भृगु : एक अतिप्राचीन महर्षी व वैदिक सूक्तद्रष्टा. कृत्रिम रीत्या अग्नी निर्माण करण्याचा शोध प्रथम याने लावला, असे उल्लेख आढळतात. ‘अग्नीचा आवाज’ वा ‘ज्वाला’ या अर्थाच्या ‘भृग्’ या संस्कृत शब्दापासून तसेच भ्रस्ज (भाजणे), भृज (भाजणे) वा भ्राज् (प्रकाशणे) या संस्कृत धातूंपासून हा शब्द बनल्याचे सांगितले जाते. प्रजापतीच्या अग्नीत पडलेल्या वीर्यापासून त्याचा जन्म झाल्यामुळे त्याला अग्नीज हे नाव मिळाल्याची कथा आढळते. कून आणि बार्थ याच्या मते भृगू म्हणजे विद्युत्देवता, तर बर्गेनीच्या मते भृगू म्हणजे अग्नी होय. काही पश्चिम विद्वानांनी फ्लेग्यस आणि फ्लेग्यी या ग्रीक व रोमन देवतांबरोबरही भृगूचा संबंध जोडला आहे. आणखी एका मतानुसार भृगू व भार्गव हे थ्रेसचे अग्निशोधक ब्रुजेस होते. भृगू हा ब्रम्हदेव, इंद्र व प्रजापती यांचा पुत्र असल्याच्या विविध कथा आढळतात. प्रथम मनूने निर्माण केलेले प्रजापती, ब्रम्हदेवाचे मानसपुत्र, सप्तर्षी, देवता इत्यादी मध्येही त्याची घणना होते. वरूण व त्याची पत्नी चर्षणी यांनी त्याचे पोषण केल्यामुळे त्याला वरूणपुत्र, चर्षणीपुत्र अशी नावेही मिळाली. चित्रावशास्त्री यांनी स्वायंभुव मन्वंतरात जन्मलेल्या भृगू प्रजापती आणि अग्नीतून जन्मल्यावर ज्याला वरूणाने दत्तक घेतले, तो भृगू वारूणी भिन्न असल्याचे मानले आहे. काहींच्या मते हे एकाच भृगूचे दोन जन्म होत.
भृगुकुल : भृगूने प्रवर्तित केलेल्या कुलाला भार्गव भृगुकुल म्हणतात. ऋग्वेदात आलेले भृगूचे बहुसंख्य निर्देश बहुवचनी आहेत. ऋग्वेदात त्यांना सोमप्रेमी पितर मानून देवतांसह सोमपानासाठी आवाहन केलेले असल्यामुळे ते खूप प्राचीन असल्याचे स्पष्ट होते. ते पुरोहित होते. अग्नी निर्माण करण्याचे ज्ञान सार्वत्रिक नव्हते. तोपर्यंत त्यांना देवतांसारखा मान दिला जात होता असे दिसते. भृगू हे द्रविड असावेत, असे अनेक विद्वानांचे मत असून काहींच्या मते ते प्रथम समुद्रमार्गाने दक्षिण भारतात आले. ते दैत्य व दानव यांचे पुरोहित असल्याच्या कथा आहेत. ⇨ दाशराज्ञ युद्धात द्रुह्यू व तुर्वश यांच्याबरोबरच तेही सुदास राजाचे शत्रू तसेच मांडलिक असल्याचा निर्देश आढळतो. भृगुकुलातील अनेकांचे विवाहादी कराणांनी क्षत्रियांबरोबर निकटचे संबंध होते. याउलट परशुराम वगैरेंचे क्षत्रियांबरोबर कमालीचे वैरही होते. या कुलात च्यवन, शुक्र [⟶ शुक्राचार्य], और्व, ऋचीक, ⇨ जमदग्नी, ⇨ परशुराम, शौनक इ. प्रसिद्ध व्यत्की होऊन गेल्या महाभारतात भृगूंविषयी विविध आख्याने आहेत. कौरव-पांडव-युद्धाचे वर्णन करणारा ग्रंथ हे मूळ भारताचे स्वरूप बदलून त्याला नैतिक व धार्मिक शिक्षण देणाऱ्या महाभारताचे स्वरूप त्यांनीच दिले असावे, असे म्हणतात. त्यांची ऐतशायन नावाची शाखा हीन मानली जात होती, असे दिसते. त्यांच्या अंगिरस, अथर्वन् व ऋभू यांच्या बरोबर नेहमी उल्लेख येतो. ते योद्धे असल्याचा तसेच त्यांच्यावर हल्ला केल्याबद्दल सृंजय वैतहव्य या लोकसमूहाचा नाश झाल्याचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदात त्यांचा रथकार म्हणून जो निर्देश आला आहे, तो सायणाचार्य व रूडोल्फ रोट यांच्या मते ऋभृंचा आहे. ई. सीग यांच्या मते भृगू हे नाव मूळचे कारागिरांना होते आणि लाकूडकाम करणारांनाच प्रथम अग्नीचा शोध लागणे स्वाभाविक असल्यामुळे रथकार भृगूंना अग्नीचा शोध लागला असावा.
साळूंके, आ. ह.