शिबिर : (कँप/कँपिंग). विशिष्ट हेतूने, विशिष्ट कार्य वा कार्यक्रमासाठी स्त्री-पुरुषांच्या एखाद्या गटाने एखाद्या ठिकाणी ठरावीक कालावधीसाठी योजिलेल्या एकत्र वास्तव्याचा उपक्रम म्हणजे शिबिर असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. शिबिर शब्दाचा मूळ अर्थ सैनिकी तळ, छावणी, तंबू किंवा गोट असा आहे. खूपच अर्थविस्तार झालेल्या कँप आणि कँपिंग या इंग्रजीतील शब्दांचे शिबिर व शिबिरवास हे रूढ मराठी पर्याय होत.

शिबिरांचे आयोजन कौटुंबिक तसेच त्याहून मोठ्या स्वरूपाच्या सामूहिक घटकांच्या पातळ्यांवर केले जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरही शिबिरे योजिली जातात. सहल-मनोरंजन-विरंगुळा या उद्दिष्टांबरोबरच शिक्षण, प्रशिक्षण, उद्बोधन, उजळणी वा सराव, उपासना, मार्गदर्शन, स्वाध्याय, स्वावलंबन यांसारखी इतरही उद्दीष्टे शिबिरांमध्ये असतात. सामान्यतः शिबिरार्थी स्वेच्छेने सहभागी झालेले असतात तथापि संस्था किंवा संघटनांच्या सदस्यांचा सहभाग कधीकधी आवश्यक स्वरूपाचा असतो. गिर्यारोहण, नौकाविहार, शेतावर निवास, वनविहार, पशुपक्ष्यांचे निरीक्षण, बदलत्या ऋतु-सौंदर्याचा आस्वाद, ग्रहताऱ्यांचे निरीक्षण, दुर्मीळ वस्तू जमविण्याचा छंद, कलागुणांचे दर्शन व संवर्धन यांसारख्या विषयांशी निगडीत अशा उपक्रमांसाठी शिबिरे भरविली जातात. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांसाठी शिबिरे योजिली जातात. यांतून शिबीरार्थींचे प्रशिक्षण व उद्बोधन करण्यात येते. त्या त्या पक्षाच्या किंवा संघटनेच्या तत्त्वज्ञानाचे, कार्याचे, प्रसार-प्रचाराचे एक साधन म्हणून अशा शिबिरांचा उपयोग होतो. काही समाजसेवी संस्था शिबिरांद्वारा रक्तदान, श्रमदान, ग्रामसफाई, आरोग्य तपासणी, रस्ते तयार करणे, विहिरी खोदणे यांसारखे लोकोपयोगी उपक्रमही करतात. लहान मुला-मुलींच्या तसेच युवक-युवतींच्या शैक्षणिक शिबिरांचे महत्त्व आता सर्वमान्य झालेले आहे. शिक्षणक्रमात अंतर्भूत नसलेल्या अनेक विषयांचे शास्त्रशुद्ध ज्ञान देण्याच्या हेतूने शैक्षणिक शिबिरे योजिली जातात. पुस्तकी शिक्षणाबाहेरच्या अभ्यासेतर विषयांची व कला-क्रीडांची ओळख विद्यार्थ्यांना अशा शिबिरांतून होते. व्यावसायिक शिबिरांतून कर्मचारी, कामगार किंवा अधिकारिवर्ग यांच्यासाठी खास प्रशिक्षणाची किंवा उजळणी-उद्बोधनाची सोय केलेली असते. विकलांग अशा मुलामुलींसाठी तसेच प्रौढांसाठीही उपचारात्मक स्वरूपाची शिबिरे योजिली जातात. विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा व उपचार उपलब्ध करून देणारी शिबिरेही असतात.

आधुनिक सुधारणांमुळे माणसाच्या वाट्याला अनिवार्यपणे येणाऱ्या यांत्रिक, कृत्रिम व जखडबंद जीवनक्रमातून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात राहावे व नवे अनुभव, नवे ज्ञान व वेगळी करमणून मिळवावी, या हेतूने पाश्चिमात्य समाजात शिबिरवासाची आवड वाढीस लागल्याचे दिसून येते. निरनिराळी मंडळे (उदा., कँपिंग क्लब), संघटना (लीग असोसिएशन) आणि व्यवासायिक संस्था लोकांसाठी शिबिरांची व्यवस्था करतात. ही कल्पना लोकप्रिय झालेली असून, त्यासाठी काही पाश्चिमात्य देशांत विशिष्ट कायदेही करण्यात आलेले आहेत.

जगातील प्रगत देशांत शाळा, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे अशा शिक्षणसंस्थांतून शिबिरांचे नियोजन व त्यांतील विविध उपक्रम यांसाठी शिक्षकांना खास प्रशिक्षण दिले जाते. अमेरिकेतील काही विद्यापीठांतून शिबिर-संचालनाचे उच्च दर्जाचे शिक्षणक्रमही उपलब्ध आहेत. काही शारीरिक शिक्षण विद्यालयांच्या अभ्यासक्रमांत हा स्वतंत्र विषयही ठेवलेला आढळतो.

फ्रान्समध्ये सुटीच्या दिवसांत मोठमोठी शिबिरे भरविण्याचे राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करतात व त्यांचा खर्च सरकार आणि औद्योगिक संस्था करतात. रशियात तरुणांच्या शिबिरांसाठी तेथील सरकारनेच मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे. स्वीडनमध्ये शहरातील संस्था मुलांची आणि मोठ्या माणसांची शिबिरे चालवितात. ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, ईजिप्त, जर्मनी, जपान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका येथे व भारतातही बहिःशाल शिक्षणात शिबिरांचा समावेश केलेला आढळतो. त्यांची व्यवस्था शिक्षणसंस्था करतात आणि त्यांना सरकारी साहाय्य मिळते.

अमेरिकेत १८६१ साली गन पतिपत्नीने ‘गनरी स्कूल’मधील मुले शिबिरासाठी प्रथम बाहेर नेली व हा कार्यक्रम सतत अठरा वर्षे चालू ठेवला. १८७६ साली जे. टी. रॉथ्रॉक यांनी पहिले खाजगी शिबिर भरविले. रेव्हरंड जॉर्ज डब्ल्यू. हिंग्क्ली यांनी १८८० मध्ये गार्डनर्स आयलंड येथे पहिले चर्चचे शिबिर सुरू केले. सर्वांत जुने परंतु आजही चालू असलेले शिबिर १८८५ साली समर एफ. डड्ली यांनी सुरू केले. ते शिबिर ‘यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन’ने (वाय्.एम्.सी.ए.) योजिले होते. विरंगुळा मिळविण्यासाठी शिबिर या कल्पनेचा जनक म्हणून टॉमस हिरम होल्डिंग याचा निर्देश करावा लागेल. त्याने सायकल अँड कँप (१८९८), कँपर्स हँडबुक (१९०८) इ. पुस्तके लिहिली. तसेच ‘असोसिएशन ऑफ सायकल कँपर्स’ ही संघटना १९०१ साली स्थापना केली. सर ⇨ बेडन-पॉवेल यांनी पहिल्या महायुद्धानंतर स्थापलेल्या बालवीर चळवळीत प्रथमपासूनच शिबिरांना अग्रस्थान दिलेले आहे.

शिबिरांचे व ज्या संयोजक संस्था असतात त्यांचे, तीन विभाग पाडता येतात. युवक-युवतींच्या संस्था, चर्च, सामाजिक मंडळे, औद्योगिक व्यवसायकेंद्रे, कामगार संघटना, सहकारी संस्था आणि स्वयंसेवी संघटना यांचा एक विभाग असतो. दुसऱ्या विभागात शाळा, नगरपालिका, तसेच शासनयंत्रणा यांनी चालविलेली शिबिरे येतात, व्यावसायिकदृष्ट्या चालविलेल्या शिबिरांचा तिसरा विभाग पडतो. शासकीय व खाजगी संस्था, नगरपालिका इत्यादींनी विशेष योजना आखून शिबिरांसाठी जागा, सोयी, साधने उपलब्ध करून देऊन इतर अनेक सवलतीही दिल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर, मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांची नेमणूकही केलेली आढळते. युरोप-अमेरिकेतील बहुतेक देश, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील काही विकसित राष्ट्रांतून या सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसून येते. लहान मुले व युवक यांच्या विकासाचे व शिक्षणाचे साधन म्हणून तसेच त्यांच्यात स्वालंबन, टापटीप, कष्टाळूपणा, हरहुन्नरीपणा आणि शिस्त निर्माण करावयासाठी शिबिरांचा उपयोग होतो. नित्याच्या शालेय शिक्षणात नसलेल्या अनेक विषयांसाठी शिक्षणाची एक शास्त्रशुद्ध योजना म्हणूनही शिक्षणक्षेत्रात शिबिरांना महत्त्व प्राप्त झाले आहे. शारीरिक व्यंग असलेल्या तसेच दीर्घकालीन विकारांनी ग्रासलेल्या मुलांसाठी विशेष प्रकारच्या शिबिरांच्या योजना अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये आखल्या जातात.

व्यक्ती आणि कुटुंबे यांच्यातही आधुनिक काळात शिबिरवासाची आवड उत्पन्न झालेली दिसून येते. स्वतःचे सामान आणि लहानसा तंबू घेऊन एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी पायी अथवा वाहनाने जाऊन काही काळ रानावनात, नदीकिनारी, समुद्रकाठी नैसर्गिक वातावरणात वेळ घालवावयची हौस युरोप-अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आढळते. या प्रकारची हौशी शिबिरे एकाच ठिकाणी उभारतात असे नाही. फिरत फिरत व ठिकठिकाणी तळ ठोकत पुढे जाण्याची पद्धतही रूढ आहे.

 शिबिरांसाठी कीटक व विषारी वनस्पतींचा उपद्रव होणार नाही अशी जागा, चांगले पाणी यांची गरज शिबिरांसाठी असते. खाण्यापिण्याची साधनसामग्री, शेकोटी आणि मनोरंजक कार्यक्रमांची व्यवस्था करावी लागते. अन्न शिजविण्यासाठी स्टोव्ह, गॅसशेगड्या यांच्या वापराकडे जास्त कल आढळतो. विविध प्रकारचे तंबू शिबिरार्थी वापरतात. उदा., एकखांबी, साधा त्रिकोणी तंबू (पब टेंट), छत्रीसारखा, वर छताचे आच्छादन असलेला तंबू (अंब्रेला टेंट विथ कॅनोपी), टोपीसारखे आच्छादन आणि भिंती असलेला तंबू (वॉल टेंट विथ हूड), तयार चौकटीवर उभारता येणारा, मनोऱ्यासारखा व तणाव्यांचा तंबू (अप्पर अँड लोअर बर्थ) इत्यादी. शिबिरात पांघरण्यापेक्षा अंथरण्याचा प्रश्न नेहमीच त्रासदायक होतो. परदेशात प्रवासी-पलंग वापरात असले, तरी तेही हिवाळ्यात खालून गार पडतात. भारतात घोंगडीसारखे अंथरूण सोयीचे वाटते. वर्तमानपत्राच्या कागदांचा या कामी उत्तम उपयोग होऊ शकतो. अनेक वेळा तयार तंबू, इमारती, झोपण्याच्या खोल्या, भोजनगृहे, जंगलातील किंवा सार्वजनिक बांधकामविभागाचे बंगले, शासकीय इमारतीही शिबिरासाठी उपलब्ध होऊ शकतात. शिबिरासाठी हलके-फुलके आवश्यक सामान, औषधे, मळखाऊ कपडे यांची व्यवस्था केली, तर ते सुखकारक ठरते.

शिबिरातील ठरावीक मुदतीच्या वास्तव्यात सर्व शिबिरार्थींना परस्परांचा सतत सहवास लाभतो. त्यांच्यातील स्नेहभाव वाढण्यास मदत होते. परस्परांच्या सवयी, आवडीनिवडी, गुणदोष, विचार यांचीही कल्पना येते, तसेच ज्या संस्थेच्या किंवा संघटनेच्या मार्फत शिबिरे भरविली जातात, त्यांच्या विचारसरणीची व कार्यपद्धतीची अधिक चांगली ओळख शिबिरार्थींना होऊ शकते. खाजगी पातळीवर योजिलेल्या किंवा कौटुंबिक स्वरूपाच्या शिबिरांमुळे कुटुंबभाव दृढ व निकोप होण्यास मदत होते.

नातू, मो. ना.