भिवंडी : महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,१५,२५६ (१९८१). यंत्रमागांचे शहर अशी भिवंडीची प्रसिद्धी आहे. हे मुंबईच्या ईशान्येस सु. ५० किमी. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. दळणवळणाच्या साधनांची विपुलता, मुंबईसारख्या औद्योगिक शहराचे व बंदराचे सान्निध्य यांमुळे येथे उद्योगधंद्यांची भरभराट झालेली आढळते. शहरात यंत्रमाग उद्योगात शेकडो लोक गुंतलेले असून येथील कापड भारतामध्ये सर्वत्र व परदेशांसही निर्यात केले जाते. भारताच्या निरनिराळ्या राज्यांतून अनेक लोक या उद्योगातील रोजगारासाठी येथे आले आहेत. याशिवाय भात सडणे, भात गिरण्यांच्या यंत्रसामग्रीचे उत्पादन, लाकूड कापणे इ. उद्योगांचा विकास झालेला आहे. येथे १८६५ पासून नगरपालिका आहे. शहरात मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आहे.
गाडे, ना. स.