बर्हाणपूर : मध्य प्रदेश राज्याच्या पूर्व निमाड (खांडवा) जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण व ऐतिहासिक स्थळ. लोकसंख्या १,०५.३४९ (१९७८ अंदाज). हे तापी नदीवर, भुसावळच्या ईशान्येस सु. ६५ किमी. वर वसले आहे. मध्य रेल्वेच्या मुबंई-दिल्ली या रूंदमापी लोहमार्गावरील हे एक मोठे स्थानक आहे.

खानदेशातील फारूकी वंशीय नासीरखानाने १४०० च्या सुमारास या शहराची स्थापना करून त्याभोवती भक्कम तटबंदी उभारली. बऱ्हाणपूर ही सु. दोनशे वर्षे फारूकी वंशीय राजांची राजधानी होती. अकबराने १५९९ मध्ये हे शहर मोगल साम्राज्यात सामील केले. यानंतर १६०० ते १६३५ या काळात मोगलांच्या खानदेशी सुभ्याचे हे मुख्य ठाणे होते. पेशवाईत बर्हामणपूर हे मराठ्यांकडेच होते. पेशवेकालीन कमविसदार भुस्कुटे यांचे येथील वाडेही पाहण्यासारखे आहेत. १८०३ मध्ये गव्हनर्र जनरल वेलस्लीने हे जिंकलेव १८६० मध्ये ते ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात आले. आईन-इ-अकबरी या ग्रंथात या शहराचा उल्लेख ‘बगिच्यांचे शहर’ असा असून येथे काही ठिकाणी चंदनवृक्ष होते, असेही ग्रंथात म्हटले आहे.

येथील जरीकामयुक्त किनखाब पूर्वीपासून प्रसिद्ध असून ही कला अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. कापूस व तेलबिया यांचा व्यापार महत्त्वाचा असून सध्या हे कापूस पिंजणे व दाबणे, यंत्रचलित व हातमागावरील कापड, लाखेच्या कांड्या इ. उद्योगांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. मोगलकालीन पाणीपुरवठाव्यवस्था काही सुधारणांसह आजतागायत चालू आहे. शहरात अनेक शैक्षणिक संस्था व वाचनालये असून येथील महाविद्यालये सागर विद्यापीठाशी संलग्न आहेत.

येथील ऐतिहासिक स्थळांपैकी किल्ला आणि तापी नदीका-ठचा फारूकी वंशीयांचा राजवाडा हे प्रेक्षणीय आहेत. वास्तुकलेच्या दृष्टीने जामी व बीबी या मशिदी उल्लेखनीय आहेत. शाहजहानची आवडती राणी मुमताज व औरंगजेबाचा राजपूत सरदार मिर्झा राजा जयसिंग हे येथेच मृत्यू पावले. शहरापासून सु. ६ किमी. वर तापी नदीकिनारी मिर्झा राजा जयसिंगाच्या स्मरणार्थ छत्री उभारलेली आहे.

कापडी, सुलभा