भूतप : उत्तर भगोलार्धातील एक मोठा तारकासमूह (क्षेत्रफळ सु. ९०७ चौरस अंश). इंग्रजीत सप्तर्षीला मोठे अस्वल असे संबोधिले जाते व भूतप तारकासमूह सप्तर्षीमागून उगवतो म्हणून या तारकासमूहाला अस्वल हाकणारा किंवा राखणारा दरवेशी म्हणतात. बैल हाकणारा, नांगर धरणारा त्याचप्रमाणे एका हातात काठी व दुसऱ्या हातात दोन कुत्र्यांना बांधलेल्या दोऱ्या धरणारा मनुष्य अशा याच्या आकृतीविषयीच्या कल्पना केलेल्या आहेत. भूतप हा उत्तर मुकुट व अरुंधती केश (किंवा श्यामशबल) या तारकासूमहांच्या दरम्यान असून त्यामध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारे १४९ तारे आहेत. फार प्राचीन काळापासून प्रथम नोंदलेल्या महत्त्वाच्या तारकासमूहांपैकी हा एक आहे. भूतपाचा मध्य होरा १४°.५ व क्रांती उत्तर ३०° [ ⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] असून त्याचा विस्तार उत्तर क्रांती ८° ते ५५° पर्यंत आहे. स्वाती ( आल्फा बूटीस ) हा आकाशातील चौथ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा या समूहातील त्याचप्रमाणे खगोलीय विषुववृत्ताच्या उत्तरेकडील सर्वांत तेजस्वी तारा आहे. हा सोडल्यास या तारकासमूहात पहिल्या व दुसऱ्या प्रतीचे [ ⟶ प्रत] तारे नाहीत व चौथ्या प्रतीपर्यंतचे ५ तारे आहेत. बीटा, गॅमा,ऱ्ही, एप्सायलॉन व डेल्टा या पाच ताऱ्यांमुळे बनणारी पंचकोनी आकृती लांबट पतंगासारखी दिसते. पतंगाकृतीचा व्यास २०° पेक्षा अधिक असून पतंगाच्या शेपटाच्या जागी स्वाती तारा आहे. लहान दुर्बिणीमधूनही दिसू शकतील असे विविधरंगी अनेक युग्मतारे (एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणाने आपल्या समाईक गुरुत्वमध्याभोवती फिरणाऱ्या ताऱ्यांच्या जोड्या ) हे भूतपाचे वैशिष्ट्य आहे. एप्सायलॉन, म्यू व डेल्टा हे असे युग्मतारे असून एप्सायलॉन हा फिकट नारिंगी व निळसर हिरवा अशा दोन रंगीत ताऱ्यांचा बनलेला आहे. स्वातीच्या उत्तरेस सु. १०° अंतरावर एक तारकागुच्छ आहे. एप्रिलच्या शेवटी मध्यरात्री भूतप याम्योत्तरवृत्तावर ( खगोलाचे ध्रुवबिंदू व निरीक्षकाचे खस्वस्तिक-माथ्यावरील बिंदू-यांतून जाणाऱ्या वर्तुळावर) येतो. उत्तर गोलार्धातून कोठूनही व दक्षिण गोलार्धातील बऱ्याच प्रदेशांवरून हा तारकासमूह दिसू शकतो.