्रत्येकी एक पूर्ण भ्रूण निर्माण होतो. यावरून अंड्यात पूर्वनिर्धारित संघटना नसावी हे सिद्ध होते. निषेचित अंड्याचे विदलन होऊन निर्माण झालेले कोरकखंड जर एकमेकांपासून विलग झाले, तर त्यांपासून पूर्ण भ्रूण निर्माण होतात व हीच उच्च प्राण्यांत जुळी म्हणून ओळखली जातात.


आ. १०. सॅलॅमॅडराच्या अंड्यापासून प्रावर्तनाने निर्माण केलेले जुळे : (१) विदलन खाच, (२) जिलेटीनयुक्त पटल, (३) रेशमी धागा.इतर काही प्राण्यांच्या निषेचित अंड्यांत ही संघटना फार लवकर सुरू होते. या अंड्यांच्या विदलनानंतर विलग झालेल्या कोरकखंडांपासून पूर्ण भ्रूण तयार होत नाहीत. त्यांचा विकास अर्धवट झालेला  असतो. अशा प्रकारची अंडो ॲनेलिडा आणि मॉलस्का या संघांतील व ॲसिडियासिया या वर्गातील प्राण्यांत आढळतात. या आधारावर  भ्रूणवैज्ञानिकांनी अंड्यांचे दोन प्रकार केले आहेत. पहिल्या प्रकारात स्वयंनियामक अंडी मोडतात, तर दुसऱ्यात निर्धारित अंड्यांचा समावेश होतो.

स्वीडिश भ्रूणवैज्ञानिक एस्. ओ. होरस्टाडीयस (१८९८-  ) यांनी समुद्री अर्चिनावर केलेल्या प्रतिरोपणात्मक (एका ठिकाणचा शरीर भाग अथवा इंद्रिय काढून त्याच प्राण्यात दुसऱ्या ठिकाणी  किंवा  अन्य प्राण्यात बसविण्याच्या) व अलगीकरण प्रयोगांच्या साहाय्याने असे दाखवून दिले की, या प्राण्याच्या अंड्यांत गुणात्मक दृष्ट्या निरनिराळ्या असलेल्या दोन द्रव्यांचे क्रिमिकतेने (प्रमाण क्रमाक्रमाने कमी-वा-अधिक होत गेलेले आहे असे) वितरण झालेले आढळते. एका द्रव्याच्या क्रमिकतेचा शिखरबिंदू सक्रिय ध्रुवाजवळ तर दुसऱ्याचा अल्पवर्धी ध्रुवाजवळ असतो. ही दोन्ही द्रव्ये जर एका विशिष्ट प्रमाणात असली, तर सामान्य भ्रूणाची निर्मिती होते. अंड्याचे विभाजन जर उभे झाले, तर प्रत्येक खंडापासून एका पूर्ण भ्रूणाची वाढ होते. ड्रीश यांच्या प्रयोगातील विभाजन या प्रकारचे होते पण याऐवजी जर आडवे विभाजन झाले, तर निर्माण होणाऱ्या प्रत्येक खंडापासून अर्धविकसित भ्रूण निर्माण होतात.

आ. ११. इंद्रिय-उत्पादक पूर्वद्रव्य असलेले बेडकाचे निषेचित अंडे : (१) सक्रिय ध्रुव, (२) करडी कोर, (३) अल्पवर्धी ध्रुव.उभयचर प्राण्यांच्या अंड्यातील विभाजनाचा प्रकार निराळा आहे. अंडे  निषेचित झाल्यानंतर ज्या भागापासून भ्रूणाचा पृष्ठभाग तयार होणार आहे त्या भागातील विषुववृत्तसदृश रेषेत इंद्रिये निर्माण करणारे द्रव्य केंद्रित होते. यालाच करडी कोर असे म्हणतात. अंड्याचे विभाजन झाल्यावर ज्या खंडांत करड्या कोरीचा काही भाग असेल, त्याच खंडपासून भ्रूण तयार होऊ शकेल.

वरील संशोधनावरून दोन महत्त्वाचे निष्कर्ष काढता येतात. पहिला निष्कर्ष काढता येतात. पहिला  निष्कर्ष असा की, सर्व अंड्यांत कमी अधिक प्रमाणात स्वयंनियामक क्षमता असते. ही क्षमता निषेचनापूर्वी  केव्हा निर्माण होते व किती काळ टिकते हे त्या प्राण्यावर अवलंबून असते. दुसऱ्या निष्कर्षाप्रमाणे सर्व अंड्यांत एखाद्या विशिष्ट द्रव्यामुले विभेदन होते. ही द्रव्ये रासायनिक स्वरूपाची असतात. सी. एम्. चाइल्ड, ए. डाल्क वगैरे शास्त्रज्ञांच्या मते विभेदनाची पहिली क्रिया काही मूलभूत शरीरक्रियात्मक द्रव्यामुळे होते व या द्रव्यांचे क्रमिकतेने वितरण झालेले आढळते. यालाच चाइल्ड यांचा क्रमिकता सिद्धांत असे म्हणतात.

प्रतिरोपण : भ्रूणाच्या प्राथमिक अवस्थेत आद्य इंद्रिये असत नाहीत. ती कशी व केव्हा निर्माण होतात, हे ठरविण्याकरिता रू या शास्त्रज्ञांनी बरेच संशोधन केले. त्यांनी स्वयंविभेदन आणि अवलंबी विभेदन असे विभेदनाचे दोन प्रकार कल्पिले. भ्रूणावरील एखाद्या क्षेत्रात त्याच्या विभेदनास लागणारे सर्व कारक उपलब्ध असल्यास हे क्षेत्र स्वयंविभेदनास बाजूच्या कोशिकांतील द्रव्याची गरज भासत असेल, तर या अर्थाने हे क्षेत्र अवलंबी विभेदनक्षम ठरेल. यावरून असे आढळून येते की, विभेदन समजण्याकरिता वर वापरलेल्या दोन्ही संज्ञा काटेकोरपणे वापरता येण्याजोग्या नाहीत. प्रतिरोपणाचे तंत्र वापरून भ्रूणक्षेत्राची विभेदनक्षणता पडताळून पाहता येते. जर प्रतिरोपण केलेला भाग नव्या भ्रूणात पूर्वींचेच विभेदन दर्शवीत असेल, तर प्रतिरोपण करण्यापूर्वीच त्यात स्वयविभेदन झाले आहे, हे सिद्ध होते. सॅलॅमँडराच्या भ्रूणातील ज्या क्षेत्रापासून अग्रपाद निर्माण होतो, त्या क्षेत्राचे जर दुसऱ्यान सॅलॅमँडर भ्रूणाच्या बागलेवर प्रतिरोपण केले, तर या क्षेत्रापासून या नवीन जागीसुद्धा अग्रपादाचाच विकास होईल. याचा अर्थ असा की, या क्षेत्रात अग्रपाद निर्माण करण्याची स्वयंविभेदनक्षमता होती. या तंत्राचा अवलंब करून आद्यभ्रूणात कोणत्या क्षेत्रापासून मेंदू, डोळा किंवा पाद निर्माण होतील हे पाहून आद्यभ्रूणाच्या इंद्रियउत्पादक क्षेत्रांचा एक स्थलाकृतिक ‘नकाशा’ (क्षेत्राचे स्थान, संबंध, आकार, आकारमान इ. दर्शविणारा नकाशा) तयार करता येतो. हे संशोधन विशेषेकरून उभयचर प्राण्यांच्या अंड्यावर व भ्रूणांवर झाले आहे. इतर प्राण्यांच्या अंड्यांचा व भ्रूणांचा उपयोगही काही संशोधकांनी केला आहे.

स्वयंविभेदनाचा अभ्यास हॅरिसन व जे. होल्टप्रेटर या संशोधकांनीही केला. त्यांनी भ्रूणाच्या शरीरातील भाग काढून त्यांचे शरीराबाहेर संगोपन केले व त्यातून कोणत्या इंद्रियाची वाढ होते, हे पाहिले. या अभ्यासात त्यांनी उभयचर भ्रूणच नव्हे, तर नियततापी (पारिसराच्या तापमानात बदल होत असला, तरी ज्यांच्या शरीराचे तापमान एका ठराविक पातळीवर स्थिर असते अशा). प्राण्यांच्या भ्रूणांवरही प्रयोग केले.


आ. १२. सॅलॅमँराच्या भ्रूणात अग्रपादाचे प्रतिरोपण : (अ) ५ दिवसांचा भ्रूण व त्यातील विविध इंद्रिय-उत्पादक क्षेत्रे : (१) वृक्क (मूत्रपिंड), (२) अग्रपाद, (३) क्लोम, (४) संतोलक, (५) डोळा, (६) हृदय, (७) पश्चपाद, (८) पुच्छ कलिका, (९) प्रतिरोपण करावयाचे अग्रपाद क्षेत्र (आ) ज्याच्या बगलेवर प्रतिरोपण करावयाचे तो भ्रूण (इ) प्रतरोपणामुळे यगलेवर अग्रपाद विकासित झालेला सॅलॅमँडर.आकारजनिक क्षेत्रे : सॅलॅमँडराच्या  आद्यभ्रूणात डोके, डोळे इ. इंद्रिये कोणत्या क्षेत्रापासून निर्माण होतात हे सांगता येते पण क्लोम, हृदय व इतर काही इंद्रियाच्या बाबतीत निश्चितपणे काही सांगता येत नाही. आ. १२ मधील सॅलॅमँडराच्या आकृतीवरून असे आढळून  येईल की, या आद्यभ्रूणात काही क्षेत्रात जरी वरवर दाखविता आले नाही, तरी याच्या आधीच विभेदन झालेले असते. यावरून असा निष्कर्ष निघतो की, विभेदन प्रथम कोणत्या तरी रासायनिक विक्रियेने अगर द्रव्याने होत असावे व नंतर इंद्रिये निर्माण करणाऱ्या क्षेत्रांत या विभेदन द्रव्याचे केंद्रीकरण होत असावे. या निरनिराळ्या इंद्रियविकास करणाऱ्या क्षेत्रांस आकारजननिक क्षेत्रे असे म्हणतात. ही क्षेत्रे परस्परव्यापी असतात. जर एखाद्या क्षेत्रातील कोशिकांचा नाश केला, तरी त्या क्षेत्रापासून निर्माण होणाऱ्या  इंद्रियांचा विकास होतो. यावरून असे दिसते की, विभेदनात या क्षेत्रातील कोशिका मध्यभागावर जास्त प्रमाणात केंद्रित झालेल्या असतात. त्यांचा जर नाश केला, तर कडेच्या कोशिका मध्यावर येऊन नाश झालेल्या कोशिकांची उणीव भरून काढतात व विभेदनाप्रमाणे ठरलेल्या इंद्रियांची वाढ होते. यावरून असेही दिसते की, या आकारजननिक क्षेत्रांतही क्रमिकता असावी.

आकारजननिक क्षेत्रात प्रबल स्वयंनियमाकक्षमता असते, हे हॅरिसन यांनी प्रयोगाने सिद्ध केले. जर विकास पावणाऱ्या अग्रपादाचा, कानाचा किंवा हृदयाचा अर्धा भाग कापून काढला, तर राहिलेल्या अर्ध्या भागापासून त्या पूर्ण इंद्रियाचा विकास होतो. या वैशिष्ट्यामुळे एकाच त्याच्याच इंद्रियाचे प्रथमावस्थेत दोन भाग केले, तर त्याच्या शरीरात दोन इंद्रियांचा विकास करणे शक्य होते.

भ्रूण-प्रवर्तन : पुष्कळदा असे आढळून आले आहे की, भ्रूणक्षेत्राचे विभेदन बाहेरून मिळणाऱ्या, उत्तेजनापासून होते. काही वेळा बाजूच्या भ्रूण उतकाचा स्पर्शही उत्तेजनाचे काम करतो. उदा., दृग्‌पुटिकेच्या (अग्रमस्तिष्काची बाजूची भित्ती मुडपून तयार झालेल्या व ज्यापासून डोळ्याचे संवेदनाग्राहक भाग तयार होतात अशा पिशवीसारख्या रचनेच्या) स्पर्शामुळे डोळ्याच्या भिंगाच्या (काचेच्या) विकासास लागणाऱ्या  कोशिका तशाच ठेवल्या, तर भिंग विकास पावत नाही. या प्रयोगात दृग्पुटिका हा प्रवर्तक (विभेदन होण्यास चालना देणारा कोशिकासमूह) व भिंगक्षेत्र हे विक्रयक प्रणाली (ज्याचा विकास प्रवर्तकामुळे नियंत्रित होतो असा कोशिकासमूह) होय. ही पद्धती बऱ्याच पृष्ठवंशी प्राण्यांत आढळते. काही इंद्रियांच्या बाबतीत बाजूची दोन ऊतके प्रवर्तक म्हणून काम करतात, असेही दिसून आले आहे. हे दोन्ही ऊतकांचे प्रवर्तन एकाच वेळी न होता एकामागून एक असे होते. भिंगाचा विकास होत असताना कोशिकांत विभेदन होऊन त्या उत्तेजित होण्यास प्रवर्तकाची वाट पहात असतात की त्यांत विभेदन झालेले नसून प्रवर्तकामुळे भिंगविकास सुरू होतो? या प्रश्नाचे उत्तर बेडकावर केलेल्या खालील प्रयोगामुळे मिळाले. एका प्रयोगात दृग्‌पुटिकेचे बाह्यत्वचेखाली प्रतिरोपण करण्यात आले, तर दुसऱ्या प्रयोगात बाह्यत्वचेचे दृग्पुटिकेवर प्रतिरोपण करण्यात आले. दोन्ही प्रयोगांत भिंगाचा विकास झाला होता. यावरून असे सिद्ध होते की, प्रवर्तन क्रिया ही जास्त वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती नुसती आदेशकारक (कार्य सुरू करण्यास प्रवृत्त करणारी) नाही. इंद्रियाचा विकास कसा व्हावा, हेही प्रवर्तन क्रियेमुळे ठरले जाते.

बाह्यत्वचेच्या ज्या क्षेत्रापासून दृग्पुटिकेच्या प्रवर्तनामुळे भिंग तयार झाले त्याच बाह्यत्वचेचे जर भ्रूणाच्या पश्चभागात जेथे कान होते तेथे प्रतिरोपण केले, तर त्यापासून भिंग न होता कान तयार होतो. यावरून असे दिसते की, भ्रूणाच्या बाह्यत्वचेत प्रवर्तकाशी संयोग झाल्याशिवाय विभेदन होत नाही. भ्रूणांच्या ऊतकांची प्राण्यांच्या दोन निरनिराळ्या जातींत, गणांत किंवा वर्गांत देवाणघेवाण शक्य आहे, असे आढळून आले आहे. प्रौढावस्थेतील एकाच जातीच्या सुद्धा दोन प्राण्यांत ही देवाणघेवण शक्य होत नाही कारण प्रत्येक प्राण्याचा शरीराची बाह्य पदार्थ स्वीकारण्याची क्षमता निरनिराळी असते व ही प्रौढावस्थेत निर्माण होते. एकजातीय प्राण्यांत जेव्हा एकमेकांच्या ऊतकांचे प्रतिरोपण केले जाते तेव्हा त्यास समरोपण म्हणतात. जेव्हा एका प्राण्यात भिन्नजातीय प्राण्याच्या ऊतकाचे प्रतिरोपण केले जाते तेव्हा त्यास भिन्न प्रतिरोपण म्हणतात. जेव्हा या प्राण्यांचे संबंध फार दूरचे असतात (उदा., उंदीर व कोंबडा) तेव्हा अशा प्रतिरोपणास दूरस्थ प्रतिरोपण म्हणतात. ह्या सर्व प्रयोगांवरून असे दिसते की, प्रवर्तकाचे स्वरूप रासायनिक असावे, जे इंद्रिय प्रवर्तकाच्या साह्याने निर्माण होते, त्याची वैशिष्ट्ये मात्र त्या इंद्रियाच्या मुळाशी असलेल्या ऊतकांच्या कोशिकांतील जननिक गुणधर्मामुळे उद्‌भवतात. उदा., सॅलॅमँडराच्या भ्रूणावर जेव्हा बेडकाच्या आद्यभ्रूणाच्या डोके निर्माण करणाऱ्या त्वचेचे प्रतिरोपण केले तेव्हा  सॅलॅमँडराचे डोके तयार झाले पण त्यात दात मात्र बेटकाच्या दातांसारखे निर्माण झाले.


भ्रूण अंगकर्ता : सॅलॅमँडराच्या भ्रूणात अंगकर्ता असतो, हे प्रथमश्पेमान व हिल्डे मॅनगोल्ड यांनी १९२५ साली शोधून काढले. बेडकाच्या कोरकरंध्राची पृष्ठीन घडी कापून तिचे प्रतिरोपण जर, दुसऱ्यान बेडकाच्या आद्यभ्रूणावर केले, तर या पृष्ठीन घडीत अंतर्वलन दिसू लागते. या कोशिका अंतर्वलित झाल्याबरोबर त्यांच्यापासून कंकार तंत्र व स्नायू यांचा विकास  सुरू होतो, ह्यात विशेष असे काही नही. कारण प्रतिरोपण प्रयोगातही असेच आढळते पण याखेरीज हे प्रतिरोपण केलेले पृष्ठीन घडीचे क्षेत्र प्रवर्तनाची असाधारण क्षमता दर्शविते. पोषक बाह्यस्तरात ही प्रतिरोपण केलेली पृष्ठीन घडी तंत्रिका तंत्र आणि यातूनच मेंदू व मेरुरज्जू तसेच स्नायू, वृक्क व कधीकधी दुसरे आंत्रही प्रवर्तित करते. अत्यंत आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रतिरोपणापासून निर्माण झालेली व पोषक बाह्यस्तरापासून प्रवर्तित झालेली सर्व इंद्रिये यांचे संकलन होते व एक नवा दुय्यम भ्रूण तयार होतो. कोरकरंध्राच्या पृष्टीन घडीची म्हणजेच भ्रूणात मध्यस्तर निर्माण करणाऱ्या या क्षेत्राची ही दुय्यम भ्रूण निर्माण करण्याची क्षमता लक्षात घेऊन याला ‘भ्रूण अंगकर्ता’ ही संज्ञा देण्यात आली आहे.

भ्रूण अंगकर्त्याच्या क्रियेत स्वयंविभेदन व जटिल स्वरूपाचे प्रवर्तन यांचा मिलाफ झालेला आहे. प्रतिरोपण प्रयोगावरून असेही आढळून आले की, अंगकर्त्याचा काही भाग डोके व डोक्याजवळील भागाचे प्रवर्तन करतो, तर काही भाग शेपूट व पश्च भागाचे प्रवर्तन करतो. यांसंबंधीचे प्रयोग प्रमामुख्याने ट्रायट्यूरस या वंशतील उभयचर प्राण्यावर करण्यात आले. ट्रा.टीनियाटस या प्राण्याची अंडी तपकिरी रंगाची असतात. याच प्राण्याच्या ट्रा. क्रिस्टेटस या दुसऱ्या जातीच्या प्राण्याची अंडी रंगविरहित असतात. एका जातीच्या प्राण्याच्या भ्रूण अंगकर्त्याचे जर दुसऱ्या जातीच्या भ्रूणाच्या बगलेवर प्रतिरोपण केले, तर दुय्यम भ्रूणाची कोणती इंद्रिये पोषक भ्रूणापासून व कोणती अंगकर्त्यापासून निर्माण झाली हे समजते. ट्रा. टीनियाटस जातीपासून निर्माण झालेला इंद्रिये तपकिरी रंगाची , तर ट्रा. क्रिस्टेटस जातीपासून झालेली इंद्रिये रंगविरहित असतील. दोन्ही जातींतील लक्षणे एकाच इंद्रियात आढळणे हे साधारणपणे असंभाव्य आहे. मत्स्य, उभयचर व पक्षी या वर्गांतही भ्रूण अंगकर्ता आढळला आहे. मानवासहित काही सस्तन प्राण्यांच्या गर्भात आढळणारी विकटताही (अपसामान्यताही) भ्रूण अंगकर्त्यामुळे निर्माण झाली असण्याची शक्यता आहे पण याविषयी निश्चित अशी काही माहिती उपलब्ध नाही.

प्रवर्तकाचे रासायनिक स्वरूप : होल्टफ्रेटर यांनी १९३२ साली असे दाखवून दिले की, उभयचर प्राण्यातील भ्रूण अंगकर्त्याच्या कोशिका जरी अल्कोहॉलाने, उष्णतेने किंवा गोठवून मारल्या, तरी त्यांची प्रवर्तनक्षमता कायम राहते. यावरून असा निष्कर्ष निघतो की, प्रवर्तकाचे स्वरूप रासायनिक असावे. ही रसायने कोणती हे जरी ज्ञात नसले, तरी त्यांस कार्याकराके असे संबोधितात. प्रवर्तनाच्या यंत्रणेचे ज्ञान अजूनही अपुरेच आहे.

रासायनिक भ्रूणविज्ञान : प्रायोगिक भ्रूणविज्ञानातील क्रियांचे वर्णन करण्यास स्वयंनियमन, प्रवर्तन, निर्धारण, क्रमिकता, आकार जननिक क्षेत्र, भ्रूण अंगकर्ता इ. संकल्पना वापराव्या लागतात. या संकल्पनांना रासायनिक व भौतिक मूलाधार काय आहे ही माहिती रासायनिक भ्रूणविज्ञानाच्या कक्षेत येते.

अपक्वांडच्या मोठ्या आकारमानावरून असे अनुमान निघते की, अंड्यातील सर्व क्रिया नुसत्या केंद्रकामुळेच होत नाहीत, तर त्यांपैकी काही कोशिकाद्रव्यामुळेही होत असाव्यात. ⇨न्यूक्लिइक अम्लांचे संश्लेषण (घटक अणू वा साधे रेणू एकत्रित आणून त्यांच्या रासायनिक विक्रियेने जटिल संयुग बनणे) मुख्यतः केंद्रकातच होते. अपक्वांडांची वाढ होण्यापूर्वी बऱ्याच अगोदर डीएनएची (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्लाची) आवृत्ती निर्माण होण्यास सुरुवात होते. दोन प्रकारचे डीएनए संश्लेषित होते, त्यांपैकी एक गुणसूत्रांचे असते, तर दुसरे केंद्रिकाकारक (केंद्रकातच असलेल्या आणि मुख्यत्वे प्रथिनांच्या बनलेल्या लहान, गोलसर पिंडकांचा म्हणजे केंद्रिकांचा विकास होण्यास चालना देणारे) असते. या दुसऱ्यान डीएनएची संरचना पहिल्यापेक्षा वेगळी असते. याच्या पुष्कळशा आवृत्त्या तयार होतात व त्यांपासून केंद्रिका बनतात. वेडकाच्या अपक्वांडात जवळपास एक हजार केंद्रिका असाव्यात, असा अंदाज आहे. यांपासून कोशिकाद्रव्यात असलेल्या रिबोसोमाच्या (कोशिकेतील प्रथिनांचे संश्लेषण करणाऱ्या कार्यकारी घटकाच्या) आरएनएचे (रिबोन्यूक्लिइक अम्लाचे) संश्लेषण होते. यथाकाल संदेशक आरएनए (डीएनएमधील प्रथिन संश्लेषणाची माहिती रिबोसोमाकडे पोहोचविणारे आरएनए) आणि स्वीकारी किंवा संदेशग्राहक आरएनए [प्रथिनांच्या संश्लेषणासाठी अमिनो अम्ले वाहून नेण्याचे व संदेशक आरएनएतील सांकेतिक माहितीचा अर्थ लावण्याचे कार्य करणारे आरएनए. ⟶ न्यूक्लिइक अम्ले] यांचाही साठा निर्माण होतो. पक्व अंड्याच्या कोशिकाद्रव्यात असलेल्या आरएनएपैकी ८०% रिबोसोमाचे आरएनए असते. हा संचय बेडकाच्या भ्रूणास भैकेर अवस्थेत त्याचा विकास होईपर्यंत पुरेसा असतो. अपक्वांडात हळूहळू ग्लायकोजेन, मेद (स्निग्ध पदार्थ) व प्रथिने यांचा साठा होऊ लागतो आणि यामुळे त्याची वाढ होते. प्रथिनांचे लहान रेणू पीतक बिंबाणूंच्या (वर्तुळाकार तबकड्यांच्या) स्वरूपात आढळतात. बहुतेक प्रथिनांचा साठा यकृतापासून मिळतो. या पीतक बिंबाणूंतही डीएनए असते. हे गुणसूत्राच्या डीएनएपेक्षा निराळे असते. या डीएनएचा उगमही यकृतातच होत असावा. अपक्वांडात सूत्रकणिका (जीवद्रव्यातील सूक्ष्म, गोलसर कणीदार, लांब सुतासारखी वा आखूड दंडाकृती कोशिकांगे कलकूण) असतात. त्यांचे कार्य श्वसनक्रियेशी निगडित असते व त्यांतही एक निराळ्या प्रकारचे डीएनए असते. उभयचर (व इतर काही) प्राण्यांच्या अपक्वांडात लँपब्रश गुणसूत्रे नावाची बाटली धुण्याच्या ब्रशासारख्या आकाराची विशिष्ट गुणसूत्रे आढळतात. ही गुणसूत्रे असाधारण लांबीची (१ मिमी. पर्यंत) असून त्यांच्या बाजूंवर अतिसूक्ष्म केसासारख्या वाढींची वलये विपुल प्रमाणात असतात. या वलयांचा गाभा डीएनएचा बनलेला असून हे डीएनए वेगळ्या प्रकारचे असते. वरील विवेचनावरून उभयचर प्राण्यांच्या अपक्वांडात चार प्रकारचे डीएनए असते असे दिसते : (१) लँपब्रश गुणसूत्रामधले, (२) केंद्रकाशी निगडित असलेल्या केंद्रिकाकारकांमधले, (३) पीतक बिंबाणूंमधले व (४) सूत्रकणिकांमधले.

पूर्ण वाढ झालेल्या अपक्वांडात बृहत्‌रेणूंचे (सापेक्षतः साध्या व अनेक अणूंनी बनलेल्या एक वा अधिक संरचनात्मक एककांची संख्या मोठी असलेल्या मोठ्या रेणूंचे) संश्लेषण बंद होते. विकासातील पुढचा टप्पा म्हणजे अंडे परिपक्व होणे होय. या वेळी  ⇨पोष ग्रंथी व अंडकोश यांत निर्माण होणाऱ्या हार्मोनांचा परिणाम अंड्यावर होतो. या परिणामामुळे केंद्रकाचे पटल नाश पावते, हळूहळू कद्रिकांचा लोप होतो व फक्त केंद्राकाकारक क्षेत्र असलेले डीएनए शिल्लक राहते. सर्व केंद्रिकाकारकांचे सायुज्यन (एकत्रीकरण) होते व ही सायुज्यित केंद्रिकाकेंद्रे अंड्याच्या बाह्यकामध्ये (बाह्यावरणामध्ये) स्थिरावतात. गुणसूत्रांचे संकलन होते व ती अंड्याच्या बाह्यकामध्ये असलेल्या तर्कृवर [चातीच्या आकाराच्या तंतूंच्या जुडग्यावर ⟶ अंडे] रोवली जातात. या कालात कोशिकाद्रव्यात पुष्कळ जीवरासायनिक क्रिया चालू असतात. केंद्रकाचा कोशिकाद्रव्यात मुख्त संचार बऱ्याच कालाने झालेला असतो. नवीन संदेशक आरएनए व प्रथिने तयार होतात. डीएनए पॉलिमरेज हे एंझाइम याच कालात तयार होते वा त्याच्या साह्याने निषेचित अंड्यात गुणसूत्रास योग्य अशा डीएनएचे संश्लेषण होते.


काही जातींत (उदा., समुद्री अर्चिन) निषेचित न झालेले अंडे चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी) झालेल्या निष्क्रियतेच्या अवस्थेत काही काल असते. या अवस्थेत प्रथिनांचे संश्लेषण व श्वसन अत्यंत मंद असते. इतर अनेक प्राण्यांच्या जातीत (उदा., कृमी, बेडूक) अंड्यात अशी निष्क्रियता आढळत नाही. प्राण्याच्या जातीप्रमाणे निषेचनानंतर अंड्यातील श्वसनाची त्वरा (वेग) कमीअधिक प्रमाणात असते. समुद्री अर्चिनामध्ये ही त्वरा काही मिनिटांतच वाढते व तिप्पट-चौपट होते. बेडकाच्या अंड्यात विशेष फरक पडत नाही. काही कृमी व मॉलस्क प्राण्यांत ही त्वरा कमी झालेली आढळली आहे.

समुद्री अर्चिनाच्या अंड्यात निषेचनांतर प्रथिन संश्लेषणाची त्वरा वाढते. बेडकाच्या अंड्यात इतकी वाढ आढळत नाही. समुद्री अर्चिनाच्या अनिषेचित अंड्याचे खंड करून ते जर अतितर्षणी [प्रमाणभूत विद्रावाच्या तर्षण दाबापेक्षा जास्त तर्षण दाब असणाऱ्या ⟶ तर्षण] सागरी पाण्यात टाकले, तर प्रथिन संश्लेषणाची त्वरा वाढते. यावरून असे दिसते की, अंड्याच्या निषेचनाचा व प्रथिन संश्लेषणाच्या त्वरेचा काही संबंध नसावा. अनिषेचित अंड्यात संदेशक आरएनएचा बराच मोठा साठा असतो. त्याच्यात काही रेणवीय बदल होऊन त्यापासून पुढे प्रथिन संश्लेषणास आवश्यक असणारे रिबोसोम व पॉलिसोम ही कोशिकांगे तयार होतात.

विदलन काळात अंड्याच्या श्वसनक्रियेत विशेष फरक होत नाही. सल्फहायड्रिल (-SH) गटात मात्र फरक होतात. हे फरक समविभाजन तंत्रातील तारा [केंद्रापासून बाहेर जाणाऱ्या  किरणांसारख्या सूक्ष्म तंतूंनी बनलेली कोशिकाद्रव्यातील रचना ⟶अंडे] व तर्कू यांच्याशी निगडित असतात. डी. माझिया यांच्या मते समविभाजन तंत्र हे गंधकयुक्त प्रथिनांच्या बहुवारिकतेमुळे (लहान, साध्या रेणूंच्या संयोगाने जटिल प्रचंड रेणूचे संयुग बनण्याच्या गुणधर्मामुळे) निर्माण होत असावे. या क्रियेस नवीन प्रथिनांच्या संश्लेषणाची आवश्यकता नसते. अंड्याच्या कोशिकाद्रव्यात असलेल्या प्रथिनांपासून सूक्ष्मनलिका तयार होत असाव्यात व त्यांपासूनच समविभाजन तंत्रातील तंतू निर्माण होऊन त्यांपासून तारा व तर्कू बनत असावेत. विदलनामुळे अंड्याचे विभाजन होते व नवीन कोशिका (कोरकखंड) तयार होतात. यथाकाल डीएनएचे संश्लेषण होत असावे. आरएनएचे संश्लेषण मात्र अगदी अल्प किंवा मुळीच होत नाही. कोशिकांचे समविभाजन आरएनएशिवाय होऊ शकते, हे सप्रयोग दाखविता येते. उदा., ॲक्टिनोमायसीन-डी या रसायनाने आरएनएचे संश्लेषण थांबविले, तरी कोशिकांचे समविभाजन चालूच राहते. विभाजनता प्रथिनांचे संश्लेषण सुरू असते व या क्रियेस लागणारे आरएनए अंड्याच्या संग्रही असलेल्या स्थिर संदेशक आरएनएच्या साठ्यातून मिळते.

आद्यभ्रूण अवस्थेत श्वसनक्रियेत वाढ होते व या क्रियेस लागणारी ऊर्जा संग्रही असलेल्या ग्लायकोजेनाच्या साठ्यामधून मिळते. आद्यभ्रूणात डीएनएचे संश्लेषण विभाजनापेक्षा कमी गतीने होते. याउलट आरएनए व प्रथिनांचे संश्लेषण वाढते. बेडकाच्या अंड्यात या द्रव्यांच्या संश्लेषणात क्रमिकात आढळते. सक्रिय ध्रवुवाजवळ ही द्रव्ये जास्त प्रमाणात असतात व अल्पवर्धी ध्रुवाच्या दिशेने त्यांची संहती (प्रमाण) कमी कमी होत जाते. सक्रिय ध्रुवाजवळच्या क्षेत्रापासून डोके विकास पावते, तर अल्पवर्धी ध्रुवापासूनच्या क्षेत्रापासून शेपूट तयार होते. आद्यभ्रूणाच्या पृष्ठभागापासून अधर भागापर्यंत ही क्रमिकता आढळते. प्रायोगिक भ्रूणविज्ञानात क्रमिकतेची जी संकल्पना मांडली आहे, तिला रेणवीय स्वरूपात प्रथिने व आरएनए यांच्या संहतीच्या अभ्यासाने पुष्टी मिळते. आद्यभ्रूणावस्थेत जे आरएनए तयार होते ते अंड्याच्या अवस्थेत तयार झालेल्या आरएनएपेक्षा निराळे असते व अल्पकाल टिकणारे असते. या आरएनएचे संश्लेषण सुरू झाले म्हणजे कोशिकांच्या केंद्रकांत केंद्रिका दिसू लागतात.

तंत्रिका तंत्र व मध्यस्तर यांचे प्रवर्तन काही ठराविक प्रथिनांमुळे होते. काही प्रथिने भ्रूणाच्या बाह्यस्तरापासून मेंदू, डोळे इत्यादींचे प्रवर्तन करतात, तर दुसरी काही प्रथिने त्याच बाह्यस्तराच्या क्षेत्रापासून शेपूट व मध्यस्तर कोशिका असलेली इंद्रिये यांचे प्रवर्तन करतात. सामान्य भ्रूणाच्या अंगकर्त्यात अशी निरनिराळी प्रथिने असतात किंवा नाही हे समजलेले नाही. प्रयोगान्ती असे आढळले आहे की, भ्रूण  अंगकर्त्यास कार्यक्षम होण्यास आरएनएचे संश्लेषण नाही पण ज्या बाह्यस्तरावर अंगकर्त्याचे प्रवर्तन होते त्या बाह्यस्तराच्य कोशिकांत मात्र आरएनए संश्लेषणाची क्षमता असली पाहिजे. प्रत्येक इंद्रियाची खास प्रथिने असतात. भ्रूणातील कोशिका-विभेदन व इंद्रियांच्या खास प्रथिनांचे संश्लेषण या दोन्ही क्रिया बरोबरच चालू असतात. या खास प्रथिनांचे संश्लेषण जीनांच्या मार्गदर्शनाने संदेशक आरएनएकडून होत असते. या अल्पकाळ टिकणाऱ्या आरएनएचे संश्लेषण कोशिकाविभेदन होण्यापूर्वी सुरू होते.

सूक्ष्मजंतूंत जीनांच्या कार्यक्षमतेचे स्वयंनियमन कसे होत असेल, याविषयी फ्रांस्व झाकॉब (१९२०-  ) आणि जे. मॉनो (१९१०-७६) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी जीनांची क्रिया दर्शविणारे एक प्रतिरूप (मॉडेल) सुचविले. याला ‘ओपेरॉन’ असे म्हणतात. ह्या प्रतिरूपामुळे जीनाचो क्रिया समजणे सुलभ होते पण या प्रतिरूपाचा भ्रूणविकासात फारसा उपयोग होत नाही कारण अंड्यासंबंधीचे आपले जननिक ज्ञान अपुरे आहे. तसेच अंड्यात असलेले कोशिकाद्रव्य फार जटिल स्वरूपाचे असते. अंड्याचे विभाजन होण्यापूर्वीच या कोशिकाद्रव्याचे काही भाग आपले वैशिष्ट्य दाखवितात. उदा., उभयचर प्राण्यांच्या अंड्यात कोशिकाद्रव्याचा काही भाग करडी कोर म्हणून दृश्ट स्वरूपात आढळतो.

टी. एच्, मॉर्गन (१८६६-१९४५) यांच्या मते विषमांगतेमुळे निरनिराळे जीन निरनिराळ्या क्रिया करतात. जीनांच्या या क्रियेमुळे कोशिकाद्रव्याची विषमांगता आणखीनच वाढते व यातूनच पुढे कोशिका-विभेदनाचा उगम होतो.

सलगर, द. चि इनामदार, ना. भा. रानडे, द. र.

मानवी भ्रूणविज्ञान : युग्मज अथवा निषेचित अंड या अवस्थेपासून बदल होत जाऊन, अंडातून नवा जीव बाहेर पडण्यापूर्वीपर्यंत म्हणजे जन्मण्यापर्यंत अंडातील सेंद्रिय द्रव्यात होणाऱ्या विकासक्रमांचा ज्या शास्त्रात अभ्यास करतात त्याला ‘भ्रूणविज्ञान’ म्हणतात. विकासासंबंधीची जीवविज्ञानाची ही एक शाखा असून तीमध्ये अंडापासून व्यक्ती तयार होईपर्यंतच्या सर्व बदलांचा अभ्यास समाविष्ट असल्यामुळे तिला ‘व्यक्तिविकास अभ्यासशास्त्र’ असेही म्हणता येते. बहुतेक सर्व बहुकोशिकीय  प्राण्यांतील प्रत्येक जाती निषेचित अंड तयार करीत असली, तरी प्रत्येक व्यक्ती फक्त अंडापासूनच तयार होते असे नाही. काही प्राणिगटांमध्ये अलैंगिक जनन (दोन निरनिराळ्या पूर्वजांची गरज नसताना एकाच पूर्वजापासून विभाजन, मुकूलन किंवा पुनर्जननातून नव्या जीवाची निर्मिती) लैंगिक जननापेक्षा अधिक आढळते. काही प्राणिगटांत दोन्ही जननपद्धतींचे मिश्रण असल्याचेही आढळते [⟶ प्रजोत्पादन]. मानवेतर प्राण्यांतील भ्रूणविज्ञानाची माहिती वर दिली आहे. प्रस्तुत नोंदीच्या उरलेल्या भागात मानवी भ्रूणविज्ञानासंबंधीचे विवरण केलेले आहे. मानवाच्या बाबतीत निषेचित अंडापासून दोन महिन्यांपर्यंतच्या अवस्थेला ‘भूण’ म्हणतात आणि त्यानंतर जन्म होईपर्यंत ‘गर्भ’ म्हणतात.


विभाग : भ्रूणविज्ञानाचे चार प्रमुख विभाग पाडता येतात.

(१)वर्णनात्मक अथवा रचनात्मक भ्रूणविज्ञान : या विभागात आकार व त्यातील बदल, रचना, अवयवांचे परस्परसंबंध आणि ऊतकांचे संबंध यांचा विचार केला जातो. भ्रूणविकासातील शरीरशास्त्राचा अभ्यास प्रमुख्याने केला जातो. प्रस्तुत नोंदीत या विषयावर अधिक भर दिला आहे.

(२)प्रयोगिक भ्रूणविज्ञान : आकारबदल आणि शरीरक्रियात्मक बदल ज्यामुळे घडतात त्यामागील प्रवर्तक व प्रेरणा यांचा अभ्यास या विभागात केला जातो.

(३) पिकसनासंबंधीचे शरीरक्रियाविज्ञान : विकसित होणाऱ्या भ्रूणातील शरीरक्रियात्मक बदलांचा अभ्यास यात करतात. या विभागातील अनेक गोष्टी अजून अज्ञात आहेत.

(४)अपरूपजननविज्ञान : भ्रूणाच्या विकसनात जेव्हा बिघाडामुळे विकृती निर्माण होते किंवा राक्षसगर्भ उत्पन्न होतो तेव्हा त्यास अपसामान्य विकसन अथवा अपरूपजनन म्हणतात. झाक लब (१८५९-१९२४) या शास्त्रज्ञांनी अलैंगिक जननाचा [अनिपेतजननाचा ⟶ अनिपेकजनन] प्रयोग करून बेडकाच्या अंड्यावर विशिष्ट भौतिक व रासायनिक उद्दीपके वापरून ‘पितारहित’ पूर्ण वाढलेले बेडूक निर्माण केले होते. फक्त या बेडकात लिंगनिर्मिती झालेली नव्हती. प्रयोग करून बेडकाच्या अंड्यावर विशिष्ट भौतिक व रासायनिक उद्दीपके वापरून ‘पितारहित’ पूर्ण वाढलेले बेडूक निर्माण केले होते. फक्त या बेडकात लिंगनिर्मिती  झालेली नव्हती. प्रयोगशालेय प्रयोगानंतर असे आढळून आले आहे की, विकृतनिर्मितीस अनेक गोष्टी कारणीभूत असतात. तीन आद्य जननस्तरांतील कोशिकांच्या विपथगमनाने (सर्वसामान्य नियमांनुसार विकास न झाल्याने) काही अपसामान्य निर्मिती होते, तर काही विकृतींस ऑक्सिजन-न्यूनता कारणीभूत असते. उदा., जन्मजात अंगलोप (जन्मतःच हात, पाय किंवा त्यांचा भाग नसणे) ऑक्सिजनन्यूनतेमुळे होतो, असे प्रयोगान्ती आढळले आहे. मधुमेही मातांध्ये अपरूपजनन अधिक आढळते. मधुमेह जेवढा गंभीर तेवढेच अपरूपजननही गंभीर आढळते. वरील पूर्व गोष्टींचा अभ्यास या विभागात केला जातो.

जनन तंत्र : मानवी भ्रूणविज्ञानाकडे वळण्यापूर्वी ज्या युग्मकांपासून (जनन कोशिकांपासून युग्मज बनतो त्यांची थोडीफार माहिती देणे आवश्यक आहे. मानवी जनन तंत्राचे सविस्तर विवरण ‘जनन तंत्र’ या नोंदीत दिलेले आहे. येथे संबंधित भागांचा थोडक्यात आढावा घेतला आहे.

पुरुष : (१) वृषण : वृषणकोशातील या ग्रंथीमध्ये शुक्राणू तयार होतात. या एकूण दोन ग्रंथी असून प्रत्येक ग्रंथी अंडाकृती असते व ती अनेक रेतोत्पादक नलिकांच्या भेंडोळ्यांची बनलेली असते. या नलिकांमध्ये शुक्राणूंचे उत्पादन होते व त्या वृषण-जालिका भागाशी जोडलेल्या असतात [⟶ वृषण], (२) अधिवृषण नलिका : अनेक वेटोळी असलेली ही नलिका वृषण-जालिकेशी अपवाही नलिकांनी जोडलेली असते व ती तयार झालेले शुक्राणू वाहून नेण्याचे कार्य करते. (३) रेतोवाहिनी अथवा शुक्राणुवाहिनी : ही अधिवृषण नलिकेचा पुढचा भाग असून तो स्नायुमय असतो (म्हणजे नलिका भित्तीत स्नायू असतात). ही नलिका वृषणकोशातून  श्रोणिगुहेत (धडाच्या तळाशी असलेल्या व हाडांनी वेष्टिलेल्या पोकळीत) जाते. तिचा शेवटचा भाग व रेताशयातून निघणारी नलिका मिळून स्खलनवाहिनी बनते. स्खलनवाहिनी ⇨अष्ठीला ग्रंथीतील मूत्रवाहिनीत उघडते. (४) मूत्रमार्ग : मूत्राशयातील मूत्र बाहेर वाहून नेणाऱ्या. या मार्गाचा अष्ठीला ग्रंथीतील भाग व शिश्नातील भाग यांचा मूत्राशिवाय संभोगाच्या वेळी रेत वाहून नेण्यासाठीही उपयोग होतो.

वरील प्रमुख भागांशिवाय काही पूरक भागही पुरुष जनन तंत्रात कार्य करतात. (१) रेताशय : रेतोवाहिनीच्या शेवटास असलेल्या छोट्या पिशवीवजा प्रवर्धाला (वाढीला) रेकाशय म्हणतात. रेताशय दोन असून प्रत्येक रेताशय काही लघुकोशांचा बनलेला असतो. सुमारे ५ सेंमी. लांब असलेल्या एका काहीशा मोठ्या नलिकेच्या वेटोळ्यात हे लघुकोश असतात. या लघुकोशांच्या अंतःपृष्ठावरील कोशिकांच्या स्त्रावापासून वीर्याचा पुष्कळसा भाग बनतो. हा स्राव क्षारधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण तयार होण्याचा गुणधर्म असलेला) असून त्यात फ्रुक्टोज असते. रेताशयात शुक्राणूंचा संचय होत नाही. स्रवणापासून तो स्खलनानंतर शुक्राणूंशी मिसळल्यावर स्रावातील फ्रुक्टोज  शुक्राणूंना ऊर्जा पुरविते. (२) अष्ठीला ग्रंथी : या ग्रंथीचा स्राव मूत्रमार्गात येऊन वीर्यात मिसळतो. (३) कंदमूत्रमार्ग ग्रंथी : मूत्रमार्गात विशिष्ट जागी उघडणाऱ्या या ग्रंथींचा स्राव वीर्यात मिसळतो.

स्त्री : (१) अंडाशयक (अंडकोश) :  श्रोणिगुहेतील या ग्रंथीमध्ये जननकोशिका अथवा अंडी तयार होतात. बदामी आकाराच्या या दोन ग्रंथी असून प्रत्येकीवर जननदअधिस्तर कोशिकांचा (ज्यांपासून अंडपुटकांची म्हणजे ज्यांत अंड असतात अशा लहान पिशव्यांची उत्पत्ती होते अशा कोशिकांचा) थर असतो [⟶ अंडकोश]. (२) अंडवाहिनी : या दोन असतात व प्रत्येकीचे एक तोंड श्रोणि-पर्युदरगुहेत (ओटीपोटातील पोकळीत) अंडाशयाजवळ उघडे असते. तोंडावर झालर असते. वाहिनीच्या अंतःस्तरावर पक्ष्माभिकायुक उपकलेचे (केसासारख्या वाढींना युक्त अशा पातळ पटलाचे) अस्तर असते. या रचनेमुळे व वाहिनीभित्तीतील स्नायूंच्या क्रमसंकोचामुळे अंड गर्भाशयाकडे वाहून नेले जाते [⟶ अंडवाहिनी]. (३) गर्भाशय : हा पोकळ त्रिकोणाकृती मांसल अवयव श्रोणीगुहेत मध्यरेषेवर असून त्याच्या वरच्या दोन्ही टोकांनी अंडवाहिन्या येऊन मिळतात [⟶ गर्भाशय]. (४) योनिमार्ग : पोकळ नळीसारख्या या भागात वरच्या बाजूस गर्भाशयाचा ग्रीवा भाग (अरूंद, लांबट व निमुळता मानेसारखा भाग) असून त्यात ग्रीवाद्वार उघडते. खालची बाजू बाह्य जननेंद्रियात उघडते [⟶ योनिमार्ग].

पुढील भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा.