भोकर: (गोंदण हिं. लासोरा कु. बर्गुंड सं. श्लेष्मातक, बहुवारक क. हडिगे, चिकचल्ले इं. इंडियन चेरी सेबॅस्टियन प्लम लॅ. कॉर्डिया मिक्सा, कॉ. डायकॉटमा, कॉ. ऑब्लिका कुल-बोरॅजिनेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. १२-१५ मी. उंचीचा हा लहान पानझडी वृक्ष श्रीलंकेत व भारतात उष्ण भागांत सर्वत्र आढळतो. शिवाय तो इंडोचायना, जावा, फिलिपीन्स, ऑस्ट्रेलिया इ. प्रदेशांतही आढळतो. याचे खोड वेडेवाकडे असून त्याचा घेर सु. ०.९-१.२ मी. असतो. साल भेगाळ व गर्द पिंगट असते. पाने साधी, एकाआड एक, काहीशी जाडसर, ७-१२ X ६-१० सेंमी. व खरखरीत असतात पात्याच्या तळातून ३-५ शिरा निघतात. याला मार्च-एप्रिलमध्ये लहान, पांढरी सुवासिक, द्विलिंगी व पुल्लिंगी फुले शाखायुक्त वल्लरीवर [कुंठित फुलोऱ्यावर ⟶ पुष्पबंध] येतात. संवर्त, पुष्पमुकुट व केसरमंडल यांमध्ये प्रत्येकी पाच पुष्पदले असतात. केसरदलांच्या तंतूंवर तळाशी केस असतात. ऊर्ध्वस्थ किंजपुटात चार कप्पे व प्रत्येकात एक बीजक असते [⟶ फूल]. अश्मगर्भी फळ (आठळी फळ) फिकट पिवळट तपकिरी किंवा लालसर काळपट, चकचकीत आणि चिकट (श्लेष्मल) गोड मगजाने (गराने) भरलेले, १.२५-२.५ सेंमी. लांब, एकबीजी व पिकल्यावर खाद्य असते. आठळीची बाहेरची साल सुरकुतलेली असते. याची इतर सामान्य लक्षणे ⇨बोरॅजिनेसीत (भोकर कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.
कच्च्या फळाची भाजी अथवा लोणचे करतात त्यापासून मद्यही बनवितात. ह्या झाडावर लाखेचे किडे पोसतात. ब्रह्मदेशात पाने चिरूट करण्यास वापरतात. खोडाच्या सालीपासून धागे काढून त्यांचे दोर बनवितात व सालीचा उपयोग कागदाच्या लगद्याकरिता करतात. साल स्तंभक (आकुंचन करणारी) व सौम्य पौष्टिक असते. तिचा फांट [विशिष्ट प्रकारे केलेला काढा ⟶ औषधिकल्प] गुळण्यांकरिता वापरतात. सालीचा रस मुरडा झाल्यास खोबरेलाबरोबर देतात चूर्ण कंडूवर लावतात. फळातील मगज कृमिघ्न, शामक (आग शांत करणारा), सारक असून मूत्रमार्ग, फुप्फुस व छाती यांच्या विकारांवर उपयुक्त असतो. बियांचे चूर्ण नायट्यावर लावतात. सालीचा काढा भूक वाढविण्यास आणि ताप कमी होण्यास देतात. पानांचा वापर जखमा व डोकेदुखी यांवर करतात. ह्या झाडाचे लाकूड ताजेपणी पिवळे परंतु नंतर ते निळसर करडे व शेवटी पिंगट किंवा करडे तपकिरी होते. ते हलके, नरम व मध्यम प्रतीचे मजबूत असते. घासून व रंधून त्यास झिलई देता येते. नौका, बंदुकीचे दस्ते, शेतीची अवजारे, चहाची खोकी, गाड्यांचे भाग इ. विविध वस्तूंकरिता ते वापरात आहे. सालीत २% टॅनीन असून तिच्यातील धाग्यांचा उपयोग नौकाबांधणीत करतात. कोटिलीय अर्थशास्त्र, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता इ. प्राचीन भारतीय ग्रंथांत श्लेष्मातक या नावाने भोकराचा उल्लेख आला आहे.
केळकर, शंकुतला परांडेकर, शं. आ.
शेंदरी भोकर: (हिं. भोकर, बोहरी, लाल लासूरा इं. स्कार्लेट कॉर्डिया, अलोवुड लॅ कॉ सॅबेस्टेना कुल-बोरॅजिनेसी). सु. ४.५-१० मी. उंच वाढणाऱ्या या लहान सुंदर वृक्षाचे मूलस्थान कॅरिबियन बेटे व द. अमेरिकेचा उत्तर किनारा असून तेथून तो भारत, श्रीलंका व फिलिपीन्समध्ये आणला गेला. सोळाव्या शतकातील जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ व्हॅलेरियस कॉर्डस यांचे नाव या वृक्षांच्या वंशनामाशी संबंधीत असून सेबेस्ता शहराच्या परिसरात वाढणाऱ्या त्यातील एका जातीच्या वृक्षाच्या फळावरून सॅबेस्टेना हे जातिवाचक नाव दिले आहे. याचे खोड वेडेवाकडे व रुंदट असून साल पिंगट व तिच्यावर कंगोरे असतात. पाने मध्यम आकाराची, गर्द हिरवी, खरबरीत, लंबगोल फुले मोठी, शेंदरी, नरसाळ्यासारखी असून जानेवारी–मार्चमध्ये मोठ्या वल्लरीत येतात. मृदुफळे पांढरी व संवर्तात काहीशी वेढलेली असून मगजाला केळ्यासारखा वास येतो. झाडाचा उपयोग फक्त शोभेकरिता होतो. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨बोरॅजिनेसीत वर्णन केल्याप्रमाणे असतात.
पहा : बोरॅजिनेसी.
जमदाडे, ज. वि.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II Delhi, 1950.
2. Dastur, J. F. Medicinal Plants of India and Pakistan, Bombay, 1962.
3. Dastur, J. F. Useful Plants of India and Pakistan, Bombay, 1964.
4. McCann, C. 100 Beautiful Trees of India, Bombay, 1959.
“