बलिया : उत्तर प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ४७,१०१ (१९७०). हे गंगा नदीच्या डाव्या तीरावर, वाराणसीच्या ईशान्येस सु. १४० किमी. गंगा-घागरा नद्यांच्या दुआबात वसले आहे. हे प्रशासकीय, व्यापारी व औद्योगिक केंद्र असून वाराणसी, पूर्वेकडील छप्रा व उत्तरेकडील मोठ्या शहरांशी लोहमार्गाने जोडलेले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगेच्या क्षरण कार्यामुळे आणि तिच्या पात्र बदलण्यामुळे जुन्या बलिया शहराचे बरेच नुकसान होत असे. १८७३ ते १८७७ यांदरम्यानच्या काळात बलियाचा काही भाग नष्ट झाला. म्हणूनच १९०० मध्ये नदीपासून सु. १.५ किमी. वर नवे शहर वसविण्यात आले.
बलियाचा परिसर गंगा-घागरा नद्यांच्या सुपीक प्रदेशात येत असल्याने येथे प्रामुख्याने धान्ये व ऊस यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. खाद्य तेल, तूप, धान्ये, कापड, तांदूळ, मांस, मीठ इत्यादींची ही बाजारपेठ आहे. यांशिवाय साखर व कापडउत्पादन हे येथील प्रमुख उद्योगधंदे होत. येथे कार्तिकी पौर्णिमेला एक लाखावर यात्रा, तसेच जनावरांचा वार्षिक बाजारही भरतो. येथे शाळा, दवाखाने व दोन महाविद्यालये आहेत.
अनपट, रा. ल.
“