बॅटन रूझ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील लुइझिॲना राज्याची राजधानी व खोल पाण्याचे मोठे नदी-बंदर. लोकसंख्या १,६५,९६३. उपनगरांसह २,८५, १६७ (१९७०). हे न्यू ऑर्लिअन्सच्या वायव्येस १३० किमी. मिसिसिपी नदीच्या पूर्वतीरावर वसले आहे. इंडियनांपासून फ्रेंचांनी १७१९ मध्ये सैनिकी छावण्यांसाठी ते प्रथम वसविले. १७६३ मध्ये ही वसाहत ग्रेट ब्रिटनच्या ताब्यात आली. १७७९ मध्ये ती स्पॅनिशांनी हस्तगत केली. १८१५ मध्ये ती अमेरिकेच्या ताब्यात आली. १८४९ पासून बॅटनरूझ हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण आहे.

या बंदराजवळ मिसिसिपी नदीचे पात्र ८ किमी. रुंद व १०.६ मी. खोल असल्यामुळे मोठमोठी जहाजे या बंदरात ये-जा करू शकतात. आसमंतातील खनिज तेले, नैसर्गिक वायू व कृषी उत्पादने यांच्या वाहतुकीचे , व्यापाराचे आणि वितरणाचे हे प्रमुख केंद्र आहे. देशातील मोठे खनिज तेल शुद्धीकरण केंद्र येथे आहे. खाद्यपदार्थ प्रक्रिया, रसायने, जहाजबांधणी, यंत्रे व त्यांचे सुटे भाग, कृत्रिम रबर इ. उद्योगधंदे येथे चालतात. लुइझिॲना विद्यापीठ, सदर्न युनिव्हर्सिटी, कृषी व यांत्रिक महाविद्यालय, शेती संशोधन केंद्र, मूक-अंध विद्यालय इ. शैक्षणिक संस्था येथे आहेत. गॉथिक शैलीचे जुने राजभवन (१८८२), ३४ मजली नवीन राजभवन (१९३२), जुने युद्धसाहित्य संग्रहालय, कला व विज्ञान संग्रहालय, खगोलालय, कलावीथी, प्राणिसंग्रहालय, लुइझिॲना राज्याचा माजी राज्यपाल व संयुक्त संस्थानांचा सीनेटर व्हे लाँग याचे स्मारक व समाधी ही बॅटनरूझमधील काही प्रमुख आकर्षणे आहेत.

चौधरी, वसंत