भुतकेस : (लावसट हिं. सखद, बेदिना क. हस्तिगिड सं. श्रीवती इं. पेपर चेस ट्री धोबीज ट्री लॅ. म्युसेंडा फ्राँडोजा कुल-रूबिएसी). हे दुसऱ्या वनस्पतीवर किंवा अन्य आधारावर चढणारे झुडूप (किंवा लहान वृक्ष) असून भारतात उष्ण कटिबंधीय हिमालयात डेहराडूनपासून पूर्वेस, खासी टेकड्या, आसाम, द्विपकल्पाचा दक्षिण भाग व अंदमान येथे आणि मलाया, ब्रह्मदेश व श्रीलंका ह्या देशांत आढळते. कोठे कोठे हे शोभेकरिता बागेत लावतात. ह्या वनस्पतीच्या वंशात (म्युसेंडा ) एकूण सु. २०० जाती असून त्यांपैकी भारतात १५ आढळतात. म्यु. फ्राँडोजा ह्या जातीत अनेक प्रकार आढळलेले असून त्यांपैकी कित्येकांना आता जातींचा दर्जा दिला गेला आहे. तथापि त्यांच्या औषधी गुणधर्मांना व इतर उपयोगांना प्रकार व जाती बनविताना महत्त्व दिलेले नाही, असा उल्लेख आढळतो. बागेत विशेषकरून लागवडीत असलेली जाती म्यु. फ्राँडोजाचा ग्‍लॅब्राटा प्रकार (किंवा म्यु. ग्‍लॅब्राटा ही जाती) आहे.

भुतकेसाच्या खोडाची साल करडी व पाने साधी (७.५-१२.५ × ५-९ सेंमी.), समोरासमोर, पातळ, दीर्घवृत्ताकृती-आयत किंवा अंडाकृती आणि फांद्या कोनीय व केसाळ असतात. उपपर्णे (पानाच्या तळाशी असलेली लहान उपांगे) जुळी (६ × २.५ मिमी.), लांबट, टोकदार व केसाळ फुलोरे फांद्यांच्या टोकांशी वल्लरीप्रमाणे [⟶ पुष्पबंध] फुले लहान (२.५ × ३.५ सेंमी.) व द्विलिंगी असून पावसाळ्यात येतात संवर्ताच्या (पाकळ्यांखालच्या पुष्पदलांच्या) पाच भागांपैकी एक पानासारखे मोठे (६-१० × ३.५-६ सेंमी.), पिवळट पांढरे व आकर्षक पुष्पमुकुट खाली नळीसारखा पण वर तबकडीसारखा (अपछत्राकृती), बाहेरून हिरवट पिवळा व मध्यावर गर्द पिवळा केसरदले पाच व त्यांचे तंतू फार आखूड किंजपुटात दोन कप्पे व बीजके अनेक [⟶ फूल] मृदुफळ लांबट गोलसर, गुळीगुळीत व सु. १-१.५ सेंमी. लांब बिया फार बारीक व अनेक, खाचदार आणि सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या) असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨रुबिएसीत (कदंब कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

भुतकेसाचे लाकूड नरम, पांढरे व साधारण कठीण असून चमचे, पळ्या इ. किरकोळ वस्तू व काही कातीव कामास उपयुक्त असते पाने व मोठे संदल खाद्य असून त्यांचे खतही बनते. पाने व फुले जखमांवर लावण्यास चांगली सुक्या फांद्यांचा काढा मुलांना खोकल्यावर देतात. मुळे कडू, आरोग्यप्रद, शामक (आग कमी करणारी) असून श्वेतकुष्ठ (पांढरे कोड) व डोळ्यांच्या विकारांवर गुणकारी असतात पांढरी संदले दुधातून काविळीवर देतात. फुले मूत्रल (लघवी साफ करणारी), दमा, पाळीचा ताप, जलशोथ (पाणी साठून आलेली सूज) इत्यादींवर उपयुक्त. बिया व कलमे लावून नवीन लागवड करता येते.

म्यु. फ्राँडोजाच्या ग्‍लॅब्राटा प्रकारात फांद्या, देठ व शिरा लालसर असून फुले शेंदरी व मध्यभागी कंठाजवळ पिवळी असतात. म्यु. ग्‍लॅब्रा ही पिवळ्या फुलाची हिमालयी जाती कुंपणाकरिता व औषधाकरिता लावतात हिची पाने चटणी व कोशिंबिरीत घालतात. म्यु. एरिथ्रोफिला ही शोभेकरिता बागेत लावतात हिला पिवळी फुले येतात, पण संदले शेंदरी असतात ही दीपक (भूक वाढविणारी) आहे. म्यु. ल्यूटिओला ही आफ्रिकी जातीही कुंपणाकरिता लावतात हिला हिरवी संदले व पिवळी फुले येतात. म्यु. रॉक्सबर्घाय ही नेपाळ व त्याच्या पूर्वेस आणि आसाम, उ. बंगाल ह्या प्रदेशांत कुंपणाकरिता लावतात हिच्या पानांची भाजी करतात पानांपासून मिळालेला रंग टोपल्या रंगविण्यास वापरतात. (चित्रपत्र ६०).

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Materials Plats, Vol. II, Delhi, 1975.

हार्डीकर, कमला श्री. परांडेकर, शं. आ.

भूतकेस