बॅजट, वॉल्टर : (३ फेब्रुवारी १८२६–२४ मार्च १८७७). प्रसिद्ध इंग्रज अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, साहित्यसमीक्षक व पत्रकार. इंग्‍लंडमधील लँगपोर्ट येथे जन्म. वडिलांचे नाव टॉमस व आईचे एडिथ. ‘युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ ब्रिस्टल’ मधून १८४६ मध्ये वॉल्टरने पदवी संपादन केली. १८४८ मध्ये तो तत्त्वज्ञान विषयात सुवर्णपदक मिळवून एम्. ए. झाला. यानंतर त्याने तीन वर्षे वकिलीचा अभ्यास केला, पण वकिली मात्र केली नाही.

पॅरिसमध्ये असताना (१८५२) वॉल्टरला ल्वी नेपोलियनने केलेल्या अवचित सत्तांतराची घटना प्रत्यक्षात पहावयास मिळाली होती. या संदर्भात वॉस्टरने इन्क्‍वायरर या साप्ताहिकात नेपोलियनाच्या कृत्याचे समर्थन करणारे सात प्रभावी लेख लिहिले. त्याच्या लेखांमुळे इंग्‍लंडमध्ये मोठेच काहूर माजले कारण तेथे या अवचित सत्तांतरावर कडक टीका करण्यात आली. परंतु यावरून बॅजटला आपल्या लेखनसामर्थ्याची कल्पना आली पुढील सहा-सात वर्षे त्याने शेक्सपिअर, मिल्टन, कोलरिज यांसारख्या नामवंत साहित्यिकांवर आणि विल्यम पिट, सर रॉबर्ट पील आदी प्रसिद्ध राजकीय व्यक्तींवर चरित्रात्मक लेख लिहिले.

बँकेमध्ये काम करीत असताना बॅजटने अनेक अर्थशास्त्रीय लेख लिहिले. लॉर्ड पाल्मर्स्टनच्या मंत्रिमंडळातील अर्थखात्याचा सचिव आणि १८४३ मध्ये स्थापिलेल्या द इकॉनॉमिस्ट या अर्थविषयक साप्ताहिकाचा संस्थापक-संपादक जेम्स विल्सन याने बॅजटला आपल्या साप्ताहिकासाठी काम करण्यास सांगितले. विल्सनच्या सहा मुलींपैकी एलिझा या ज्येष्ठ मुलीच्या प्रेमात बॅजट पडला, १८५८ मध्ये त्याचा विवाह झाला.

जेम्स विल्सनला १८५९ मध्ये भारत सरकारच्या वित्तव्यवहाराचे संघटन करण्यासाठी भारतात जावे लागले. १८६० मध्ये कलकत्ता येथे विल्सन मृत्यू पावला. त्यामुळे द इकॉनॉमिस्टच्या प्रकाशनाची सर्व जबाबदारी बॅजटवर येऊन पडली. तो द इकॉनॉमिस्टचा व्यवस्थापकीय संचालक व संपादक बनला. १७ वर्षे बॅजटने या साप्ताहिकाची सर्व धुरा वाहिली. पुढील काळात द इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकास जागतिक महत्त्वाचे राजकीय-आर्थिक नियतकालिक म्हणून प्रतिष्ठा लाभली याचे श्रेय बॅजटच्या संपादकीय कौशल्यास दिले पाहिजे.

बॅजटची कीर्ती तीन ग्रंथांवर सुप्रतिष्ठित आहे. द इंग्‍लिश कॉन्स्टिट्यूशन (१८६७) या आपल्या पहिल्या ग्रंथात त्याने ग्रेट ब्रिटनच्या कॅबिनेट पद्धतीने कार्यस्वरूप व तिची बलस्थाने यांचा ऊहापोह केला आहे. शासनाच्या कार्यकारी व वैधानिक घटकांचा कार्यक्षम समन्वय साधणारी कॅबनेट पद्धत ही त्याच्या दृष्टीने अध्यक्षीय शासन पद्धतीपेक्षाही अधिक चांगली आहे. फिजिक्स अँड पॉलिटिक्स (१८७२) हा बॅजटचा दुसरा ग्रंथ. त्यात त्याने विविध समाज व राष्ट्रे यांच्या विकासकार्यात मानवशास्त्रामधील नवनवीन शोधांचा झालेला उपयोग यांचा आलेख काढण्याचा प्रयत्‍न केल्याचे आढळते. कार्ल मार्क्स व माक्स व्हेबर यांच्या प्रभावामुळे बॅजटच्या या ग्रंथाला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. हे खरे, पण त्याने मांडलेल्या दृष्टिकोनाचे अनेक समाजशास्त्रज्ञांनी स्वागत केले. तथापि या ग्रंथामधील एक मध्यवर्ती विचारधारेचा आणि प्रतिमेचा, राष्ट्रांच्या विकासात अबोध अनुकरण तत्त्वाचा मोठा प्रभाव असतो–विल्यम जेम्स (१८४२–१९१०) व ग्रॅहम वॅलास (१८५८–१९३२) या दोन सुविख्यात तत्त्ववेत्ते–समाजशास्त्रज्ञ यांच्यावर मोठा प्रभाव पडल्याचे दिसून येते. लाँबर्ड स्ट्रीट (१८७३) हा बॅजटचा तिसरा ग्रंथ म्हणजे वित्तवषयक लेखनाचा एक उत्कृष्ट नमुना मानण्यात येतो. या ग्रंथात त्याने नाणे-बाजाराचे प्रत्यक्ष कार्य कसे चालते, याचे तपशीलवार वर्णन केले आहे. मध्यवर्ती सुवर्णसाठा वाढवून अधिक रोकडसुलभता निर्माण करणे कसे आवश्यक आहे, हे बॅजटने या ग्रंथात दाखवून दिले आहे.

इकॉनॉमिक स्टडिज या ग्रंथाचे लेखन बॅजट करीत होता. १८७०–७५ यांदरम्यानच्या काळातील जगाच्या आर्थिक स्थितीसंबंधीचे वर्णन यामध्ये आहे. हा ग्रंथ वाचताना शंभर वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ॲडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्स या सुप्रसिद्ध ग्रंथाची आठवण होते. अर्थशास्त्राची उद्दिष्टे व मर्यादा स्पष्ट करण्याचा बॅजटचा प्रयत्‍न त्याच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहिला. वयाच्या अवघ्या एकावन्नाव्या वर्षी न्यूमोनियामुळे बॅजटचे लँगपोर्ट येथे निधन झाले. उपर्युक्त ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आला (१८८०).

संदर्भ : Buchan, Alastair. The Spare Chancellor: The Life of Walter Bagehor, London, 1959.

गद्रे, वि. रा.