भीमाशंकर : महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. हे खेडच्या वायव्येस ४८ किमी खेड तालुक्यात सह्याद्रीच्या रांगेत १,०५१ मी. उंचीवर आहे. येथील महादेवाचे मंदिर हेमाडपंती असून या मंदिराच्या भिंतीवर ब्रह्मा, गणपती, परशुराम इत्यादींच्या मूर्ती आहेत. मंदिरात नंदीची भव्य मूर्ती आहे. या मंदिरात १७२९ अशी अक्षरे कोरलेली एक मोठी घंटा आहे. घंटेवर मानवी आकृती असून ती कुमारी मेरीची असावी. मराठा सरदारांनी वसई घेतली तेव्हा ही घंटा सु. १७३९ च्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील वाशिंदहून (कल्याणजवळ) आणली असे म्हणतात. या मंदिराचे बांधकाम नाना फडणीसांनी केले व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नीने कळसाचे काम पूर्ण केले. मंदिराजवळच मोक्षकुंड व ज्ञानकुंड आहे. येथे साक्षी विनायक, हनुमान, कमळजा देवी यांची मंदिरे आहेत.

भीमा नदीचा उगम जवळच झालेला असून येथील वनास ‘डाकिनीचे वन’ म्हणतात. या ज्योतिर्लिंगाविषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

गाडे, ना. स.