बस्तर : मध्य प्रदेश राज्यातील, क्षेत्रफळाने केरळ राज्यापेक्षा मोठा जिल्हा आणि १९४८ पूर्वीचे संस्थान. क्षेत्रफळ ३९,०६० चौ. किमी. लोकसंख्या १८,४०,४४९ (१९८१). याच्या पूर्वेस ओरिसा, दक्षिणेस आंध्र प्रदेश आणि पश्र्चिमेस महाराष्ट्र ही राज्ये असून, उत्तरेस राजनंदगाव, दुर्ग आणि रायपूर हे जिल्हे आहेत. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण जगलपूर (लोकसंख्या ३१,३४४ – १९७१) आहे. जगलपूरचा निर्देश ‘बस्तर’ या नावानेही केला जात असे.
दख्खनच्या पठारावरील या जिल्ह्याचे मध्यवर्ती व वायव्य भाग डोंगराळ असून पूर्वेकडील प्रदेश ४५० ते ६०० मी. उंचीच्या पठाराचा आहे व पश्र्चिम भाग गोदावरी खोऱ्याचा आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातून महानदी व मध्यातून पूर्व-पश्र्चिम दिशेने इंद्रावती नदी वाहते. एकूण क्षेत्राच्या १०% पेक्षा कमा प्रदेश लागवडीखाली आहे. या प्रदेशातून भात, ज्वारी इ. पिके तसेच अभ्रक, हेमेटाइट, कोरंडम इ. खनिजेही काढली जातात. यांशिवाय जिल्ह्यातील जंगलक्षेत्रातून साल, बांबू, साग इ. वनस्पतींचेही उत्पन्न मिळते. येथील लोकांपैकी एकूण ७५% आदिवासी असून त्यांत गोंड व हालवे या जमातींचे प्रमाण जास्त आहे.
बस्तर संस्थानातील राजघराणे जुने सोमवंशीय होते, असे सांगतात. या घराण्याचा मूळ पुरूष आनमदेव असून दंतेश्र्वरीच्या कृपेने त्याने बस्तर येथे सत्ता प्रस्थापित केली. मराठ्यांच्या काळात बस्तर स्वतंत्र होते परंतु अठराव्या शतकात नागपूर सरकारने ह्यावर खंडणी बसविली होती. पुढे १९४८ मध्ये बस्तर संस्थान व कांकर संस्थान यांचा समावेश बस्तर जिल्ह्यात करण्यात आला [→ दंडकारण्य प्रकल्प मध्य प्रदेश राज्य].
चौंडे, मा. ल.
“