बॅथोलिथ : पातालिक (खूप खोलीवर तयार झालेल्या) खडकांच्या मोठ्या व पुढील लक्षणे असणाऱ्या अंतर्वेशी (आत घुसलेल्या) राशींना बॅथोलिथे म्हणतात. त्यांच्या आडव्या छेदाचे किंवा दृश्यांशाचे क्षेत्र १०० चौ. किमी. हून अधिक असते. त्यांच्या माथ्याचा भाग ओबडधोबड घुमटासारखा असतो व त्यांच्या बाह्य पृष्ठाचा उतार तीव्र व बाहेरच्या बाजूस असतो. जो जो खोल जावे तो तो त्यांचे आकारमान वाढत गेलेले दिसते. त्यांच्या तळाचा ठाव लागत नाही व तळ असलाच, तर तो कित्येक किमी. खोल जागी असला पाहिजे. बॅथोलिथांना तळ नसतो व त्यांच्या राशी कवचाखालून वर आलेल्या असतात, अशी आर्. ए. डेली (१८७१–१९५७) यांची कल्पना आहे पण जे. पी. इडिंब्ज (१८५७–१९२०), एच्. क्लोस (१८८५–१९५१) इत्यादिकांना ती मान्य नाही. कवचाच्या खडकांच्या मधेच बॅथोलिथांचा शिलारस घुसलेला असून त्यांच्या तळाखाली कवचाचे खडक असतात, असे त्यांचे मत आहे. बॅथोलिथे ही सर्वस्वी किंवा प्रामुख्येकरून ग्रॅनाइटाची बनलेली असतात. ही बॅथोलिथांची सर्वसामान्य लक्षणे होत पण त्यांचे सविस्तर परीक्षण केले, तर त्यांच्या संघटना, संरचना व शेजारच्या खडकांशी म्हणजे ज्यांच्यात बॅथोलिथांचा शिलारस घुसला त्यांच्याशी असणारे संबंध इ. बाबतींत पुष्कळच भेद आढळतात.

भारताच्या द्वीपकल्पात आढळणारे पुढील काही ग्रॅनाइट हे बॅथोलिथांची उदाहरणे म्हणून सांगता येतील : ⇨ एरिनपुरा ग्रॅनाइट, ⇨ द्वीपकल्पी पट्टिताश्म, ⇨ क्‍लोजपेट ग्रॅनाइट इत्यादी. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण एरिनपुरा ग्रॅनाइटाच्या एका खोडावर वसलेले आहे.

बॅथोलिथे सामान्यतः पर्वत-निर्मितीच्या पट्ट्यात असतात. त्यांच्या राशीची लांबी पर्वत पट्ट्यांच्या सांरचनिक अक्षास समांतर म्हणजे ज्या खडकात बॅथोलिथांचा शिलारस घुसला त्यांच्या संरचनेशी सुसंगत असते पण विस्ताराच्या दृष्टीने पाहिले, तर त्यांच्या शाखा लगतच्या खडकात विसंगत रीतीने घुसलेल्या आढळतात.

काल्पनिक बॅथोलिथाच्या माथ्याचे उघडे पडलेले पृष्ठ व त्याचे उभे छेद : (१, २, ३, ४) छत-झुंबरे, (५) बाह्याश्म, (६) खोड, (७) स्कंध.

सोबतच्या आकृतीवरून बॅथोलिथांच्या उपस्थितीच्या रीतीची कल्पना येईल. जिचे छत उंच-सखल, अतिशय खडबडीत आहे अशी खडकातली पोकळी शिलारसाने भरली गेली व शिलारस थिजून खडक तयार झाला, तर त्याच्या राशीचा माथा जसा असेल तसा बॅथोलिथांचा माथा असतो. त्या पोकळीलगतच्या खडकांत काही लहान-सहान भेगा, पोकळ्या असल्या, तर त्यांच्यातही शिलारस शिरतो व बॅथोलिथांपासून निघून शेजारच्या खडकांत जाणारी लहान अंतर्वेशने तयार होतात. क्षरणाने (झिजण्याच्या क्रियेने) पृष्ठाचे खडक नाहीसे होऊ लागले म्हणजे प्रथम बॅथोलिथांच्या माथ्यावरील लहान अंतर्वेशने उघडी पडतात.कित्येक स्कंध व खोडे ही खोल जागी असलेल्याबॅथोलिथांच्या अशा शाखा असतात. अधिक क्षरण झाल्यावर बॅथोलिथांचा माथा उघडा पडतो.

खडकातील पोकळीच्या छताच्या खडकाचे सुळके शिलारसात व शिलारस झिजून तयार होणाऱ्या खडकात घुसलेले असतात. छताच्या खडकांचे काही ठोकळे निखळून पडून शिलारसात बुडतात व शिलारसापासून तयार होणाऱ्या खडकाने वेढले जातात. क्षरण होऊन बॅथोलिथांच्या माथ्याचे खडक उघडे पडले म्हणजे देशीय (मूळच्या स्थानिक) खडकांच्या लोंबत्या झुंबरासारख्या राशी (छती झुंबरे) व छतापासून गळून पडलेल्या खडकांचे तुकडे बॅथोलिथांच्या खडकात रुतलेले आढळतात. सोबतच्या ठोकळा-आकृतीत एका काल्पनिक बॅथोलिथाच्या माथ्याचे उघडे पडलेले पृष्ठ व त्याचे उभे छेद दाखविले आहेत.

कित्येक बॅथोलिथांच्या खडकांत काही परक्या, भिन्न प्रकारच्या व सामान्यतः काळसर खडकांची लहान मोठी ठिगळे इतस्ततः आढळतात. ती छत-झुंबराच्या किंवा छतापासून गळून शिलारसात बुडालेल्या खडकांची असतात त्यांना ‘बाह्याश्म’ म्हणतात. शिलारसात घुसलेल्या किंवा बुडालेल्या खडकांची शिलारसाशी विक्रिया होऊन त्यांच्या खनिज संघटनात व संरचनेत फेरफार होणे शक्य असते. बॅथोलिथांच्या माथ्याजवळच्या खडकात छत-झुबंरे व बाह्याश्म विपुल असतात पण क्षरण होऊन त्यांचे अधिकाधिक खोल भाग उघडे पडू लागले म्हणजे ती कमी होत जातात व बऱ्याच खोल भागात ती मुळीच नसतात. सारांश, बॅथोलिथाच्या दृश्य खडकाचे स्वरूप काही अंशी क्षरणाच्या मानावर अवलंबून असते.

कित्येक बॅथोलिथांची कडा स्पष्ट असते आणि बॅथोलिथांचे ग्रॅनाइट व शेजारचे खडक यांचा संस्पर्श कोठे होतो, हे काटेकोर दाखविता येते. संस्पर्शाच्या एका बाजूस बॅथोलिथाचा ग्रॅनाइट व दुसऱ्या बाजूस नमुनेदार देशीय खडक असतात. पण इतर कित्येक बॅथोलिथांच्या कडा काटेकोर नसतात व संस्पर्शालगतच्या भागांत ग्रॅनाइट व देशीय खडक यांच्या क्रियेमुळे तयार झालेल्या मिश्रित खडकांच्या पट्टा असतो. कॉर्डिएराइट, अँडॅलुसाइट, सिलिमनाइट, गार्नेटे किंवा एपिडोट यांसारखी व ग्रॅनाइटात नसणारी खनिजे त्या पट्ट्यातील ग्रॅनाइटात आढळतात. त्या पट्ट्यातील देशीय खडकाचे कमीअधिक रूपांतरण झालेले असते व ग्रॅनाइटी शिलारसातील काही घटक त्यांच्यात असतात.

गौण अंतर्वेशी राशींचे अभिस्थापन कसे झाले म्हणजे त्यांना आवश्यक तेवढ्या आकारमानाच्या पोकळ्या कशा निर्माण झाल्या हे सहज कळून येते. उदा., खोल जागेतील शिलारस खडकांतील भेगांत घुसून व त्या भेगा रुंद करून खालून वर असल्यामुळे भित्ती निर्माण झालेल्या असतात. खडकांतील दुर्बल पातळ्यांस (उदा., गाळाच्या खडकांमधील आडव्या स्तरणतलांस) अनुसरून शिलारस घुसविला गेल्यामुळे शिलापट्ट निर्माण झालेले असतात. लॅकोलिथांचे [⟶ लॅकोलिथ] किंवा फॅकोलिथांचे (घड्या पडलेल्या खडकांतील भिंगाकार राशींचे) अंतर्वेशन तसेच झालेले असते, लोपोलिथांचे [⟶ अग्‍निज खडक] अंतर्वेशनही स्थूलमानाने देशीय खडकांच्या संरचनेस अनुसरून झालेले असते. परंतु बॅथेलिथांचे अभिस्थापन कसे झाले व त्यांना आवश्यक तेवढ्या प्रचंड आकारमानाच्या पोकळ्या कशा निर्माण झाल्या असतील हे कोडेच आहे. शिलारसाच्या क्रियेमुळे देशीय खडकांचा काही भाग शिलारसात विरघळून जाऊन पोकळ्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी एक कल्पना प्रारंभी होती. परंतु बॅथोलिथांच्या पोकळ्यांचे आकारमान एवढे प्रचंड असते की, तेवढ्या आकारमानाच्या खडकांचे विद्रावण करण्यास आवश्यक तेवढी उष्णता शिलारसात नसते व बॅथोलिथांच्या स्थानी पूर्वी असलेल्या खडकांचे विद्रावण होऊन व ते शिलारासात मिसळून गेल्याने बॅथोलिथांना आवश्यक त्या पोकळ्या निर्माण झाल्या असणे अशक्य आहे,  असे दिसून आले.


बॅथोलिथे आता आहेत त्या जागेत पूर्वी कोणते तरी खडक असले पाहिजेत व त्यांना वर किंवा बाजूस ढकलून बॅथोलिथांचा शिलारस घुसला असावा, असे सुचविण्यात आले आहे. अशी ढकलाढकली लहानशा प्रमाणात होणे शक्य आहे व होतेही. पण बॅथोलिथांना आवश्यक तेवढी जागा होण्यासाठी तिचे प्रमाण प्रचंड असावे लागेल व तिच्यामुळे अंतर्वेशनाच्या लगतच्या खडकांच्या संरचना पुष्कळ विक्षोभित झाल्या असत्या पण त्या तशा झालेल्या दिसत नाहीत. शिवाय असे की, बॅथोलिथांचा शिलारस देशीय खडकांना बाजूस सारून घुसण्याऐवजी त्यांना छेदून गेला असावा, असे बॅथोलिथांच्या व त्यांच्या लगतच्या खडकांच्या संरचनांवरून दिसते.

बॅथोलिथांच्या जागी पूर्वी असलेले खडक खचून खाली गेल्यामुळे शिलारसाला जागा मिळाली असावी, असेही सुचविण्यात आलेले आहे. शिलारसाच्या उष्णतेमुळे त्याच्या माथ्यावरील खडक भेगाळतात. त्या भेगांत शिलारस शिरतो व भेगा रुंदावतात व भेगाळलेल्या खडकांचे तुकडे निखळून शिलारसात पडतात व बुडून खोल जातात. निखळून पडणारे तुकडे लहान-सहान किंवा प्रचंड ठोकळ्याएवढे असणे शक्य आहे. अशा क्रियेमुळे शिलारसाच्या माथ्यावरील खडक खोदले जातात. डेली यांनी या क्रियेला ‘निखनन’ (स्टोपिंग) असे नाव दिले आहे. बॅथोलिथांचे अभिस्थापन मुख्यतः निखननाने झाले असावे असे डेली यांचे मत आहे पण ही कल्पनाही समाधनकारक नाही. शिलारसात बुडून खाली गेलेल्या खडकांच्या राशी प्रचंड असल्या पाहिजेत. कित्येक बॅथोलिथांच्या ग्रॅनाइटात देशीय खडकांचे बाह्याश्म आढळतात. यावरून देशीय खडकांचे तुकडे शिलारसात बुडाले आसावेत, या अनुमानाला पुष्टी मिळते पण इतर कित्येकांत बाह्याश्म नसतात आणि असा अनुभव आहे की, बॅथोलिथांच्या माथ्याजवळील खडकांत विपुल बाह्याश्म असले, तरी जो जो त्यांच्या अधिक खोल भागाकडे जावे तो तो ते कमी होत जाऊन नाहीसे होतात. बाह्याश्मांचे तुकडे शिलारसात विरघळून तादात्म्य पावले, असे मानून भागत नाही. त्यांची भर पडण्याने शिलारसाचे घनफळ वाढणार व अधिक जागा लागणार आणि ती कशी उपलब्ध होते हा प्रश्न उरतोच.

कोणत्याही भौतिकी रीतीने मूळचे खडक मूळ जागी राहून त्यांच्या जागी शिलारस येणे शक्य नाही. म्हणून रासायनिक प्रतिष्ठापन होऊन म्हणजे कायांतरणाने बॅथोलिथे तयार झाली असावीत असे सुचविण्यात आले. कायांतरणाने ग्रॅनाइट तयार होण्याच्या प्रक्रियेला ग्रॅनीटीभवन म्हणतात. कोणत्याही साध्या किंवा विषमांग खडकांना शिलारसावस्था प्राप्त न होता त्याचे ग्रॅनाइटासारखे संघटन व संरचना असणाऱ्या खडकांत रूपांतर होणे म्हणजे ग्रॅनीटीभवन होय. ग्रॅनीटीभवनात मूळ खडकाच्या घनफळात सामान्यतः बदल होत नाही.

ग्रॅनाइट हे शिलारपासून तयार झालेले असतात असे परंपरावादी व आजच्याही बहुसंख्य शिलावैज्ञानिकांचे मत आहे पण बॅथोलिथांच्या सारख्या प्रचंड राशींच्या शिलारसाचे अंतर्वेशन कसे होऊ शकले, याचा खुलासा करता येत नाही. रासायनिक प्रतिष्ठापनाने तो करता येणे शक्य आहे व बॅथोलिथांचे ग्रॅनाइट प्रतिष्ठापनाने तयार झाले, असे सुचविण्यात आलेले आहे.

कित्येक क्षेत्रांतील देशीय खडकांकडून अंतर्वेशी ग्रॅनाइटाकडे जाऊ लागले म्हणजे प्रथम देशीय खडकांत फेल्स्पारी पदार्थांचा प्रवेश झालेला व नंतर त्यांचे मान उत्तरोत्तर वाढत जाऊन अखेरीस देशीय खडकांचे ग्रॅनाइट बनलेले आढळतात, हे फ्रेंच वैज्ञानिकांच्या लक्षात आले होते. अंतर्वेशी शिलारसातील वायूच्या व विद्रावांच्या बरोबर जाणाऱ्या  पदार्थांची देशीय खडकांत भर पडून व त्यांचे पुनःस्फटिकीभवन होऊन देशीय खडकांचे ग्रॅनाइटांत रूपांतर झाले असावे, असे अशा उदाहरणावरून सूचित होते. नंतर अधिक अध्ययन झाल्यावर ग्रॅनाइटी अंतर्वेशनांतील विद्रावांमुळे त्यांच्या लगतच्या देशीय खडकांचे कायांतरण होऊन ग्रॅनाइट तयार होणे शक्य असते, हे कळून आले. अशा रीतीने तयार झालेल्या ग्रॅनाइटांचे परिमाण अल्प असते पण बॅथोलिथांसारख्या प्रचंड राशी प्रतिष्ठापनाने होऊ शकतील असे मानण्यास पुरेसा पुरावा नाही व त्या प्रतिष्ठापनाने निर्माण होऊ शकतील, हे पुष्कळांना मान्य नाही.

ग्रॅनीटीभवनाच्या प्रक्रियेचा सारांश असा : खोल जागेतील एखाद्या स्थानातून (ग्रॅनाइटी शिलारसापासून म्हणा) बाहेर पडलेले विद्राव वर येऊन कवचाच्या खडकातून विकिरण (प्रसारण) होऊन पार जात असताना त्या खडकावर त्यांची क्रिया होते व त्या खडकात विद्रावातील काही द्रव्यांची भर पडते व खडकातील काही द्रव्ये बाहेर जाणाऱ्या  विद्रावांबरोबर निघून जातात आणि खडकाचे पुनःस्फटिकीभवन होऊन त्याला ग्रॅनाइटी संघटन व वयन (पोत) प्राप्त होते. मूळचा खडक अर्कोज असला, तर केवळ पुनःस्फटिकीभवनाने त्याचा ग्रॅनाइट बनेल. तो शुद्ध वालुकाश्म असला, तर त्याच्यात पोटॅश, ॲल्युमिना, सोडा व थोडी चुना, लोह व मॅग्‍नेशियम यांची भर पडावी लागेल व घनफळ पूर्ववत राहण्यासाठी त्याच्यातील बरीचशी सिलिका बाहेर न्यावी लागेल. तो मृण्मय असला,  तर त्याच्यात सिलिका, पोटॅश व सोडा याची भर पडावी लागेल व त्याच्यातील काही ॲल्युमिना, मॅग्‍नेशिया, फेरस ऑक्साइड ही बाहेर जावी लागतील. चुनखडीचे ग्रॅनीटीभवन होणे मात्र कठीण आहे.

कायांतरण घडवून आणणारे विद्राव खोल जागेतून येत असावेत, असे सुचविण्यात आलेले आहे पण ते कोठून येतात किंवा खोल जागी कसे निर्माण होतात हे सांगता आलेले नाही व ते वर येऊन खडकातून जात असतात याला पुरावा नाही. कायांतरण घडवून आणणारी द्रव्ये विद्रावाच्या स्वरूपात येतात असे काहींचे मत आहे, तर काही याच्याही पुढे गेलेले आहेत व द्रव्ये ‘ओल्या’ म्हणजे विद्रावांच्या स्वरूपात असण्याची आवश्यकता नाही व घन द्रव्याचेही विकिरण होऊन ती घन खडकातून पार जाऊ शकतील व ग्रॅनीटीभवन होऊ शकेल, असे त्यांचे मत आहे. ग्रॅनीटीभवनाने बॅथोलिथांसारख्या प्रचंड राशी तयार होण्यासाठी बरीच उष्णता पुरवावी लागेल व ती कशी पुरविली जाते, हेही निश्चित सांगता येत नाही. सारांश, बॅथोलिथे कशी निर्माण झाली हे कळलेले नाही. बॅथोलिथांच्या उत्पत्तीविषयी अगदी भिन्न कल्पना असणाऱ्या शिलावैज्ञानिकांचे शिलारसवादी व रूपांतरवादी असे दोन पंथ आता झालेले आहेत. बॅथोलिथे शिलारसापासून झाली असे पहिल्या पंथाचे व ती रूपांतरणाने झाली असे दुसऱ्याचे मत आहे. रूपांतरणवाद्यांतही ‘ओले’ म्हणजे विद्रावांच्या द्वारे व ‘सुके’ म्हणजे घन विकिरणाच्या द्वारे ग्रॅनीटीभवन होते असे मानणारे दोन गट आहेत.

पहा : अग्‍निज खडक.

संदर्भ :    1. Holmes, A. Principles of Physical Geology, London, 1965.

             2. Turner. F. J. Verhoogen, J. IGneous and Metamorphic Petrology, Bombay. 1961.

             3. Tyrrell, G. W. The Principles of Petrology, Bombay. 1977.

केळकर, क. वा.