भाषाकुटुंब : भाषाकुंटुंब ही एक ऐतिहासिक स्वरूपाची कल्पना आहे. ‘कुटुंब’ या शब्दाने अनेक व्यक्तींचा समूह व्यक्त होतो. पण या सर्व व्यक्तींचा परस्परांशी एका निश्चित स्वरूपाचा रक्तसंबंध असतो आणि पुराव्याच्या आधारे मागे जात राहिले, तर शेवटी आपण एका मूळ व्यक्तीकडे येतो. ही मूळ व्यक्ती ठरवणे केवळ आपल्या सोयीनुसार आपण करतो. म्हणजेच आपण एक मर्यादा आखून घेतो व तिथेच थांबतो. या मर्यादेपलीकडेही वंशरेषा जातच असते. पण इतिहास हा स्थल-काल-व्यक्तींच्या मर्यादा घातल्याशिवाय सिद्ध होत नाही, हे या अभ्यासाचे आद्यसूत्र आहे.
भाषांच्या संबंधातही संबंधित किंवा एककुटुंबीय भाषा असा प्रयोग करण्यात येतो. यातील संबंधित आणि एककुंटुबीय या कल्पना स्पष्ट झाल्या, तर भाषाकुंटूब याचा अर्थ समजू शकेल.
दोन भाषा संबंधित आहेत, त्यांचे एकमेकींशी बहिणीचे, मायलेकीचे नाते आहे, असे म्हणण्यात येते. हा प्रयोग केवळ आलंकारिक आहे. कारण हे नाते म्हणजे काय हे तपासून पाहिले, म्हणजेच प्रत्यक्षात काय घडते याचा अभ्यास केला, तर त्यातली विसंगती लक्षात येईल.
जेव्हा दोन भाषांचा इतिहास पहात आपण मागे जाऊ लागतो आणि अशा प्रकारे मागे जाताजाता आपण एकच मूळ भाषेकडे येऊन पोचतो, तेव्हा त्या भाषांना संबंधित भाषा म्हणतात. मराठी व गुजराती, फ्रेंच व इटालियन, कन्नड व तेलुगू, हिब्रू व अरबी ही अशा संबंधित भाषांची उदाहरणे आहेत. पण केवळ दोनच भाषांचा विचार न करता आपण शक्य तितक्या सर्व संबंधित भांषाचा विचार केला, तर जो समूह तयार होईल त्याला ‘भाषिक कुंटुब’ हे नाव दिले जाते. सिंधीपासून आसामीपर्यंत आणि काश्मीरीपासून कोकणीपर्यत ज्या भांषाचे मूळ संस्कृत किंवा तत्सम एखाद्या भाषेत आहे असे दाखवता येते, त्यांच्या समूहाला भाषिक कुंटुब म्हणावे लागेल.
पण कित्येकदा असे समूहदेखील इतर अशात काही समूंहाशी अशाच प्रकारे जोडलेले असतात आणि मग हे भाषिंक कुंटुब आणखी मोठे, आणखी व्यापक व आणखी मागे जाणारे किंवा प्राचीन आहे, असे आपल्याला आढळते. संस्कृत, इराणी, ग्रीक, लॅटिन, जर्मानिक इ. भारतापासून इंग्लंडपर्यंत पसरलेली अनेक भाषांकुटुंबे या मोठ्या भाषांकुटुबात सामील करण्याजोगी आहेत, हेही लक्षात येते. मग हे महाकुटुंब हेच मूळ कुटुंब असून बाकीचे भाषासमूह हे त्याचे गट, उपकुटुंबे किंवा शाखा आहेत, असे ठरते. या शाखांतही काही शाखा एकमेकींच्या अधिक जवळच्या असून महाकुंटुब व शाखा यांच्या दरम्यान त्यांची एक महाशाखा मानता येते. या तत्त्वानुसार इंडोयूरोपीयन कुटुंबात आर्य (संस्कृत-इराणी), बाल्टो-स्लाव्हिक, इटालो-केल्टिक असेही वर्गीकरण सोयीसाठी केले जाते.
पण सर्वांत मुलभूत मुद्दक आहे तो हा की, दोन किंवा अधिक भाषा संबंधित आहेत, हे ठरवायचे कसे ?- यासाठी भाषेच्या मुलभूत तत्त्वांचा आधार घेवून अभ्यासकांची एक पद्धत शोधून काढली आहे. तिला थोडक्यात ऐतिहासिक-तुलनात्मक पद्धत हे नाव आहे.
मूलभूत तत्त्वे आणि पद्धती : संकेत बनवणारे ध्वनी त्यांनी व्यक्त होणाऱ्या अर्थाशी कोणत्याही निसर्गसिद्ध कार्यकारणभावाने बांधलेले नसतात. त्यांच्यातले नाते हे परंपरागत सामाजिक मान्यतेचे असते, हा भाषा या विनिमयसाधनाचा एक मूलभूत सिद्धांत आहे. म्हणजेच कोणतीही भाषा, कोणताही अर्थ व्यक्त करण्यासाठी कोणतेही ध्वनिरूप वापरू शकते. ‘घोडा’ ही कल्पना व्यक्त करण्यासाठी फ्रेंच भाषेत cheval (शव्हाल्), तर इंग्रजीत horse (हॉर्स्) हे शब्द आहेत. ‘हात’ साठी अनुक्रमे main (मँ) व hand (हँड्) हे शब्द आहेत. ‘ पाणी ‘ साठी eau (ओ) व water (वॉटर) हे आहेत. दोन किंवा हे अधिक भाषांनी एकच अर्थ व्यक्त करण्यासाठी वापरलेल्या शब्दांत म्हणजे ध्वनिशृंखलेत कोणताही संगती, साम्य किंवा संबंध असण्याचे कारण नाही, हे यावरून स्पष्ट होते.
असे असूनही जर दोन भाषांत विशेष संबंध असावा, असे वाटण्याइतके साम्य आढळते, त्यात एक प्रकारची सूत्रबद्धता, नियमबद्धता, सुसंगती आढळली, तर आपले कुतूहल जागृत झाल्यावाचून रहाणार नाही आणि विशेष जिज्ञासापूर्वक अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला त्यामागे काही कारण आहे की काय, हे जाणून घेण्याची इच्छा व्हावी हे स्वाभाविक आहे.
सर ⇨ विल्सम जोन्स यांनी अठराव्या शतकाच्या शेवटाला (१७८६) भाषांचा परस्परसंबंधाबद्दल जे विधान केले, त्यामागे त्यांचे अनेक भाषांचे प्रभुत्व होते. त्यांना ग्रीक, लॅटिन, फारसी, संस्कृत इ. भाषांचे उत्तम ज्ञान होते, त्यामुळे या भांषाचे ध्वनी, शब्दसंग्रह, व्याकरण यांच्यातील विलक्षण साम्यस्थळांकडे त्यांचे लक्ष साहजिकपणेच वेधले गेले आणि त्यावरून संबंधित भाषांसंबधीचा आपला सिद्धांत त्यांनी स्थूल स्वरूपात मांडला. तो निष्कर्षात्मक नव्हता, कारण त्यांनी केलेल्या सूचनेवरून प्रेरणा घेऊन करायचे पद्धतशीर कार्य अजून व्हायचे होते. तुलनात्मक पद्धतीचा जन्म व्हायचा होता.
जोन्स यांची सूचना अतिशय वास्तव स्वरूपाची होती. आपल्यापुरताच विचार करायचा झाला, तर असे म्हणता येईल की जरी संस्कृत भाषा आपल्याला पूर्णपणे अज्ञात असती, तरी हिंदी, गुजराती, बंगाली इ. भाषा येणाऱ्या मराठी भाषिकाला केव्हातरी त्यांच्यातील विविधस्तरांवरील साम्य लक्षात येऊन त्यांचा काहीतरी पूर्वसंबंध असावा, अशी जाणीव नक्कीच झाली असती. केवळ काही नित्योपयोगी मुलभूत शब्द किंवा ‘ एक ‘ ते ‘दहा’ असे संख्यावाचक शब्द यांची तुलना करूनही त्याला पुढे जाण्याचा उद्युक्त करणारी महत्त्वाची माहिती मिळू शकली असती. उदा., मराठी, गुजराती, हिंदी व बंगाली यांतील खालील शब्द पहा :
मराठी |
गुजराती |
हिंदी |
बंगाली |
हात |
हाथ |
हाथ |
हात |
भूक |
भूख |
भूख |
भूख |
पाणी |
पाणी |
पानी |
जल |
काळा |
काळो |
काला |
कालो |
कर |
कर |
कर |
कर |
दोन |
बे |
दो |
दुइ, दु |
फळ |
फळ |
फल |
फल |
फूल |
फूल |
फूल |
फूल |
सात |
सात |
सात |
सात |
उड |
उड |
उड |
उड |
वरील यादीकडे वरवर नजर टाकली, तरी काही गोष्टी चटकन लक्षात येतील : (१) म. ह्.= गु. ह्.= हिं. ह् = बं. ह्. हीच गोष्ट आद्य म. भ्. प्. क्. ख् आणि उ यांची. बाह्यत : स् देखील या यादीत असावा, असे वाटते. पण बंगालीत स् नाही, फक्त श् आहे. म्हणजे म. स् = गु. स् =हिं. स् = बं. श. (२) म. आणि गु.ण. = हिं. न्. (३) म,. क् =गु. हि. बं. ख. (४) म. गु. ळ् = हिं. बं. ल् (पण ‘ फूल’ यात म.= गु. = हि. बं. ल्. या विसंगतीचे रहस्य काय ?). (५) म. द्= गु. ब् = हिं. द्.= बं. द्. (ह्याचा उकल होण्यासाठीही अधिक उदाहरणे पाहिजेत).
म्हणजे हा प्रश्न केवळ दहा शब्दांची तुलना करून सुटत नाही. त्यासाठी भाषेचे संपूर्ण चित्र डोळ्यासमोर ठेवून कोणते नियम, उपनियम, अपवाद (म्हणजेच न सुटलेले प्रश्न) मिळू शकतील, ते पाहिले पाहिजे. तुलनेसाठी बहुतेक वेळा मूलभूत शब्दसंग्रहाकडे धाव घेतली जाते. या संग्रहात प्राथमिक संख्या, नातीगोती, पाळीव जनावरे, नित्यपयोगी वस्तू व नित्यपरिचित घटना इत्यादींशी संबंधित शब्दांचा समावेश होतो. तरीही हे लक्षात ठेवले पाहिजे, की दोन भाषांचा, संबंध जोडताना विशेष महत्त्व असते, ते रूपविचाराला, व्याकरणाला. कारण शब्दांची उसनवारी करणे, ते टाकून देणे शक्य असते. रूपप्रक्रिया मात्र इतक्या सहजासहजी बदलता येत नाही. ‘शाळा’ बद्दल ‘स्कूल’ म्हणता येईल, पण मग मराठीत त्याला लिंग द्यावे लागेल, त्याचे सामान्य रूप व अनेकवचन नक्की करावे लागेल. मात्र असे कितीही शब्द बाहेरून मराठीत आले, तरी तिचे भारतीय-आर्य (इंडो-आर्यन) हे वर्गीकरण अबाधितच राहील. आपल्या शेजारी इराणीत शे. ७५-८० शब्द अरबी आहेत, तरी ती आर्यभाषाच आहे. इंग्रजीमध्ये ५-६ % लॅटिन – फ्रेंच शब्द आहेत,पण ती जर्मानिकच आहे. एवढेच कशाला, अरबी लिपी आणि शब्दसंग्रह यांमुळे परकी वाटणारी उर्दूही पूर्णपणे भारतीय-आर्य वर्गातच मोडते. कारण तिचा अभिव्यक्तीचा मूळ साचा जो रूपविचार व वाक्यरचना तो बदललेला नाही. म्हणूनच, ‘ मी माझ्या वाइफला कन्व्हिन्स केलं, की फादर-इन-लॉकडे डिलिव्हरीसाठी जाऊ नको म्हणून ‘ हे वाक्य मराठीच म्हणावे लागते.
जगातली भाषाकुटुंबे : भाषिक संबंधांमुळे नक्की करता येणारे भाषासमूह म्हणजे भाषाकुटुंबे, या संबंधाची स्थूल कल्पना करून घेतल्यानंतर जगात कोणकोणती भाषाकुटुंबे आढळतात, हे आपण पाहू. या ठिकाणी हे लक्षात ठेवले पाहिजे, की काही कुटुंबे निश्चित झाली असली, तरी काहींच्या बाबतीत भक्कम पुरावा नाही, तर काहींचे वर्गीकरण अजून ठरवता आलेले नाही.
विवेचनाच्या सोयीसाठी आपण भारतातील भाषाकुटुंबांपासून सुरूवात करू.
भारतात चार भाषाकुटुंबे आहेत : इंडो-यूरोपियन, द्राविड, ऑस्ट्रिक व सिनो-तिबेटी, मूळात आसामपासून आइसलँडपर्यंत पसरलेल्या इंडो- यूरोपियन कुटुंबाने आता आफ्रिका (दक्षिण), उत्तर व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया या व इतर काही बारीकसारीक प्रदेशांवर आक्रमण केले आहे. या कुटुंबात आर्य (संस्कृत व इराणी यांपासून निघालेल्या भाषा), हिटाइट (मृत), तोखारियन (मृत), दक्षिण कॉकेशस व पश्चिम तुर्कस्तान येथील आर्मेनियन, अल्बेनियन, बाल्टिक (लिथुएनियन, लेटीश, प्रशियन ही मृत भाषा) स्लाव्हिक (दक्षिणेकडील बल्गेरियन, सर्बो-क्रोशियन, स्लोव्हिनियन पश्चिमेकडील चेक, स्लोव्हाक, पोलिश, वेंदिश पूर्वेकडील ग्रेट रशियन, व्हाइट रशियन, युक्रिनियन) ग्रीक, इटालिक (लॅटिनच्या भिन्न रूपांपासून निघालेल्या इटालियन, प्रॉव्हांसाल, कातालान, स्पॅनिश, पोर्तुगीज, रूमानियन, सार्डिनियन, रोनांश इत्यादी. आज यातल्या पोर्तुगीज व स्पॅनिश स्वक्षेत्राबाहेरही मुख्यतः दक्षिण अमेरिकेत व फ्रेंच कॅनडात, बोलल्या जातात.) केल्टिक (वेल्श, स्कॉटिश गेलिक, आयरिश, फ्रान्समधील ब्रतों) जर्मनिक (तीन गट: इंग्लिश-फ्रीझियन, डच-जर्मन, स्कँडिनेव्हियन. पहिल्या गटात इंग्लिश व हॉलंड तसेच जर्मनीच्या किनाऱ्यावरील फ्रझियन येतात. दुसऱ्या गटात जर्मन, डच, फ्लेमिश, आफ्रिकान्स, यिड्डिश तर स्कँडिनेव्हियन गटात डॅनिश, स्वीडिश, नॉर्वेजियन व आइसलँडिक या भाषा येतात).
द्राविड भाषा : भारताच्या दक्षिणेला असून त्यातल्या महत्त्वाच्या तेलुगू, तमिळ, कन्नड व मल्याळम् या आहेत. शिवाय तुळूसारख्या काही लहान भाषा या कुटुंबात आहेत. ब्राहुई ही एकच भाषा द्राविड प्रदेशापासून दूर बलुचिस्तानात बोलली जाते.
भारतातील तिसऱ्या वर्गातील भाषा ऑस्ट्रो-आशियाई (एशियाटिक) या नावाने ओळखल्या जातात. त्या आग्नेय आशियाच्या आहेत. यांपैकी बिहार, ओरिसा यांच्या डोंगराळ प्रदेशातील आदिवासींच्या भाषांना मुंडा अशी एक संज्ञा आहे. त्यातली मुख्य भाषा संथाळी आहे. खासी ही आसामात बोलली जाते. निकोबारची भाषाही त्यातलीच. पोलाङ् आणि वा ह्या उत्तर ब्रह्मदेशात व माँङ् ही दक्षिण ब्रह्मदेशात आहेत. ख्मेर व व्हिएतनामी याही या कुटुंबातल्याच आहेत.
तिबेटी-ब्रह्मी व चिनी या सिनो-तिबेटी कुटुंबाच्या मुख्य शाखा आहेत. पाहिल्या शाखेतील काही भाषा भारतात आढळतातः (१) गारो, बोडो, नागा इत्यादी. तिबेटी, ब्रह्मी, कारेन ह्या या शाखेतील काही प्रमुख भाषा होत. चिनी हे नाव असलेल्या भाषा एकरूप नसून हिंदीप्रमाणे अनेक भाषांच्या समूहाने बनलेली आहे. त्यातली मँडरीन ही महत्त्वाची भाषा उत्तर चीनची आहे. याशिवाय यांगत्सीच्या मुखाजवळील वू भाषा, दक्षिण किनाऱ्यालगतच्या फूक्येन, मध्य चीनमधील हाक्का, त्याच्या दक्षिणेला कँटनीज भाषा या लक्षात घेण्यासारख्या आहेत.
तिबेटो-ब्राह्मीला लागूनच मलाबो-पॉलिनीशियन भाषाकुटुंब हे पूर्व व दक्षिणेला पॅसिफिक बेटसमूहापासून मादागास्करपर्यंत पसरलेले आहे. त्याच्या दोन शाखा आहेत : पश्चिम (इंडोनेशियन) व पूर्व. मुळातली सुमात्रामधील मले ही भाषा सुमात्रा, मलाया व बोर्निओ या प्रदेशांत बोलली जाते. इंडोनेशियन ही इंडोनेशियाची भाषा आहे. तर जावानीज, सुंदानीज व मादुरान या जावाच्या आहेत. सुमात्राची बाताक ही भाषाही आहे. बाली बेटांत बालीनीज, बोर्निओच्या मध्यभागी दायाक व सेलेबीझमध्ये माकासार या भाषा आहेत. फिलिपिन्समधील भाषा इंडोनेशियनच आहेत. इंडोनेशियन शाखा पूर्वेला ग्वॉमपासून पश्चिमेला मादागास्करपर्यंत पसरल्या आहेत. पूर्वेच्या शाखेतील हवाईयन, ताहितीयन, सामोअन व माओरी या विशेष प्रसिद्ध आहेत.
न्यू गिनी व आसपासच्या बेटांत पापुअनभाषाकुटुंब आहे.
ऑस्ट्रेलियातील आदिवासी ऑस्ट्रेलियन भाषा बोलतात.
जपानी व रिऊक्यू भाषांनी जपानी भाषाकुटुंब बनले आहे, तर कोरियन ही कोरियन कुटुंबाची भाषा आहे.
इराणच्या पश्चिमेला लागून सुरू होणाऱ्या भाषाकुटुंबाला आफ्रोआशियाई हे नाव आहे. त्याचा विस्तार दक्षिण आशियाचा पश्चिमेकडील प्रदेश व आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील प्रदेश एवढा आहे. त्यात पाच शाखा आहेतः सेमिटिक, ईजिप्शियन, बर्बर, कुशिटिक आणि चॅड. या शेवटच्या चार शाखांना मिळेन ‘ हॅमिटिक ‘ असे नाव असून त्यामुळे या सर्व कुटुंबाला हॅमिटो- सेमिटिक असेही म्हणतात. सेमिटिकाच्या सर्वांत महत्त्वाच्या भाषा अरबी (उत्तर व दक्षिण) व हिब्रू या असून इथिओपियातही काही अरबी बोली आहेत. केवळ धार्मिक विधींत वापरल्या जाणाऱ्या हिब्रूचे इस्राएलमध्ये पुनरूज्जीवन होत आहे. या शाखेत ऐतिहासिक महत्त्वाच्या अकेडियन, फिनिशियन यांसारख्या भाषा होत्या. ईजिप्शियनपासून आलेली कॉप्टिक हा आता धर्माविधीपुरतीच जिवंत आहे. बर्बर भाषा उत्तर आफ्रिका व सहारा या प्रदेशांत पसरलेल्या आहेत. अरबीने त्यांच्यावर बऱ्याच अंशी आक्रमण केले असले, तरी अजून काबिल, शिल्ह, झेनागा व त्वारेग या प्रचारात आहेत. कुशिटिक भाषा पूर्व आफ्रिकेच्या टोकदार भागात (सोमालियाचा भाग) बोलल्या जातात. सोमाली, गाल्ला व बेजा या भाषा विस्तीर्ण प्रदेशात बोलल्या जातात. चॅड भाषा मध्य व उत्तर नायजेरिया व चॅड सरोवराचा परिसर यांत बोलल्या जातात. त्यांची संख्या फार मोठी आहे. त्या फारशा परिचित नसल्या, तरी हौसा ही मात्र अतिशय महत्त्वाची असून पश्चिम आफ्रिकेतील व्यापारी वर्गाची भाषा आहे.
बाकीच्या भाषाकुटुंबांची माहिती फार अपूर्ण तशीच अनिश्चित आहे. यात चारीनाईल, मध्य सुदानी, मध्य सहारा, नायजर-काँगो, पश्चिम अटलांटिक, मांदे, क्का, मध्य आफ्रिकन, खोइसन इत्यादींचा समावेश होतो. यांपैकी मध्य आफ्रिकेतील बांतू समूह जास्त परिचित असून त्याचा विशेष अभ्यास झालेला आहे.
यूरोपात इंडो-यूरपियन सोडल्यास आणखी जी भाषाकुटुंबे आहेत, ती अशी : फिनो-उग्रिक, बास्क, कॉकेशियन. फिनो-उग्रिकमध्ये फिनिश, एस्टोनियन व हंगेरियन त्याचप्रमाणे इतर काही छोट्या भाषांचा समावेश होतो. कॉकेशसच्या आसपासच्या कॉकेशियन कुटुंबात उत्तर व दक्षिण कॉकेशियन या शाखा असून त्यांत जॉर्जियन, मिनग्रेलियन, आब्खाझ, आवार, चेचिएन, काबार्दी इ. भाषा येतात. बास्क भाषेचा कोणत्याही भाषाकुटुंबांशी संबंध असल्याचे दिसत नाही.
अल्ताइक हे कुटुंब तुर्कस्तानपासून पूर्वेला उत्तर आशियाच्या दिशेने पसरले आहे. त्यात तुर्की, आझरबैजानी, किरगीझ, उझबेक, तुर्कमेनी, कझाक इ. भाषांचा समावेश होतो.
अमेरिकेत यूरोपियनांच्या आक्रमणामुळे इंडो-यूरोपियनचा प्रवेश झाला. त्यात कॅनडामध्ये फ्रेंच व इंग्लिश अमेरिकेत इंग्लिश दक्षिण अमेरिकेत, ब्राझीलमध्ये पोर्तुगीज व इतरत्र स्पॅनिश या भाषांनी आपले वर्चस्व स्थापन केले. पण मूळ रहिवाश्यांच्या काही भाषा टिकून राहिल्या आहेत. त्यांची प्रमुख समूहवार वाटणी अशी : उत्तर अमेरिका (उत्तरेकडून दक्षिणेकडे)-एस्किमो-ॲल्यूट, आथापास्कन, अल्गाँक्वियन, मोसन, इरोक्वायन, नाचेझ-मुस्कोजियन, सिउअन, पेनुशिअन, होकन, उटो-ॲझटेकन आणि मायन. य़ाशिवाय काही अभ्यास न झालेल्या भाषा आहेत. मध्य अमेरिकेत दहा भाषांचे प्रत्येकी एक लाखावर भाषिक आहेतः नाहुआत्ल, क्विच, काकचिक्वेल, माम, नावाहो इत्यादी. यातल्या काहींची भाषिक संख्या वाढतही आहे. दक्षिण अमेरिकेत तर चार भाषा लाखो लोकांकडून बोलल्या जातात. त्यांत ग्वारानी, क्केचुआ, आयमारा व लिंग्वा जेराल या विशेष महत्त्वाच्या आहेत.
वेगळ्या भाषा म्हणजे वेगळ्या मानववंशाच्या भाषा किंवा भाषेचा उदय होण्यापूर्वी विभक्त झालेल्या टोळ्यांच्या स्वतंत्र भाषा. पण भाषा अस्तित्वात आल्यावर ज्या टोळ्या विभक्त होऊन ठिकठिकाणी विखुरल्या आणि त्यांनी मूळ भाषा चालू ठेवून जी रूपे अस्तित्वात आली त्या संबंधित भाषा होत. त्या सर्वांचा समूह हेच भाषाकुटुंब.
कौटुंबिक वर्गीकरणातले मुख्य अडथळे दोन आहेत. अजून जगातील सर्व भाषांची नोंद होऊन तुलनेला उपयोगी पडेल अशा तर्हेचा, त्यांतील अनेकींचा पद्धतशीर वर्णनात्मक अभ्यास झालेला नाही. दुसरा अडथळा हा की, बहुसंख्य भाषा केवळ बोलण्यातच उपलब्ध असून त्यांचा अगदी अलीकडचा देखील ऐतिहासिक पुरावा म्हणजे पूर्वरूप आपल्याला मिळत नाही.
इंडो-यूरोपियन व सेमिटिक यांना फार मोठी प्रतिष्ठा आहे. त्यांचे भाषिक पुरावे फार प्राचीन काळापासून मिळतात, कारण त्यांनी लेखनाचा आधार घेतला. त्यामुळे त्यांचा तपशीलवार अभ्यास होऊन त्यातूनच सामान्य भाषाशास्त्राचा जन्म झाला. या शास्त्राची व भाषिक परिवर्तनाची तत्त्वे आपल्या हाती असल्यामुळेच इतर भाषांना ती लावण्याचे काम सुकर झाले आहे. (नोंदीच्या विवेचनात येऊन गेलेल्या बहुतेक सर्व प्रमुख भाषाकुटुंबांवर, भाषासमूहांवर व भाषांवर मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी यथास्थळी आहेत).
संदर्भ : 1. Cohen, M. Meillet, A. Ed. Les Langues du monde, Paris, 1952.
2. Gleason, H. A. An Introduction to Descriptive Linguistics, New York, 1966.
3. Lehmann, Winfred P. Historical Linguistics: An Introduction, New York, 1963.
4. Meillet, A. Les langues dans l’ Europe nouvelle, Paris, 1928
कालेलकर, ना. गो.
“