बला : (क. बळगिड, चित्तमुट्टी गिड लॅ. पॅव्होनिया झेलॅनिका कुल-माल्व्हेसी). सु. ०.०६ — १.२५ मी. उंचीचे हे बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) क्षुप (झुडूप) आफ्रिकेतील उष्ण भाग, मॉरिशस, श्रीलंका, सिंध व भारत ह्या प्रदेसात सामान्यपणे आढळते. भारतात दख्खन, गुजरात व सौराष्ट्र येथे हे विशेषेकरून सापडते. याची पाने साधी, गोलसर, हृदयाकृती, त्रिखंडी, दातेरी व केसाळ असून देठावर चिकट केस असतात. फांद्या बारीक व शूलाकृती फुले गुलाबी, पानांच्या बगलेत, एकाकी व नोव्हेंबर ते डिसेंबरात येतात. संवर्त पेल्यासारखा, संदले भाल्यासारखी पुष्पमुकुट अपिसंवर्तापेक्षा (संवर्ताच्या खाली असलेल्या उपांगापेक्षा) लांब आणि छेदक (फुलाच्या तळास असलेली उपांगे) ८-१२ किंजदले पाच, सपक्ष, सुर- कुतलेली व बाहेरून गोलसर [→फूल]. शुष्क फळ दीर्घस्थायी अपिसंवर्ताने वेढलेले असते बिया लहान व पिंगट काळ्या. याची इतर सामान्य शारीरित लक्षणे ⇨ माल्व्हेसी कुलात (भेंडी कुलात) व वर्णिल्याप्रमाणे
असतात. ह्या झाडापासून उत्तम प्रतीचा धागा मिळतो तो नरम पांढरा शुभ्र व बारीक पोताचा व ⇨ अंबाडी व ⇨ ताग (ज्यूट) यांच्यासारखा असतो. ही वनस्पती कृमिघ्न (कृमिनाशक) व रेचक म्हणून वापरतात.
सुगंधी बला : (काळा वाळा गु. काळो वाळो क. मुदिवला सं. उदीच्य लॅ. पॅ. ओडोरॅटा). वलाच्याच वंशातील ही दुसरी जाती श्रीलंका, सिंध, बलुचिस्तान व भारत येथे सामान्यपणे सर्वत्र आढळते. हे ४५-९० सेंमी. उंच, केसाळ, वर्षायू (जीवनक्रम एका वर्षात पूर्ण करणारे) व शाखित क्षुप असून याची काही लक्षणे बलाप्रमाणेच आहेत. फुले गुलाबी परंतु अधिक लांब व सुगंधी छदके १०-१२ किंजदले पंखहीन धागे व त्यांचे उपयोग वरीलप्रमाणे असून दोन्ही जातींतील धागे आखूड असल्याने व्यापारी दृष्टया महत्त्वाचे नाहीत. सुगंधी बलाची मुळे सुंगधी, स्तंभक (आकुंचन करणारी), शक्तिवर्धक, दीपक (भूक वाढविणारी), शा-मक (शांतता देणारी), वायुनाशी व ज्वरहर (तापनाशी) असून आमांशा-वर गुणकारी असतात. पाने खाद्य सर्वच वनस्पतीला कस्तुरीसारखा सु-वास येतो. ही बागेत लावतात. मुळांतील सुवासिक अर्क ‘हिना’ या अत्तरात घालतात. बला व अतिबला ही नावे माल्व्हेसी कुलातील दुसऱ्या वंशातील (सिडा) दोन जातींना लावलेली आढळतात [→चिकणा].
जोशी, गो. वि. परांडेकर, शं. आ.
“