बळीराजा : प्राचीन भारतातील एक अत्यंत सद्‌गुणी, प्रजाहितदक्ष व सामर्थ्यशाली असा विख्यात दैत्यराज. पुराणकथेनुसार हा ⇨ सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. ⇨ विष्णूने वामनावतारात याच्या मस्तकावर पाय ठेवून याला सुतल नावाच्या पाताळात गाडले, अशी कथा आहे. हा ⇨ प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा मुलगा होय. विरोचनाच्या देवी वा सुरूची या पत्नीनपासून याचा जन्म झाला. त्याला विंध्यावली, अशना इ. भार्या होत्या. त्याला अशना नावाच्या स्त्रीपासून बाणसुर हा पुत्र झाला (भागवत ६.१८). भागवतातच बाणाच्या आईचे नाव कोटरा असे आढळते (१०.६३). त्याला १०० पुत्र होते अशी कथा असून त्याचे बाण, कुंभगर्त इ. पुत्र प्रसिद्ध होते. शकुनी व पूतना या त्याच्या दोन मुली होत. बळीच्या नातीचा म्हणजेच बाणासुराची कन्या उषा हिचा विवाह कृष्णाच्या अनिरूद्धनामक नातवाशी (प्रद्युग्नाच्या मुलाशी) झाला होता. महाबलीपुर ही त्याची राजधानी होती. तो अत्यंत सामर्थ्यशाली असल्यामुळे त्याला नुसते बळी असे न म्हणता महाबळी असे म्हणत असत.

बळी व इंद्र यांच्या संघर्षाची वर्णने पुराणांतून वारंवार आढळतात. या संघर्षातून आर्य व अनार्य यांचा संघर्ष सूचित होतो. यथासांग नसलेल्या, विशेषतः दक्षिणेशिवाय केलेल्या कर्मांचे फळ बळीला मिळते, या संकेतावरूनही हा संघर्षच सूचित होतो. एकदा बळीने इंद्राचा पराभव करून त्याच्या संपत्तीचे हरण केले होते. ती संपत्ती समुद्रात पडली तेव्हा ती परत मिळविण्यासाठी (वा अमृत मिळविण्यासाठी) देवांनी बळीच्या मदतीने ⇨ समुद्रमंथन केले (भागवत ८.६ ८.८). त्यानंतर अमृतासाठी झालेल्या युद्धात मृत झालेल्या बळीला शुक्राचार्यांनी जिवंत केले. त्याने पुन्हा इंद्राला जिंकले आणि इंद्रपद मिळविले.

एकदा बढाई मारल्यामुळे प्रह्‌लादावने त्याला राज्यनाशाचा शाप दिला विष्णूला भूमीचे दान देऊ नकोस, असे शुक्राचार्यांनी सांगितले असतानाही त्याने त्यांचे ऐकले नाही, म्हणून शुक्राचार्यांनीही त्याला असाच शाप दिला त्याने एक विश्वजित याग व १०० अश्वमेध यज्ञ केले होते त्याला सोडविण्यासाठी रावण पाताळात गेला असता, ते तुला जमणार नाही, असे म्हणून बळीने त्याला परत पाठविले रावण त्याला जिंकण्यासाठी पाताळात गेला असता रावणाला अपमानित होऊन परत जावे लागले इ. कथा आढळतात.

प्रह्‌लादाच्या उपदेशानुसार बळीने अत्यंत न्यायाने राज्य चालविले. कार्तिक शु. प्रतिपदा ही त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. हा विक्रम संवताचा प्रारंभदिन असून हिंदूंच्या साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. वामनाने याच दिवशी बळीचा पाडाव केला होता. बळीकडे तीन पावले जमीन मागून दोन पावलांनी पृथ्वी व आकाश व्यापल्यानंतर त्याने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवले होते. त्या दिवशी तांदळांनी बळीची आकृती काढून वा त्याचे पंचरंगी चित्र काढून त्याची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया पुरूषांना ओवाळताना ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’, असे म्हणतात. यावरून प्रजेच्या मनातील त्याच्या विषयीचा आदर स्पष्ट होतो. आश्विन महिन्याच्या शुक्लपक्षात केरळमध्ये ⇨ ओणम् नावाचा सण साजरा केला जातो. त्या दिवशी बळी आपल्या प्रजेला भेटावयास पृथ्वीवर परत येतो, आपले दुःख त्याला दिसू नये म्हणून प्रजा उत्सव साजरा करते आणि प्रजा सुखी आहे, हे पासून तो आनंदाने परत जातो, अशी समजूत आहे. बळी पाताळात गेला, याचा अर्थ त्याने केरळात राज्य स्थापन केले असावे, असे अभ्यासकांचे मत आढळते. पं. सातवळेकरांच्या मते त्याने कोकणात राज्य स्थापन केले असावे. कन्याकुमारीच्या दक्षिणेला समुद्रात गेलेल्या एका भूशिरावर त्याची राजधानी होती, असे उल्लेख तमिळ वाङ्‌मयात आढळतात. त्रिविक्रम वामनाने बळीला पाताळात ढकलले, या विषयावरची अनेक शिल्पे दक्षिणेत आढळतात.

साळुंखे, आ. ह.