भोजपुरी भाषा: हिंदी या सामान्य नावाने ओळखल्या जाणाऱ्या समूहात अनेक भाषांचा समावेश होतो. त्यांपैकी काही दीर्घ साहित्यिक परंपरा असलेल्या आणि एक निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापून असणाऱ्या भाषा आहेत. त्या इतक्या साहित्यसमृद्ध आहेत, की साहित्य अकादेमीलाही त्यांची स्वतंत्रपणे दखल घ्यावी लागली आहे. ब्रज, अवधी, भोजपुरी इ. भाषा अशा भाषांपैकीच आहेत. भाषकांच्या संख्येच्या दृष्टीनेही त्या महत्त्वाच्या आहेत.

भारतीय आर्य भाषांचे बाह्य, मध्य व आंतर असे जे वर्गीकरण ग्रीअर्सन यांनी केले आहे, त्यांतील बाह्य उपशाखेतील पूर्वेकडच्या बिहारी या समूहातली भोजपुरी ही सर्वांत मोठी भाषा आहे.

इतर अनेक नावांप्रमाणे भोजपुरी हे नावही भौगोलिक आहे. शाहाबाद जिल्ह्याच्या वायव्येकडील एका गावाच्या व परगण्याच्या नावावरून ते पडले आहे.

ग्रीअर्सनच्या अंदाजाप्रमाणे पहाणीच्या काळी ही भाषा सु. १,२९,५०० चौ. किमी. मध्ये जवळजवळ दोन कोटी लोकांकडून बोलली जात होती, तर मगही व मैथिली यांचे भाषक अनुक्रमे ६२ लाख व एक कोटी होते. भौगोलिक दृष्टीने मगही व मैथिली या पूर्वेकडील व भोजपुरी ही पश्चिमेकडील आहे. पूर्वेकडील भाषा बंगालीला अधिक जवळच्या आहेत, तर भोजापुरी अवधीला.

भोजपुरीचे तीन महत्त्वाचे भेद आहेत : प्रमाण, पश्चिम व नागपुरिया. प्रमाण भोजपुरी शाहाबाद, बालिया, गाझीपूरचा पूर्व भाग व गोग्रागंडकच्या दोआबमधे बोलली जाते. पश्चिम भोजपुरी पश्चिमेकडील जिल्ह्यांत, तर नागपुरिया छोटा नागपूरमध्ये बोलली जाते. पश्चिम भोजपुरीला ‘पूर्बी’ असेही नाव आहे. अर्थात हे नाव तिच्या पश्चिमेकडच्या लोकांनी दिले आहे. पूर्वीचे भाषक ते पुर्बिया (म. पुरभैया).

व्याकरण: उच्चारदृष्ट्या भोजपुरी हिंदीहून फारशी भिन्न नाही. बिहारीच्या अतिपूर्वेकडील पोटभेदांत च्या जागी येतो. भोजपुरी या बाबतीत निश्चितपणे पश्चिमेलगतची पूर्वेकडील भाषा असून तिच्यातील बदलला नाही.

(अ) नाम – भोजपुरी नाम पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी व एकवचनी किंवा अनेकवचनी असते. त्याला होणारे विकार सामान्यरूप, शब्दयोगी अव्यय इ. इतर भारतीय आर्य भाषांपेक्षा भिन्न नाहीत.

(आ) सर्वनाम – सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत :

 

प्रथम पुरुष 

द्वितीय पुरुष 

तृतीय पुरुष 

ए. व. 

अ. व. 

में 

इम् 

तुं, तें 

तुंलोग, तोहनिक, इ. 

ऊ,  

उलोग 

दर्शक स. इ-इलोग, हइ-हइलोग संबंधी स. जे…से, जवन… तवन प्रश्नवाचक स. (सजीव) के, कवन-के, कवन लोग (वस्तू) का स्ववाचक स. स. अपने, अपना अनिश्चित स. अवर, अउरी, अवरी.

(इ) विशेषण – विशेषणेही बहुतांशी लिंगाप्रमाणे बदलतात. व्यंजनांत विशेषणांना स्त्रीलिंगदर्शक ई हा प्रत्यय लागतो, तर पुल्लिंगी आकारांत विशेषणांतील च्या जागी स्त्रीलिंगात येते. परंतु या दोन्ही नियमांना काही अपवाद आहेत : बूढ-बूढि ‘म्हातारा-री’, ऊजर-ऊजरि ‘पांढरा-री’, गोला-गोली ‘लालसर’, लंगरा-लंगरीलंगडा-डी ’. पण करिआ ‘काळा-ळी ’. उदा., करिआ बरध ‘काळा बैल’-करिआ गाइ ‘काळी गाय’.

सर्वनामापासून बनलेली गुण, पद्धती व परिणामवाचक विशेषणेही आहेत. अइसन-ना ‘असा, असला’, ओइसन ‘तसा, तसला’, कइसन ‘कसा, कसला’. –अतना, एतना, हतना, हेतना ‘एवढा, इतका’. नामाच्या सामान्य नियमानुसार विशेषणांचीही स्त्रीलिंगी रूपे होतात.

(ई) क्रियापद – धातूला वेगवेगळे प्रत्यय लागून क्रियापदाची रूपे तयार होतात. क्रियावाचक नामाचा-अल्, उल् किंवा वल् प्रत्यय काढून घेतल्यावर उरते ते धातुरूप :सूतल-सूत् + अल्‘झोप+णे’, गइल ‘जाणे’, खेवल ‘वल्हवणे’.


आज्ञार्थवाचक रूपांशिवाय वर्तमान, भूत व भविष्य काळांची शुद्ध (धातू+प्रत्यय) व मिश्र (धातू + सहायक धातू+ प्रत्यय) रूपे यांचा अंतर्भाव क्रियापदव्यवस्थेत होतो. शुद्ध वर्तमान व भूत काळांची रूपे संकेतार्थी रचनेत वापरतात.

प्रथम पुरुषात एकवचनाऐवजी अनेकवचनाचाच वापर होतो. एकवचन काव्यातच काय ते आढळते. 

सहायक क्रियापद पुढीलप्रमाणे :

 

वर्तमानकाळ

भूतकाळ

 

एकवचन

अनेकवचन

एकवचन

अनेकवचन

प्र. पु. 

द्वि.पु. 

तृ. पु. 

(बडों)/- 

बाड, बाडे, 

बाडेसि, बाडस/बाडिस 

बा, बाडे, बाडा, बाडो, बाडसि, बाडसु, बाडस /-

बडीं,  

बानी/बाड्यूं 

बाड, बाडह/बाडू 

बाडन /बाडिन

रहलों 

रहले, रहलस/रहली,रहलिस 

रहल, रहले, रहलसि

 रहलास/रहली

रहलीं/रहल्यूं 

रहल, रहलह/रहलू 

रहलन/रहलिन 

याशिवाय पर्यायी रूपे अनेक आहेत. पण इथे एकच नमुन्यादाखल दिले आहे. पुढे देख-या धातूची निवडक रूपे दिली आहेत :

वर्तमानकाळ: ए. व. १. देखों/-२ देख, देखे, देखसि, देखस/देखिस ३ देखे, देख, देखो, देखसि, देखसु, देखस/- अ. व. १ देखीं, देख्यूं २ देख, देखह/देखू ३, देखन, देखनि/देखिन.

भूतकाळ: ए. व. १ (देखलों) /-२ देखले, देखलस/देखली, देखलिस ३ देखले, देखलस, देखलसि/देखली अ. व. १. देखलीं / देखल्यूं २ देखलह/देखलू ३ देखलन, देखलनि/देखलिन.

भविष्यकाळ: ए. व. १ (देखबों, देखबउ) /-२ देखबे/देखबिस, देखबी ३ देखी/- अ. व. १ देखब, देखबी, देखिह/देखिब, देखिबी २ देखबह/देखबू ३ देखिहे, देखिहेन/-

(उ) संख्या : संख्यावाचक रूपे पुढीलप्रमाणे आहेत : १ एक, राम २ दूइ ३ तीनि ४ चारि ५ पांच ६ छव ७ सात ८ आठ ९ नव १० दस २० बीस ३० तीस ४० चालिस ५० पचास ६० साठि ७० सत्तरि ८० असी ९० नब्बे १०० सई १००० हजार.

साधारणपणे लोकात वीसपर्यंत मोजण्याची प्रथा आहे. नंतरचे आकडे वीसच्या मापाने मोजतात :तीनि बिसा पांच ‘६५’. कित्येकदा वीस आधीचे आकडेही असेच मोजतात : दूइकम बीस ‘१८’. विशेषणदर्शक संख्येनंतर गो हा शब्द घालण्यात येतो : तीनि गो लइका ‘तीन मुलगे,’  सात गो रुपया ‘सात रुपये’.

क्रमवाचक विशेषणे पहिल, दोसरा, तिसरा, चउया, पचंवा इ. म्हणजे पांचपासून पुढे संख्यावाचकाला वा हा प्रत्यय लागून क्रमवाचक तयार होते.

संख्यावाचकानंतर ‘वेळा’ या अर्थी शब्द ठेवून संख्यावाचक अव्यय तयार होते. हे शब्द आहेत तोर, तोरी, तोरीं, हाला, हालि, हालीं, बेर, बेरि, वेरीः दुइतोर, दुतोर ‘दोनदा’ इ. खरे तर ही अव्यये म्हणजे कालवाचक नामाआधी संख्यावाचक विशेषण ठेवून झालेले सामासिक शब्दच आहेत.

(ऊ) काही उभयान्वयी अव्यये अशी : अ, अउरी ‘आणि’ चाहे… चाहे ‘किंवा’ ना…ना ‘किंवा+नकार’ नात, नाहींत ‘नाहीतर’ बाकी ‘पण, तरीही’… जे… ‘की’ जेहमें, जेमें‘…म्हणून…’ जो ‘जर…तर…’

(ए) काही शब्द व वाक्ये-पीठि ‘पाठ’, आंखि ‘डोळा’, चानी ‘चांदी’, नाऊ ‘न्हावी’, टूक ‘फडके’, मइजा‘आजी’, लइका ‘मुलगा’, धांख ‘धूर्त माणूस’, बाघ‘वाघ’, आंच ‘जाळ’, राछछ‘राक्षस’, बकलंड ‘मूर्ख’, बाध ‘दोरी’, सोन्ह‘सुवास’, सार ‘बायकोचा भाऊ’, नाप ‘माप’. –घर (पु.) जरि गइल ‘घर जळून गेले’, किताब (स्त्री.) जरि गइलि ‘पुस्तक जळून गेले’, मजूर ले अइल ‘मजूर घेऊन आलात?’ हमके चारिअदमि द ‘मला चार माणसे दे’. उ भिखारीके भीख दिहले ‘त्याने भिकाऱ्याला भीक दिली’. लइकाके भेज ‘मुलाला पाठव’. फेडसे पतई गिरतिआ ‘झाडावरून पाने पडतात’. रामके लइकी मु गइलि ‘रामची मुलगी मरून गेली’. एतना चाउर त एकेअदिमिके होई ‘एवढे तांदूळ तर एका माणसाला पुरतील’, जेतना अदिमी अइहें तेतनाअदिमीके इतजाम कइल जाइ ‘जितके लोक येतील तितक्या लोकांची व्यवस्था केली जाईल’.

संदर्भ : 1. Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. V, Part 2, Delhi, 1968.

            2. Tiwari, U. N. A Dialect of Bhojpuri, Patna, 1934-35.

कालेलकर, ना. गो.