बलुचिस्तान : पाकिस्तानचा इतिहासप्रसिद्ध प्रांत. क्षेत्रफळ ३,४७,१८८ चौ. किमी. लोकसंख्या २५,६२,००० (१९७५ अंदाज). विस्तार २४º५४’ उ. ते ३२º४’ उ. अक्षांश आणि ६०º५६’ पू. ते ७०º१५’ पू. रेखांश यांदरम्यान असून याच्या पश्र्चिमेस इराण, उत्तरेस अफगाणिस्तान, दक्षिणेस अरबी समुद्र व पूर्वेस सिंध आणि पंजाब हे पाकिस्तानचे प्रांत आहेत. बलुचिस्तानमध्ये व्केट्टा-पिशिन, सिबी, झोब, लोरालाई, चागई हे पाच जिल्हे व कलात, लास बेला, खारान व मकरान या चार भूतपूर्व संस्थानांचा समावेश होतो. बलुची किंवा बलोच (भटके) जमातीवरून यास ‘बलुचिस्तान’ हे नाव पडले. व्केट्टा [लोकसंख्या १,५६,००० (१९७६ अंदाज)] ही या प्रांताची राजधानी आहे.

बलुचिस्तानचा बहुतेक भाग डोंगराळ व रूक्ष वाळवंटांनी व्यापलेला आहे. भौगोलिक दृष्टया याचे (१) मध्य व ईशान्येकडील डोंगराळ भाग (खोरासान प्रदेश), (२) कच्छी मैदान, (३) बोलन व खोजाक खिंडींचा भाग आणि (४) समुद्रकिनारी व नद्यांच्या खोऱ्यांतील मैदानी  प्रदेश  असे  विभाग  पडतात.  बलुचिस्तानमध्ये  सुलेमान पर्वतश्रेणी, तोबा-काकर  पर्वतरांग, मकरान, खारान, चागई, पाब, कीर्थर, मध्य  ब्राहूई  या  प्रमुख  पर्वतरांगा  असून  झरगून  (३,५७८ मी.) हे  येथील  सर्वोच्च  शिखर  आहे.  त्याखालोखाल खलीफत  (३,४८५ मी.)  व  तख्त-इ-सुलेमान  किंवा कैसरगढ (३,४४१ मी.)  ही  अन्य  शिखरे  आहेत.  बोलन  व  खोजक  या प्रमुख खिंडी होत. मैदानी भाग हा समुद्रकिनारी व नद्यांच्या खोर्यां तून असून ९६५ किमी. लांबीचा समुद्रकिनारा बलुचिस्तानला लाभलेला आहे. चागई, खारान, मकरान ही मोठी वाळवंटे आहेत. येथील नद्यांना बारमहा पाणी नसते. बहुतेक नद्या सिंधू नदीस अथवा अरबी समुद्रास मिळतात. झोब, नारी, दश्त, हिंगोल, पोराली-नाई, हब, पिशिन-लोरा या प्रमुख नद्या व हामून-इ-लोरा, हामून-इ-मश्केल ही प्रमुख सरोवरे आहेत. समुद्रकिनारा वगळता इतरत्र स्थूलमानाने उपोष्ण कटिबंधीय खंडीय प्रकारचे हवामान आहे. वार्षिक सरासरी किमान तपमान समुद्रकिनारी ३०ºसे., वाळवंटी प्रदेशात ३७ºसे. व पर्वतीय भागात २४ºसे. असते. मान्सून हवामानाच्या टापूत हा प्रांत येत नसल्याने त्याचाही येथील हवामानावर परिणाम होतो. पावसाचे प्रमाण कमी असून किनारी भागात ते वर्षांकाठी सरासरी सु. २८ सेंमी., तर पर्वतीय भागात सु. ४१ सेंमी. असते. पर्वतीय भागैत जूनिपर, लॉरेल, पाइन, ऑलिव्ह, अँश, पॉप्लर, विलो तसेच जिरे, हिसप इ. तर वाळवंटी भागात काटेरी झुडुपे, खजुराची झाडे आढळतात. चिकोर, सिसी, शकुक, सोनेरी गरूड इ. पक्षी तसेच उंट, शेळ्या-मेंढ्या, बकऱ्या, घोडे इत्यादींचे अनेक प्रकार आहेत. पर्वतीय भागांत चित्ता, काळे अस्वल हेही प्राणी अधूनमधून आढळतात. समुद्रकिनारी शार्क, रांजा, सार्डिन, मांजरमासा, हेरिंग इ. मासे सापडतात.

 

इतिहास : अश्मयुगीन व ब्राँझयुगीन अवशेष या प्रातांत अनेक  ठिकाणी  आढळले  आहेत.  व्केट्टा, तोगो, कुली, नाल  येथे सापडलेल्या अवशेषांवरून येथील सिंधू संस्कृतिकालीन (इ. स. पू. ५००० ते ३०००) प्रगतीची कल्पना येते. या प्रातांचा उल्लेख अवेस्तामध्येही आढळतो. ग्रीक इतिहासकार हीरॉडोटस, भूगोलज्ञ स्ट्रेबो यांनीही याचा उल्लेख केलेला आढळतो. अलेक्झांडर द ग्रेट हा इ. स. पू. ३२५ मध्ये बलुचिस्तानमार्गे परतल्याचे प्रसिद्ध आहेच. ग्रीकांनंतर या प्रदेशावर शक, चंद्रगुप्त मौर्य, अशोक इत्यादींचा अंमल होता. इ. स. सातव्या शतकात हा प्रदेश अरबांच्या ताब्यात गेला. त्यांचा अंमल सु. तीन शतके टिकला. तदनंतर हा प्रदेश मोगल सत्तेची ४३ वर्षे वगळता १८०० पर्यंत इराणी साम्राज्यात होता. मात्र यावरील इराणची सत्ता नाममात्रच होती. या काळात बलोच व ब्राहुई टोळ्यांत अनेक संघर्ष झाले. ब्राहुई टोळीचा नायक नासीरखान यास इराणच्या नादिरशाहने (१६५८-१७४७) बलुचिस्तानचा प्रमुख शासक नेमले. नादिरशाहनंतर अहमदशाह अब्दालीबरोबर नासीरखानाचा काही काळ संघर्ष झाला, पण अखेरीस नासीरखानाने अब्दालीशी तह करून त्याचा अधिकार मान्य केला.

 

पहिल्या अफगाण युद्धाच्या वेळी (१८३९) ब्रिटिशांचा बलुचिस्तानशी संबंध आला. ब्रिटिशांनी बोलन खिंडीच्या मार्गे सैन्य पाठवून कलात शहर जिंकले (१८३९). त्यानंतर १८७७ मध्ये ब्रिटिशांनी व्केट्टा शहराचा ताबा घेतला. ब्रिटिशांनी अफगाणिस्तानबरोबर केलेल्या गंडमकच्या तहान्वये (१८७९) तसेच कलातच्या खानांबरोबर वेळोवेळी केलेल्या तहानुसार १८९६ मध्ये ब्रिटिश बलुचिस्तान प्रांत तयार झाला व कलात हे एक संस्थान म्हणून राहिले.

पहिल्या महायुद्धकाळात (१९१४ — १९) जर्मनांनी इराण-बलुचितस्तानमध्ये ब्रिटिशविरोधी प्रचार केल्याने मारी व इतर टोळ्यांनी उठाव केला परंतु बलुची संस्थानिक ब्रिटिशानुकूल असल्याने तो अयशस्वी झाला. पुढे १९४७ मध्ये बलुचिस्तान पाकिस्तानात समाविष्ट झाला व २६ फेब्रुवारी १९४९ पासून पाकिस्तानचा प्रांत म्हणून त्यास स्थान लाभले. १९५५ मध्ये नव्याने निर्माण केलेल्या प. पाकिस्तान प्रांतात बलुचिस्तानचा समावेश करण्यात आला. पुढे १ जुलै १९७० रोजी पुन्हा बलुचिस्तानला स्वतंत्र प्रांताचा दर्जा देण्यात आला.

बलुचिस्तानची अर्थव्यवस्था ही खनिजसंपत्ती, मेंढपाळी, मासेमारी व शेती या व्यवसायांवर अवलंबून आहे. येथे कोळसा, क्रोमाइट, जिप्सम, गंधक, तांबे, बॉक्साइट इत्यादींचे साठे विपुल प्रमाणात आढळतात. सुई येथे १९५२ मध्ये नैसर्गिक वायूचा शोध लागला. सोनमीआनी, ओर्मार, कलमत, पसनी, जीवानी इ. बंदरांतून मासेमारीच्या विकासाच्या दृष्टीने आधुनिक सोयी करण्यात आलेल्या आहेत. ग्वादर येथे शीतगृह असून मासेमारीसाठी या बंदराचा नव्याने विकास करण्यात आलेला आहे. मेंढपाळी व्यवसायातही पुष्कळसे लोक गुंतले आहेत. कमी व अनियमित पावसामुळे शेतीचा विकास झालेला नाही. सु. ६८,७९,६६२ हे जमीन लागवडयोग्य असली, तरी फक्त सु. १२,१४,०५८  हे.  क्षेत्र  लागवडीखाली  आहे  सिंधू  व सिबी  नद्यांतील पाणी  जलसिंचनास उपलब्ध करून गहू, तांदूळ, बार्ली, भाजीपाला, फळे यांच्या लागवड क्षेत्रांत वाढ करण्यात आली आहे. दर हेक्टरी उत्पादनही वाढत आहे. देशातील एकूण उद्योगांपैकी केवळ १ % उद्योग या प्रातांत आहेत. त्यांत औषध कारखाना, लोकर गिरणी, कापड गिरणी, धान्य सडणे, अन्नप्रक्रिया, मद्यनिर्मिती, फळे डबाबंद करणे इत्यादींचा समावेश होतो. हातमागावरील विणकाम, कुंभारकाम इ. हस्तोद्योग चालतात. सिबी आणि लास बेला जिल्ह्यांतील अनुक्रमे उस्त-मुहंमद व उथल येथे नवीन औद्योगिक वसाहती झाल्याने औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. या प्रांतात ११,२०० किमी. लांबीचे रस्ते असून व्केट्टा-सिबी, व्केट्टा-चमन, व्केट्टा-मीर्जाव्हे हे प्रमुख महामार्ग आहेत. प्रांतात १,६०० किमी. लांबीचे लोहमार्ग आहेत. व्केट्टा, रावळपिंडी, कराची, लाहोर या शहरांदरम्यान हवाई वाहतूक चालते. तसेच सोनमीआनी, जीवानी, पसनी, ग्वादर या बंदरांतून जलवाहतूक चालते.

 

लोकसंख्येची घनताही अल्प आहे. या प्रांतात बलुची, ब्राहुई, पठाण, मारी, बुग्टी, मेद, लुर इ. जमातींचे लोक असून त्यांमध्ये बलुची व पठाण लोक बहुसंख्य आहेत व ते बव्हंशी सुन्नी पंथाचे आहेत. येथे बलुची, ब्राहुई, सिंधी, पंजाबी, पुश्तू, मोकाकी इ. भाषा बोलल्या जातात. बलुची व ब्राहुई या भाषांना प्राधान्य आहे. शहरी भागातील उद्योगांच्या वाढीमुळे शहरांकडे लोकांचा ओढा वाढत आहे. बलुचिस्तानात सु. ३०० शैक्षणिक संस्था आहेत. व्केट्टा येथे बलुचिस्तान विद्यापीठ (स्था. १९७०) असून व्केट्टा येथील बलुची अकादमी, ब्राहुई अदबी दिवान व पुश्तू अकादमी या सांस्कृतिक संस्थाही उल्लेखनीय आहेत. घोड्यांच्या शर्यती, कुस्त्या हे येथील लोकप्रिय खेळ आहेत. व्केट्टा या राजधानीच्या शहराशिवाय चमन, कलात, सिबी, ग्वादर, पसनी इ. प्रमुख शहरे या प्रांतात आहेत.

पहा : पाकिस्तान.

संदर्भ : 1. Mari Baloch, M. K. B. The Bolochis Through Centuries :History Versus Legend, 1964.

             2. Khan, M. S. History of Baluch Race and Baluchistan, 1958.

             3. Khan, M. S. The Great Baluch,1965.

     

ओक, द. ह. गाडे, ना. स.