भुंगेरा : कोलिऑप्टेरा गणातील कीटकांना भुंगेरे (मुद्गल) म्हणतात. या कीटकांना चार पंख असतात. त्यांपैकी पुढील दोन पंखांचे रूपांतर (परिवर्तन) कठीण व शृंगमय पदार्थात (केराटीन या तंतुमय प्रथिनात) झालेले असते. या कठीण कवचाखाली मागील पंख झाकलेले असतात व याचेच आवरण उदरावर असते. या कठीण आवरणास ‘इलीट्रा’ असे म्हणतात. भुंगेऱ्यांची संख्या अगणित आहे व त्यांचे प्रकारही पुष्कळ आहेत. काही भुंगेरे आकारमानाने खूप मोठे, तर काही अत्यंत सूक्ष्म आहेत. डायॅनीस्टस हर्क्युलिस या नावाचा गेंडा भुंगेरा सु. १७ सेंमी. लांबीचा असू शकतो. काही भुंगेऱ्यांचे आकारमान माणसाच्या मुठीएवढे असते, तर काही भुंगेरे दोन मिमी. इतके लहान असतात. कोलिऑप्टेरा हा गण कीटकांतील सर्वांत मोठा गण होय. यात सु. २,५०,००० जातींचा समावेश आहे. ही संख्या प्राण्यांच्या सर्व जातींच्या सु. पावपट आहे. हे कीटक सर्वत्र आढळतात. यांपैकी बरेचसे भक्ष्योपजीवी (इतर प्राण्यांची हिंसा करून उपजीविका करणारे) किंवा वनस्पतिभक्षक आहेत पण काही कुजके किंवा सडके पदार्थ खाऊनही उपजीविका करतात. सडक्या वनस्पतींवर, मेलेल्या प्राण्यांच्या शरीरावर, वनस्पतींच्या ऊतकांत (समान रचना न कार्य असलेल्या पेशींच्या समूहात) किंवा कवकांवरही (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींवरही) हे आढळतात. जमिनीत खोलवर किंवा पाण्यावर पोहून जातानाही हे दिसतात. विषुववृत्तापासून उत्तर किंवा दक्षिण ध्रुवापर्यंत, रानावनात, वाळवंटात, दऱ्याखोऱ्यांत किंवा डोंगरमाथ्यांवर हे सर्वत्र आढळतात. ५०° से. तापमान असलेल्या लवणयुक्त पाण्याच्या झऱ्यांतही ते आढळले आहेत. या गणातील काही इतर कीटकांच्या घरट्यांत पाहुणे म्हणून राहतात, तर काही अन्य कीटकांच्या शरीरावर किंवा प्राण्यांच्या शरीरावर परोपजीवी (इतर जीवांवर उपजीविका करणारे) प्राणी म्हणून जगतात. मनुष्याने स्वतःकरिता साठवून ठेवलेल्या अन्नधान्य व इतर वस्तूंच्या साठ्याचाही हे नाश करतात.
शरीररचना : भुंगेऱ्यांच्या शरीररचनेत त्यांच्या सवयी व राहणीनुसार बरेच फरक आढळतात, यामुळे त्यांचे शरीररचनात्मक वर्णन एकाच प्रकारचे असू शकत नाही. काही भुंगेऱ्यांत इलीट्राचा तर काहींत पंखांचा अभाव आढळतो. सर्वसाधारणपणे भुंगेऱ्यांच्या शरीराचे डोके, वक्ष (छाती) व उदर (पोट) असे तीन भाग पडतात. डोक्यावर शृंगिकांची (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रियांची) एक जोडी, डोळे व अन्न चावून खाण्यास योग्य अशी मुखांगे (तोंडाचे अवयव) असतात. त्यांचे जबडे मजबूत व तीक्ष्ण असून लाकडासारखे कठीण पदार्थ कुरतडण्यास योग्य असे असतात. वक्षाचे तीन खंड (भाग) असून प्रत्येक खंडावर पायाची एक जोडी आणि दुसऱ्या व तिसऱ्या वक्षखंडावर पंखांची एक जोडी असते. पंखाच्या पहिल्या जोडीमुळे उदरखंडाच्या वरील बाजूचे रक्षण होते. पंखाची दुसरी जोडी उड्डाणास उपयेगी पडते. उदरखंडांची खालील बाजू टकण व कठीण असते.
उदर दहा खंडांचे बनलेले असते. प्रत्यके खंडांवर श्वासरंध्रांची (हवा घेण्याच्या छिद्रांची) एक जोडी असते. पायांच्या उपयोग निरनिराळ्या कामांकरिता (उदा., धावणे, पोहणे, उड्या मारणे, उकरणे किंवा पकडणे) केला जातो. ज्या कामाकरिता पायांचा उपयोग केला जातो, त्याला अनुरूप अशी पायांची रचना असते. काही भुंगेऱ्यांचे पंख उड्डाणास अनुकूल नसतात, तर काहींत लांब व जबरदस्त उड्डाण केले जाते. काही भुंगेरे थवे करून उड्डाण करतात. भुंगेरे काळे, तपकिरी, उदी, पांढरे व फिक्या रंगाचे असतात, तर काही चकाकणाऱ्या निळ्या, हिरव्या, जांभळ्या अगर लाल रंगांचे असतात. आपल्या अंगावरील कठीण कवचामुळे भुंगेरे सहसा चिरडले जात नाहीत व यामुळे शत्रूपासून त्यांचे संरक्षण होते.
जीवनक्रम : अंड्यातून बाहेर पडल्यावर डिंभास (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेत) ताबडतोब अन्न मिळेल अशा ठिकाणी किंवा अशा वस्तूवरच भुंगेरे अंडी घालतात. अंडी पांढरी व गोल असून त्यांतून डिंभ बाहेर पडतात. हे डिंभ विविध प्रकारचे असतात. काही लांब तर काही आखूड, काही गोल तर काही चापट, काही जाड तर काही बारीक, काही केसाळ तर काही तुळतुळीत असे असतात. डिंभाच्या शरीराचे डोके, वक्ष व उदर असे तीन भाग असतात. डोक्यावर शृंगिकांची एक जोडी, गोल आकाराचे अनेक डोळ आणि अन्न चावून व कुरतडून खाण्यास योग्य अशी मुखांगे असतात. पाण्यात राहणाऱ्या जीवभक्षक डिंभांना लांब व तीक्ष्ण जबडे असतात व यामुळे त्यांना भक्ष्य पकडणे सोपे जाते. काही जातींच्या डिंभांना वृक्षखंडावर पायाच्या तीन जोड्या असतात, तर काही डिंभांना पाय नसतात. डिंभावस्था अनेक दिवसांची असून या मुदतीत डिंग अनेक वेळा कात टाकतो व हळूहळू आकारमानाने वाढत जातो. या अळीरूपी डिंभाची पूर्ण वाढ झाल्यावर त्याचे कोशात रूपांतर होते. ही अवस्था काही दिवस टिकते व नंतर कोशामधून पूर्णावस्थेतील कीटक बाहेर पडतो. अशा तऱ्हेने भुंगेऱ्यांच्या जीवनक्रमात रूपांतर होते. डिंभावस्थेत व पूर्ण वाढ झालेल्या कीटकावस्थेत वनस्पतींना व इतर वस्तूंना यांचा फार उपद्रव होतो. जुनी लाकडे फोडल्यानंतर ज्या अळ्या बाहेर पडतात किंवा शेणाच्या ढिगाऱ्यातून तांबड्या डोळ्यांच्या व तीक्ष्ण जबड्याच्या ज्या अळ्या आढळतात त्या या कीटकांच्याच होत.
उपजीविका : जमिनीवर राहणाऱ्या काही भुंगेऱ्यांच्या जाती, व्याघ्र भुंगेरे, चित्रांग भुंगेरे व काही पाणबुडे भुंगेरे हे मांसाहारी आहेत. हे व यांचे डिंभ इतर लहान प्राण्यांना पकडून त्यांच्यावर आपली उपजीविका करतात. काही भुंगेऱ्यात डिंभ परोपजीवी असतात, तर त्यांच्यापासून पूर्ण वाढ झालेला कीटक मुक्तजीवी असतो. याच गणात समाविष्ट केलेल्या टोके या कीटकांच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. [⟶ टोका]. मुळापासून फळापर्यंत झाडाचा कोणताही भाग यांच्या उपद्रवापासून सुटत नाही. अन्नधान्याच्या साठ्यांचे हे कीटक फार नुकसान करतात. काही भुंगेरे भुंग्यांच्या किंवा वाळव्यांच्या वारुळांत राहतात, तर काही दगडांच्या कपारीत किंवा मोठाल्या खडकांच्या बुडाशी सापडतात. समुद्रकिनाऱ्यावर वाळूतही काही जाती आढळल्या आहेत. काही बाह्य परोपजीवी म्हणून सस्तन पाण्यांच्या शरीरावर राहतात.
स्वसंरक्षण : शत्रूपासून स्वसंरक्षण करण्यासाठी काहीच्या शरीरावर निरनिराळे रंग असतात. काहींचे शरीर मखमली कवकासारखे असते, तर काहींच्या शृंगिका वाळलेल्या प्रतानासारख्या (तनाव्यासारख्या) असतात. काही टोके शत्रूची चाहूल लागल्याबरोबर मेल्यासारखे निश्चल पडून राहतात, तर काही आपले हातपाय शरीराजवळ आकसून स्वस्थ पडतात. या अवस्थेत ते एखाद्या बीसारखे दिसतात. काही भुंगेरे अत्यंत दुर्गंधीयुक्त वास सोडतात. काहींच्या (उदा., पिंगूळ किंवा पादरा किडा) शरीरातून दुर्गंधीयुक्त द्रवही बाहेर टाकला जातो.
ध्वनी व प्रकाश निर्मिती : काही भुंगेरे अत्यंत कर्कश असा आवाज काढतात. हा आवाज शरीरातील एका विशिष्ट भागाचे दुसऱ्या भागाशी घर्षण झाले म्हणजे निर्माण होतो. या आवाजामुळे नर व मादी एकमेकांकडे आकर्षिले जातात. हे आवाज नर व मादी दोघेही करतात. काही भुंगेऱ्यांत पूर्ण वाढ झालेल्या कीटकातच असले आवाज काढण्याची क्षमता असते असे नाही, तर त्यांचे डिंभही असे आवाज काढून एकमेकांस संदेश देतात.
काही भुंगेऱ्यांच्या जातींत आवाजाऐवजी प्रकाश निर्माण करून संदेश देण्याची क्षमता आहे. हा प्रकाश देणारे एक प्रदीप्ती अंग असते. या अंगात प्रकाश देणारा बहिःस्तर व प्रकाशाचे परावर्तन करणारा अंतःस्तर असतो. बहिःस्तरास श्वासनालातून ऑक्सिजनाचा पुरवठा केला जातो. अंतःस्तरात युरेटाच्या स्फटिकांद्वारे प्रकाशाचे परावर्तन केले जाते. ल्युसिफेरीन या संयुगाचे ल्युसिफेरेज या एंझाइमाद्वारे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनाद्वारे) ऑक्सिजनाच्या साह्याने ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन] होते आणि प्रकाश निर्माण होतो. या जातीच्या भुंगेऱ्यांचा समावेश लँपिरीडी व इतर काही कुलांत होतो. रात्रीच्या वेळी आढळणाऱ्या सुपरिचित काजव्यांचा या कुलात समावेश होतो. काही काजव्यांत मादीचा प्रकाश जास्त, तर नराचा कमी तर काहींत दोहोंचा प्रकाश सारखाच असतो. [⟶ काजवा जीवदीप्ति].
उपद्रव व उपयुक्तता : पुष्कळ भुंगेरे डिंभावस्थेत किंवा प्रौढावस्थेत उपद्रव्यकारक असतात. शेतातील उभ्या पिकांचा व अन्नधान्यांचा हे नाश करतात. अन्नधान्याप्रमाणेच पालेभाज्या, फळभाज्या व कंदमुळे यांवरही यांचा हल्ला होतो. बटाट्यासारख्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पिकांचा काही वेळा याच कीटकांमुळे पूर्णपणे नाश झालेला आहे. काही टोके फारच उपद्रवी आहेत. कापसाचा विध्वंस, साठविलेल्या धान्याचा नाश व जमिनीतील कंदमुळे खाणे हे काही टोक्यांचे वैशिष्ट्य आहे. एका जातीचे टोके तर दूरध्वनीच्या केबलींवरील शिशाच्या आवरणास भोके पाडतात आणि या भोकांतून बाष्प वा पाणी केबलीत शिरल्याने मंडलसंक्षेप (शॉर्ट सर्किट) होऊन संदेशवहनात बिघाड निर्माण होतो [⟶ केबल छिद्रक कीटक]. सुती व रेशमी कापड, तसेच गालिचे यांचा नाश करणारेही बरेचसे भुंगेरे आहेत.
काही जातींचे भुंगेरे मानवास उपयुक्त आहेत. झाडावरील ⇨खवले किडयांचा व ⇨पिठ्या ढेकणांचा नाश काही भुंगेऱ्यांकडून होतो व त्यामुळे शेतातील उपयुक्त वनस्पतींचे रक्षण होते. काही पतंगांच्या सुरवंटांचा नाश करण्याकरिता यूरोपातून कॅलोसोमा सायकोफँटा या भुंगेऱ्यांची उत्तर अमेरिकेत आयात केली गेली. हिस्टेरिडी कुलातील पुष्कळ जातींच्या भुंगेऱ्यांचा उपयोग घरातील माश्या, केळीच्या मुळास उपद्रव्य करणारे कीटक किंवा ताल (पाम) वृक्षांस उपद्रव देणारे टोके यांचा नाश करण्यासाठी केला जातो. या उपद्रवी कीटकांवर हे भुंगेरे आपली उपजीविका करतात.
काही भुंगेरे वैद्यकीय दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मेलॅनिडी कुलातील भुंगेऱ्यांना ⇨सोसा किंवा हिंगे म्हणतात. मानवाच्या कातडीवर जर हे भुंगेरे चिरडले गेले किंवा या भुंगेऱ्याकडून निघालेला द्रव पदार्थ जर कातडीस लागला, तर कातडीवर फोड उठतात. जगातील काही प्रदेशांत अशा भुंगेऱ्यांमुळे अंगावर फोड उठण्याचे साथीचे रोग उद्भवतात. ⇨कँथर्डिन हे द्रव्य कातड्यास लागले, तर फोड येतो. हे कँथर्डिन काही जातींच्या सोसा भुंगेऱ्यांपासून मिळते. आँथोफॅगस या वंशातील काही भुंगेरे लहान मुलांच्या आतड्यात आढळतात. काही भुंगेऱ्यांत फीतकृमीच्या जीवनचक्रातील एखादी अवस्था आढळते. वनस्पतींचे कित्येक रोग भुंगेऱ्यांमुळे उद्भवतात. भुंगेऱ्यांचे नियंत्रण करण्यासाठी प्रमाणभूत कीटकनाशके वापरली जातात.
वर्गीकरण : भुंगेऱ्यांची १३५ कुले ज्ञात आहेत. ही कुले तीन उपगणांत विभागली आहेत.
आर्कोस्टेमॅटा : या उपगणात क्युपेसिडी हे एकच लहान व दुर्मिळ कुल आहे. यातील भुंगेरे आदिम (आद्य) स्थितीतील आहेत. हे भुंगेरे भारतात आढळलेले नाहीत.
ॲडिफॅगा : यातील सर्व कुले (सु. सात) कॅरॅबिडिया या अधिकुलात अंतर्भुत आहेत. यांपैकी तीन कुले प्रमुख आहेत. सिसिंडेलिडी या कुलातील भुंगेरे शिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. यांना व्याघ्र भुंगेरे (टायगर बीटल) असे म्हणतात. या कुलातील सिसिंडेला या वंशाच्या बऱ्याच जाती भारतात आढळतात.
कॅरॅबिडी कुलातील भुंगेरे जमिनीवरील चालणारे भुंगेरे म्हणून ओळखले जातात. ते दगडाखाली, जमिनीत किंवा लाकडाच्या ओंडक्याखाली आढळतात. त्यांचे पाय धावण्यास किंवा जमीन उकरण्यास योग्य असे असतात. यांना पंख नसल्यामुळे उडता येत नाही. हे निशाचर प्राणी होत. यांच्या २५,००० जाती ज्ञात असून त्यांपैकी काही भारतात आढळतात.
डिटिस्किडी या कुलातील भुंगेरे पाण्यात आढळतात. यांपैकी काही वाहत्या पाण्यात, तर काही स्थिर पाण्यात, काही गरम पाण्याच्या झऱ्यात, तर काही मचूळ पाण्यात सापडले आहेत. त्यांचे आकारमान लहानापासून बरेच मोठे म्हणजे काही सेंमी.पर्यंत असू शकते. यांचे रंगही करडे, काळे किंवा हिरवट असतात. हे पाण्यात डुबून राहतात व ठराविक वेळेस हवा घेण्यास पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. यांच्या २,००० जाती ज्ञात असून त्यांपैकी काही भारतात आढळतात.
पॉलिफॅगा : भुंगेऱ्यांच्या बहुसंख्य जाती (सु. ९०%) या उपगणात समाविष्ट आहेत. हा उपगम १८ अधिकुलांत विभागला आहे. या उपगणातील काही महत्त्वाच्या कीटकांचाच येथे नुसता निर्देश केलेला आहे.
जल अपमार्जक हा भुंगेरा साधारणपणे कुजके वनस्पतिजन्य पदार्थ ज्या पाण्यात आढळतात तेथे राहतो व कुजक्या पदार्थांवर उपजीविका करतो. पोलादी भुंगेरे हे लहान आकारमानाचे चकाकणारे तपकिरी किंवा काळ्या रंगाचे भुंगेरे जनावरांच्या शेणपोवात आढळतात. कॅरियन भुंगेरे, सेक्स्टन भुंगेरे व बेरिइंग (लहान प्राण्यांची मृत शरीरे जमिनीत पुरून त्यात अंडी घालणारे) भुंगेरे हे भुंगेरे आकारमान मोठे असून ते प्राण्यांच्या मृत शरीरावर आढळतात. मृत प्राण्याचे कुजके मांस हे त्यांचे खाद्य होय. मुंगीसदृश अश्म भुंगेरे हे लहान मुंगीच्या आकारमानाचे शेवाळ्यात, दगड व लाकूड यांखाली आणि मुंग्यांच्या वारुळांत आढळणारे भुंगेरे होत. कवकांवर राहणाऱ्या लहान आकारमानाच्या चकाकणाऱ्या भुंगेऱ्यांना कवक भुंगेरे म्हणतात. कुजक्या झाडांत राहणाऱ्या, ३ ते १० सेंमी. लांबीच्या, हरणाच्या शिंगासारखे लांब शाखायुक्त जंभ (जबडे) असलेल्या आणि काळा किंवा तपकिरी रंग असलेल्या भुंगेऱ्याला मृगशृंगी भुंगेरा म्हणतात. शेणकिडा (स्कॅरॅब) सस्तन प्राण्यांच्या शेणात राहतो व वाढतो. मे-जून महिन्यांच्या सुमारास आढळणारे जून भुंगेरे हे निरनिराळ्या रंगांचे असून ते अन्नधान्यांची, उसाची व फळांची नासाडी करतात. या भुंगेऱ्यांचे डिंभही शेंगदाणे, नारळ वगैरेंची नासाडी करतात. गेंडा भुंगेरा हा माडाची नासधूस करण्याबद्दल प्रसिद्ध आहे. ह्या भुंगेऱ्यांची उत्पत्ती खताच्या खड्ड्यांत किंवा कुजणाऱ्या पालापाचोळ्यात होते. याची लांबी ५ सेंमी.पर्यंत असू शकते. फुलांची नासधूस करणाऱ्या भुंगेऱ्यांच्या बऱ्याच जाती आहेत. काजवे हे भुंगेरेच होत. यांच्या शरीरात प्रकाश निर्माण करणारे इंद्रिय असते. सिगारेट भुंगेरे हे तंबाखू, सिगारेट, मसाले यांचा नाश करतात. काही भुंगेरे फर्निचर, बांबू व तत्सम इतर लाकडी वस्तूंचा नाश करतात. कँथर्डिन ज्या सोसा भुंगेऱ्यांपासून मिळते त्यांचाही याच उपगणात समावेश होतो. संत्री, आंबा, द्राक्षे, कॉफी, सफरचंद्र, साल, सागवान, काकडी, भोपाळा व इतर अनेक उपयुक्त वनस्पतींस निरनिराळ्या जातींच्या भुंगेऱ्यांपासून उपद्रव पोहोचतो. टोके या भुंगेऱ्यांचे डोके लांब चोचीसारखे किंवा सोंडेसारखे लांबट असून विविध अन्नपदार्थांचा ते नाश करतात.
वरील वर्णनावरून असे आढळून येईल की, मानवाच्या गरजेच्या बहुतेक सर्व वस्तू या कीटकांच्या उपद्रवापासून सुटू शकलेल्या नाहीत.
पहा : काजवा काष्टकीटक कीटक कीटक नियंत्रण कीटकांचे वर्गीकरण केबल छिद्रक कीटक गेंडा भुंगेरा चर्म भुंगेरा चित्रांग भुंगेरा टोका ठिपके भुंगेरा धनुर पिसू भुंगेरा भिरूड भोपळा भुंगेरा शेणकिडा सोसा.
संदर्भ : 1. Imms, A. D. A General Textbook of Entomology, Bombay, 1961.
2. Nayar, K. K. Ananthakrishnan. T. N. David, B. V. General and Applied Entomology, New Delhi, 1976.
रानडे, द. र. इनामदार, ना. भा.
“