बहुरूपी : नानाविध सोंगे धारण करून भिक्षा मागणाऱ्या लोकांची एक जमात. बहुशः सुगीच्या हंगामात खेड्यात जे ‘बिछायती’ म्हणजे गावाबाहेरचे लोक येतात, त्यांत काही ‘उपलाणी’ असतात. म्हणजे जे फिरस्ते वतनदाराप्रमाणे वहिवाटीनुसार नेमलेल्या गावी न जाता वाटेल तिथे भटकतात, त्यांना उपलाणी म्हणतात. अशा उलपाणी वर्गात बहुरूप्याचा समावेश होतो. ‘भोरपी’, ‘रायनंद’ या नावांनीही ते ओळखले जातात. श्रीपतिभट्टाच्या ज्योतिषरत्न्माला या आद्य मराठी गद्य ग्रंथात त्यांचा ‘बोहर्पी’ असा उल्लेख आढळतो. महाराष्ट्रातील जानपद नाट्योपासकांपैकी बहुरूपी हा सर्वांत महत्त्वाचा व आद्य घटक होय. बहुरूपी निरनिराळी सोंगे काढून व वेष धारण करून लोकांचे मनोरंजन करतात व लोकांकडून खुशीपोटी जे पैसे, धान्य वा वस्त्र मिळेल त्यावर उपजीवीका करतात. कोणतेही सोंग काढताना ते हुबेहूब वेषांतर, अभिनय, आवाजातील चढउतार व नाट्यमयता इतकी परिणामकारकपणे साधतात, की कित्येकदा अस्सल व नक्कल यांतील भेद प्रेक्षकाला सहजासहजी ओळखू येत नाही. बहुरूपी कित्येकदा सोंगाना विनोदी गाण्यांची जोड देतात. उदा., लग्नातचे निमंत्रण देणाऱ्या बाईचे सोंग घेऊन म्हटले जाणारे ‘लग्ना ला चला, तुमि लग्नादला चला’ हे विनोदी गाणे. त्यांच्या अनेकविध सोगांमध्ये खेड्यातील पोलीसपाटील, मामलेदार वगैरे प्रतिष्ठित व्यक्ती, बाळंतिणी गर्भवती स्त्रिया, रडणाऱ्या बालकांचे आवाज, पशुपक्ष्यांचे ध्वनी, पौराणिक पात्रांची सोंगे वगैरे प्रकार पाहावयास मिळतात. महाराष्ट्रात त्यांचा संचार खेडोपाडी सर्वत्र असे. नित्य गावोगावी भटकत असल्यामुळे त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यांच्या चालीरीती मराठा-कुणब्यांसारख्याच असतात. बहिरोबा, जानाई, जोखाई, खंडोबा ही त्यांची दैवते होत. प्राचीन मराठी वाङ्‌मयात बहुरूप्याचे दृष्टांत विपुल आढळतात. समर्थ रामदास स्वामींच्या एका भारूडात परमेश्वर हाच बहुरूपी असल्याची कल्पना मांडली आहे. मोगल काळातील अकबर बादशाहाच्या दरबारातील बहुरूप्यांच्या बैल, वाघ, घोडा यांसारख्या प्राण्यांच्या सोंगांच्या काही आख्यायिका रूढ आहेत. महाराष्ट्राखेरीज भारताच्या अन्य भागांतही बहुरूपी आढळतात. पंजाबातील बहुरूपी शीखपंथीय आहेत. गुजरातेतील ‘भवय्ये’ म्हणजे बहुरूपी पशुपक्ष्यांचे हुबेहूब ध्वनी काढण्यात तरबेज असतात. बहुरूप्याची कला काही घराण्यांत पितृपरंपरेने चालत आली आहे. तथापि आधुनिक काळात लोकाश्रयाच्या व सामाजिक प्रतिष्ठेच्या अभावामुळे ही परंपरा लुप्त होत चालल्याचे दिसून येते.

संदर्भ : ढेरे, रा. चिं. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.

कार्लेकर, शि. शं.