बल्गेरियन साहित्य : इसवी  सनाच्या  नवव्या  शतकात   झार बोरिस पहिला ह्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर (८६५), ह्या धर्माच्या प्रसाराच्या प्रेरणेतून बल्गेरियन साहित्यनिर्मितीला आरंभ झाला. त्यामुळे आरंभीचे बल्गेरियन साहित्य धार्मिक स्वरूपाचे आहे. संत सिरिल (८२७—६९) आणि त्याचा बंधू संत मिथोडिअस (८२६—८५) ह्या दोघांच्या अनुयायांनी ह्या साहित्यनिर्मितीत पुढाकार घेतला. संतचरित्रे, प्रवचने असे हे साहित्य आहे. इतिवृत्तेही लिहिली गेली. बल्गेरियाचा काजा झार सिमेऑन (कार. ८९३ — ९२७) ह्याच्या कारकीर्दीत बल्गेरियन साहित्याचा उत्कर्ष झाला. Shestodnev (इं. शी. हेक्-झामेरॉन) ही ह्या कालखंडातील एक उल्लेखनीय साहित्यकृती. जॉन द एक्झार्क हा ह्या साहित्यकृतीचा कर्ता. विश्र्वनिर्मितीचा वृत्तांत तीत दिलेली असून हे विश्र्व कधी नष्ट होणार ह्याबाबतची भविष्यवाणीही व्यक्तविलेली आहे. मध्ययुगीन अद्-भुतकथांच्या आधारे काही कथात्मक साहित्यही निर्मिले गेले. १३९६-१८७८ ह्या दीर्घ कालखंडात बल्गेरियावर तुर्कांची सत्ता होती. साहजिकच बल्गेरियन साहित्याची गळचेपी होऊ लागली त्याचा प्रवाह थांबला.

खंडित झालेल्या ह्या प्रवाहाला पुन्हा ओघ प्राप्त करून देण्याचे श्रेय फादर पाइसी (१७२२-९८) ह्याच्याकडे जाते. ‘स्लाव्होबल्गेरियन हिस्टरी’ (१७६२, इं. शी.) हा इतिहासग्रंथ लिहून त्याने बल्गेरियाच्या उज्ज्वल भूतकाळाकडे देशबांधवांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतरच्या सु. शंभर वर्षांत  बल्गेरियन भाषेच्या विकासाकडे बल्गेरियन साहित्यिकांनी लक्ष पुरविले. १८३५ मध्ये बल्गेरियन भाषेचे पहिले व्याकरण प्रसिद्ध झाले. नेओफित रिल्स्की (१७९३-१८८१) हा त्याचा कर्ता. पेचको स्लाव्हिकोव्ह (१८२७-९५) हा थोर कवी आधुनिक बल्गेरियन साहित्यभाषेचा निर्माता समजला जातो. आपल्या कवितेची प्रेरणा स्लाव्हिकोव्हने बल्गेरियन लोकगीते आणि आख्यायिका ह्यांत शोधली. भावकविता, देशभक्तिपर गीते आणि प्रभावी उपरोधिका अशी विविध प्रकारची काव्यचना त्याने केली आहे. अमेरिकन बायबल सोसायटीने बायबलचा बल्गेरियन भाषेत अनुवाद करण्याची कामगिरी स्लाव्हिकोव्हवर सोपवली आणि त्याने ती पार पाडली (१८६२). आधुनिक बल्गेरियन साहित्यभाषेचे स्वरूप निश्र्चित करण्यात स्लाव्हिकोव्हच्या कवितेबरोबरच त्याने केलेल्या ह्या अनुवादाच वाटाही मोठा आहे. ल्यूबेन काराव्हेलोव्ह (१८३४-७९), गेओर्गी साव्हा रकॉव्हस्की (१८२१-६७) आणि ख्रिस्टो बोटेव्ह (१८४८-७६) हे अन्य उल्लेखनीय बल्गेरियन साहित्यिक होत.

सामाजिक जीवनाच्या गरजा लक्षात घेऊन साहित्यिकांनी आपली साहित्यनिर्मिती केली पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. काराव्हेलोव्हने कविता, कथा, कादंबऱ्या असे विपुल लेखन केले. त्याच्या कथात्मक साहित्याने बल्गेरियन साहित्यातील वास्तवादाचा पाया घातला. रकॉव्हस्कीच्या Bulgare ot staro Verme (१८७२) ह्या कादंबरीचा अंतर्भाव बल्गेरियन भाषेतील श्रेष्ठ साहित्यकृतींत करण्यात येतो. रकॉव्हस्कीने कविता लिहिल्या तथापि साहित्यिक म्हणून त्याचे नाव मुख्यतः त्याच्या कथात्मक साहित्यामुळेच झाले. बोटेव्हच्या कवितातून  प्रखर देशप्रेमाचा प्रत्यय येतो. ह्या सर्व साहित्यिकांनी निव्वळ साहित्यनिर्मिती केली नाही, तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी चाललेल्या क्रांतिकार्यात भाग घेतला.

 

बल्गेरियाला १८७८ मध्ये स्वातंत्र्य लाभले आणि देशातील सामाजिक-राजकीय जीवनाला वेगळे वळण मिळाले. इव्हान व्हाझॉव्ह (१८५०-१९२१) हा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील श्रेष्ठ बल्गेरियन साहित्यिक. कविता, कादंबरी, कथा, नाटक असे विविध साहित्यप्रकार त्याने हाताळले. अंडर द योक (१८९४. इं. भा.) ही त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी बल्गेरियन स्वातंत्र्यलढ्यावर आधारलेली आहे. ‘एपिक टू द फरगॉट्न’ (१८८१-८४. इं. शी.) ही काव्यमाला, ‘न्यू लँड’ (१८९६, इं. शी.) हा कादंबरी आणि ‘टूवर्ड द अबिस’ (१९१०, इं. शी.) हे नाटक ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय साहित्यकृती होत. बल्गेरियन जनतेच्या आशाआकांक्षा आणि बल्गेरियाचा आणि बल्गेरियाचा इतिहास ह्या त्याच्या लेखनामागील मुख्य प्रेरणा होत्या.

कनस्टंटयीन व्हेललिच्-कोव्हवर (१८५५-१९०७) इटालियन साहित्याचा आणि संस्कृतीचा प्रभाव होता. पीत्रार्क, दान्ते ह्यांसारख्या इटालियन कवींच्या काव्यकृती त्याने बल्गेरियन भाषेत अनुवादिल्या. इटालियन साहित्याचा प्रभाव त्याच्या सुनीतांतूनही प्रत्ययास येतो. झखारी स्टोयानॉव्ह (१८५१-८९) ह्याने बल्गेरियनांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यांतील आपल्या काही स्मृती Zapiski po Bulgarskite Vuxstaniya ह्या नावाने लिहिल्या. आधुनिक बल्गेरियन गद्याचे अनेक उत्कृष्ट नमुने ह्या ग्रंथात आढळतात. स्टोयान मिखायलोव्हस्की (१८५६-१९२७) ह्याने बल्गेरियन समाजातील काही अपप्रवृत्तींचे दर्शन आपल्या उपरोधप्रचुर लेखनातून घडविले.

ह्यानंतरच्या पिढीतील साहित्यिकांत पेंचो स्लाव्हिकोव्ह (१८६६—१९१२) ह्या कवीचा अंतर्भाव होतो. ह्या कवीवर पश्र्चिमी कल्पनांचा आणि विचारांचा-विशेषतः नीत्-शेचा विशेष प्रभाव होता. संकुल जीवनानुभवांची प्रभावी अभिव्यक्ती साधू शकणारी काव्यभाषा पेंचोच्या कवितेने निर्माण केली. त्याची कविता चिंतनशील व आत्मपर आहे. ‘ए साँग ऑफ ब्लड’ (१९१३, इं. शी.) हे त्याचे महाकाव्य अपूर्णच राहिले. बल्गेरियन जनतेने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची ही गौरवगाथा. दर्जेदार समीक्षात्मक लेखनही त्याने केले. पेटको टोडोरोव्ह (१८७९—१९१६) ह्याच्या नाट्यकृतींतून त्याच्या काव्यात्मक वृत्तीचा प्रत्यय येतो.


अंतोन स्ट्राशिमिरॉव्ह (१८७२-१९३७) व एलिन-पेलिन (१८७७-१९४९) हे बल्गेरियन साहित्यातील वास्तववादाचे प्रतिनिधी. ‘ऑटम डेज’ (१९०२, इं. शी.), ‘क्रॉसरोड’ (१९०४, इं. शी.) आणि ‘मीटिंग’ (१९०८, इं. शी.) ह्या त्याच्या कादंबर्यां तून तत्कालीन बल्गेरियन समाजाचे परिणामकारक चित्रण त्याने केले आहे. त्याच्या तीव्र निरीक्षणशक्तीचा प्रत्यय ह्या कादंबर्यांहतून येतो. एलिन-पेलिनने बल्गेरियन कथा समृद्ध केली. ‘द गेराक फॅमिली’ (१९११, इं. शी.) आणि ‘लँड’ (१९२८, इं. शी.) ह्यासारख्या कादंबर्यां तून खेडुतांच्या आणि शेतमजुरांच्या मनांचे मार्मिक विश्र्लेषण त्याने केले आहे.

 

विसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रतीकवादाचा प्रभाव बल्गेरियन कवितेवर  पडला.  पेयो  याव्होरोव्ह  (१८८७ — १९१४)  ह्या  श्रेष्ठ  कवीचे नाव  ह्या  संदर्भात  विशेष  उल्लेखनीय.  आपल्या  नादवती  कवितेतून त्याने शब्दांचे संगीत निर्माण केले भाषेच्या सूचनाक्षमतेचा उपयोग करून घेतला. कवितेखेरीज त्याने नाट्यलेखनही केले संस्मरणिकाही लिहिल्या.

डिमिचको डेबेल्यनॉव्हच्या (१८८७-१९१६) कवितेवर याव्हो-रोव्हचा प्रभाव आढळतो. किरील क्रिस्टोव्हवर (१८७५-१९४४) नीत्-शेच्या व्यक्तित्ववादाचा तसेच विख्यात इटालियन कवी गाब्रिएले दान्नूत्स्यो ह्याच्या कवितेचा परिणाम जाणवतो. ‘हिम्स टू द डॉन’ (१९११, इं. शी.) हा त्याचा वैशिष्टयपूर्ण काव्यसंग्रह. पुश्किन, शेक्सपिअर, बायरन, शिलर, गटे आणि दान्ते ह्यांसारख्या थोर साहित्यिकांचे साहित्य त्याने बल्गेरियन भाषेत अनुवादिले.

पहिल्या महायुद्धानंतर डाव्या विचारसरणीचे जे साहित्यिक बल्गेरियात निर्माण झाले, त्यांत गेव मिलेव्ह, क्रिस्टो स्मिरनेन्स्की आणि निकोला व्हाप्टसारॉव्ह ह्यांचा समावेश होतो.

बल्गेरियात १९४४ मध्ये साम्यवादी सत्ता प्रस्थापित झाली आणि समाजवादी वास्तववादाचा पुरस्कार करण्यात आला. काही उल्लेखनीय बल्गेरियन साहित्यिक असे : कादंबरीकार–डिमिटर डिमॉव्ह, एमिल्यन स्टानेव्ह (१९०७- ), डिमिटर टालेव्ह, पाव्हेल व्हेझिनॉव्ह (१९१४- ). कवी–लामार वोझिलेव्ह. नाटककार-ऑर्लिन व्हास्सिलेव्ह (१९०४- ) इत्यादी.

कुलकर्णी, अ. र.