भूज : गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व भूतपूर्व कच्छ संस्थानची राजधानी. लोकसंख्या ६९,७३० (१९८१). हे अहमदाबादच्या पश्चिमेस सु. ३०४ किमी. कच्छच्या रणात वसलेले आहे. हे इतिहासप्रसिद्ध शहर पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद-भूज या लोहमार्गाचे अंतिम स्थानक असून रस्त्यांनी गुजरातमधील इतर शहरांशी जोडलेले आहे. येथे विमानतळही आहे. पहिला राव खेंगार याने १५४८ मध्ये येथे राजधानी केली. १५९० मध्ये हे मोगलांच्या ताब्यात गेले व ‘सुलेमाननगर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. राव गोदजी याने यास १७२३ मध्ये तटबंदी केली. १८१९ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्याच वर्षी झालेल्या भूकंपामुळे शहराचे अतोनात नुकसान झाले. आसमंतातील कृषिमालाची एक बाजारपेठ म्हणून हे विशेष प्रसिद्ध आहे. येथे चाकू-सुऱ्या यांसारख्या वस्तूंची निर्मिती, तेलगिरण्या हे उद्योग प्रमुख असून भरतकामासारखे हस्तव्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात. भूज हे कच्छ जिल्ह्याचे शैक्षणिक केंद्र असून तेथे सहा माध्यमिक शाळा, एक शिक्षक महाविद्यालय आणि विधी, कला, विज्ञान व वाणिज्य यांचे प्रत्येकी एक महाविद्यालय आहे. भूज येथे आकाशवाणीचे केंद्र आहे. राव प्रागमल याने सु. १८६५ मध्ये बांधलेला राजवाडा व त्यातील ‘ऐना महल’ (आरसे महाल), दरबार हॉल, कारंजे इ. प्रेक्षणीय आहेत. शहराजवळील ‘भूजिया किल्ला’, टेकडीवरील भुजंगनाथ मंदिर, नगरभवन, कच्छ संग्रहालय इ. उल्लेखनीय असून हमीरसर आणि देसलसर या सरोवरांमुळे आणि राजेंद्र, खेंगार, नाझर इ. उद्यानांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. येथील स्वामी नारायण, हटकेश्वरजी यांची मंदिरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. यांशिवाय राव लाखोजी छत्री (सु. १७७०), जमादार फतेह मुहंमदाचा कबर, पन्ना मशीद इ. ऐतिहासिक वास्तू पर्यटकांची आकर्षणे होत.
गाडे, ना. स.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..