भूशिर : (केप)विस्तृत जलाशयात शिरलेला व पाण्याच्या पृष्ठभागावर दिसून येणारा जमिनीचा किनाऱ्याच्या इतर भागापेक्षा पुढे आलेला भाग म्हणजे भूशिर, अशी सामान्यपणे व्याख्या केली जाते. हा भूविशेष महासागर, समुद्र, सरोवरे इत्यादींच्या किनारी प्रदेशात ठळकपणे दिसून येतो. सागरात शिरलेली खंडांची (उदा., केप ऑफ गुड होप, कन्याकुमारी) आणि बेटांची टोके (न्यूझीलंडमधील नॉर्थ केप) ही याची प्रमुख उदाहरणे होत. भूशिराचा आकार, त्याची निर्मितिपद्धती इत्यादींवरून त्याला स्थलपरत्वे वेगवेगळी नावे रूढ आहेत. जिह्वा (स्पिट), निमुळते भूशिर (पॉइंट), उंचभूशिर (हेडलँड), अंतरिप (प्रॉमन्टरी) इत्यादी सर्व भू्विशेष म्हणजे भूशिरेच होत. परंतु त्यांची काही वैशिष्ट्ये असतात. बहुतेक भूशिरांची टोके मुख्य भूभागाकडे वळलेली असतात. सागरजलाच्या स्थापन कार्यामुळे भूशिरांची निर्मिती व वाढ होत असते. त्यांच्या वाढीबरोबरच त्यांना अधिकाधिक बाक येतो. भूशिरामुळे लाटांना प्रतिबंध होऊन पहिल्या भूशिराला जोडून दुसऱ्या भूशिराची निर्मिती होते. अशा तऱ्हेने काही भूशिरे नव्याने तयार होतात, तर काही क्षरणाने नष्ट होतात.
भूशिरांचे प्रमुख प्रकार : जिह्वा : एक टोक मुख्य भूमीला जोडलेले व दुसरे समुद्रात लांबपर्यंत शिरलेले असा वाळू, खडी, रेती यांच्या संचयनाने बनलेला अरूंध ‘दांडा’ म्हणजे जिह्वा होय. ग्रेट ब्रिटनमधील साउदॅम्पटनच्या दक्षिण भागातील कॅल्शॉट स्पिट सोलंड खाडीच्या प. भागातील हर्स्ट कॅसल स्पिट, न्यूझीलंडमधील फेअरवेल स्पिटही याची उदाहरणे आहेत. काही वेळा नदीमुखखाडीत या जिह्वेमुळे नदीचे दोन्ही काठ जोडले जाऊन नैसर्गिक बांध तयार होतो.
निमुळते भूशिर : सस.पासून कमी उंचीचे व अरूंध भूशिर म्हणजे ‘पॉइंट’ असे सर्वसाधारणपणे मानले जाते. उदा., अ. सं. सं. च्या न्यूयॉक राज्यातील माँटक पॉइंट.
उंच भूशिर : सामान्यपणे उंच कड्यांनी बनलेले भूशिर या प्रकारात मोडते. स्कॉटलंडमधील ‘डंकन्सबी हेड’ हे याचे उदाहरण आहे.
अंतरिप : सागरखुंट व कड्याकड्यांची खंडित रांग असलेले भूशिर अंतरीप या संज्ञेने ओळखले जाते. उदा., ऑस्ट्रेलियातील विल्सन्स प्रॉमन्टरी.
समुद्रकाठी लाटांमुळे झीज व भर असे दुहेरी कार्य होऊन काही वेळा भूभागाला गळासारखा आकार प्राप्त होतो व वैशिष्ट्यपूर्ण भूशिर बनते. मॅसॅचूसेट्स राज्यातील ‘केप कॉड’ (वरील रेखाचित्र) हे प्रमुख उदाहरण आहे. भूशिरांच्या निर्मितीची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे :
(१) सागरकिनाऱ्याजवळील प्रवाहांमुळे सागराच्या उथळ भागात वाळू, रेती व इतर घटकांचे संथ गतीने संचयन होऊन वाळूचे दांडे, पुळणी यांची वाढ होते. त्यामुळे काही वेळा समुद्रात आतपर्यत निमुळती भूशिरे (पॉइंट) निर्माण होतात. अशा प्रकारची भूशिरे नदीमुखखाड्यांमध्ये निर्माण झालेली आढळतात. (२) भूकंड हिमनदीच्या काठावर गाळाचे संचयन होऊन काही भूशिरे निर्माण होतात. ‘केप कॉड’ हे या प्रकारचे भूशिर आहे. (३) विस्तृत सागरकाठावरील कठीण खडकांचे कडे तसेच राहून बाजूच्या भागांचे लाटांमुळे क्षरण होऊन भूशिरांची निर्मिती होते. ऑस्ट्रेलियातील ‘केप यॉर्क’ हे या प्रकारातील एक महत्त्वाचे उदाहरण आहे.
चौंडे, मा. ल.
“